डॉ. मिलिंद पराडकर discover.horizon@gmail.com

पाणी हे जीवन आहे, याविषयी जगभरातील संस्कृतींमध्ये एकमत आहे. किंबहुना, गुहेतून बाहेर पडलेल्या आदिमानवानं जेव्हा आपलं पाऊल संस्कारित आयुष्याच्या दिशेनं उचललं त्यावेळी त्याचा पहिला पडाव बहुधा पाण्याकाठीच पडला असावा. जगभरातील संस्कृतींचे पायठसे, सर्वकाळ वाहणाऱ्या जलस्रोतांच्या तीरावर उमटलेले आहेत. माणसानं जीवनाची सुरुवात शिकारी म्हणून केली. या कठीण कालखंडात, ओल्या मातीत पडलेला धान्याचा दाणा शतमुखी होऊन धरित्रीबाहेर डोकावतो हे बहुधा योगायोगानं त्याच्या ध्यानी आलं अन् त्याच्यासाठी जणू उजाडलं. पाण्याच्या जवळिकीने निखळ शिकाऱ्याचा नकळत शेतकरी झाला होता. मग धान्यासोबत हा माणूसही नदीकाठी रुजला. फुलीफळी वोळून आला. जगभरातील जीवनवाहिनींचे तीर नानापरींच्या संस्कृतींच्या पावलांनी गजबजून गेले.

Nagpur, Smartphones, parents,
‘पाल्यांच्या कोवळ्या मनातील सुप्त प्रश्नांची उत्तरे पालकांनीच शोधावी’
book review the beast you are stories by paul tremblay
बुकमार्क : आजच्या काळातील भयकथा
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?

आपल्या या देशाची गतही काही वेगळी नव्हती. हिमालयातील उदंड जलसंपत्ती सवे घेऊन पर्वतरांगा उतरणाऱ्या सिंधु-सरस्वती अन् त्यांच्या लेकींनी एक संपन्न संस्कृती त्यांच्या कुशीत जोगवली. स्वत:च्या जीवाचे संरक्षण करावे ही तर कुणाही प्राण्याची नैसर्गिक भावना. मग बुद्धिमत्तेच्या देणगीमुळे निसर्गचक्राचा शिरोभाग बनलेल्या माणसानं स्वत:चं अन् स्वत:च्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी वेगळी वाट चोखाळली. या देशीचं सांगायचं झालं तर, सिंधु-सरस्वतीच्या खोऱ्यात पाय रोवलेल्या आपल्या या पूर्वजांनी तिथं दुर्गरूप नगरं रचली. अक्षरश: शेकडो अतिप्राचीन मानवी वसाहती पुरातत्त्वज्ञांना या खोऱ्यात सापडल्या आहेत. मानवी वास्तव्याचे हे सारेच ठाव दुर्गरूप आहेत. विटांच्या तटबंदीने संरक्षिलेले आहेत. मात्र याही वेगळी जगाआगळी गोष्ट म्हणजे या अवघ्या वसाहतींमध्ये केली गेलेली जलसंधारणाची, जलनियोजनाची, जलवितरणाची अन् मलनिस्सारणाची व्यवस्था केवळ अनन्यसाधारण म्हणावी अशीच आहे.

उदाहरणच द्यायचं झालं तर कच्छच्या रणात वसलेल्या धोलावीरा या दुर्गरूप असलेल्या सिंधूसंस्कृतीपूर्व नगरातील जलव्यवस्था थक्क करणारी आहे. दगडी बांधकाम असलेल्या कालव्यांचं जाळं अन् विस्तीर्ण तलाव यांनी ही जलव्यवस्था परिपूर्ण केलेली आहे. उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या एका जलप्रवाहावर जागोजागी बंधारे बांधून त्याआधारे तत्कालीन अभियंत्यांनी जवळपास सोळा तलावांची निर्मिती केली आहे. हे सोळाही तलाव खडकात कोरलेले आहेत आणि खडकातच कोरून काढलेल्या पन्हळींनी एकमेकांशी जोडलेले आहेत. कच्छच्या रणाचा वैराण अन् निरतिशय कमी पावसाचा प्रदेश लक्षात घेता ही रचना करणाऱ्यांचं भौगोलिक ज्ञान आणि बुद्धीवैभव आपल्या ध्यानी येऊन आश्चर्यानं मुग्ध व्हायला होतं.

