पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जोरदार आघाडी उघडल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल हे उद्यापासून मैदानात उतरत आहेत. मोदी विरुद्ध राहुल यांच्यातील दुसऱ्या टप्प्यातील सामना आता राज्यात सुरू होणार आहे. काँग्रेसमध्ये मात्र राहुलपेक्षा सोनियांच्या सभांना उमेदवारांकडून जास्त मागणी करण्यात येत आहे.
मोदी यांच्याशी सामना करण्याच्या उद्देशाने काँग्रेसने सोनिया आणि राहुल या दोघांनाही उतरविले आहे. राहुल गांधी यांच्या उद्या महाड आणि औसा येथे जाहीर सभा होणार आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या गुरुवारी राज्याच्या दौऱ्यावर येत असून, कोल्हापूर आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काँग्रेस नेत्यांच्या सभा होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ आणि मुंबईत सोनियांच्या सभांचे आयोजन केले जाणार आहे. राहुल गांधी यांच्या सभा प्रत्येक विभागात घेण्याची पक्षाची योजना आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांच्यातील सामना रंगला होता. पक्षाच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी हे फारसे सक्रिय राहिले नाहीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदी विरुद्ध राहुल यांच्यातील सामन्याचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.