घराचा हॉल, बैठकीची खोली सुशोभित करण्यासाठी पेन्टींग्ज, वॉल हँगिंग, डेकोरेटिव्ह वस्तूंची निवड केली जाते. पण ‘इनडोअर प्लॅन्ट’ – घरातलं झाड लावलं तर घरात जिवंतपणा, ताजेपणा येतो. पानांच्या हिरव्या रंगामुळे डोळ्याला थंडावाही मिळतो. गेले वर्षभर जवळजवळ २०-२५ इनडोअर प्लॅन्ट्स, त्यांच्या विविध जाती, त्या कशा वाढवायच्या, त्यांची कोणती काळजी घ्यायची, त्यांची निगा कशी राखायची हे सविस्तर बघितलं! बागेतल्या झाडांपेक्षा ‘घरातली झाडं’ जरा जास्त काळजीपूर्वक वाढवावी लागतात; ती वाढवताना बऱ्याच मर्यादा येतात. ‘इनडोअर प्लॅन्ट्स’ ही नेहमीच कुंडीत किंवा हँगिंग बास्केटमध्ये लावावी लागतात. त्यामुळेच त्यांना लागणारं पाणी, भोवतालची आद्र्रता, खत, सूर्यप्रकाश या सगळ्याचं गणित गार्डन प्लॅन्ट्सपेक्षा वेगळंच असतं! बाहेरगावी जायचं झालं तर जिवापाड जपलेली ही झाडं दुसऱ्यांकडे सोपवावी लागतात किंवा काही तरी वेगळी व्यवस्था करावी लागते. या सगळ्यासाठी काही ‘टीप्स’ पुढे देत आहे, त्या तुम्हाला ‘इनडोअर प्लॅन्ट्स’ वाढवताना नक्कीच उपयोगी पडतील.
‘इनडोअर प्लॅन्ट’ नर्सरीमधून खरेदी करण्याअगोदर आपल्या घरात ते कुठे ठेवायचे आहे, त्याच्या आजूबाजूला कोणते फर्निचर किंवा इतर कोणती वस्तू ठेवणार आहोत हे पक्कं करून घ्या. नर्सरीत पूर्ण वाढलेल्या किंवा फुलं आलेल्या झाडाची कुंडी शक्यतो घेऊ नका. कारण नर्सरीतल्या हवामानात त्याची पूर्ण वाढ झालेली असते. आपल्या घरातलं हवामान पूर्ण वेगळं असतं, त्यामुळे झाडाला, मुळांना शॉक बसू शकतो, आणि आपल्या घरात ते झाड पूर्ण आणि तजेलदार वाढत नाही. त्यासाठी झाडाचं छोटं रोप असलेली कुंडी निवडा. छोटं रोप जर प्लॅस्टिकच्या पिशवीत लावलं असेल तर ते तसेच तीन – चार दिवस घरात ठेवा. त्याला थोडे थोडे पाणी घाला, त्याला खूप वारं किंवा त्यावर प्रखर सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्या. झाडाचा आकार पूर्ण वाढल्यावर किती होणार आहे, याचा अंदाज बांधून नवीन कुंडीची निवड करा. खरं तर बरेच ‘इनडोअर प्लॅन्ट्स’ छोटय़ा कुंडीत चांगली वाढतात.
शक्यतो मातीची सच्छिद्र कुंडी वापरावी, त्यामुळे हवा खेळती राहून मुळं चांगली वाढतात. नर्सरीत आणलेलं रोप प्लॅस्टिकच्या पिशवीत असेल तर कुंडी खत मातीने अर्धी भरून घ्यावी. नंतर रोप असलेली प्लॅस्टिकची पिशवी ब्लेड वापरून काढून टाकावी. आणि मुळांसकट असलेलं रोप अलगद कुंडीत ठेवावं आणि कडेनी माती घालून कुंडी भरून घ्यावी. कुंडी मातीने पूर्ण भरू नये कारण पाणी घालताना माती बाहेर येऊ शकते. रोपांची मुळं कुंडीत पूर्ण झाकली गेली आहेत का, हे जरूर पाहा, ती उघडी राहिली तर झाड एक-दोन दिवसात वाळून जाईल. रोप कुंडीत पूर्ण ‘सेट’ होईतोपर्यंत त्याची काळजी घ्या. ‘घरातलं झाड’ असल्यामुळे कुंडीखाली खोल ताटली ठेवा. त्यात थोडे पाणी घाला, अती पाणी घातलं तर मुळं पाणी जास्त शोषून घेतील आणि कुजतील. हे टाळण्यासाठी लाकडी चौकोनी तुकडा ताटलीत ठेवून त्यावर कुंडी ठेवली तरी चालेल. लाकूड ओलं होऊन कुंडीला गारवा राहील, थोडी आर्द्रताही वाढेल. ज्या झाडांना वाढीसाठी जास्त आद्र्रता लागते, त्या झाडांवर पाणी ‘स्प्रे’ करा, पाण्याचा हलका फवारा एक-दोन दिवसाआड मारा. ‘हंसपदी’, नेफ्रोलेपीस’ यासारख्या नेच्यांना सतत गारवा लागतो. त्यासाठी रोप लावलेल्या कुंडीपेक्षा थोडी मोठी कुंडी घेऊन त्यात ओलं पीट मॉस टाका, ते सतत ओलपट ठेवा, त्यावर कुंड ठेवा.