मोहेंजो-दारो, हडप्पा यांसारख्या दुर्गरूप शहरांमध्ये शंभरांहून अधिक विहिरी सापडल्या आहेत. तेथलं सार्वजनिक स्नानगृह विख्यात आहे. एकमेकांना काटकोनात छेद देणाऱ्या मार्गाच्या दोहो बाजूंना पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत जलविसर्गाची योजना केलेली आहे. प्रत्येक चारसहा घरांमागे एक विहीर आहे. प्रत्येक घरात स्नानगृह आहे. त्यातील पाणी बाहेर काढून ते जलविसर्ग योजनेला जोडलेले आहे. हे सारे साफ करण्यासाठी जागोजागी उच्छ्वास दिलेले आहेत. पाणी मुरण्यासाठी शोषखड्डे आहेत. पावसाचं पाणी गोळा करणारी आणि मलनिस्सारणाची योजना आहे. हे सारं इतकं योजनापूर्वक केलेलं आहे की, यावर विचार करू जाता एकविसाव्या शतकातही थक्क व्हायला होतं.

वेदसाहित्यापासून ते नंतरच्या कालखंडात रचलेल्या लिखित साहित्यात जळाविषयी असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेचं मूळ हा जणू या सिंधूशहरांनी या देशाला दिलेला अद्वितीय म्हणावा असा वारसा आहे!  पणींनी, दस्युंनी वा असुरांनी बांधून ठेवलेले जलसाठे बांध फोडून मोकळे कर, अशा अर्थाच्या प्रार्थना ऋग्वेदामध्ये इंद्राला उद्देशून केलेल्या आहेत. यातून घेण्याजोगा अर्थ असा की, सिंधुसंस्कृतीतल्या मानवसमूहाचं जलनियोजन इतक्या उत्कृष्ट पद्धतीचं होतं की, त्यांच्यावर मात करण्यासाठी त्यांचे जलसाठे उद्ध्वस्त करावे लागले.  ऋग्वेदातील हे उल्लेख बहुधा सिंधूशहरांना उद्देशून केलेले असावेत. शत्रूचे पाणीसाठे ताब्यात घ्यावेत व उद्ध्वस्त करावेत याप्रकारची नीती तर आधुनिक युद्धशास्त्रातही अंगीकारली जाते.

सनपूर्व ८००-७०० या दरम्यान लिहिल्या गेलेल्या काश्यपीयकृषीसूक्तामध्ये जलसंधारणाचा विषय मोठय़ा विस्ताराने चर्चिला गेला आहे. वैशिष्टय़ म्हणजे, यात हा सूक्तकर्ता पावसाविषयी काहीच बोलत नाही. सूक्ताच्या एकशे ऐंशी श्लोकांमध्ये तो जलाच्या इतर स्रोतांविषयीच विवरण करताना आढळतो. जलाशयांची योजना, त्यांचे आकार, त्यांच्या दिशा, त्यांवरचे बंधारे, कालवे व त्यांची लांबी, रुंदी, त्यांचे प्रकार, विहिरी खणताना घ्यायची काळजी, त्यांचा पाया, त्यांच्या िभती, त्यातून पाणी उपसताना वापरण्याची साधने या साऱ्यांची सांगोपांग चर्चा या सूक्तकर्त्यांने केली आहे.

