संहिता जोशी

पिढय़ान्पिढय़ा धरलेले समज, ‘अर्थातच’ म्हणत दडपून दिलेली विधानं ‘अंधश्रद्धा’ असतात; नसल्या तर ‘व्यक्तिगत मतं’ असतात. त्यांची वैज्ञानिक सिद्धता व्हायची असेल, तर प्रश्न विचारणं, त्यांची उत्तरं शोधण्यासाठी प्रयोग करणं, प्रयोगांतून कदाचित आपली मतं खोडली जातील याची तयारी ठेवणं ही वृत्ती हवी..

गेल्या आठवडय़ात तीन बातम्या आल्या :

एक, भारत जगातला पहिला देश असेल, जो आयकर विवरणाच्या विश्लेषणासाठी विदाविज्ञानाचा वापर करणार आहे. (बातमीमध्ये, अर्थातच, ‘कृत्रिम प्रज्ञा (ए.आय.)’ असा उल्लेख होता. ‘कृत्रिम प्रज्ञा’ हा शब्दप्रयोग सहज ‘विकला’ जातो. विदाविज्ञान शिकणाऱ्यांत आणि शिकू पाहणाऱ्यांत ‘कृत्रिम प्रज्ञा’ या शब्दांना ग्लॅमर आहे. तो विदाविज्ञानाचा एक भाग आहे.) विदाविज्ञान वापरून आयकर विवरणांतल्या त्रुटी, विसंगती, घोटाळे, गुन्हे किंवा आणखी काही उघडकीस येतील, अशी योजना असेल.

दुसरी बातमी फेसबुककडून आली- आता फेसबुकवर डेटिंगची सुविधा उपलब्ध आहे, ही. डेटिंगसाठी ‘टिंडर’ लोकप्रिय आहे. ‘टिंडर’ला आतापर्यंत स्पर्धाही नव्हती. फेसबुकचं डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’पेक्षा निराळं का असेल, असे प्रश्न या लेखमालेच्या कक्षेबाहेरचे आहेत.

तिसरी बातमी फार गाजली नाही. ती म्हणजे- फेसबुकवर आपल्याला ‘लाइक्स’ आणि प्रतिक्रिया कशा प्रकारे दिसतील, याची रचना बदलणार आहे. आपल्या मैत्रिणीच्या भिंतीवर आपण काही लिहिलं, आणि त्यावर आपल्या मैत्रांपलीकडे आणखी कोणी काही प्रतिक्रिया दाखवली, लिहिली, तर त्याची सूचना, नोटिफिकेशन आपल्याला येणार नाही.

या तीनही बातम्यांत विदा, विदासंबंधित तंत्रज्ञान हा महत्त्वाचा धागा आहे. तिसऱ्या बातमीत लोकांवर विदा-संबंधित-तंत्रज्ञानाचा होणारा दुष्परिणाम कमी करण्याचा प्रयत्न आहे. इतर दोन निर्णयांचा आपल्यावर, समाजावर काय परिणाम होईल, हे समजण्यासाठी वेळ लागेल. विदाविज्ञान असो वा इतर कोणतंही विज्ञान-तंत्रज्ञान, त्यांचा समाजावर होणारा परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो. फेसबुकवर गेली काही वर्ष आपल्याला सगळ्यांचे लाइक्स आणि प्रतिक्रिया दिसतात. यापुढे आपल्या परात्पर मित्रमैत्रिणींच्या लाइक्स/प्रतिक्रियांची नोटिफिकेशन्स आपल्याला दिसणार नाहीत. याचं कारण लाइक्स मोजून लोकांचं स्वप्रेम, नार्सिसिझम वाढतं; मानसिक विकारांचं प्रमाण वाढीस लागतं, असं लक्षात आलं आहे.

