बैठय़ा चाळी, बैठी घरे, चार मजल्याच्या इमारती आता नावापुरत्याच उरल्या आहेत. आता जी बांधकामे होत आहेत ती बहुतेक बहुमजली. त्यामुळे त्याना लिफ्ट असणे आता अनिवार्य आहे. इतकेच काय, जुन्या इमारतींनादेखील लिफ्ट बसविण्यात येऊ  लागल्या आहेत. लिफ्टकरता राज्य सरकारचा कायदा अस्तित्वात आहे. काळाची गरज म्हणून गर्दी नियोजनाचा एक भाग म्हणून आता सरकते जिने आणि सरकते पट्टे शक्य असेल तेथे कार्यान्वित करण्यात येत आहेत. लिफ्ट, सरकते जिने आणि सरकते पट्टे हे स्वयंचलित असल्यामुळे येथे कोणा कामगाराची नियुक्ती केलेली नसते. हे तंत्रज्ञान लोकांच्या अजून अंगवळणी पडलेले नाही, त्यामुळे अपघात होण्याच्या घटनाही समोर येऊ  लागल्या आहेत. सरकते जिने आणि सरकते पट्टे हे बहुतकरून सार्वजनिक जागी आणि व्यावसायिक ठिकाणी असतात. त्या संबंधी वेगळा विचार करता येईल, परंतु रहिवासी इमारतींमध्ये वापरात असलेल्या लिफ्टचा विचार करताना, त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा.

आज मोठय़ा शहरातच नाही तर बऱ्याच तालुक्याच्या ठिकाणीदेखील बहुमजली इमारती बांधल्या जात आहेत. नियमानुसार चार मजल्याहून अधिक मजल्यांच्या इमारतीसाठी लिफ्ट अनिवार्य आहे. अशा बहुमजली इमारतींची संख्या काही हजारात असेल. बहुतांश इमारतीच्या लिफ्टमध्ये लिफ्टमन नेमलेला नसतो. लिफ्टमन नेमल्यास रहिवाशांच्या मासिक खर्चात वाढ होईल आणि त्यामुळे ते लिफ्टमनची नेमणूक टाळली जात असावी. वरवर पाहता हा मुद्दा बिनतोड वाटतो. पण बारकाईने विचार केल्यास लिफ्टमनमुळे पैशाची बचतदेखील होऊ  शकते, याचादेखील विचार होणे आवश्यक आहे. शिवाय रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक जागरूक व्यक्तीही इमारतीत उपलब्ध होऊ  शकते. कारण लिफ्टमन हा लिफ्टमधून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचाली अगदी जवळून सहज टिपू शकतो. कुठलेही स्वयंचलित वाहन एकहाती चालविण्यात आले तर त्याचा देखभाल खर्च खात्रीने कमी असतो हे सत्य आहे. कारण लिफ्टसाठीची आतली आणि बाहेरची बटणे आणि दरवाजे जो तो आपल्या पद्धतीने दाबत किंवा सरकवत असतो. अनोळखी एकटा पुरुष आणि महिला दोघांनाही अशा बंदिस्त ठिकाणी फार संकोच वाटत असतो. तसेच एकटय़ादुकटय़ा महिलेसाठी आणि लहान मुलांसाठी लिफ्टमन आधार ठरतो. लिफ्टमन कायम लिफ्टबरोबर राहत असल्यामुळे लिफ्टच्या बारीकसारीक तक्रारी वेळीच त्याच्या लक्षात येतात आणि त्यावर लगेच उपाय योजले जाऊन लगेच दुरुस्ती होऊ  शकते; अन्यथा दुर्लक्षित बिघाड अखेर मोठा अपघात होण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. एकापेक्षा अनेक लोकांनी एकावेळी लिफ्टचा वापर केला तर ऊर्जा बचत होतेच आणि विजेचे बिलदेखील वाचते. लिफ्टमन त्यासाठी प्रयत्नीशील असतो, अन्यथा कोणी कोणासाठी थांबून राहत नाही. काही वेळा अनवधानाने किंवा घाईघाईत लिफ्टच्या वजन वाहून नेण्याच्या क्षमतेकडे डोळेझाक केली जाते आणि क्षमतेपेक्षा वजन जास्त झाल्यामुळे अपघात घडल्याच्या घटनादेखील होत असतात. अशा वेळी लिफ्टमन हे घडू देत नाही. आता काही आधुनिक लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन असेल तर ते स्वीकारलेच जात नाही. परंतु अशा आधुनिक लिफ्ट जेथे नसतील तेथे हा प्रश्न आहेच.

काही कारणाने लिफ्ट सुरू असताना अचानक बंद पडली तर आतील प्रवासी गांगरून जातात. अशा वेळी काय करावे हे न सुचून घाईघाईत काही तरी निर्णय घेऊन चुकीची कृती केल्यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते. अशा वेळी काय करावे हे लिफ्टमनला नीट माहिती असल्यामुळे, कोणाशी संपर्क साधावा वगैरे यथायोग्य निर्णय अशा आणीबाणीच्या प्रसंगी त्याला घेता येतो. आतील प्रवाशांना त्याचा मोठा आधार वाटतो. आधुनिक लिफ्ट बहुतकरून चारी बाजूंनी पूर्णपणे बंद असतात, अशा लिफ्टमध्येच बंद पडल्या तर आतील प्रवासी आधीच भीतीने गांगरून गेलेले असतात. अशा परिस्थितीत त्यांना शुद्ध हवेची आवश्यकता असते, लिफ्टच्या बांधणीमध्ये त्यासाठी तरतूद करण्यासाठी शासनाने नियम घालून दिले पाहिजेत.

gadrekaka@gmail.com