28 October 2020

News Flash

नागलोलीतील आजोळचं घर

आजीचा हात पकडून आम्ही आमच्या अत्यंत लाडक्या घरात प्रवेश करायचो.

हे घर आमच्या आजोबांनी साधारणपणे सत्तर वर्षांपूर्वी बांधलं.

शाळेत असताना आमच्या उन्हाळ्याच्या सगळ्या सुट्टय़ा आमच्या आजोळी म्हणजेच ‘नागलोली’ या गावी गेल्या. हे आमचं आजोळ रायगड जिल्ह्यतील ‘दिवे आगर’ या समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गावाच्या जवळ आहे. नागलोली हे विचाऱ्यांचे गाव. आधीपासूनच आंबे व सुपारीच्या बागांसाठी प्रसिद्ध. चहुबाजूंनी डोंगरांनी वेढलेले गाव. डोंगरातून गाडी उतरत असताना दूरवर गावातील घरांची कौलं दिसायला लागत व आम्हाला कधी एकदा घरी पोहोचतो असं वाटायला लागे. नातवंडांच्या ओढीने आमची आजी घराच्या पडवीत वाट बघत बसलेली असे. आम्ही एकदाचे पोहोचल्यावर तिचा जीव भांडय़ात पडे. आजीचा हात पकडून आम्ही आमच्या अत्यंत लाडक्या घरात प्रवेश करायचो. या क्षणासाठी आम्ही वर्षभर वाट पाहिलेली असायची.

हे घर आमच्या आजोबांनी साधारणपणे सत्तर वर्षांपूर्वी बांधलं. आजही ते तितक्याच दिमाखात उभं आहे. गावचा परिसर अत्यंत रमणीय आहे. पंधराएक वर्षांपूर्वी गावात लाल मातीचा रस्ता होता. आत्ताच्या डांबरी रस्त्याला ती सर कधीच येणार नाही. कोकणातील बहुतांश गावांप्रमाणे हे गावही उतारावर वसले असल्याने, हे गाव वरची आळी व खालची आळी अशा दोन भागांत विभागले आहे. गावात नीरव शांतता असते. जी काही तुरळक रहदारी असते ती गावाबाहेरून जात असलेल्या रस्त्यावर.. या पट्टय़ातील घरं साधारणपणे एकाच धाटणीची आहेत. खालच्या आळीत असलेल्या माझ्या या घरासमोर साधारणपणे तीनशे चौ. फुटांचे छान सारवलेलं अंगण आहे. अंगणाच्या सभोवताली बसण्यासाठी बनवलेला दगडी कठडा आहे. रात्रीच्या जेवणानंतर आम्ही भावंडं येथे तासन्तास गप्पा मारायचो. भेंडय़ा खेळायचो. मला पाच मामा व एक मावशी. त्यामुळे मामे, मावस भावंडं खूप असायची. या अंगणात आम्ही विटीदांडीपासून क्रिकेटपर्यंत सगळे खेळ खेळायचो. या अंगणात उन्हाळ्यात मांडव घातला जायचा. ज्यावर सुंदर ‘शेंदरी’ रंगाची ओली सुपारी सुकत घातली जायची. मांडव घातला नसेल तर काही वेळेस आम्ही भावंडं अंगणात झोपायचो. आकाशाचा तो सुंदर निळाभोर रंग व चांदण्याची ती प्रचंड प्रमाणातली गर्दी मुंबईत कधीच दिसली नाही.

