घराची गळती ही एक अत्यंत किचकट आणि नकोशी वाटणारी समस्या. मात्र योग्यवेळी वॉटरप्रूफ्रिंग हा या समस्येवर योग्य पर्याय आहे. त्याविषयी मार्गदर्शन करणारं सदर.

लेखाचे शीर्षक वाचताना एक प्रश्न मनात येऊ शकतो आणि तो म्हणजे ‘हा काय प्रश्न झाला?’ ज्यांच्या घरात पावसाळ्यात भांडी लावावी लागतात त्यांना हा प्रश्न विचारायच्या अगोदर डोक्यावर हेल्मेट घालणं जरुरीचं ठरेल. घराची गळती हा एक अत्यंत किचकट आणि नकोसा वाटणारा विषय आहे. या प्रश्नांची खूपशी उत्तरं आपल्याला माहीत असतात, पण ती विखुरलेल्या स्वरूपात असतात. त्यांना एकत्रित करून जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो तेव्हा आपली प्रतिक्रिया ‘अरेच्या, हे असे आहे मला हे माहीतच नव्हते!’ अशी होऊ शकते. खूप वेळा ही गळती थांबवण्याचा आपण खूप प्रयत्न करतो. परंतु दर वेळेस आपण त्यात यशस्वी होतोच असे नाही. आणि म्हणूनच सोसायटीच्या वार्षिक सभेत गळती हा एक मोठा विषय चर्चेला असतो. कित्येकदा त्यातून वातावरण भयंकर तप्त होते. आरोप-प्रत्यारोप, उणीदुणी, पूर्वेतिहास वगैरे सर्वाचा ऊहापोह होतो. पण मूळ प्रश्न तेथेच राहतो. याचे एक कारण म्हणजे गळतीचा त्रास सर्वाना सारखा नसतो. काहींना जास्ती आणि काहींना कमी स्वरूपाचा असतो. व्यवस्थित वॉटरप्रूफिंग करण्याचा खर्च मोठा असतो आणि म्हणूनच ज्यांना त्याचा त्रास नसतो किंवा कमी असतो त्यांचा अशा प्रकारच्या खर्चाला विरोध असतो. त्या वेळेस त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला असतो की शेवटी आपली बिल्डिंग हे एकच घर आहे. त्याचा ढांचा एक आहे, बा पृष्ठभाग एक आहे. फ्लॅट्स हे आतले निव्वळ भिंतींनी निराळे केलेले अंतर्गत भाग आहेत. म्हणून इमारतीचा कुठलाही भाग हा खराब असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण इमारतीवर होणार. खर्च कमी करण्याकडे साधारण कल असतो व त्यातून काम नीट होत नाही. केलेला खर्च अक्षरश: पाण्यात जातो. काही वेळेस निर्णय एखाद्या एक्स्पर्टला न संबोधता ऐकीव गोष्टीच्या आधाराने घेतले जातात. परिणाम तोच होतो व मग तीच जुनी टेप वाजवली जाते. शंभर टक्के वॉटरप्रूफिंग होऊच शकत नाही. किंवा आपल्याकडे पाऊस एवढा आहे की कुठचेही वॉटरप्रूफिंग यशस्वी होऊ शकत नाही. अमेरिकेच्या काही भागांत आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पाऊस आहे. पण तिथे लीकेजचा त्रास पाहण्यात येत नाही.

वॉटरप्रूफिंग हा विषय फार मोठा आहे. भले भले लोक या विषयाला हात घालायला घाबरतात. कारण एकच की शंभर टक्के परिणामांची खात्री नाही. या विषयाचा आवाका फार मोठा आहे. इमारत बांधणीत खूप लोकांचा सहभाग असतो. त्यातील कुणीही आपल्या कामात कुचराई केली तर त्याचा परिणाम गळतीच्या स्वरूपे दृष्टीस येतो. वॉटरप्रूफिंग ही सरतेशेवटीची इमारत बांधकामाची परीक्षा आहे. तिचे पासिंग मार्क्‍स १०० टक्के आहेत. जरी ९९ टक्के मार्क्‍स मिळाले तरी परीक्षार्थी नापास होतो. कारण गळती झाली, मग ती कितीही असो वॉटरप्रूफिंग फेल झाले असे मानले जाते. तो १ टक्का कुठूनही येऊ शकतो, पण परिणाम मात्र तोच राहतो.

