राज्य विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन दिवसांवर आल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरात तब्बल ७६ मतदारांची नोंदणी झाल्याची आढळून आले आहे. कोल्हापूरच्या मतदारयादीचा अभ्यास केल्यानंतर ही धक्कादायक बाब पुढे आली आहे.
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान कागल येथे असून ३०९, ३११ आणि ३११/२ अ, दुसरी मुजावर गल्ली असा या निवासस्थानाचा पत्ता आहे. हाच पत्ता कागलच्या ३१ क्रमांकाच्या निवडणूक यादीत एक-दोघा जणांनी नव्हे तर तब्बल ७६ जणांनी आपला कायमस्वरूपी पत्ता म्हणून दाखवला आहे. गंमत म्हणजे एकाच घरात राहणाऱ्या या ७६ जणांपैकी अनेकांची आडनावे जुळणारी नाहीत. मुश्रीफ यांच्या घरातील मूळ सदस्यांव्यतिरिक्त ६३ मतदारांची यादीतील आडनावे पुढीलप्रमाणे- कोल्हापुरे, मकानदार, शरीकमसलत, शेख, मुजावर, पिंजारे, जमादार, पिरंजाडे, महात, मुल्ला, मुलानी आणि सनदी.
विशेष म्हणजे या नावांमध्ये एका मतदाराच्या नावावरून सदर मतदार हिंदू धर्मीय असल्याचे स्पष्ट होत आहे.
एक्स्प्रेस वृत्तसमूहाच्या प्रतिनिधीने या संदर्भात मुश्रीफ यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीकडे विचारणा केली असता, या घरात केवळ मुश्रीफ कुटुंबीयच राहत असल्याचे त्यांनी सांगितले. मुश्रीफ यांच्या या दुमजली घरात आपण, आपले पती, आपली मुले आणि सुना यांचेच वास्तव्य आहे, असे सहिरा म्हणाल्या. तर मुश्रीफ यांचे बंधू आपल्या कुटुंबीयांसह या बंगल्यासमोरच असलेल्या इमारतीत राहतात. मुश्रीफ यांचे सासू-सासरे -कोल्हापुरे, जे कर्नाटकातील निप्पाणी येथील नोंदणीकृत मतदार आहेत, त्यांच्या नावांचाही कागल मतदारयादीत समावेश आहे. मात्र ते येथे राहत नाहीत, असे सहिरा यांनी नमूद केले. निप्पाणी येथील मतदार यादी तपासली असता, त्या यादीतील किमान १३ मतदारांची नावे कागल मतदार यादीतही नोंदली असल्याचे निदर्शनास आले आहे.