भिंतीवर एखादे म्युरल किंवा पेन्टिंग टांगा आणि नेहमीच्या रटाळ भिंतींना एक नवा चेहरा द्या. श्रीमंती लुक देण्याकरिता भिंतीवर टेपेस्ट्रीही टांगता येईल. भिंतीवर आपल्या आप्तांचे, प्रियजनांचे, कुटुंबाचे फोटो लावा. हे करताना स्टाइल, साइझ आणि फ्रेम्सचा क्रम या सर्वामध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहा.
भिंतींचा आकर्षक रंग घराला एक वेगळेपण देतो. घराला नवेपण द्यायचे असेल तर नवनवनीन रंगांचा योग्य प्रयोग करणे केव्हाही चांगले. आपल्या घराच्या भिंती ताज्या टवटवीत रंगांमध्ये रंगवा. त्यावर एखादे म्युरल किंवा पेन्टिंग टांगा, आणि नेहमीच्या रटाळ भिंतींना एक नवा चेहरा द्या. श्रीमंती लुक देण्याकरिता भिंतीवर टेपेस्ट्रीही टांगता येईल. भिंतीवर आपल्या आप्तांचे, प्रियजनांचे, कुटुंबाचे फोटो लावा. हे करताना स्टाइल, साइझ आणि फ्रेम्सचा क्रम या सर्वामध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहा. रंगीत फोटोंमध्ये कृष्णधवल फोटोही लावून ते कसे दिसतात हे पाहा.
रंग आणि मूड
भिंतींना लावायचा रंग निश्चित करताना त्या रंगाचा तुमच्या मूडवर कसा आणि काय परिणाम होतो याबद्दल जरूर विचार करा. एखादा रंग आवडणे आणि तो रंग कायमचा भिंतींना लावणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण त्या रंगाने तुमच्या खोलीचा चेहराच बदलून जातो. त्यामुळे रंगाच्या निवडीवर पुरेसा विचार करायला वेळ द्या. खोलीला जास्तीतजास्त ताजातवाना लुक कसा देता येईल याचा विचार करा. भिंतीवर एखादे रंगबिरंगी चित्र लावले तरी खोली वेगळी भासू लागते. अशी चित्रे रस्त्यांवर भरणाऱ्या बाजारांमध्येही सहज मिळून जातात, त्यामुळे हा पर्याय कमी खर्चीक आणि त्यामुळे विचार करण्यायोग्य ठरू शकेल. दुसरा मार्ग म्हणजे खोलीमध्ये बर्ड्स ऑफ पॅराडाइझ, अँथुरियम किंवा साध्या डेझीची फुले ठेवणे. त्यामुळे तुमचे घर अधिक आपले वाटू लागेल.
क्लासिक लुक
भिंतीचा जो भाग अधिक आकर्षक आहे त्याला जास्तीतजास्त उठावदार करण्याचा प्रयत्न करा. खोलीमध्ये एखादी बॅकड्रॉप वॉल तयार करा. ही भिंत तुम्ही घरात शिरल्या शिरल्या सर्वप्रथम तुमच्या नजरेस पडणारी किंवा दुसऱ्या खोलीतूनही दिसत राहणारी भिंत असते. त्याकरिता दगड, विटा, स्लेट आणि लाकूडकाम असे नैसर्गिक पर्याय अ‍ॅक्सेण्ट्स म्हणून शोभू शकतात. त्यामुळे बाहेरचे जगच आपल्या खोलीत आल्याचा भास होतो. तुम्हाला इतके सारे प्रयोग करण्याची इच्छा नसेल तर तुमच्याकरिता वॉलपेपर्स आणि ट्रेंडी पेण्ट्स हे पर्याय उत्तम ठरतील. ज्या खोलीत जास्त वावर असतो त्या खोलीत उबदार रंगांचा वापर करा. तुम्ही जिथे आराम करता अशा खोलीमध्ये हिरवा, निळा अशा शीत रंगांचा वापर करा. तुमच्या भिंतींना अधिक उठावदार करायचे असेल तर तुमच्यासमोर म्यूरल्स, डीकॅल्स किंवा स्टिकर्सचा पर्याय आहेच.
दिवाणखाना
अनेक रंगांचा वापर केल्याने तुमच्या दिवाणखाना अर्थात लिव्हिंग रूमला एक वेगळाच चेहरा मिळतो. त्याकरिता फ्लोरल प्रिण्ट्स वापरा, गडद रंगांचा आणि उठावदार अ‍ॅक्सेसरींचा वापर करायला कचरू नका. या सर्वामधील समतोल साधण्याकरिता तुमच्या भिंती न्यूट्रल आहेत याची खबरदारी घ्या.
सध्या प्रचलित असलेले ट्रेण्ड्स तुम्ही वापरले पाहिजेतच असे नाही. थोडय़ाफार प्रमाणावर डिजिटली प्रिण्टेड वॉलपेपरचा वापर केला तरी हरकत नाही. डस्की रेड आणि मॉव्ह ही हटकून वापरली जाणारी रंगसंगती उबदार आणि घरी आल्याची भावना करून देते.
तुम्ही राहता त्या जागेचे रूप पालटण्याचा प्रवास तितकाच संस्मरणीय असला पाहिजे. हे काम संपवायचे म्हणून संपवण्यात अर्थ नाही; कारण घराची सजावट ही अशी गोष्ट आहे जी कधीच संपत नाही. तुमची जीवनशैली, राहणीमान, आवडीनिवडी सतत बदलत असतात. आणि त्यानुसार तुमच्या घरातही नवनवीन गोष्टी येत असतात.
तुम्हाला ज्या प्रकारची वॉल आर्ट आवडते तशा वॉल आर्टने आपल्या भिंती सजवा. कलेतून तुमची वैयक्तिक आवड, रुची प्रतिबिंबित होत असतात. त्यामुळे तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टींचाच वापर करा. भिंतींना सजवताना त्यावर एखाद्या ख्यातनाम चित्रकाराचे चित्रच लावले पाहिजे. एखाद्या विशिष्ट कलर थीमचाच उपयोग केला पाहिजे किंवा सध्या प्रचलित असलेल्या ट्रेण्ड्सचाच वापर केला पाहिजे असे मुळीच नसते. तुम्ही तुम्हाला आवडतात तेच कपडे घालता, तुम्हाला आवडते तीच ज्वेलरी परिधान करता; मग त्याचप्रमाणे, तुम्हाला आवडतात त्याच गोष्टींनी तुमची भिंत सजवा. भिंतीवर लावलेले पेन्टिंग फर्निचरवर आणि डेकॉरच्या रंगाशी मिळतेजुळतेच असले पाहिजे असा आग्रह धरू नका.
तुमच्या आवडत्या गोष्टी, तुमचे आवडते रंग, आवडते फर्निशिंग, कलेच्या वस्तूंनी तुम्हाला रुचेल असे सुंदर पर्यावरण तयार करा. पण हे करताना कशाचाही अतिरेक होऊ न देण्याचे भान राखा!
इंटिरियर डिझायनर