उदाहरणार्थ, इमारतीच्या डिझाइनमध्ये जर पावसाच्या दिशेने खिडक्यांवर छज्जा द्यायचे राहून गेले (असे झालेले आहे) किंवा त्या दिशेने मोठे थोरले ओपनिंग्स विनायोग्य त्या खबरदारीशिवाय ठेवले तर पाणी हे येणारच. हा डिझाइनमधील दोष असू शकतो. तसेच बांधकाम करताना योग्य ते मापदंड न अनुसरता काम केले तर भेगा या पडणारच. त्याचप्रमाणे इमारतीच्या निरनिराळ्या भागावरती येणाऱ्या ताण व वजनाचे गणित चुकले तर त्याचा परिणाम भेगा पडण्यावर होऊ शकतो. आणि भेगा पडल्या की गळतीला सुरुवात होते हे आपल्याला माहीत आहे. काही भेगा या दुरुस्त केल्या तरी परत परत येतात. याचे कारण आता कळून येऊ शकेल. इमारत बांधत असताना विकासक, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअर व बांधकामावरील इंजिनीआर यांचा मुख्य सहभाग असतो. प्रत्येकाच्या हाताखाली असंख्य मदतनीस असतात. त्यातील प्रत्येकाने आपले काम चोख करणे व त्यांच्यामध्ये समन्वय असणे जरुरीचे आहे. आर्किटेक्ट व इंजिनीअर्स यांचे नकाशे निरनिराळे असतात, त्यात वेळोवेळी सुधार होत असतात. सुधारित नकाशांचा संदर्भ राखून सतत पाण्याच्या निचऱ्याचे भान ठेवणे आवश्यक असते. अन्यथा पाणी बाहेर जायच्या ऐवजी आत येऊ शकते. इमारतीचे डिझाइन व पृष्ठभागावरील नक्षीकाम यातून पाण्याचा जलद निचरा व अवरोध साध्य करता येतो.

इमारत उभी करताना भरपूर प्रमाणात शुद्ध पाण्याची जरुरी असते, पण एकदा का इमारत उभी राहिली की तिला पाण्यापासून दूर ठेवणे तेवढेच आवश्यक असते. इमारतीचे वॉटरप्रूफिंग योग्य असल्यास तिचे आयुष्य वाढते. किती वाढते? आपणा सर्वाना माहीत असलेला हुएनत्सांग हा चिनी बौद्ध भिक्षुक भारतातून आपल्या विद्याग्रहणाचा काळ संपवून जेव्हा चीनमधील शियांग या शहरी आला तेव्हा त्याने शिक्षण प्रसारासाठी तेथील राजाला मठ बांधून देण्याची विनंती केली. राजाने ती मान्य करून प्रशस्त मठ बांधून दिला. ही एक आठ मजली टॉवरनुमा बिल्डिंग असून ती आजही पूर्णपणे वापरात आहे. ही इमारत फक्त २५०० वर्षे जुनी आहे. तिच्या एवढी वर्षे टिकण्यामागे एक कारण असू शकते आणि ते म्हणजे तिचे डिझाइन, जेणेकरून मूळ इमारतीपासून पाण्याला दूर ठेवले आहे.

भले आपल्याला आपली इमारत हजार वर्षे टिकवायची नसेल, परंतु आपण आपला फ्लॅट मोठय़ा हिकमतीने, अपरिमित कष्ट घेऊन साध्य केला आहे व तो योग्य प्रकारे चांगल्या परिस्थितीत पुढील पिढीला हस्तांतरित करता आला पाहिजे. त्यासाठी आपण त्याचे वेळोवेळी नीट रखरखाव व योग्य ते व्यवस्थापन करणे जरुरीचे आहे. त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे इमारतीचे वॉटरप्रूफिंग हे व्यवस्थित स्थितीत असले पाहिजे.

वॉटरप्रूफिंग हे निव्वळ इमारतीचे आयुष्य वाढविण्यासाठीच नव्हे तर इतर कारणांसाठीसुद्धा जरुरीचे आहे. घरात गळती असेल तर पेन्टिंग्स, फर्निचर वगैरे इतर मौल्यवान वस्तूंचे नुकसान होऊ शकते. अशा दूषित जागा वापरणाऱ्यांच्या तब्येतीत फरक पडू शकतो. काम करण्याच्या क्षमतेत फरक पडू शकतो. एकंदरीत गळतीमुळे निरनिराळ्या प्रकारच्या नुकसानीला व आर्थिक तोटय़ाला सामोरे जावे लागते.

काही गोष्टी आपण लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. इमारतीचा ढांचा (Structure) एकदा का खराब झाला की आपण कितीही प्रयत्न करून त्याला मूळ पदावर आणू शकत नाही. सिमेंट हा पदार्थ वॉटरप्रूफ नसतो, त्याला वॉटरप्रूफ बनवावे लागते. अति सिमेंट किंवा पाणी वापरण्याने इमारतीत काही मूलभूत दोष निर्माण होतात व गळतीमुळे अशा इमारतीचे स्थैर्य धोक्यात येते.

पुढील काही भागांत आपण गळतीमुळे होणाऱ्या परिणामांची चिकित्सा करू या व त्यातून वॉटरप्रूफिंगचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू या.

शैलेश कुडतरकर shaileshkudtarkar81@gmail.com