तिसरी बातमी फार गाजली नाही.. म्हणजे मी ज्या वाहिन्या पाहते त्यांत एकदा या बातमीचा उल्लेख दिसला; बाकी समाजमाध्यमांतून माझ्यासमोर अनेकदा डेटिंग अ‍ॅपची चर्चा दिसली. पण माझ्या आजूबाजूच्या लोकांनी या बातमीची दखल फार घेतलेली दिसली नाही. या निरीक्षणावरून जे विधान केलं, ते व्यक्तिगत मत समजलं पाहिजे. कोणी अधिकारी वाटणाऱ्या व्यक्तीनं, इतर सगळ्या ठीकठाक वाटणाऱ्या गोष्टींसोबत आपलं व्यक्तिगत मत दडपून दिलं, तर तेही ग्राह्य़ विधान मानलं जातं. गैरसमज कसे वाढतात, याचं हे एक उदाहरण.

आपले सगळ्यांचेच अनेक समज असतात. देवीच्या कोपानं रोग होतो, असा तेव्हाचा समज होता, म्हणून रोगाचं नाव दिलं- ‘देवी’! पुढे हा रोग विषाणूंमुळे होतो, हे सिद्ध झालं. एक समज चूक होती, ती गळून पडली. देवीचा एकही रुग्ण १९७७ सालापासून मिळाला नाही; १९८० सालात त्याचं उच्चाटन झाल्यावर जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यू.एच.ओ.) जाहीर केलं. त्यानंतर जन्माला आलेल्या लोकांच्या दंडावर देवीची लस टोचल्याची मोठी, गोलसर खूण सापडत नाही.

या वर्षांच्या पूर्वार्धात जगभरात गोवरची साथ आली होती. २००६ सालात जेवढे रुग्ण सापडले, त्यापेक्षा जास्त रुग्ण २०१९ मध्ये सापडले. अमेरिकेत या रोगाचं उच्चाटन २००० सालात झाल्याचं जाहीर झालं होतं. तरीही २०१९ मध्ये, प्रवाशांकडून संसर्ग होऊन अमेरिकी रहिवाशांना, विशेषत: लहान मुलांना गोवर झाल्याचं निदान झालं. याचं कारण होतं, अमेरिकेत काही समाजगटांचा लसींना विरोध आहे. त्यांच्या दृष्टीनं हा ‘तत्त्वाचा प्रश्न’ आहे.

१९९८ साली ‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध वैद्यकीय संशोधन-नियतकालिकात अँड्रय़ू वेकफील्डचं संशोधन प्रसिद्ध झालं. त्यात त्यानं १२ मुलांचा अभ्यास करून निष्कर्ष काढला होता, की स्वमग्नता (ऑटिझम) टाळण्यासाठी गोवर, कांजिण्या आणि रुबेला या तिन्ही लसी एकत्र न देता वेगवेगळ्या द्याव्यात. त्यानं दिलेले पुरावे हा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसे नव्हते आणि इतर कोणत्याही संशोधकांना तशा प्रकारची विदा मिळाली नाही. वैज्ञानिक सिद्धतेत दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात : एकच प्रयोग पुन:पुन्हा केला तर निरीक्षणं तीच मिळाली पाहिजेत. आणि कोणतीही वैज्ञानिक सिद्धता खोटी पाडण्याची पद्धत अस्तित्वात असली पाहिजे.

अमेरिकेत एक लसविरोधी गट आहे. लसींमुळे मुलं स्वमग्न होतात, हा या गटाचा आवडता सिद्धांत आणि वेकफील्ड हा आवडता ‘संशोधक’ आहे. या गटातल्या अनेकांनी आपल्या मुलांना लसी दिलेल्या नाहीत. स्वमग्नता हा विकार नक्की का होतो, तो कसा टाळायचा किंवा कसा ‘बरा’ करायचा, हे आजही कुणालाच निश्चितपणे माहीत नाही. ज्या आपत्तींवर काही इलाज नसतो, त्यांबद्दल अंधश्रद्धा पसरणं/ पसरवणं सोपं असतं. देवीमुळे लोक मरत, त्यामुळे देवीबद्दल अंधश्रद्धा पसरणं सोपं होतं. फक्त सर्दीमुळे कोणी मरत नाही; सर्दीबद्दल फार कमी अंधश्रद्धा असतात.

