दिंडोरीत राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणास

लोकसभेसाठी राष्ट्रवादीकरिता ‘राज्यातील सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ’ असे दस्तुरखुद्द शरद पवार यांनी वर्णन केलेल्या दिंडोरीत मोदी लाटेमुळे राष्ट्रवादीचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.

लोकसभेसाठी राष्ट्रवादीकरिता ‘राज्यातील सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ’ असे दस्तुरखुद्द शरद पवार यांनी वर्णन केलेल्या दिंडोरीत मोदी लाटेमुळे राष्ट्रवादीचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. आता विधानसभा निवडणुकीत सावरण्यासाठी त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी युतीपेक्षा पक्षांतंर्गत गटबाजी आणि मित्रपक्ष काँग्रेसकडून कितपत सहकार्य मिळेल याविषयी असलेली साशंकता याविरुद्धच त्यांना अधिक बळ खर्ची घालावे लागणार आहे.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा येवला आणि त्यांचे पुत्र पंकज यांचा नांदगाव हे दोन्ही मतदारसंघ या भागात येत असल्याने भुजबळांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. मागील विधानसभा निवडणुकीप्रसंगी असलेल्या स्थितीत यावेळी बराचसा बदल झाला आहे. दस्तुरखुद्द भुजबळ यांच्या पाठीशी मागील निवडणुकीत साथ देणारे अनेक जण आज विरोधी गटात गेले आहेत. भुजबळ यांच्याविरोधात लढण्यासाठी विरोधकांमध्ये चुरस आहे. काँग्रेसच्या वाटय़ाला एकही मतदारसंघ नसल्याने त्यांची अलिप्त भूमिका राष्ट्रवादीसाठी मारक ठरू शकते.
नांदगाव
पालकमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांचा मतदारसंघ म्हणून लक्ष लागून असलेल्या नांदगाव मतदारसंघात  पुन्हा एकदा पंकज यांच्याशिवाय पर्याय नाही. भुजबळ यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा लाभ उठविण्याइतपत विरोधकही एकसंघ नाहीत. मागील निवडणुकीत भुजबळ यांच्याविरोधात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार संजय पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु अलीकडेच ते पुन्हा स्वगृही परतले. मागील निवडणुकीत भुजबळ यांच्या प्रचारात वाहून घेतलेले सुहास कांदे हे शिवसेनेतर्फे इच्छूक आहेत. परंतु बाहेरील व्यक्तीस उमेदवारी नको म्हणून त्यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावाही झाला. भाजपनेही चांगलाच जोर लावला असून अलीकडेच भाजपमध्ये विलीनीकरण झालेल्या जनराज्य आघाडीचे अव्दय हिरे हे या मतदारसंघातून इच्छूक आहेत. काँग्रेसनेही पुन्हा एकदा या मतदारसंघावर हक्क सांगितला असून अनिल आहेर हे त्यांचे उमेदवार असू शकतात. मनसेकडून राजेंद्र पवार इच्छूक आहेत.
दिंडोरी
आघाडीचे परंपरागत वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेचे धनराज महाले यांनी धक्का दिला. लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवातून सावरण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ आवश्यक झाली आहे. तर, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील यशामुळे विधानसभेसाठी भाजप-सेनेकडे इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सेनेकडून आमदार महाले, सुधाकर राऊत इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटय़े यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या मतदारसंघात माजी आमदार नरहरी झिरवळ, रामदास चारोस्कर, माजी उपसभापती भास्कर भगरे यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. आघाडी न झाल्यास काँग्रेसकडून नामदेव राऊत, दशरथ चारोस्कर, जयराम गवळी यांची नावे चर्चेत येऊ शकतात. तर, भाजपही इतर पक्षातील नाराजांवर डोळा ठेवून आहे.
निफाड
पक्षापेक्षा कायम गटातटाचे राजकारण खेळणाऱ्या या मतदारसंघावरील वर्चस्व कायम राखण्यासाठी शिवसेनेकडे आ. अनिल कदम यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. निफाड साखर कारखान्यातील राजकारणाचाही विधानसभा निवडणुकीवर प्रभाव पडत असल्याने कदमांची कोंडी करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. त्यातच शिवसेनेचे भागवतबाबा बोरस्ते हे करून भाजपमध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप बनकर, दिलीप मोरे, माजी आमदार दिवंगत डॉ. वसंत पवार यांची कन्या अमृता पवार हे इच्छूक आहेत. तर, काँग्रेसनेही मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून तसे झाल्यास राजेंद्र मोगल, भास्कर बनकर, राजाराम पानगव्हाणे, माणिकराव बोरस्ते यांच्या नावांची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील राजकारणाचा परिणाम या निवडणुकीवर होणे निश्चित मानले जात आहे.
येवला
नाशिकचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ. नाशिक लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर भुजबळ हे येवल्यातून पुन्हा उमेदवारी करणार किंवा नाही याविषयी असलेली अनिश्चितता आता संपली आहे. तेच राष्ट्रवादीचे उमेदवार राहतील हे निश्चित असून त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून माजी आमदार कल्याणराव पाटील, संभाजी पवार यांनी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. या दोघांपैकी कुणा एकाला उमेदवारी मिळाल्यास दुसऱ्याची बंडखोरी अटळ मानली जात आहे. त्यातच मागील निवडणुकीत भुजबळांना सहाय्य करणारे नरेंद्र दराडे हे उमेदवारीसाठी विरोधकांना जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे येथील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
कळवण-सुरगाणा
ज्येष्ठ नेते आ. ए. टी. पवार यांनाच पुन्हा एकदा या मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता असली तरी त्यांचे पुत्र नितीन पवार हेही राष्ट्रवादीकडून इच्छूक आहेत. उमेदवार निश्चित करण्याआधी राष्ट्रवादीला हा कौटुंबिक पेच मिटविण्याचे काम करावे लागेल. मागील निवडणुकीत पराभूत माकपचे माजी आमदार जीवा पांडु गावित हे किंवा त्यांचे पुत्र सुरगाणा पंचायत समितीचे सभापती इंद्रजित गावित हे उमेदवारी करू शकतात. त्याअंतर्गत शिवसेनेचे संभाव्य उमेदवार मोहन गांगुर्डे यांना सुरगाणा पंचायत समितीचे उपसभापती देण्याची खेळी माकपने खेळली. त्यामुळे आता गांगुर्डे हे शिवसेनेकडून उमेदवारी करतील का, हा प्रश्नच आहे.
चांदवड-देवळा
चांदवड विरूध्द देवळा अशा प्रादेशिकवादाच्या गर्तेत अडकलेल्या या मतदारसंघात आघाडीसह युतीलाही प्रबळ उमेदवाराची प्रतिक्षा आहे. विद्यमान अपक्ष आमदार शिरीष कोतवाल हे काँग्रेस प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेल्या या मतदारसंघात माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, डॉ. सयाजीराव गायकवाड, बाळासाहेब माळी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. आत्मारा कुंभार्डे यांसह डॉ. राहुल आहेर, भूषण कापडणीस, केदा आहेर यांच्यात भाजपच्या उमेदवारीसाठी चुरस आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Wining dindori assembly seat is prestige issue for ncp