एका ट्रेमध्ये पेबल्स टाकून त्यावर कुंडय़ा ठेवल्या आणि पेबल्सवर पाणी घातलं तरी झाडांना चांगली आर्द्रता मिळते. कुंडीतला वरचा थर कोरडा झाल्याशिवाय झाडाला पाणी घालू नका. कुंडीत पाणी जास्त घालू नका. कुंडी ठेवलेल्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत आहे ना याकडेही लक्ष द्या. घातलेलं पाणी मुळांपर्यंत पोचलं आहे की नाही याची खात्री करण्यासाठी बांबूची काडी, खराटय़ाची काडी घेऊन कुंडीच्या कडेने मातीत खालपर्यंत खोचून बघा, ती ओली झाली तर झाडाला खालपर्यंत पाणी गेलेलं आहे याची खात्री होईल. काही इनडोअर प्लॅन्ट्स’च्या पानांवर पाणी साचलं तर पानं कुजतात, त्यामुळे पाणी घालताना थोडी काळजी घ्यावी लागते. पण लांब दांडय़ाची, बारीक ‘नॉझल्स’ असलेल्या छोटय़ा ‘झारी’ने झाडाला पाणी घातले तर पानांवर पाणी साचणार नाही. काही झाडांना विशेषत: फुलं आल्यानंतर पाणी कमी लागतं, तेव्हा कुंडी ठेवलेल्या ताटलीत थोडं पाणी घातलं तरी झाडाची मुळं पाणी शोषून घेतात, पण कुंडी सतत पाण्यातच राहणार नाही याची खबरदारी घ्या. ‘ब्रोमेलियाड्स’ सारख्या काही ‘इनडोर्अस’च्या पानांवर पाणी राहिलं तरी पानं कुजत नाहीत, अशा झाडांच्या शेंडय़ांवर पाणी घातलं तर झाड जास्त टवटवीत दिसतं.
झाडाची पानं एकाएकी गळून पडायला लागली तर ते झाड टवटवीत होण्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते. प्रथम झाडाला पाणी, पातळ खत घालून एक-दोन दिवसात ते टवटवीत होते आहे का ते  बघावे. ते न झाल्यास, कदाचित मुळांभोवतालची माती कुंडीच्या कडांपासून सुटलेली असेल. अशावेळेस कुंडीतून झाड बाहेर काढून त्यात पुन्हा नवीन खत-माती घालून त्यात झाड लावल्यास ते चांगले वाढेल. किंवा धारदार चाकूने कुंडीतली वरवरची माती मोकळी करून घ्यावी, मात्र मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. नंतर कुंडी पाणी भरलेल्या बादलीत ठेवा, कुंडीतल्या मातीत बुडबुडे येतील, ते येण्याचे थांबले की कुंडी बादलीबाहेर काढा, तोपर्यंत पानांवर पाण्याचा फवारा मारा. ज्यादा झालेलं पाणी कुंडीतून काढून टाका. झाड पुन्हा ताजंतवानं होईल. पण हे असंच वारंवार होत राहिलं, तर मातीचं मिश्र बदलून पुन्हा त्यात झाड लावा. झाड दुसऱ्या कुंडीत पुन्हा लावायचे झाल्यास झाडाला एक दोन दिवस पाणी देऊ नका, माती पूर्ण कोरडी होऊ द्या. त्याचवेळेस नवीन कुंडी माती – खत मिश्रणाने पूर्ण भरून त्याला दोन-तीन दिवस पाणी द्या. नंतर पहिल्या कुंडीतून झाड अलगद काढून त्यात लावा. झाडाला पाणी दिले नसल्यामुळे कुंडी उलटी केली की मुळासकट झाड कुंडीतून बाहेर येईल. झाडाच्या फांद्या वेडय़ावाकडय़ा वाढल्या असतील तर काही फांद्या अशा तऱ्हेने कापा, की झाडाचा मूळ आकार तसाच राहील किंवा लांब दोरा घेऊन सर्व फांद्या एकत्र राहतील, फुलं येणाऱ्या जागेच्या खाली दोरा बांधा. गावाला जायच्या अगोदर झाडाला पाणी घाला आणि वरून प्लॅस्टिकची पिशवी बांधा, जेणेकरून मातीतल्या पाण्याची वाफ होऊन प्लॅस्टीकमुळे पुन्हा पाणी होऊन झाडाला मिळेल किंवा एखादी पाण्याची बाटली भरून तिच्या बुचाला एक छोटे भोक पाडून ती उलटी करून मातीत खोचून ठेवा, किंवा मोठय़ा बाटलीत पाणी भरून त्यात कॉटनच्या कापडाची चिंधी घालून तिचे एक टोक कुंडीत सोडा. ही बाटली उंचावर ठेवा, किंवा कुंडी बाथरूममध्ये ओल्या कापडी तरटावर ठेवा. घरात वेली वाढवायच्या असतील तर बांबूच्या काटक्या आणून त्यांना वेगवेगळे आकार द्या आणि त्यावर वेली वाढवा म्हणजे घराची शोभा नक्कीच वाढेल. फक्त ‘इनडोअर प्लॅन्ट्स’ वाढवायच्या ऐवजी स्वयंपाकघरात, सणावाराला लागणारी छोटी झाडंसुद्धा तुम्हाला घरी वाढवता येतील; त्याची माहिती पुढच्या वेळेपासून…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to care for indoor plants
First published on: 25-06-2013 at 01:00 IST