लसविरोधी गटानं आपल्या अंधश्रद्धा अमेरिकेत पुरेशा पसरवल्या आहेत. लसी न घेतलेली मुलं जेव्हा गोवर-रुग्णांच्या संपर्कात आली, तेव्हा त्यांना गोवर झाला.

लसींमुळे मुलं स्वमग्न निपजतात, ही अंधश्रद्धा असल्याचं आजवरच्या वैज्ञानिक संशोधनातून दिसलेलं आहे. ज्या घरांत स्वमग्न मुलं आहेत, त्यांचा या अंधश्रद्धेवर विश्वास जरा जास्तच असतो. आपण काही करून स्वमग्नता बरी किंवा कमी होणार नाही, यात आपण अगतिक होतो. आपण काही केलं म्हणून मूल स्वमग्न झालं, असं म्हणलं की ती अगतिकता कमी होते.

अंधश्रद्धा निरनिराळ्या प्रकारच्या असतात. उदाहरणार्थ, सणासुदीच्या वेळेस जास्त जाहिराती दाखवल्यामुळे खप अधिक होईल, असा एक समज असतो. या जाहिराती किती आधी सुरू करायच्या, यासाठी प्रयोग आणि गणितं करता येतात. प्रयोगाचं एक उदाहरण बघू. आता गणपती जाऊन नवरात्र तोंडावर येईल. नवरात्रांत रोज वेगळ्या रंगांचे कपडे घालण्याची नवी परंपरा आहे. या कपडय़ांवर ‘मॅचिंग’ दागिने विकणारं दुकान आहे. त्यांनी समजा, नवापैकी तीन रंगांच्या दागिन्यांच्या जाहिराती केल्याच नाहीत किंवा काही शहरांमध्ये त्यांनी जाहिरातींचं प्रमाण वाढवलंच नाही; तर उरलेल्या सहा रंगांच्या दागिन्यांच्या खपाच्या तुलनेत जाहिरात न केलेल्या तीन रंगांचे दागिने किती खपले, असा प्रयोग करून बघता येईल. ज्या शहरांत जाहिरात केली तिथला खप समजा वाढला आणि जाहिरात टाळलेल्या शहरांतला खप होता तेवढाच राहिला, हे सांख्यिकी पद्धतीनं सिद्ध झालं, तर ‘जाहिरातींमुळे खप वाढतो’ हे सिद्ध होईल. पुढचा प्रश्न येतो : जाहिरातींवर झालेला खर्च भरून काढण्याएवढा खप वाढला का?

बहुतेकदा असे प्रयोग केले जात नाहीत. कारण जाहिराती न करून होणारं नुकसान कोण भरून काढणार? जाहिरात करण्यात बाजार-शरणता, अगतिकता असेलच असं नाही. प्रश्न विचारणं, त्यांची उत्तरं शोधण्यासाठी प्रयोग करणं, प्रयोगांतून कदाचित आपली मतं खोडली जातील याची तयारी ठेवणं ही वैज्ञानिक वृत्ती अभावानंच आढळते.

पिढय़ान्पिढय़ा धरलेले समज, नफा कमी होईल किंवा नुकसान होईल अशी भीती, ‘अर्थातच’ म्हणत दडपून दिलेली विधानं ‘अंधश्रद्धा’ असतात; नसल्या तर ‘व्यक्तिगत मतं’ असतात.

वैज्ञानिक पद्धतीनं प्रश्न विचारणं, त्यांच्या उत्तरांसाठी विदा आणि सांख्यिकी वापरणं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन असतं.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com