घर उतारावर बांधलं असल्याने घराचे जोते म्हणजेच प्लिंथ अंगणात चार फूट तर घराच्या उजव्या बाजूस दहा फूट इतके उंच आहे. घराच्या बाह्य़दर्शनी मजबूत लाकडी गजांचे डिझाइन आहे. पायऱ्या चढून घरात प्रवेश केल्यावर लांब-रुंद पडवी आहे. या पडवीत दोन्ही बाजूंस पाहुण्यांसाठी बसण्याची सोय आहे. एका कोपऱ्यात कणगी आहे.  कणगी म्हणजे सहा फूट उंचीची व पाच फूट व्यासाची व आतून बाहेरून शेणाने सारवलेली एक भली मोठ्ठी टोपली. या टोपलीत तांदूळ साठवला जातो. हा तांदूळ टरफलासकट असतो. नंतर तो राइसमिलमध्ये पाठवला जातो. पडवीस दोन्ही बाजूस खिडक्या असल्याने व अंगणाच्या बाजूस लाकडी गज असल्याने, पडवीत भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा असते. येथे पंखाही लावलेला नाही. ही पडवी साधारणपणे दोनशे चौ. फुटांची आहे. इथून एक पायरी वर शंभर चौ. फुटांची जागा आहे. त्या जागेस ओटी असे म्हणतात. या ओटीच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींत कोनाडे आहेत. यापैकी एका कोनाडय़ात पाहुण्यांसाठी सदैव भरून ठेवलेला पितळी तांब्या व पितळी पेला असे. एका कोनाडय़ात आजीचा पानसुपारीचा पितळी डबा ठेवलेला असायचा. एका कोनाडय़ात सुवासिक अगरबत्ती लावलेली असायची, तर शेवटच्या चौथ्या कोनाडय़ात दिवेलागणीच्या वेळेस घरभर फिरवलेली पितळी धूपदाणी ठेवलेली असे. दिवेलागणीचे ते वातावरण खूप सुंदर असे.

याच ओटीतून आतील खोलीत जाण्याचे दार आहे. आतल्या खोलीस माजघर असे म्हणतात. माजघरात एका बाजूस सुंदर असा सात फुटी देव्हारा आहे. याच देव्हाऱ्यात गणपतीची स्थापना केली जाते. गणपतीच्या आरतीला खालच्या आळीतील सगळे भावबंद, पोरंटोरं मिळून चाळीसएक जण हजर असतात. मृदुंग-झांजांच्या गजरात दणक्यात आरती होते. आरतीची खरी मजा गावीच येते. पाहुणे असल्यास जेवणाची पंगत माजघरात मांडली जाते.

माजघराच्या एका बाजूस ‘ऱ्हाटोरं’ नावाची खोली आहे. ही या घरातली बेडरूम. या ऱ्हाटोऱ्यातून माळ्यावर जायचा लाकडी जिना आहे. माळादेखील लाकडी फळ्यांपासून बनवलेला आहे. या माळ्यावर शेतीची अवजारं, खतांच्या पोती, मोठ्ठाले पितळी डबे, पेटारा, बरण्या व सुंदर नक्षीकाम असलेला लाकडी पाळणा असं बरंच काही ठेवलेलं असे. या माळ्याचा उपयोग लपंडावाच्या वेळेस लपून बसण्यासाठी हमखास व्हायचा, पण थोडय़ाच वेळेत घाम फुटायचा व आम्ही खाली परतायचो. ऱ्हाटोऱ्याला तीन खिडक्या आहेत. त्यातील एक खिडकी बाहेरील पडवीत उघडते तर उर्वरित दोन खिडक्या घराबाजूस असलेल्या छोटेखानी बागेत उघडतात. या बागेत आजीने लावलेली छान फुलझाडं आहेत.

