मंगल तुरंबेकर

घरातला आनंद अक्षय राहावा म्हणून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोक आपल्या घरात शुभकार्य आवर्जून करतात. खरीप हंगामाचं पीक चांगलं येऊन आपलं घर धनधान्यानं भरावं या हेतूनं शेतकरी पेरणीच्या कामाचा मुहूर्त करतो. लोक घर, वाहन किंवा घरासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात, पूजाअर्चा करतात, महत्त्वाचे निर्णय घेऊन एखाद्या कामाचा श्रीगणेशा करतात.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न

 युष्य जगत असताना ते आनंदानं, उत्साहानं व सकारात्मक ऊर्जेनं जगता यावं यासाठी माणसानं आपल्या जीवनात सण, उत्सव साजरे करायला सुरुवात केली असावी. भारतीय संस्कृतीत जेवढी विविधता आहे, तेवढंच सणसमारंभ साजरे करण्यात नावीन्य आहे. आपले सगळे सण निसर्गाशी नातं जोडणारे आहेत. निसर्गातील बदल आपल्या जीवनावर परिणाम करत असल्यामुळे घरात सण साजरे करताना आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी जवळीक साधण्याचा कायम प्रयत्न केला आहे.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण दरवर्षी घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा हा शुभ दिवस प्रत्येक घरासाठी जल्लोशाचा दिवस असतो. शिशिरातल्या पानगळीमुळे सृष्टीचे गेलेले चैतन्य वसंताच्या आगमनानं पुन्हा बहरू लागतं. या नवबहराचं स्वागत आनंदानं करण्यासाठी प्रत्येक घरी गुढीपाडवा उत्साहाने प्राचीनकाळापासून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. नवीन वर्षाचं स्वागत उत्साहानं, आनंदानं करण्यासाठी घरोघरी गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.

गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी।

कुळाची कीर्ती जावी दाही दिशा।।

असं गुढीपाडव्याचं वर्णन स्त्री लोकगीतांमध्ये सापडतं. यातून हेच सूचित होतं की उंच उभ्या केलेल्या गुढीप्रमाणे त्या घराची, कुळाची कीर्ती दाही दिशांमध्ये पसरावी, ते घर सुखा-समाधानाने नांदतं राहावं…

गतवर्षातल्या वाईट घटनांचे सावट घरावर राहू नये, घरात सकारात्मक ऊर्जा सतत प्रवाही राहावी व घर आनंदाने डोलत राहावे याच उद्देशाने लोक आपलं घर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज करत असतात. घरात मांगल्य, पावित्र्य, सुख-समाधान भरभरून राहावं यासाठी गुढीपाडव्याआधी साफसफाई करून घर शुचिर्भूत केलं जातं. घराला सुशोभित करण्यासाठी रंगरंगोटी, फुलांची सजावट, रोशनाई अशा बऱ्याच गोष्टी करून घराला नवं रूप देण्याचा प्रयत्न केला जातो. येणाऱ्या नवीन वर्षाला माणसांबरोबर घरही उत्साहानं सळसळत सामोरं जात असतं.

शुभ म्हणून घराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जाते. स्त्रिया दारात सुंदर रांगोळी काढून आपल्या घराचं दार, अंगण सजवतात. घराच्या सुख-समृद्धीचं, उत्कर्षाचं प्रतीक असणारी गुढी प्रत्येक जण आपल्या दारात उभी करतो. गुढी उभारताना उंच काठीला भरजरी किंवा रेशमी वस्त्र, आंब्याची व कडुलिंबाची डहाळी, चाफ्याच्या, झेंडूच्या फुलांची माळ, साखरेच्या गाठी इत्यादी गोष्टी एकत्र बांधून त्यावर धातूचा कलश उपडा घालून आकाशाकडे झेपावणारी गुढी दारात, अंगणात किंवा हल्ली घराच्या बालकणीत किंवा खिडकीत उभी केली जाते. गुढी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं आकाशाकडे झेपावत असते, तसंच आयुष्य जगत असताना आपलं घर आलेल्या संकटांवर मात करत सुख-समृद्धीच्या वाटेकडे झेपावले पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं.

गुढीला नैवद्या दाखविण्यासाठी पुरणपोळी, श्रीखंड-पुरी, बासुंदी पुरी, खीर असे गोड पदार्थ घरोघरी बनवले जातात. त्याचबरोबर चनाडाळ, कैरी, करवंद, गूळ, कडुलिंब इत्यादी पदार्थांना एकत्र करून खास कडुलिंबाचा नैवेद्याही बनवला जातो. येणाऱ्या उन्हाळ्यात घरातल्या प्रत्येकाचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून हा आरोग्यपूर्ण प्रसाद बनवला जातो. घरातले सगळे जण नवीन कपडे परिधान करून, अंगावर आभूषणे लेवून गुढीची साग्रसंगीत पूजा करतात. येणारं नवीन वर्ष घरासाठी सुखाचं यावं, येणाऱ्या अडचणींना धीराने सामोरे जाता यावं आणि गुढीसारखं प्रत्येकाचं ध्येय उच्च इच्छाआकांक्षांनी प्रेरित होऊन आकाशाला गवसणी घालणारं व्हावं अशी कामना प्रत्येक जण करत असतो. लोक आपल्या मित्र-आप्तेष्टांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन घरोघरचा आनंद द्विगुणीत करतात. खेडेगावांमध्ये आपल्या घराचं वेगळेपण दाखविण्यासाठी काही लोक सगळ्यांपेक्षा उंच गुढी दिमाखात उभी करतात. येणारं नवीन वर्ष कसं असेल हे जाणून घेण्यासाठी काही लोक आपल्या घरी पंचागाचे वाचन करतात. घरातला आनंद अक्षय राहावा म्हणून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोक आपल्या घरात शुभकार्य आवर्जून करतात. खरीप हंगामाचं पीक चांगलं येऊन आपलं घर धनधान्यानं भरावं या हेतूनं शेतकरी पेरणीच्या कामाचा मुहूर्त करतो. लोक घर, वाहन किंवा घरासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात, पूजाअर्चा करतात, महत्त्वाचे निर्णय घेऊन एखाद्या कामाचा श्रीगणेशा करतात. एखाद्याच्या घरात दु:खद प्रसंग घडला असला तरी शेजारी किंवा नातेवाईक त्या घरासाठी गुढी उभी करून नवीन वर्षाचं स्वागत करतात, जेणेकरून भविष्यात ते घर सुखा-समाधानाने नांदेल… घराचं वैभव दाखविणारी, प्रत्येकाच्या घरात सौख्य नांदावं म्हणून अभिमानाने उभी केलेली गुढी सूर्यास्तापूर्वी सगळे जण उतरवतात.

संत एकनाथ महाराजांनी म्हटलं आहे,

‘‘चाखता निजसुखगोडी। हारपती दु:खकोडी।

उभवूनि भक्तिसाम्राज्यगुढी स्वानंदजोडी जोडावी।’’

अर्थात जीवनात भक्तीसाम्राजाची गुढी माणसाने उभी केली आणि त्याला स्वानंदाची जोड दिली तर त्याच्या आयुष्यातले दु:ख दूर होऊन त्याला सुखाची गोडी चाखता येईल. त्याप्रमाणे आपल्या घराला सुखाची जोड देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनाच्या पावित्र्याची, सुखा-समाधानाची, माणुसकीची गुढी उंच उभी करावी. ज्यामुळे त्या घराच्या प्रगतीचा आलेख उंचच उंच जात राहील…

● vasturang@expressindia.com