क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आहे. जिंकायला वेस्ट इंडिजला शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या आहेत. दोन्ही संघांच्या समर्थकांनी श्वास रोखून धरले आहेत. काहींचे श्वास बंद पडले आहेत. खेळाडूंना घेतलेले कष्ट आठवतायत. कप्तानाची, कोचची पुण्याई आठवतीये. प्रचंड तणावात शेवटचा चेंडू पडतो. वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने चेंडू टोलवला. षटकार जाणार असं वाटता वाटता चौकार मिळतो. मॅच टाय. इतका रोमहर्षक सामना आणि तोही फायनलचा.
विधानसभा निवडणुकीच्या चढाओढीच्या जीवघेण्या स्पर्धेत विविध सर्व्हेवाल्यांनी भाजपला अधिक जागा आणि सेनेला थोडय़ा कमी जागा दाखवल्या आहेत. पण प्रत्यक्ष मतमोजणीनंतर १९ तारखेला कांटे की टक्कर होऊन सामना टाय झाला तर? मेंदूला झिणझिण्या आणणारी, तळहाताला घाम आणणारी, हृदयाची स्पंदने वाढवणारी आहे नाही कल्पना! युतीची बोलणी सर्वाच्या सहनशक्तीचा अंत पाहणारी ठरली. दोन्ही पक्षाला एकेक सीट महत्त्वाची होती. इंच इंच भूमीप्रमाणे. मुख्यमंत्रिपदाच्या संधीमुळे दोन्ही पक्ष ‘हम नही छोडेंगे’ यावर ठाम होते हे काही गुपित राहिलेले नाही. सर्व महत्त्वाची खाती मिळूनसुद्धा मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे नसेल तर कसा खोळंबा होतो, याचा अनुभव राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे मनातल्या योजना राबवायाच्या असतील तर मुख्यमंत्रिपदच हवे. त्यामुळे युती तुटली. मने दुभंगली. कडवट प्रचार झाला. आता सारी भिस्त कुणाला जास्त जागा मिळतात त्यावर मोठा भाऊ ठरणार. अशा परिस्थितीत प्रचंड अटीतटीच्या सामन्यात दोन्ही पक्षाला समान जागा उदा. ८०-८०, ९०-९० मिळाल्या आणि निवडणूक टाय झाली तर? युतीच्या बोलणीला अंत पाहणाऱ्या चर्चाच्या फेऱ्या झाल्या. सर्व नेत्यांच्या घरी बैठका झाल्या. जेवणावळी, नाष्टावळी झाल्या. चॅनेलवाल्यांनी जबर हात धुवून घेतले. जनतेला सुटीच्या दिवशीही युतीच्या बोलणीची करमणूक, उत्कंठा, आशा, निराशा, उद्वेग, मनस्ताप सहन करावे लागले.
जर युतीच्या बोलणीला ही कसरत, तर निवडणूक टाय झाली तर डेली सोपच होणार. एकता कपूर स्टाईल नाटय़ किती एपीसोड चालेल नेम नाही. रुसवे, फुगवे, विनंत्या, याचना, प्रार्थना; प्रसंगी पायाशी लोळण वगैरे सर्व काही. मोठमोठय़ा नेत्यांनी कितीही संभ्रम पसरवायचा प्रयत्न केला तरी भाजपची युती सेनेशीच आणि सेनेची भाजपशीच होऊ शकते हे सुज्ञ मतदार जाणतो. मातोश्रीवर सकाळपासून कोणी कोणी हजेरी लावली, भाजप कार्यालयात कोणकोण येऊन भेटले, कोणी आधी फोन केला, कोणी फोन उचललाच नाही, कोण विरोधी पक्षात बसू म्हणलं, अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉम्र्युला, दिल्लीचा होकार नकार, प्रचारातली कडवट वाक्य उगाळणं, वेगवेगळ्या अस्मिता, हिंदू एकता, आणाभाका, युतीच्या शिल्पकारांचे स्मरण, मीडियातून शाब्दिक गोळीबार असं खच्चून पुरण भरलेलं महानाटय़ किती दिवस चालेल सांगता येत नाही.
गंमत म्हणून टायची कल्पना ठीक आहे. पण प्रत्यक्षात टायचा पर्याय स्थैर्याच्या दृष्टीने घातकच.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)