सुश्रुतसंहिता पाण्याच्या शुद्धीकरणाविषयी व त्या संदर्भातील पद्धतींविषयी आपल्याला काहीशी वेगळीच वाट दाखवते. कोठल्या ऋतूमध्ये कोणत्या ठिकाणचं पाणी प्यावं, कोणत्या मातीतल्या पाण्याची चव कशी असते अशी अनेक निरीक्षणं सुश्रुत आपल्यापुढे मांडतात. वाग्भट, अष्टांगहृदयम् या ग्रंथांतून आपल्याला दिव्य अन् भौम अशा जलप्रकारांची अन् त्यांच्या तेरा उपप्रकारांची गुणधर्मासकट ओळख करून देतात. कालव्यांचा वापर करून हे जल सर्वसामान्यांना उपलब्ध करण्याचं तंत्र, जलस्रोतांजवळ खालच्या पातळीवर निर्माण केलेली टाकी, झऱ्यांचा शोध घेऊन त्याभोवती बांधकाम करून बंदिस्त केलेले जलस्रोत, खोलगट भागात पावसाचे पाणी साठून निर्माण झालेले जलाशय आणि नद्यांवर बंधारे घालून निर्माण झालेले फुगवटे अशा चार प्रकारच्या जलनियोजनावर या प्राचीन साहित्यात नेटकं विचारमंथन झालेलं दिसून येतं.

सहाव्या शतकात होऊन गेलेल्या वराहमिहिर या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वानं लिहिलेला बृहत्संहिता हा ग्रंथ त्यांच्या अलौकिक निरीक्षणशक्तीचा अन् विलक्षण बुद्धिमत्तेचा जणू आरसाच आहे. ढगांची व पावसाची कारणे व रचना, त्यामागील आकाशस्थ ग्रहांची कारणपरंपरा या साऱ्याचाच त्यांनी मोठय़ा विस्तारपूर्वक ऊहापोह केला आहे. बृहत्संहितेमधलं दकार्रगलम् हे सबंध प्रकरण भूमिगत जळाचा शोध कसा घ्यावा व त्यासाठी भूमीवर कोणकोणती लक्षणे दिसून येतात याविषयी सांगोपांग चर्चा करतं. कोणत्या वनस्पती, कोणत्या लता-वेली, कोणते वृक्ष, कोणत्या रंगाचे खडक, कोणते कीटक, कोणते पक्षी, कोणते पशु, कोणत्या रंगाची माती अशा साऱ्याच लक्षणांचा विस्तृत विचार करून भूमिगत जळ कोठे सापडेल हे वराहमिहिर निश्चितपणे सांगतात. जलव्यवस्थापनाच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेतील जलशोधन ही जी पहिली पायरी. त्याचा शास्त्रोक्त पाया वराहमिहिरांनी रचला एवढं आपल्याला तर्कशुद्धपणे सांगता येतं.

प्राचीन काळी आभाळातून कोसळणाऱ्या या देवजळाविषयी नितांत आदर ठेवून त्याचा उत्तम उपयोग स्वत:चे जीवनमान सुजलाम् अन् फलस्वरूप सुफलाम् कसे करता येईल याचा विचार पूर्वसूरींनी निश्चितच केला होता. चरकसंहितेत ऋषिवर्य चरक एके ठिकाणी म्हणतात की, इंद्राच्या आभाळातून पडणाऱ्या पाण्याची जातकुळी एकच असते. मात्र ते ज्या स्थळी व ज्या काळी पडतं त्यावरून त्याचं रंगरूप ठरवलं जातं;

जलमेकंविधंसर्वम् पतत्यंद्रम नभस्थलात

तत्पततंपतितंचव देशकालावपेक्षते..

या जलयज्ञामध्ये दक्ष राज्यकत्रे व सुजाण जनसामान्य या दोघांचाही सारखाच सहभाग होता. महाराष्ट्रातील प्राचीन राजघराणी त्यांच्या लोकाभिमुख कार्यासाठी कायमच इतिहासाच्या लक्षात राहिली आहेत. पूर्तकर्माची म्हणजे पुण्यकृत्यांची जाणीव, ही त्यांच्या संस्कृतीचा अविच्छिन्न भाग होती. या पूर्तकर्मामध्ये जलसंधारण हा एक महत्त्वाचा विचार होता. केवळ राजघराणीच नव्हे तर धनिकांच्या अन् सर्वसामान्यांच्या दृष्टीनेही पाणी हे मोक्षमार्गाची एक पायरी समजलं जात होतं. या मताला पुष्टी देणारे नानाविध उल्लेख तत्कालीन साहित्यातून आपल्यासमोर येतात. नाना ठिकाणी सापडलेले ताम्रपट अन् शिलालेख देवदत्त जळासंबंधी वाटणाऱ्या कृतज्ञतेची तत्कालीन विचारधारा आपल्याला उलगडून दाखवतात. विख्यात चक्रवर्तीपासून ते सर्वसामान्य सेलवढकीपर्यंत असंख्यांनी टाकी-तळी बांधून जलदानाचे जे पुण्य कमावले त्यांचे उल्लेख या अशा शिलालेखांमधून अन् ताम्रपटांमधून आपली गाठभेट घेतात.

