लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांत मतदानाचे नवे विक्रम प्रस्थापित होतील, ही अपेक्षा मात्र मतदारांनी या वेळी काही प्रमाणात फोल ठरवली. ठाणे शहरासह भिवंडी, पालघर परिसरातील ग्रामीण पट्टय़ात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगरसारख्या शहरांतील ‘सुशिक्षित मतदारांनी’ सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेमतेम ४० टक्के इतके मतदान केले.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्य़ात ४३. ८१ टक्के इतके मतदान झाले. शेवटच्या एका तासात चांगले मतदान झाल्याने हा टक्का ५२ ते ५३ टक्क्यांच्या घरात राहील, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.
भिवंडीतील आयवे दिवे गावात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार वगळता इतरत्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अंबरनाथ (३१.९४), उल्हासनगर (२९.१८), डोंबिवली (३९.६६) या मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी फारच कमी होती. तुलनेत पालघर जिल्ह्य़ातील सर्वच मतदारसंघांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली. क्षीतिज ठाकूर आणि विवेक पंडित यांच्यातील लढतीमुळे संवेदनशील बनलेल्या वसई मतदारसंघात ५६.१३ तर बोईसर मतदारसंघात सर्वाधिक ६२.१९ टक्के इतके मतदान झाले होते. सायंकाळी पाचपर्यंत पालघर जिल्ह्य़ात ५५.१३ टक्के इतके मतदान झाले.   
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात राखीव कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिपाई मारुती जाधव यांचा मेंदूतील रक्तस्रावामुळे मृत्यू झाला.
बेलापूर, ऐरोलीत मतदानास थंड प्रतिसाद
बेलापूर विधानसभा क्षेत्रासाठी ३ लाख ८२ हजार १७ मतदारांपैकी ४९.६९ टक्के मतदान करण्यात आले आहे.  त्यामध्ये पुरुषांनी १ लाख ३ हजार १३४ व स्त्रियांनी ८६ हजार ६७४ मतदान केले. तसेच ऐरोली विधानसभा क्षेत्रांसाठी ४ लाख ८ हजार ५० मतदारांपैकी ५१.८२  टक्के मतदान करण्यात आले आहे. ऐरोली व बेलापूर दोन्ही विधानसभा मतदारसंघांत किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
पनवेलमध्ये सरासरी ६२ टक्के
रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रप्रमुखांची आकडय़ांची जुळवाजुळव सुरू असल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये नेमके किती मतदान झाले, याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सांगू शकले नाहीत. अंदाजित ६२ टक्क्यांपर्यंत पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान झाल्याची माहिती रात्री उशिरा पनवेलचे निवडणूक आयोगाचे अधिकारी पवन चांडक यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. मात्र रायगडचे जिल्हाधिकारी यांच्या वतीने फिरणाऱ्या एका संदेशामध्ये पनवेलचे मतदान ६७ टक्के झाल्याचे म्हटल्याने अनेकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. कळंबोली गावातील शंभर वर्षीय मनीबाई धर्मा पाटील याही कौतुकाने लोकशाहीच्या सणात सामील झाल्या.  मनीबाईंची मतदान करण्याची प्रखर इच्छा असल्याने गावातील मतदान केंद्रापर्यंत त्या काठी टेकत टेकत पोहचल्या. मतदान करून त्या घरी परतत असताना त्यांना चक्कर आली. गावातील गुरुनाथ फडके यांनी मनीबाईला घरी सोडले.