माजघराच्या एका बाजूस जसं ‘ऱ्हाटोरं’ आहे तसं दुसऱ्या बाजूस एक खोली आहे. या खोलीस ‘खोली’ असंच म्हणतात. या खोलीसदेखील ऱ्हाटोऱ्यासारख्या खिडक्या आहेत. या खोलीत एक वापरात नसलेली मोरी आहे. याचं प्रयोजन असं की घरातील बाळंतिणीला व वयोवृद्धांना लघुशंकेसाठी बाहेर जायला लागू नये. आधीच्या काळात शौचालय घरी बांधण्याची पद्धत नव्हती. या खोलीत साठवणुकीचे डबे व पिंपं असतात. इथेच घरी खाण्यासाठी असलेल्या आंब्याची आढी पसरली जाते. खोलीचं दार उघडताच आंब्यांचा दरवळ पूर्ण घरभर पसरत असे. गावाला आंबे, फणस, काजू, जांभळं, रातांबे, केळी, चिंचा, आवळे, करवंद मुबलक प्रमाणात असत. दिवसभर आम्ही या मेव्याचा फडशा पाडत असू.

माजघरातून दोन पायऱ्या खाली उतरून स्वयंपाकघर आहे. तेथे एका कोपऱ्यात  मोठी चूल आहे. फोर बर्नरची चूल. आता सणासुदीलाच यावर स्वयंपाक होतो. सोयीसाठी किचन प्लॅटफॉर्म हल्लीच बांधला आहे. कोपऱ्यात पाटा-वरवंटा ठेवला आहे. तोदेखील क्वचितच वापरला जातो. पाटा-वरवंटय़ावर केलेल्या वाटणाची सर मिक्सरमध्ये केलेल्या वाटणाला नाही. स्वयंपाकघराच्या दोन्ही बाजूंस खिडक्या आहेत. एका भिंतीत फडताळ आहे. त्यात भाजी-भाकरीपासून दुधापर्यंत सगळंच स्टोअर केलं जायचं. आता फ्रिज आला. विशेष न दिसणारं शिंकाळंही होतं.

घरी कायम नखरे करणारे आम्ही, गावी पानात पडेल ते भरपूर व आवडीने खायचो. घरी मुश्किलीने दोन चपात्या खाणारे आम्ही, गावी चपातीपेक्षा दुप्पट मोठय़ा तांदळाच्या भाकऱ्या दिवसातून तीन वेळा खायचो. गावची ओढ, तेथील वातावरण, भावंडांचा सहवास, पाटा-वरवंटा व चुलीवरील स्वयंपाक, विहिरीचं चविष्ट पाणी, पितळी भांडी, आजीची माया. कारण काहीही असो.. गावचं जेवण केवळ अप्रतिम असतं.

स्वयंपाकघराच्या दोन पायऱ्या खाली उतरून मागची पडवी आहे. या पडवीच्या एका बाजूस बाथरूम आहे तर दुसऱ्या बाजूस आणखी चूल आहे. या चुलीवरही स्वयंपाक केला जातो, पण मुख्यत्वे येथे अंघोळीचे पाणी तापवले जाते. याच पडवीत एका कोपऱ्यात रात्रीस मोठय़ा टोपलीखाली कोंबडय़ा झाकून ठेवल्या जात. या पडवीला घराचे मागचे दार आहे. तीन पायऱ्या खाली उतरलं की घराचं मागचं अंगण आहे. या पायऱ्यांवर आम्ही न्याहारीची भाकरी दुणून खायचो. दुणून म्हणजे भाकरी अर्धी फोल्ड करून त्यात कांदा सुकटची भाजी, लसणाची झणझणीत चटणी व पापडाचा चुरा पसरवून खाणं. या खाद्य प्रकाराला तोड नाही. गावी खारी, बटर, बिस्किटे असे लाड नव्हते.

मात्र इथे बसून खाताना काळजी घ्यावी लागते, कारण परसातल्या झाडांवरचे कावळे उडता उडताच हातातली भाकरी नाही तरआंब्याची फोड लंपास करतात व शांतपणे झाडावर बसून खातात. मागचं अंगणही छान सारवलेलं आहे. मध्यभागी एका मोठय़ा चौथऱ्यावर सुंदर तुळशीवृंदावन आहे. या अंगणाच्या एका कोपऱ्यात शेतकामाची साधनं तसेच गुरांचं खाद्य ठेवलेलं असतं. या अंगणातही कधी कधी मांडव घातला जातो.

