निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसच्या प्रचाराची सारी धुरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राबवावी लागली असून, अन्य नेत्यांनी चार हात लांब राहात सारे जुने हिशेब चुकते केले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांचे राज्यातील पक्षाच्या पहिल्या फळीतील कोणत्याच नेत्याशी फारसे जमले नाही. मुख्यमंत्रीपदी असताना चव्हाण यांना अन्य नेत्यांना तसे दूरच ठेवले होते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पक्षाची सारी यंत्रणा चव्हाण यांना राबवावी लागली. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्यांमध्ये सहभागी होणे, उमेदवार, जिल्हाध्यक्षांशी संपर्क ठेवणे ही सारी कामे सध्या चव्हाण यांच्यावर पडली. हे सारे करतानाच दक्षिण कराड मतदारसंघातील काळजी पृथ्वीराजबाबांना आहे. दक्षिण कराडमध्ये पृथ्वीराजबाबांना अपशूकन करण्याकरिता राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसमधील काही नेते प्रयत्नशील आहेत. चव्हाण यांच्या विरोधातील भाजप उमेदवाराला लातूरमधून मोठय़ा प्रमाणावर रसद पुरविण्यात आल्याची चर्चा आहे.  नारायण राणे हे कोकणात, सुशीलकुमार शिंदे सोलापूरमध्ये, अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये अडकून पडले. अशोक चव्हाण यांनी मुंबई व मराठवाडय़ात दौरे केले असवे तरी त्यांना नांदेडची खबरदारी घ्यावी लागली. पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू झाले. माणिकरावांनी मग विदर्भ आणि मुलगा लढवित असलेल्या यवतमाळ मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. पक्षाच्या नेत्यांची तेवढी साथ नसल्याने माजी मुख्यमंत्र्यांनी सारी जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली असली तरी अन्य नेत्यांच्या या भूमिकेबद्दल नाराज असल्याचे समजते.
जबाबदारी पार पाडत आहे – चव्हाण
पक्षाच्या नेत्यांचे दौरे, प्रचाराची सारी यंत्रणा, उमेदवारांशी संपर्क ठेवणे हे करण्याबरोबरच प्रचार दौरे करीत आहे. उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवावा लागत आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.