वेदकाळापासून चालत आलेली आपोदेव ही संकल्पना प्रमाण मानून समाज आजही मार्गक्रमणा करताना दिसतो आहे. तहानलेल्याच्या ओठी पाण्याचा घोट घालण्यासारखं पुण्य नाही ही धारणा आजही जनमानसाच्या मनाचा ठाव धरून आहे यातच सारं काही आलं. कळकळत्या उन्हातून धूळभरली वाट चालत असता कुण्याही गावात कुण्याही दारी उभं राहावं. न मागता, दमगीर पायावर पाणी घालण्यासाठी दारी पाण्याचा हंडा ठेवला जातो. घोंगडी अंथरली जाते अन् पाठोपाठ लखलखीत वाटी-तांब्यात गूळ पाणी येतं. यापाठीशी असलेली देवदत्त जळाची कल्पना, ज्यानं हे अनुभवलं त्यालाच असते.

भटका, शिकारी ते शेतकरी हा टप्पा मानवानं ओलांडायला बराच काळ घेतला. प्राचीन शहरं, गावं, खेडी ही मानवी वसाहतींची सारीच ठिकाणं जळाचे ठाव पाहूनच वसवली गेली. बारमास वाहणारे जलस्रोत हाच स्थायी वस्ती करण्याचा पहिला मापदंड ठरला. हळूहळू हा माणूस शेतकऱ्याचा व्यापारी झाला. त्या व्यापाऱ्यांतून श्रेष्ठी निर्माण झाले. त्यांनी व्यापार वाढवला. मग त्या वाढलेल्या व्यापारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा निर्माण झाली. कालांतराने त्या यंत्रणेच्या शीर्षस्थानी ‘राजा’ ही संकल्पना आरूढ झाली. या अवघ्याची जबाबदारी ही राजाकडे आली. आणि मग व्यापाराच्या, व्यापारी मार्गाच्या आणि पर्यायाने एतद्देशीय संस्कृतीच्या संरक्षणासाठी निरनिराळ्या राजकुलांनी, निरनिराळ्या कालखंडात, निरनिराळ्या प्रकारच्या दुर्गाची निर्मिती केली.

सह्याद्रीच्या उत्ताल पर्वतरांगांच्या शिखरांवर बुलंद दुर्ग उभारले गेले आहेत. जवळपास तीनशे दुर्गलेण्यांनी सह्याद्रीची मस्तके सजली आहेत. गोष्ट कौतुकाची म्हणा वा आश्चर्याची, बहुधा या साऱ्याच दुर्गावर जिवंत भूमिगत पाण्याचे ठाव आहेत. त्यांना वाट देऊन व ते बंदिस्त करून या साऱ्या दुर्गावरली पाण्याची प्राथमिक गरज भागविण्यात आलेली आहे. पाच हजार फुटांवर उंची असलेला साल्हेरचा दुर्ग, महाबळेश्वराएवढय़ा उंचीचे पुरंदर, तोरणा, प्रतापगड, राजगडासारखे उत्तुंग दुर्ग, किंबहुना सह्याद्रीतील, दक्खनच्या पठारावरील वा सिंधूसागराच्या  लाटांशी झुंज घेत असलेले सारेच दुर्ग आणि त्यांमधील भूमिगत वा आकाशस्थ जलाचे जलसाठे गेली अनेक सहस्रकं तहानलेल्या जीवांची तहान भागवताहेत. वराहमिहिरांची बृहत्संहिता येथे कामी आलेली आहे असा साधार तर्क आपल्याला येथे निश्चितपणे करता येतो.

