भाजपची सत्ता आल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुंदर स्मारक आम्ही निर्माण करु, असे प्रतिपादन करीत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम सुरु करण्यासाठी सहा महिन्यांत पावले टाकली जातील, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात युती-आघाडीचे राजकारण आता संपले असून प्रादेशिक पक्ष हे केवळ अस्मिता पेटविण्याचे राजकारण करतात व त्यामुळे विकास मंदावतो, असा टोलाही तावडे यांनी लगावला.
पुणे जिल्ह्य़ाच्या प्रचार दौऱ्यावर असताना ‘लोकसत्ता’ शी बोलताना तावडे यांनी विविध मुद्दय़ांवर भाष्य केले.  बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आम्ही कधी शिवसेनेचे प्रमुख या नात्याने पाहिले नाही. ते युतीचे कुटुंबप्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे भाजपचा आणि ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे शिवसेनेचा लाभ झाला. शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्हाला आदर असून सरकार आल्यावर त्यांचे यथोचित स्मारक करण्यासाठी पावले टाकली जातील. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्वानाच परिचित आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकांचे काम सुरु करण्यासाठी सहा महिन्यांच्या आत पावले टाकली जातील, असे तावडे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात आता युती-आघाडीचे राजकारण संपुष्टात आले असून प्रादेशिक पक्षांऐवजी राष्ट्रीय पक्षांना सत्ता दिल्यास विकासाच्या मार्गावर वाटचाल होते, हे केंद्र सरकारच्या अनुभवावरुन जनतेला दिसून आले आहे. प्रादेशिक पक्ष स्थानिक अस्मिता जपण्याचे राजकारण करतात. राष्ट्रीय पक्षही स्थानिक अस्मितेचा सन्मान राखू शकतात. दुकानाची पाटी मराठी करण्याऐवजी दुकानाचा मालक मराठी असावा, हे विकासाचे राजकारण आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
देशपातळीवरही नेतृत्वाची फळी
चंद्राबाबू नायडू, जयललिता हे प्रबळ प्रादेशिक नेते म्हणून त्या त्या राज्यात ओळखले जातात. त्यांची कदाचित पंतप्रधान होण्याची क्षमता असल्याचीही चर्चा झाली. पण ते प्रादेशिक पक्षाचे नेते असल्याने राष्ट्रीय पातळीवर त्यांचा तेवढा दबदबा प्रस्थापित होऊ शकला नाही. त्याउलट नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचे ते नेते असल्याने ते पंतप्रधानपदापर्यंत पोचले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे भाजपचे असल्याने त्यांचे राष्ट्रीय पातळीवरही वजन आहे. तेच महाराष्ट्रातही होऊ शकते. भाजपची सत्ता आल्यास जे नेतृत्व उदयास येईल, ते कदाचित पुढील काळात केंद्रातील नेतृत्वाच्या पहिल्या फळीपर्यंत पोचू शकतील.