19 February 2019

News Flash

पातळीगणिक मॅक्रो/मायक्रो व्ह्यू

मायक्रो/मॅक्रो अशा दोनच दोन पातळ्या नसून प्रत्येक पातळीकडे दोन्ही व्ह्यूजनी बघता येते.

विचार ठोकळेबाज राहिलेत. पण कॉम्प्लेक्सिटी तर वाढतच जाणार. ती उलगडण्यासाठीची विचारपद्धती शिकून घ्यावीच लागेल. बंद-पेटी खुली-पेटी’ (‘ब्लॅकबॉक्स व्हाइटबॉक्स’) ही पद्धती आज समजावून घेऊ या..  

मोठे मॉल्स किंवा तत्सम जागी पार्किंगसाठी ‘लिफ्ट अ‍ॅण्ड शिफ्ट’ पद्धतीचे एक भव्य ‘कपाट’ असते. त्यात अनेक थर आणि एकेका थरात अनेक कप्पे असतात. जेव्हा आपण गाडी काढायला जातो तेव्हा, कमीत कमी चढवा-उतरवी आणि सरकवा-सरकवीनिशी गाडी आपल्या पुढय़ात आणली जाते. जेव्हा ही पार्किंगची ‘सिस्टिम’ डिझाइन केली जाते तेव्हा अख्खी कार ही ‘एकक-वस्तू’ म्हणजेच ‘ऑब्जेक्ट’ म्हणून पाहिली जाते. पण खुद्द कार ही किती तरी गुंतागुंतीची सिस्टीम असतेच. पण कारच्या ‘आतली’ गुंतागुंत आत्तापुरती दृष्टीआड केली जाते. म्हणजेच या पद्धतीच्या परिभाषेत, कार ‘बंद-पेटीत’ (ब्लॅक-बॉक्समध्ये) टाकली जाते. बंद पेटय़ांना जोडणारी सिस्टीम बघणे म्हणजे मॅक्रो-व्ह्यू. पेटी खोलून बघणे म्हणजे मायक्रो-व्ह्यू. मायक्रो/मॅक्रो अशा दोनच दोन पातळ्या नसून प्रत्येक पातळीकडे दोन्ही व्ह्यूजनी बघता येते.

तीच कार, बनवणाऱ्या कंपनीत किंवा दुरुस्त करणाऱ्या गॅरेजमध्ये, ‘सिस्टीम’ म्हणून उपस्थित होईल म्हणजेच आता ती ‘उघडय़ा पेटी’ (व्हाइट-बॉक्स)मध्ये येईल. मग इंजिन एक ऑब्जेक्ट बनेल. गिअरबॉक्स, स्टेिरग वगरे उपजोडण्या (सबअसेम्ब्लीज) ऑब्जेक्ट्स बनतील. इंजिनचाही एक उपघटक म्हणजे स्पार्क प्लग. तो अख्खाच बदलावा लागला तर तो ‘त्याच्या बंद पेटी’तच राहील. पण जर तो खोलावा लागला तर तो उघडय़ा पेटीत येईल! त्याच्यातली ‘फट’ हे महत्त्वाचे उपांग म्हणून उपस्थित होईल!!

सिस्टीम म्हणजे ‘रचनेचे-प्रवाह-मंडल’. तिची उपांगे (ऑब्जेक्ट्स) एकमेकांना काही तरी देत व एकमेकांकडून काही तरी घेत असतात. या प्रवाहांचे (द्रव्य, ऊर्जा, माहिती, गुण, संबंध) गणित/लॉजिक जुळले तर सिस्टीमचे आकलन झाले. मात्र, उपांगांच्या आतमध्ये कोणत्या उप-उप-अंगात काय देवाणघेवाणी चालल्यात हे, घाई करून बघायचे नाही. तसेच ही सिस्टीम कोणत्या तरी बृहत्-सिस्टीमचे एक उपांग असणारच आहे! पण तेही आत्ता बघायचे नाही. कोणत्या पातळीवर थांबायचे हे ठरवले नाही तर अनवस्था, एकाच प्रश्नाची अंतहीन पुनरावृत्ती, होते. एका वेळी एका पातळीच्या लगतची वरची किंवा लगतची खालची पातळी उलगडून थांबण्याला, व्हाइटबॉक्स/ ब्लॅकबॉक्स विचारपद्धती असे म्हणायचे. पातळ्या गाळून उडय़ा मारल्याने गोंधळ होतात. ‘समग्रतेने पहा’ म्हणजे नेमके काय करा? हे कोणीच सांगत नाही.

महत्त्वाची कोटी : घटक-संघात

हेच आपण असेही म्हणू शकतो की ‘संघाताचे घटक हे त्यांच्या परीने उपसंघात असू शकतात आणि संघात हाही त्याच्या परीने कोणत्या तरी महासंघाताचा घटक असू शकतो.’ वेगळ्या शब्दांत असेही म्हणता येईल की ‘‘अंतव्र्यूह-व्यूह-बहिव्र्यूह’ अशी चढती वा उतरती भाजणी असतेच. शिवाय एकेका पातळीवर तत्सम विभागांमध्ये आंतर-व्यूहीय जोडण्याही असू शकतात.’