इतिहासपूर्व काळापासून हे अवघ्या देशभर घडत होतं. मात्र महाराष्ट्रातील दुर्गाच्या निर्मितीची सुरुवात ही बहुधा सातवाहनांच्या राज्यकाळात झाली. त्या काळी आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र अतिशय संपन्न होता. व्यापारी संबंधांतून रोमन साम्राज्य आर्थिकदृष्ट्या धुळीला मिळवण्याइतका संपन्न होता. कुलपर्वत सह्याद्रीच्या परस-अंगणातून जाणाऱ्या या व्यापारी वाटा दुभत्या होत्या. साऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची मदार जणू या वाटांवर अवलंबून होती. या अर्थव्यवस्थेला सुरक्षित ठेवण्यासाठी सन्याची आवश्यकता होती. या सन्याला राहाण्यासाठी सुरक्षित व बळकट निवाऱ्यांची आवश्यकता होती. म्हणून मग सह्याद्रीच्या मस्तकावर दुर्गाची निर्मिती झाली. त्यावर सन्याची पथकं राहू लागली. त्यांच्यासाठी त्या दुर्गावर पाण्याचे ठाव निर्माण झाले.

या तत्कालीन सोयी अगदी प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. आभाळातून पडणारं पाणी वाहून जाऊ शकणाऱ्या उताराच्या तळाशी कातळात कोरलेली टाकी अशा स्वरूपाच्या आहेत. या टाक्यांच्या जागा निवडताना काही एक विचार केलेला असतो. सह्याद्रीच्या माथ्यावर महामूर पाऊस पडतो. तेथल्या नैसर्गिक उतारांवरून वाहून जाणारं देवजळ प्रथम या टाक्यांमध्ये उतरून मगच पुढच्या प्रवासाला निघावं अशाच बेतानं या टाक्यांच्या जागा निवडल्या जातात. तेवढय़ा भागात पडणारं पर्जन्यजळ दान देऊनच पुढे जावं अशीच या टाक्यांची रचना केली जाते. यातला दुसरा प्रकार आहे तो लेण्यांच्या धर्तीवर कोरलेल्या मोठय़ा आकाराच्या स्तंभटाक्यांचा. ही बहुधा दुर्गावरल्या एखाद्या तीव्र उताराच्या तळाशी कोरलेली असत. आधारासाठी मध्ये खांब असलेला एखादा बौद्ध विहार असावा तशी काहीशी यांची रचना असते. मात्र या पद्धतीची टाकी जमिनीच्या पातळीवर नसून त्या पातळीच्या अर्धी खाली तर अर्धी वर अशा पद्धतीने कोरलेली असतात. जमिनीच्या पातळीवरून आत उतरायला पायऱ्या कोरलेल्या असतात. यांच्या समोरच्या बाजूला अजून एक टाके कोरलेलं असतं व ते भरल्यावर त्यातून होणारा अतिरिक्त जलविसर्ग या टाक्यात उतरावा अशी ही योजना असते. ही स्तंभटाकी कडय़ापोटाशी असल्यामुळे यात वाहून जाणारी माती वा काडीकचरा उतरत नाही. तो सगळा बाहेरच्या टाक्यात उतरून त्यात तळाशी जातो व निखळ पाणी आतल्या स्तंभटाक्यात अतिरिक्त जलविसर्गाच्या रूपात उतरतं. कचरा नसल्यामुळे हे पाणी कुजत नाही. पर्यायानं, अतिशय शीतल अन् निवळशंख अशा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दुर्गावरील माणसांना वर्षभर होत असतो.

