महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, मतदारांना लाच स्वीकारण्यास सांगणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाने गडकरी यांच्यावर कारणे-दाखवा नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देताना गडकरी यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे त्यामधील काही भागाचा समावेश आयोगाने आपल्या आदेशात नमूद केला आहे. आपला हेतू काहीही असला तरी आपल्या वक्तव्यामुळे आपल्या निवडणुकीच्या पावित्र्याला बाधा निर्माण होते. इतकेच नव्हे तर लोकशाही प्रक्रियेच्या ऐक्यालाही त्यामुळे तडा जातो, असे आयोगाने म्हटले आहे.
भविष्यात सार्वजनिक ठिकाणी गडकरी अशा प्रकारचे भाष्य टाळण्याबाबत चौकस राहतील, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त करताना त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.