वरील उदाहरण हे मानवनिर्मित गोष्टीचे म्हणजे ‘आर्टफिॅक्ट’चे आहे. पण मानवनिर्मित नसलेल्या गोष्टीसुद्धा, या ‘घटक-संघात’ पद्धतीच्या चढत्या/उतरत्या भाजणीपासून, मुक्त नसतात. आपण शाळेत हृदयाची आकृती काढतो तेव्हा कर्णिका, जवनिका, व्हॉल्व्हज्, मुख्य धमन्या, मुख्य शिरा एवढेच अवयव घेतो. पण खुद्द हृदयाला सप्लाय करणारे धमन्यांचे जाळे, किंवा हृदयाच्या स्नायूंतले मज्जातंतूंचे जाळे, यात शिरत नाही. म्हणजेच त्यांना बंद पेटीत टाकतो. जर पेसमेकर बसवायचा असेल तर मज्जातंतूत शिरावेच लागेल! म्हणजेच त्यांना खुल्या पेटीत आणावे लागेल.

केमिस्ट्रीत, संयुगातील रेणू खोलून पाहिला, तर आपण अणूबाबत फक्त व्हॅलन्सी बघतो. तेव्हा अणूच्या आतील कक्षा, न्युक्लियस वगरेंकडे डोळेझाक करतो. प्रकाशकिरण सरळ रेषेत जातो, हे प्राथमिक ऑप्टिक्समध्ये ठीक. पण किरण ही खरे तर एक विद्युतचुंबकीय लहर व ही लहर तुटक अशा लहरपुंजांची (फोटॉन्सची) बनलेली, असे ‘आत आत’ जाता येते.

नुसते स्वतची प्रत काढू शकणारे रेणू, मग नुसती जनुके, त्यांनी स्वतभोवती कवच धारण करून एकपेशीय जीव, मग बहुपेशीय जीव, असे अधिकाधिक संघटित जीव, जनुकांनी मज्जासंस्था निर्मिणे, मज्जासंस्थांनी अंतप्रत्यय निर्मिणे, अंतप्रत्ययांनी ‘स्व’ निर्मिणे असे उत्तरोत्तर संघातांच्या— संघातांच्या —— संघातांचे संघात बनत जाऊन माणसाइतका अंतव्र्यूहित (कॉम्प्लेक्स) जीव निर्माण झाला आहे. मानवनिर्मित वस्तूंचे/नियमांचे जगही अधिक वरच्या पातळ्यांवर अंतव्र्यूहित आहे.

उद्भुत गुणांचे वैभव

विडय़ामधला एकही घटक लाल नसताना तोंडात विडा लाल रंगतो हे उद्भुत गुणाचे (इर्मजट प्रॉपर्टी) उदाहरण चार्वाकांपासून प्रसिद्ध आहे. उद्भुत गुण ही भानगड समजून घ्यायची तर कार्बनचे हिरारूप आणि ग्राफाइटरूप ही उत्तम उदाहरणे आहेत. कार्बनचे अणू हे कार्बनच्याच अणूंशी संयोग पावून रेणू बनू शकतात. कार्बन अणूंचे एकाच प्रतलात सलगपणे कितीही षटकोन जोडले गेले आणि ही प्रतले अणूगणिक एकेका दुबळ्या बंधाने एकमेकांशी जोडली गेली तर ग्राफाइट बनते. ग्राफाइटची प्रतले दुबळ्या बंधांमुळे एकमेकांवरून सटकू शकतात. म्हणून ग्राफाइट हा पदार्थ अत्यंत मऊ असतो. इतका की त्याचा उपयोग वंगण म्हणून करता येतो. हिरा हा टेट्राह्रेडॉनच्या अक्षांच्या मधला एक आणि बाहेरचे चार अणू मिळून, असे सर्व दिशांनी जोडले जात बनतो. या रचनेत हलायला जागाच नसते. म्हणून हिरा टणक असतो. पण खुद्द कार्बन-अणू हा ना टणक असतो ना मऊ! टणक/ मऊ (तसेच पारदर्शक/ काळे) हे गुण, अणू पातळीवरचे गुण नसून रेणू पातळीवरचे उद्भुत गुण आहेत.