कोकणातील बंदरांमधून वरघाटीच्या प्राचीन शहरांकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गाच्या परिसरात असलेले अनेक गिरिदुर्ग सातवाहनांच्या राज्यकाळात रचले गेले. बहुधा या साऱ्याच दुर्गावर आभाळातून उतरणारे देवजळ साठवण्याची उपरोक्त पद्धती अवलंबिलेली दिसते. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर दुर्गावरील जलसंधारणाचा हा पहिला यशस्वी प्रयोग म्हणता येईल. उदाहरण देताना पटकन डोळ्यांसमोर येणारं नाव शिवनेरीचं. या प्राचीन दुर्गाच्या माथ्यावर आलं की, शिवजन्मस्थानाच्या दिशेनं जाताना डाव्या हातीच्या कडय़ाच्या उताराच्या काठाला अनेक टाकी एका ओळीत कोरलेली दिसतात. ती रांग संपली की, गंगा-यमुना नावाची स्तंभटाकी उजव्या हातीच्या कडय़ाच्या पोटाशी कोरलेली दिसतात. याची साफसफाई हल्ली फारशी कुणी करत नसलं, तरी आजही या टाक्यांचा दहाबारा फुटांच्या खोलीवर असलेला तळ लख्ख दिसतो. कधी कधी यात प्लास्टिकच्या बाटल्या अन् वेफर्सची रिकामी पाकिटं तरंगताना दिसली की, इतिहासात रमलेलं आपलं मन दाणदिशी वास्तवात येतं!

इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात सातवाहनांचं

साम्राज्य अस्तावलं. मात्र त्यांनी सुरू केलेली दुर्गनिर्मितीची परंपरा त्यांच्यानंतर आलेल्या राजवटींनी तितक्याच समर्थपणे पुढे नेली. वाकाटकांनी विदर्भ गाजवलं. तर येथल्या आभीर, त्रकूटक यांच्या कारकीर्दी सातवाहनांच्या तुलनेत काहीशा अल्पजीवी ठरल्या. अंजनेरी हा दुर्ग आभिरांची राजधानी. या दुर्गावरली जलव्यवस्था सातवाहनांसारखीच आहे. मात्र त्यानंतरच्या चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, बहमनी यांनी दक्षिणदेशी विपुल दुर्गनिर्मिती तर केलीच; पण त्यासोबत दुर्गावरील जलव्यवस्थापनाबद्दल नवनवीन मानदंड प्रस्थापित केले. भूगर्भीय जळ शोधून व ते वर काढून बांधबंदिस्त करण्याची पद्धतही याच राजवटींच्या कालखंडात सुरू झाली. इथं एक सांगावंसं वाटतं की, दुर्ग या विषयावर प्राचीन काळापासून अनेक विद्वानांनी भरभरून लिहिलं. मात्र दुर्गावरील माणसं ज्याच्या आधारावर राहायची त्या जळाविषयी कुणी अवाक्षरदेखील काढलेलं नाही. हे खटकणारे आहे. वाटून जाते की, बहुधा या संदर्भातले लिखित साहित्य काळाच्या उदरात कुठंतरी गुपित झालं असावं का?

गुजरातच्या सीमेपासून ते तेरेखोलच्या खाडीपर्यंत सुमारे साडेसहाशे किलोमीटर्स लांबीचा, सत्तर-ऐंशी किलोमीटर्स रुंदीचा सह्याद्री महाराष्ट्राच्या वाटय़ाला आला आहे. त्या तेवढय़ा लांबी-रुंदीत जवळजवळ साडेतीनशे दुर्गाची गर्दी आहे. आभाळातून पाहिलं तर, दर दीड-दोन किलोमीटर्सवर एक दुर्ग दिसायला हवा असेही दुसऱ्या शब्दात सांगता येईल. यात गिरिदुर्गही आहेत अन् जलदुर्गही आहेत. उत्तरेतल्या साल्हेर-अहिवंतापासून ते दक्षिण टोकाच्या भरतगडापर्यंतचे सारे गिरिदुर्ग, तर खांदेरी-उंदेरीपासून ते सिंधुदुर्गापर्यंतचे सारे जलदुर्ग आजही जलस्रोतांनी परिपूर्ण आहेत. याला अपवाद म्हणावा असा एकही दुर्ग नाही. यांपैकी कुण्याही दुर्गावरील कोणत्याही कोपऱ्यात जावं. खात्रीनं सांगता येतं की, जिथं असाल तिथून हाकेच्या अंतरावर तुम्हाला जीवनाचा-पाण्याचा-ठाव सापडतो.

हे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असलेल्या दुर्गाचं झालं. मात्र उगवतीकडे पसरलेल्या दख्खनच्या पठारावरही अनेक बलदंड भूदुर्ग आहेत. सह्याद्रीच्या अवघड डोंगरी मुलखाची धास्ती असलेल्या मुसलमानी शाह्य़ांनी या सपाट प्रदेशात भक्कम भूदुर्गाची निर्मिती करून आपले पाय या भूमीत घट्ट रोवले. अहमदनगर, पिरडा, नळदुर्ग, औसा, विजापूर, गोवळकोंडा, बीदर, कल्याणी, चित्तूर यांसारख्या दख्खनमधल्या काही विख्यात दुर्गाची नावे यानिमित्ताने पटकन आठवतात. हे सारेच दुर्ग जळाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत. मोठमोठाले तलाव व विहिरी यांनी परिपूर्ण असणाऱ्या या दुर्गापैकी काहींमध्ये तर शहरं वसली आहेत. या बाबतीतले उत्तम उदाहरण विजापूरच्या दुर्गाचं आहे. तर नदीचा प्रवाह फिरवून तो दुर्गात घेतलेला उस्मानाबादचा नळदुर्ग हे मध्ययुगीन दुर्गामधल्या जलव्यवस्थापनाचे लखलखीत उदाहरण आहे.

शिवछत्रपतींचा कालखंड हा दुर्गाच्या जागतिक इतिहासातील सुवर्णकाळ म्हणायला हवा. साधारण अकरा हजार वर्षांपूर्वी नांदलेलं पॅलेस्टीनजवळील जेरिको शहर हा मानवी संस्कृतीच्या इतिहासातला पहिला दुर्ग. तेथपासून चालत आलेला दुर्गाचा वारसा शिवछत्रपतींपाशी येऊन थांबतो. अशा या राजाची दुर्गावरील जळाविषयी काय धारणा होती, हे शिवछत्रपतींचे अमात्यपद भूषविलेल्या रामचंद्रपंतांनी, आज्ञापत्र या नावाचा राज्यशास्त्राशी संबंधित जो छोटेखानी ग्रंथ लिहिला त्यात स्पष्टपणे उमटली आहे. त्यातील दुर्गप्रकरणात दुर्गावरील जलसाठय़ाच्या संदर्भात नोंद लिहिताना पंतअमात्य म्हणतात: गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त जाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्यकाळपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे यसी मजबूद बांधावी. गडावरी झराही आहे, जैसे तसे पाणीही पुरते म्हणोन तितकियावरी निश्चिती न मानता उद्योग करावा किंनिमित्य की, जुझामध्ये भांडियांचे आवाजाखाली झरे स्वल्प होताती आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो तेंव्हा संकट पडते याकरिता तसे जागा जखिऱ्यिाचे पाणी म्हणौन दोन चार तळी बांधून ठेऊन त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे.

या लिखाणाचा गर्भितार्थ असा की, पाणी हे तर कुण्याही दुर्गाची मुख्य गरज. ज्या स्थळी दुर्ग उभारायचा आहे, तिथं जर पाणी नसेल तर मग ते स्थळ लष्करीदृष्ट्या कितीही महत्त्वाचं असलं तरी ते कुचकामी मानायला हवं. ज्या स्थळी माणसं राहणार तिथं कायमच पाण्याची नितांत गरज भासणार. दुर्ग हे तर लष्करी ठाव. तिथं तर युद्धासारख्या कठीण प्रसंगात पाणी कायमच उपलब्ध असायला हवं. याशिवाय युद्धकाळात तोफांचे दणदणाट सुरू असतात. कधी कधी त्या दणक्यांमुळे जमिनीखालचं पाणी वाट बदलतं. जिवंत झरेही आटतात. अशी परिस्थिती जर उद्भवली तर राखणीचं म्हणून पाणी दुर्गावर असायला हवं. म्हणून मग जागोजागी टाकी तळी खोदायला हवीत. ती बांधून काढायला हवीत. कोणत्याही परिस्थितीत दुर्ग पाण्याविना तहानलेला राहता कामा नये. दुर्गावरलं पाणी अतिशय काळजीपूर्वक वापरावं. साचणीचं पाणी ग्रीष्मकाळात झाकून ठेवावं. त्यात केरकचरा, काडीकस्पट पडू देऊ नये अशाही सूचना या आज्ञापत्रात स्पष्टपणे दिलेल्या आहेत. या चारसहा ओळी म्हणजे जणू दुर्गाच्या बाबतीतलं शिवकालीन जलसूत्रच आहे.

