लिखित स्वरूपाच्या इतिहासाबरोबर वास्तुरुपी राष्ट्रवैभवाचे योग्य संवर्धन करणे हे सरकार बरोबर सुजाण नागरिकांचाही कर्तव्य आहे याची समाज मनाला जाण देण्यासाठी युनेस्को तर्फे १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्ताने..

पृथ्वीवर जशी काळानुरूप नैसर्गिक स्थित्यंतर सतत घडत असतात तशी अनेक क्षेत्रात मान व निर्मित घटकातही परिवर्तन घडत असते. त्यात कलाक्षेत्राप्रमाणे सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक क्षेत्रातही जे बदल घडत आल्यास त्यात मानवाने आपल्या संस्कृतीचे मापदंड गणल्या जाणाऱ्या  कलाकृती निर्माण केल्यास त्यांना इतिहासाच्या पाऊल खुणांबरोबर धार्मिक अधिष्ठानासह सांस्कृतिक मोलही आहे. त्यातील काहींना राष्ट्राच्या अस्मितेची शान आहे. त्यात गडकोट, कमानी, राजवाडे, मनोरे, विजयस्तंभ प्रशासकीय इमारतींचा समावेश आहे.

हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक राज्यकर्त्यांनी आपल्या धर्माच्या आधारावर, तत्त्वप्रणालीनुसार लेण्या- स्तुप मंदिर, चर्च, मशीदी, मनोरे, कमानी उभारल्या त्या वारसा वास्तु गणल्या गेल्या. लिखित स्वरूपाच्या इतिहासाबरोबर या राष्ट्र वैभवाचे योग्य संवर्धन करणे हे सरकार बरोबर सुजाण नागरिकांचाही कर्तव्य आहे याची समाज मनाला जाण देण्यासाठी युनेस्को तर्फे १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो.

आपल्याकडे समाज एकसंध राहण्यासाठी कलाकृतीची मंदिरे बांधण्याचा प्रभाव यादव, शिलाहार काळापासून आहे. वारसा वास्तुप्रकारात मंदिर वास्तंचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यावरील कलाकृती ही पर्यटक, अभ्यासकांना भूरळ घालणारी आहे. परंतु दुर्देवाने या बऱ्याच मंदिरांसह, लेण्या, गुहामंदिरे, गडकोट, कमानी यांची आजची अवस्था दयनीय असून त्यांचे अस्तित्वच धोक्यात आलय. आता नवीन मंदिरे उभारताना त्यावर मार्बल, ग्रेनाईट, इ. चा साज चढवून ते सुशोभित करण्याच्या प्रयत्नात त्यांचा मुळ ढाचा, बाज, प्राचीन स्थापत्य कौशल्य नाहीसं होत चाललाय. त्यामुळे आमचा प्राचीन बांधकाम वारसाच नष्ट होतोय. आर्थिक पाठबळाच्या आधारावर नवीन मंदिर वास्तू उभारताना ज्या नवीन मंदिर वास्तू उभारल्या जाताहेत पण प्रादेशिक वास्तुकलेच्या प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होतय. आधुनिकपणा बरोबर नावीन्याची कास धरताना आम्ही आमचा वैभवशाली वारसा विसरत चाललोय हेच यातून जाणवते.

आपल्या समाज मनात प्रौढ शिक्षण, लैंगिक शिक्षण या विषयांप्रमाणे प्राचीन वारसावास्तूंचे महत्त्व आणि संवर्धनाबाबत अज्ञान, बेफिकिरी आणि उदासिनता आहे. हा विषय सर्वत्र पोचवायचा असेल तर दृक्श्राव्य माध्यमाबरोबर साध्या सोप्या भाषेतून त्यावर विपुल लेखन होणे गरजेचं आहे. तरच संस्कारक्षम विद्यार्थ्यांपासून, अशिक्षित, असंस्कृत पर्यटकांना त्यांची जाण येईल या संबंधात फिरोज रानडे, डॉ. देगुलरकर, प्रा. ढवळीकर, डॉ. माया पाटील यांचे परिश्रमपूर्वक संशोधनात्मक लेखन मार्गदर्शक असून धोक्याचा इशाराही देणारे आहे. पाश्चिमाथ्य राष्ट्रांसह इजिप्तसारख्या पुरातन वास्तू वैभवाच्या देशातील वारसासंवर्धनाच्या जाणीवेची उणीव आपल्याकडे प्रकर्षांने जाणवते.

आमची अलौकिक कलाकृतीची मंदिरे ही फक्त धार्मिक ठिकाणच नव्हती तर सभोवतालचा समाज एक संघ राहण्यासाठी ती शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्रं होती हे आम्ही ध्यानातच घेत नाही. या मंदिर वास्तूच्या व्यासपीठावरून नृत्य, किर्तन, गायन, प्रवचन, भारूड, पाठशाळा यांच्या बरोबर प्रांगणातील आठवडय़ाचे बाजार, इ. उपक्रम राबवले जात होते. बरोबरीने न्यायनिवाडा करण्याचे ते एक समाजमान्य न्यायालयही होतेच. याशिवाय मंदिर माध्यमाद्वारे वाद घालून संवादाचे हे लोकांचे एक हक्काचे ठिकाण होते. तर व्याख्यानं, प्रवचनांद्वारे लोकोपयोगी माहिती पुरवण्याचा परिपाठ तर वाखाणण्यासारखा होता. आता हे सारे इतिहासजमा होतंय.

भारतातील प्राचीन संस्कृती दर्शवणाऱ्या वारसावास्तू, लेण्या, स्तुप, इ. पाहण्यासाठी जगभरचे पर्यटक, अभ्यासक येत असतात. पण इतिहासाचे मापदंड ठरलेल्या या घटकांच्या संवर्धनाची समाजात व शासकीय पातळीवरही जाणीव नाही. याकडे होणारे दुर्लक्ष अक्षम्य असून भावीकाळात हा राष्ट्रीय ठेवा इतिहासजमा होण्याची वेळ आली आहे.

ग्रामीण भागात प्राचीन मूर्ती, विरगळ, शिलालेख रस्त्याच्या कडेला उन- पावसात तडाखे सोसत उभे आहेत, तर काही वारसा वास्तूंचे अवशेष आपल्या घरांच्या पायऱ्यासाठीही वापर करून आपली गरज भागवणारे आहेत. काही किल्ले, लेण्या, स्तंभावर खडू कोळशाने आपले नाव ठळकपणे लिहून आपण या ठिकाणी आपल्या मैत्रिणींसह भेट दिल्याचा पुरावा दर्शवणाऱ्या पर्यटकांच्या असंस्कृतपणाची कीव करावीशी वाटते. खरं तर ही पुरातन कलाकृती निर्माण करणारे कलाकार अज्ञात आहेत, पण असले आचराटाचार्य पर्यटक सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या वास्तूसौंदर्याला बाधा आणतात. जसा निसर्गाचे मोल जाणणारा पर्यटक वन पर्यटनाला हवा आहे. तसाच वारसा वास्तूचे मोल जाणणारा अभ्यासू पर्यटक असेल तरच या राष्ट्रवैभवाचे संवर्धन होईल.

परिसराचा विकास साधताना, धरण प्रकल्प निर्माण होताना प्राचीन वास्तूंना जलसमाधी लाभली याची कुणालाच खंत नाही. आपल्याकडे पुरातत्त्व खाते कायम उपेक्षितच राहिलेय. वारसा स्थळांच्याद्वारे प्राप्त होणारा महसूल अत्यल्प असेल या कारणाने या खात्याकडे गांभीर्यानी पाहिले जात नाही. देशातील वारसावास्तूंची संख्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी मंजूर निधी याचे प्रमाण तर हास्यास्पद आहे. लोप पावलेल्या अज्ञात संस्कृतीला जनमानसासमोर आणून तिच्या इतिहासासह त्यावेळच्या समाज जीवनावर प्रकाश झोत टाकण्याचे काम पुरातत्त्व अभ्यासाद्वारे होत असते. हेच पुरातत्व शास्त्राला अभिप्रेत आहे. इ.स. १७८४ मध्ये आपल्या देशात एशियाटिक सोसायटीची स्थापना करून पुरातत्व शास्त्राचा पाया घातला गेला. त्याला शास्त्रीय अभ्यासाची जोड देण्यासाठी १८६० साली आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया ही अस्थापना स्थापन करून ब्रिटिश प्रशासकांनी पुरातत्व खात्याला प्रोत्साहन दिले.

भूकंपासारख्या आपत्तीतही काही प्राचीन मंदिर वास्तूंवर परिणाम झाला नाही तेव्हा पूर्वीच्या बांधकाम तंत्रज्ञानाचा अभ्यास करून या शास्त्राच्या आधारावर इमारती बांधकामाचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा विचारही आम्हाला सूचत नाही.

वैयक्तिक छंद म्हणून काहींनी स्वत:चे वस्तुसंग्रहालय उभारले आहे. त्यांना शासकीय मान्यतेसह अनुदान दिल्यास प्राचीन वारसा संवर्धन कामाला प्रोत्साहन मिळेल. काही कुटुंबांकडे जुनी शस्त्रे, वस्तू आहेत त्यांनाही मदतीसह आवाहन करून हा ठेवा संग्रहालयात सुपूर्द करण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास संग्रहालयात त्याचे योग्य जतन होईल.