संपूर्ण घर हे कौलारू आहे. कोकणातील मुसळधार पावसापुढे स्लॅब तग धरत नाहीत. घरातील सगळ्या खोल्यांना अगदी मुख्य प्रदेशद्वारालाही काही दोनखापी मजबूत लाकडी दरवाजे आहेत. घर उतारावर बांधले असल्याने बऱ्याच लेव्हल्सवर आहे. घराचा मुख्य दरवाजा माजघराचे दरवाजे, स्वयंपाकघराचा दरवाजा व मागील दरवाजा एकाच रेषेत आहेत. गावाला दरवाजे केवळ रात्री झोपतानाच बंद होत असल्याने खूप छान क्रॉस व्हेंटिलेशन होते. घर बांधताना हवामानाचा, दैनंदिन गरजांचा, शेतकामाच्या गरजांचा उपलब्ध असलेल्या बांधकाम साहित्याचा पूरेपूर विचार केलेला दिसून येतो. घराचा लेआउट प्लॅन छान आहे. इतकंच काय, मागील अंगणास लागून असलेले परसदारही योग्य प्रकारे वापरले गेले आहे. या परसात आंब्याची भली मोठी आठ-दहा झाडं आहेत. या परसाला एक छोटंसं प्रवेशद्वार आहे व सभोवताली करवंदाला सुक्या जाळीचं कुंपण आहे. करवंदाची जाळी वापरण्याचं कारण म्हणजे करवंदाच्या झाडाला मोठे काटे असतात. म्हणूनच या फांद्या वापरल्याने भटकी गुरं आत येत नाहीत. यात मेंदीच्या झाडाचा देखील वापर केलेला दिसतो. याच परसात एकेकाळी पंधरा वीस गुरं बांधलेली असत. यात गाई, म्हशी, खुलगे (रेडे), खोंड (छोटे कौल), कालवडी (छोटय़ा गाई), रेडकं, बैल जोडय़ा असं बरंच काही असे. शेतकामाची बैलजोड वेगळी तर शर्यतीची किल्लारी बैलजोड वेगळी असे. नेहमीच्या बैलगाडीव्यतिरिक्त एक पिंप बसवलेली नदीवरून पाणी आणण्यासाठीची बैलगाडी होती. शर्यतीसाठी आणलेला छकडा होता. सुंदर किल्लारी बैलजोडी जोडलेल्या छकडय़ाची शान काही औरच असते. हा छकडा पळवण्यासाठी आम्ही दिवे आगरच्या समुद्रकिनाऱ्यावर जायचो. त्यावेळचा दिवे आगरचा समुद्रकिनारा निर्मनुष्य असायचा. तेव्हा ते पर्यटन स्थळ झालं नव्हतं. बैल धावत असताना छकडा छकडय़ाची चाकं हवेत उचलली जात. अशा वेळेस त्या चार फूट बाय चार फूट इतक्या छोटय़ाशा हौदात, कठडा पकडून बसणं हा एक प्रच्ांड थ्रिलिंग एक्सपिरीयन्स असायचा. त्यावेळी बैलांची नावं निशान, पतंग, हिरा, मोऱ्या अशी असायची व गायींची नाव मंगळी, सोनी, कपीला अशी असत. बिचाऱ्या म्हशींना व रेडय़ांना मात्र लाडाने कोणी नावं ठेवलेली आठवत नाही. सगळ्या गुरांना अगदी पोटच्या मुलासारखं सांभाळलं जायचं. माझ्या आईच्या लहानपणी घरी एक गडी होते. त्यांना सहदेवमामा म्हणत. त्यांनी एकदा चरायला नेलेल्या गाईला चक्क वाघाच्या जबडय़ातून सोडवून आणलं होतं. लहानपणापासून वाढवलेल्या गाईसाठी ते प्रत्यक्ष वाघाशी लढले होते.. अशी ही माया.

