हरयाणात सत्तारूढ काँग्रेस, विरोधी पक्ष असलेला भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि यंदा प्रथमच मोठय़ा प्रमाणावर मुसंडी मारलेला भाजप अशी तिरंगी लढत प्रामुख्याने अपेक्षित आहे. हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत राज्याच्या स्थापनेपासून या वेळी प्रथमच ७३ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. या पुर्वी १९६७ मध्ये सर्वाधिक ७२.६५ टक्के मतदान झाले होते.
मतदानाची नियोजित वेळ संपुष्टात येईपर्यंत ७३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. काही मतदान केंद्रांमध्ये मतदार रांगेत उभे असल्याचे चित्र दिसत असल्याने अंतिम टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत वालगड यांनी वर्तविली.
सायंकाळी सहा वाजता जे मतदार मतदान केंद्रात आले त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिला जाणार आहे, असे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत फतेहबाद जिल्हा (७८ टक्के), हिसार (७३), जिंद (७५), कैथल (७९), कुरुक्षेत्र (७८), मेवट (७६), रोहतक (७०) आणि यमुनानगर (७९) इतक्या मतदानाची नोंद झाली. त्याच्या तुलनेत फरिदाबाद जिल्हा (५७ टक्के), गुरगाव (६४) आणि पंचकुला (६६) टक्के इतकेच मतदान झाले.
हरयाणातील ९० विधानसभा मतदारसंघात एकूण १३५१ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १.६३ कोटी मतदारांपैकी ८७ लाख महिला मतदार आहेत.