खोदकाम करताना अनेकदा जुन्या वस्तू, मूर्ती आढळतात. त्या शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायत तालुका तहसिलदार यांच्याकडे जमा करून अखेरीस प्रत्येक जिल्हा पातळीवर चांगले वस्तुसंग्रहालय निर्माण होणे शक्य आहे. पण सरकारी जाच- काच व नियमांचा कोलदांडा टाकण्यासाठी याची कुठेच नोंद होत नाही. त्यासाठी सुजाण नागरिकांबरोबर लोकप्रतिनिधींनी  पुढाकार घेणं आवश्यक आहे, पण हा ठेवा जतन करण्यासाठी अभ्यासू लोकप्रतिनिधी व प्रशासकांची आवश्यकता आहे.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वारसा वास्तू दर्शन सहलींचे Heritage Work‘ आयोजन करून या वारसावास्तू स्थळ दर्शनाद्वारे हा अनमोल ठेवा असून, त्यांचे संवर्धन करणे कसे आवश्यक आहे. हे त्यांच्या मनावर बिंबवता येईल. त्यासाठी प्रथमत: त्यांच्या अभ्यासक्रमातच या विषयाचा समावेश करावा लागेल.

..अनेक वारसावास्तू स्थळ दर्शनात अधिकृत मार्गदर्शकच नसतो आणि जो स्थानिक स्वयंघोषित मार्गदर्शक असतो, ती तर प्रचलित दंतकथा सांगत या ठिकाणी कोणत्या चित्रपटांचे छायाचित्रण झाले हे सांगण्यात धन्यता मानतो व ऐकणारे पर्यटकही आपली सहल सत्कारणी धन्यता मानतो. ऐकणारे पर्यटकही आपली सहल सत्कारणी लागल्याचं समाधान घेऊन  भोजन- खरेदीसाठी तत्परतेने परततील. किंवा या स्थळाची आजची अवस्था पाहून सरकारी यंत्रणेला दोष देत काही वेळ हळहळतील, पण याच ठिकाणी आडोशाला मद्यपानाचा आस्वाद घेऊन सहलीचा आनंद द्विगुणीत करतील. फार तर घरी परत त्यावर एखाद्या वृत्तपत्रातून त्या वारसा स्थळाच्या आजच्या सोचनीय स्थितीबद्दल पत्र प्रसिद्ध करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याच समाधान मानणारे पर्यटक भरपूर आहेत.

बऱ्याचदा सहल व्यवस्थापक गाईडची भूमिका पार पाडतो. आयोजित सहलीचे वेळापत्रक सांभाळणारा हा व्यवस्थापक वारसा वास्तू अभ्यासक, मार्गदर्शक असेलच असे नाही. तो स्थानिक मार्गदर्शकांकडे पर्यटकांच्या गटाला सोपवून मोकळा होतो. यासाठी सहल व्यवस्थापकानाच वारसावास्तू मार्गदर्शनाचे प्रशिक्षण हवे. बऱ्याच पर्यटकांना वारसा स्थळ दर्शनापेक्षा भोजन खरेदीतच जास्त स्वारस्य असते.

सक्षम ज्येष्ठ नागरिकांच्या ज्ञानासह त्यांच्या क्षमतेचा उपयोग करून घेतला जात नाही. इतिहास, प्राचीन वास्तू, संस्कृती यात गती असलेल्या ज्येष्ठांना मार्गदर्शक म्हणून काम करण्याची तयारी असूनही त्यांच्या आवाहनाला शासन दरबारी प्रतिसाद नाही. काही वारसावास्तू समुहाची परिक्षेत्र व्याप्ती मोठी असते, तेव्हा प्रवेश द्वारीच मार्गदर्शक नकाशा व संक्षिप्त माहिती फलकच नसतो आणि जो असतो तो वाचणे अशक्य असते. मात्र असल्या स्थळी प्रवेश शुल्क तत्परतेने आकारले जाते.

आता मानवनिर्मित वारसा कलाकृती बरोबर काही नैसर्गिक स्थळांची दखल युनेस्कोने घेऊन त्यांचाही जागतिक वारसा स्थळात समावेश केला आहे. त्यात महाराष्ट्रातील पश्चिम घाट क्षेत्रातील चार स्थळांचा समावेश झाला आहे. परंतु या अजस्त्र घाटमाथ्यावरील निसर्गराजा जसा आम्हाला खचितच क्षमा करणार नाही तसेच वारसा वास्तू संवर्धनाची उपेक्षाही हेच सांगते.