एकाच भिंतीला ‘आतील बाजू आणि बाहेरील बाजू’ असे काहीच नसते. पण चार भिंतींची खोली केली की प्रत्येक भिंतीला ‘आतील बाजू आणि बाहेरील बाजू’ निर्माण होते. ‘खोलीपणा’ या उद्भुत गुणामुळे ‘आतील बाहेरील’ हे ‘सहभाग-जन्य गुण’ भिंतींनाही प्राप्त होतात की जे सुटय़ा भिंतीला नसतात. घटक बनवताना तोडकाम लागले तर भंजनगुण (सेपरेटर प्रॉपर्टीज) व बांधतानाच्या जोडकामासाठी युंजनगुण (जॉइनर प्रॉपर्टीज) असावे लागतात. भंजनगुण युंजनगुण हे संघात बनण्याआधी असतात तर उद्भुत/सहभागजन्य हे गुण संघातानंतर प्राप्त होतात.

सोन्याचे रेणू हे ना सोनेरी असतात ना लालभडक. कसाच्या दगडावर काढलेली रेघ ही रेणूंची पातळ रचना ‘लाल’ असते. परंतु जाड रचना सोनेरीच राहते. कोणताच एक स्वर हा करुण किंवा आनंदी नसतो. पण सुरावट ही करुण किंवा आनंदी असू शकते. नीट पाहिले तर, आपल्याला गुण म्हणून लक्षात येणारे कोणतेही गुण, हे खालच्या स्तरातील घटकांच्या संघाताला लाभलेले उद्भुत गुणच असतात, असे लक्षात येईल. अंतिम मूलघटक व अंतिम सर्वसमावेशक-संघात हे ध्रुव अज्ञेयच राहतात!

मानव्य-विद्यांतही घटक-संघात’  

अर्थव्यवस्थेचा अभ्यासाचे समष्टीय (मॅक्रो) आणि व्यष्टीय (मायक्रो) ही स्वरूपे वेगळी असतात. व्यष्टीय निकषांच्या बेरजेने समष्टीय निकष मिळत नाहीत. मोठी कंपनी देशासाठी व्यष्टी पण व्यक्तींसाठी (मध्यम पातळीची) समष्टीही असते. मतदारांनी ‘अस्थिरता यावी या हेतूने’ मते दिलेली नसताना अस्थिर सरकार येऊ शकते! अस्थिर सरकार या संघातात आल्यामुळे अपक्ष आम/खासदारांना वेगळा भाव प्राप्त होतो. सहभागजन्य गुण!

दोन सुस्वभावी व्यक्ती जोडपे म्हणून मिसमॅच असू शकतात. (किंवा मॅच झाल्याने सुस्वभावी बनूही शकतात!) एका व्यक्तीचा स्वभाव हाही तिच्या जीवनातील अनेक प्रसंगांतून बनत गेलेला आत्ताचा स्वभाव असतो. पण त्या त्या प्रसंगीच्या ‘आचरणांचा संच’ म्हणजे व्यक्तीचा स्वभाव, असे नसते.

अनेक हाउसहोल्ड्स, अनेक फम्र्स, ट्रान्सनॅशनल कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्र सरकारे, जागतिक व्यापार संघटना, मानव अधिकार संघटना असे वेगवेगळ्या पातळीवरचे संघात असतात. नागरिकही ग्राहक, उत्पादक, कामगार, मालक, मतदार, कुटुंब-घटक, भाषक, जातीचा, धर्माचा, पक्षाचा, मित्र, चाहता, नेता, अनुयायी असे बरेच काही असतो. त्या-त्या भूमिकेत शिरताच त्याच्या आस्था बदलत्या असतात.

आजची जागतिक औद्योगिक समाजव्यवस्था ही अनेक पातळ्यांवर आणि अनेक अंगांनी अंतव्र्यूहित/ आंतरव्यूहित (कॉम्प्लेक्स) अशी आहे. ती चालवताना त्या त्या पातळीवरचे प्रश्न त्या त्या पातळीवरच कळतात. पातळ्या अटळ आहेत आणि त्यामुळे कार्यात्मक श्रेणीयता (फंक्शनल-हायरार्की) देखील अटळ आहे. ‘एकाच पातळीवर गोल बसून खेळीमेळीने निर्णय घेऊ!’ हे म्हणणे शुद्ध भंपकपणाचे आहे. तरीही ‘पूर्वी’ असे वास्तवात होते आणि आधुनिकतेमुळे ते हरपले, असे ‘पळशीकरांच्या निमित्ताने’या समीर शिपूरकर निर्मित डॉक्युमेंटरीत सूचित केले आहे. खरे तर आधुनिकपूर्व काळात अत्यंत दमनकारी सत्ताश्रेणी होती. ‘गोल बसणे’ छाप कल्पना आधुनिकतेनंतरच सुचलेल्या आहेत.

ही कॉम्प्लेक्सिटी आणि तिच्यातील गतिमानता लक्षात घेऊन वर्ग आणि वर्गसंघर्ष यांचे मार्क्‍सवादी प्रारूप कसे सुधारित करायला हवे हे पुढील लेखांकात.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे स्वातंत्र्यसमृद्धीसवरेदयवादीआंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.

ई-मेल: rajeevsane@gmail.com

First Published on April 11, 2018 6:03 am

Web Title: article by rajiv sane