सभोवतालचे डोंगर चढणे हा आमचा छंद होताच, पण आम्हा काही भावंडांचा एक जगावेगळा छंद होता. तो म्हणजे- संध्याकाळी गुरांना पाण्यावर घेऊन जाणे. पण आम्ही चालत नसू तर चक्क खुलग्यांच्या पाठीवर बसून डुलत डुलत जात असू. यमासारखे रेडय़ाच्या पाठीवर बसून जाणारे आम्ही फारच विनोदी दिसत असू, यात शंकाच नाही. त्या शांत, प्रेमळ खुलग्यांची आजही आठवण येते.

या गुरांसाठी परसात एका कोपऱ्यात कौलारू वाडा होता. या वाडय़ात दुभत्या गायी व वासरं बांधलेली असत. या वाडय़ालगतच साधारणपणे शंभर स्क्वेअर फुटांचा पुरुषभर खोल खड्डा आहे. यास ‘शेणकी’ म्हणतात. या शेणकीत सगळं शेण साठवलं जाई. संपूर्ण घर शेणाने सारवलेलं असल्याने शेणाची खूप गरज भासते. तसंच शेणखत म्हणूनही वापरलं जातं. शेणकीला लागूनच एक छोटासा मळा आहे. या मळ्यात केवळ घरी खाण्यासाठी लागणाऱ्या भाज्या पिकवल्या जातात. या भाजांची चव मुंबईतल्या भाजांना येत नाही. या मळ्याच्या बाजूला गुरांच्या चाऱ्यासाठी बांधलेली मेढी आहे व त्या समोर चुलीसाठी लागणारे सरपण साठवण्यासाठी सुक्या झावळ्यांपासून शाकारलेली खोपी आहे. या खोपीचं डिझाइन इतकं अचूक आहे की मुसळधार पावसातही खोपीतली लाकडं अजिबात ओली होत नाहीत. या परसात बैलगाडय़ा उभ्या केलेल्या असत व दुपारी त्या बैलगाडय़ांमध्ये आमचे बालउद्योग अविरत चालू असत.

गावी आमची एक मोठ्ठाली सुपारीची बाग आहे. या पुलंच्या अंतू बरवाच्या भाषेत सांगायचं तर ‘अगदी एअरकंडिशन्ड’. या बागेत एक मोठी विहीर आहे. याच विहिरीतून बागेला पाणीपुरवठा होतो. या विहिरीत पोहणे हा आमचा फावल्या वेळेतला उद्योग असे. या बागेला लागूनच कमळांनी भरलेलं तळं आहे. या तळ्यात पडलेलं सुपारीच्या झाडांचं प्रतिबिंब अप्रतिम दिसतं. पुढे एक नदी आहे. या नदीला ‘कोंडी’ म्हणतात. खरं तर कोंडी म्हणजे साठलेलं पाणी. या कोंडीवर संपूर्ण गावच्या गणपतींचं वाजतगाजत एकत्र विसर्जन होतं. याच्या आजूबाजूला पसरलेल्या करवंदांच्या जाळीतून करवंद खात भटकणं खूप आठवतं. आजकालची मोबाइल व टॅबमध्ये तोंड खुपसलेली पिढी पाहिली की खूप वाईट वाटतं. चाकरमानी गावाला आले असल्याने गावात कोणाकडे तरी सत्यनारायणाची पूजा असे. लाऊड स्पीकरवर गाणी लावली जात. त्यातील ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे गाणं आजही कुठे कानावर पडलं तर हटकून गावाची आठवण येते. आमच्यासाठी पूजेचं मुख्य आकर्षण म्हणजे पूजेच्या रात्री व्हिडीयोवर दोन चित्रपट दाखवले जात. एक हिंदी व एक मराठी. सलग दोन चित्रपट बघितले जात. कारण त्यावेळेस टी. व्ही.चं प्रमाण कमी होतं. कमी कसलं, अत्यल्प होतं.

