दिल्लीत भाजप सरकार कसे स्थापन करणार, घोडेबाजार करूनच  सरकार स्थापन करणार हे उघड आहे, प्रत्येक आमदाराला २० कोटी रुपये देऊन खरेदी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत नायब राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करू नये यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी आप करणार आहे, असेही केजरीवाल म्हणाले. दिल्लीत भाजपला सरकार स्थापनेसाठी नायब राज्यपाल कोणत्या आधारावर पाचारण करणार, असा सवालही केजरीवाल यांनी केला.
यामध्ये काहीही अनैतिक नाही – अमित शहा
दिल्लीत सरकार स्थापनेच्या सर्व शक्यता भाजप पडताळून पाहात असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही पक्षाच्या कृतीचे जोरदार समर्थन केले आहे. दिल्लीत भाजपला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे, त्यामुळे दिल्लीत सरकार स्थापन करण्याचा पक्षाला अधिकार आहे आणि त्यासाठी पाठिंबा मिळविण्यात काहीही अनैतिक नाही, असे अमित शहा यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला सांगितले. कोणत्याही पक्षाला दिल्लीत नव्याने निवडणूक नको आहे, सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्याने सरकार स्थापनेचा पक्षाला अधिकार आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे.