दिल्लीत भाजपची सत्ता स्थापन व्हावी या उद्देशाने जी पावले उचलण्यात येत आहेत, त्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारच्या असमाधानकारक कामगिरीमुळे सत्तारूढ पक्षाने आत्मविश्वास गमावला असून ते नव्याने निवडणुकांना सामोरे जाण्यास कचरत आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हा भाजप सर्वात मोठा पक्ष होता. मात्र त्यानंतर आणि आता जो बदल झाला आहे तो म्हणजे हा पक्ष पुन्हा जनतेसमोर जाण्यास कचरत आहे आणि केंद्र सरकारची निराशाजनक कामगिरी हे त्याचे प्रमुख कारण आहे, असे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.
दिल्ली विधानसभेत आवश्यक असलेले संख्याबळ नसतानाही नायब राज्यपाल नजीब जंग यांनी, सर्वात मोठय़ा पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाचारण करण्याची परवानगी देण्याबाबतचे पत्र राष्ट्रपतींना पाठविले असल्याचे वृत्त पसरल्यानंतर तिवारी यांनी वरील मत व्यक्त केले आहे.
नायब राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रात दिल्लीतील राजकीय स्थितीचे विश्लेषण केले आहे. ‘आप’ सरकारने राजीनामा दिल्यानंतर १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट आहे. त्यामुळे दिल्लीत निवडून आलेले सरकार स्थापन होण्याची गरज आहे, असेही जंग यांनी पत्रात म्हटले आहे.