आमच्या श्रीवर्धन, हरिहरेश्वर व दिवे आगर या गावी फेऱ्या व्हायच्याच, पण आमचं आणखीही एक अत्यंत आवडत ठिकाण होतं. ते म्हणजे-नागलोलीच्या अगदी जवळ असलेल्या ‘देवखोल’ या गावातील प्राचीन पांडवकालीन शिव मंदिर. या मंदिराची आख्यायिका अशी की, हे मंदिर पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात एका रात्रीत बांधून काढलं. देवळाचा परिसर मोठा रमणीय आहे. बाजूला एक छोटासा झरा आहे. सभोवताली गर्द वनराई आहे. देवळाला लागूनच लाल चिऱ्यांनी बांधून काढलेला हौद आहे व परिसरात छोटी तीन-चार मंदिरं आहेत. जीर्णोद्धाराच्या नावाखाली देवळाचं रिनोवेशन झालं खरं, पण देवळाचं आधीचं कौलारू रूप अतिशय भावणारं होतं. या परिसराचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे थोडंसं खोदल्यावर देवी-देवतांच्या कोरीव काम असलेल्या दगडी मूर्त्यां सापडतात. कदाचित खोदल्यावर देव सापडतो म्हणून की काय या गावाचे नाव ‘देवखोल’ असे पडले असावे. अशा सापडलेल्या मूर्त्यां देवळाबाहेर रांगेने रचून ठेवल्या आहेत. या कुसुमेश्वर देवस्थानी एका अनामिक व पवित्र शांततेचा अनुभव येतो व येथून पाय निघत नाही. थोर पक्षीशास्त्रज्ञ मारुती चितमपल्ली यांनी देवखोल परिसराचे व दिवे आगर गावाचे त्यांच्या ‘चकवाचारण’ या पुस्तकात सुंदर वर्णन केलं आहे.

सुट्टीचा दीड महिना कसा संपायचा ते कळायचंच नाही व एक दिवस बाबा आम्हाला घ्यायला यायचे. जाताना डिक्कीत घरचे तांदूळ, आंबे, कोकम, फणस, सुकी खारी मासळी असा सगळा कोकणचा मेवा खच्चून भरलेला असायचा. आजी तिचा हात आमच्या तोंडावर फिरवून, डोळ्यांत पाणी आणून निरोप द्यायची व गाडीने उडवलेल्या लाल धुरळ्यामुळे  दिसेनाशी व्हायची. आणि आम्ही खिन्न मनाने मुंबईस परतायचो. पुढचे दोन दिवस स्वत:चंच घर वेगळं भासायचं व गावचं घर डोळ्यांसमोर नाचायचं.

आता आजी नाही, त्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ाही नाहीत. त्यामुळे गावाला जाणंही होत नाही. तरीही गणपतीला व शिमग्याला गावी जाण्याचा पूरेपूर प्रयत्न करतो. गणपतीत हिरवे चिंब गाव व गणपतीचं देखणं रूप तर शिमग्याला पालखीतील देवाची प्रतिमा डोल्यांत साठवतो.

कामाच्या व्यापामुळे एखाद्या वर्षी गावी जाणं होत नाही आणि मी मुंबईत चुकचुकत राहतो. गावचं घर डोळ्यांसमोर  नाचायला लागतं व मी पुढील गणपतीची किंवा होळीची वाट पाहतो, पुन्हा गावी जाण्यासाठी!

अजित सावंत ajitsawantdesigns@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2017 2:10 am

Web Title: house in nagaloli village
Next Stories
1 वार्षिक सर्वसाधारण सभेची मुदत ३० सप्टेंबपर्यंत
2 उद्यानवाट : गुलाब
3 वास्तु-प्रतिसाद : रेरामुळे बिल्डर लॉबीला चाप
Just Now!
X