शिवकालातील एका दस्तावेजात या संदर्भातील एक महत्त्वाची नोंद सापडते. अभिषिक्त राजधानी म्हणून रायगड मुक्रर झाल्यावर, कल्याणचे सुभेदार आबाजी सोनदेव यांना गडावर इमारती बांधण्याच्या आज्ञा सुटल्या. १६७१-७२च्या एका जाबत्यामध्ये रायगडावरील या कामासाठी, पन्नास हजार होनांची तरतूद झालेली दिसते. त्यांपैकी चाळीस टक्के रक्कम म्हणजे वीस हजार होन गडांवरील दोन तलावांसाठी वेगळे काढण्याच्या सूचना

दिलेल्या आहेत. दुर्गाच्या बाबतीत शिवकालात पाण्याला किती महत्त्व होतं हेच यातून

अधोरेखित होतं.

शिवकालीन जलसंधारणाची, ध्यानी राहावी अशी दोन उत्तम उदाहरणं रायगडावर आहेत. कुशावर्त या तलावाच्या शेजारी एक वाडा आहे. त्या वाडय़ाच्या समोर एक लहानगं कुंड आहे. त्या कुंडाच्या तोंडावर एक दगडी जाळी होती – कुणा अधमानं काही वर्षांपूर्वी ती उखडली आहे. जमिनीतील स्रोतांमधून वाहून येणारं पाणी त्यातून गाळलं जाऊन शेजारील कुंडात उतरतं. तेथून ते काही अंतरावर असलेल्या लहानशा बांधीव जलमंदिरात उतरतं. त्यातला विसर्ग कुशावर्तात उतरतो. या रचनेचं वैशिष्टय़ं असं की, पाण्याचा हा साराच मार्ग जमिनीखालून अप्रकट स्वरूपात आहे. या साऱ्या पाण्याचा स्रोत बालेकिल्ल्यात पडणाऱ्या व जमिनीत मुरणाऱ्या पावसाच्या पाण्यात आहे. दुसरं उदाहरण रायगडावरील शिवछत्रपतींच्या राजवाडय़ात आहे. तेथील संपूर्ण जलविसर्गव्यवस्था भूमिगत आहे. किंबहुना रायगडाचं जलव्यवस्थापन हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.

दुर्ग हे प्राणसंरक्षणाचं साधन. देव-देश-धर्म यांच्या अभ्युत्थानाचं साधन असा विचार प्राचीन कालापासून चालत आलेला. आपल्या देशातील सारेच दुर्ग या संकल्पनेच्या आधारावर निर्माण झाले. त्यांचं महत्त्व काळाच्या ओघात कमी कमी होत गेलं तरीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ती ओळख पुसली गेली नाही. प्राचीन काळातील या दुर्गरूप शहरांनी, नाना प्रकारच्या दुर्गानी जलव्यवस्थापनाची एक आगळी परंपरा सुरू केली. निसर्गाविषयी कृतज्ञ असलेल्या, निसर्गाची ओळख पटलेल्या मानवी संस्कृतीचा हा चेहरा निश्चितच खरा मानायला हवा. विचार करू लागलं की, ही भावना देशकालातीत आहे हे निखळपणे जाणवू लागतं. मानवी संस्कृतीच्या या अनोख्या रूपापुढं आपलं इवलंसं मन हळुवार होऊन माथा टेकतं. ऋणाईत म्हणून.!