निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत जागावाटपाचे गणित काही जमत नसल्याने तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. दोन पटेलांमध्ये (प्रफुल्ल आणि अहमद) चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी दोन्ही बाजूने ताणले गेल्याने घोळ मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. जास्त जागा आणि चांगले मतदारसंघ या राष्ट्रवादीच्या दोन्ही मागण्या मान्य करण्यास काँग्रेसने नकार दर्शविला आहे.
जागावाटपावर तोडगा काढण्याकरिता राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे अहमद पटेल या दोघांमध्ये शुक्रवारी रात्री नवी दिल्लीत बैठक निष्फळ ठरली. राष्ट्रवादीने १३२ जागांची मागणी लावून धरली असून, वाढीव कोणते मतदारसंघ मिळावेत याची यादीही सादर केली आहे. मात्र राष्ट्रवादीने दावा केलेले मतदारसंघ सोडणे शक्य नाही, असे काँग्रेसच्या गोटातून स्पष्ट करण्यात आले.
तीन टप्पे निर्णायक
काँग्रेस-राष्ट्रवादीत तीन टप्पे निर्णायक आहेत. पहिला जागांचे संख्याबळ निश्चित करणे. संख्याबळ निश्चित झाल्यावर कोणत्या जागा द्यायच्या हा कटकटीचा मुद्दा ठरेल. कारण काँग्रेसच्या काही निवडून येणाऱ्या जागांवर राष्ट्रवादीचा डोळा असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते. तिसऱ्या टप्प्यात जागांची आदलाबदल.जागांची आदलाबदल करताना काँग्रेसला नको असलेल्या जागा राष्ट्रवादीने स्वीकारल्या पाहिजेत, तसेच राष्ट्रवादीला काँग्रेसचे सूत्र मान्य झाले पाहिजे.
राष्ट्रवादीत अजूनही दोन मतप्रवाह
काँग्रेसबरोबर आघाडी व्हावी ही शरद पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांची इच्छा आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे आघाडीच्या विरोधात आहेत. कमी जागा लढविण्यापेक्षा सर्व जागी  ताकद अजमवूया, अशी अजितदादांची भूमिका आहे.
काँग्रेसची पहिली यादी बुधवारी पक्षाच्या छाननी समितीची बैठक उद्या नवी दिल्लीत होत आहे. सोनिया गांधी या सोमवारी परदेशातून परतल्यावर मंगळवारी केंद्रीय त्याच दिवशी रात्री किंवा बुधवारी पक्षाची पहिली यादी जाहीर केली जाईल. पहिल्या यादीत ६० ते ७० उमेदवारांच्या नावांचा समावेश असेल.
काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद नाही
जागावाटप लवकर व्हावे, अशी आमची अपेक्षा असली तरी काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसादच दिला जात नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. बदलत्या राजकीय परिस्थितीत जास्त जागांवरील आमचा दावा हा न्याय असून, काँग्रेसकडून योग्य प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीने जास्त जागांची मागणी केली असली तरी कोणत्या जागा सोडायच्या हा आमच्यापुढे प्रश्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.