16 January 2021

News Flash

ऐहिक अभ्युदयाकडे दुर्लक्ष का?

श्रमण, भक्ती आणि वैदिक या धारांच्या समन्वयवादी संयोगाने हिंदू हा पंथ-समुच्चय निर्माण झाला.

मायावाद, कर्मविपाक, वर्ण-समर्थन, अधोगामी युगकल्पना, राजसी कर्त्यांचा निषेध, वैराग्य / तपश्चर्यावाद आणि मोक्षकेंद्रीपणा, हे दोष हिंदूंना कुंठित करत राहिले.

येथे हिंदू हा शब्द दार्शनिक अर्थाने आला आहे, राजकीय नव्हे. त्यात बौद्ध/ जैन/ शीख हेही मोडतात. इतर धर्मीयांवरही ‘भारतीय’ संस्कृतीचा प्रभाव आहेच! धर्माना जोडून येणारी विविध दर्शने शास्त्रार्थाने नव्हे, पण कथा, कीर्तने, म्हणी, उत्सव वगैरेद्वारे जनमानसात मत-उपदेश रूपात झिरपलेली असतात. निदान एक घटक म्हणून त्यांचा समाजजीवनावर प्रभाव असतो.

श्रमण, भक्ती आणि वैदिक या धारांच्या समन्वयवादी संयोगाने हिंदू हा पंथ-समुच्चय निर्माण झाला. विविध दैवते व आचार-परंपरा त्यात सामावल्या गेल्या. अनेक जन्मांचा फेरा आणि कर्मविपाक मानणे हे हिंदूंचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भगवान बुद्धांनी खरेतर अनात्मवाद, अनित्यवाद आणि अव्याकृते मांडून क्रांतिकारक बदल करू घातला होता. परंतु मानसिक अस्तित्वाचे संतान (कंटिन्युइटी) मान्य केल्यामुळे कर्मविपाक हे प्रकरण बौद्धांतही टिकले. वैदिकही याज्ञिक कर्मकांडापासून उपनिषदांतील तत्त्वकाव्याकडे गेले. श्रमणांची साधना व द्वैती आचार्याद्वारे भक्तीही त्यांनी आत्मसात केली.

धार्मिक असण्याने जीवनाला व मनाला जे वळण लागते ते मानवहितासाठी इष्ट की अनिष्ट? हा प्रश्न महत्त्वाचा असतो. सतान नसल्यामुळे जिहाद किंवा क्रुसेड नाही हे  हिंदू-समुच्चयाचे एक इष्ट लक्षण आहे.

धर्म किंवा संबंधित ‘शास्त्रे’ यांचे उद्दिष्ट काय? याची तीन सर्वसाधरण उत्तरे दिली जातात. एक अभ्युदय म्हणजे ऐहिक जीवनात सुधारणा. दुसरे नि:श्रेयस म्हणजे परमानंदाच्या अवस्थेत कायमचे जाणे (निदान नि:शेष दु:खनिवृतीच्या) आणि तिसरे म्हणजे धारणा किंवा लोकसंग्रह. तिसऱ्याचा अर्थ समाजव्यवस्था टिकवून ठेवणे असा होतो. कोणत्या प्रकारची समाजव्यवस्था? आणि नुसती टिकवायची की सुधारायचीसुद्धा? हे अनुत्तरित राहते किंवा रूढ असेल ती व्यवस्था असा बदल-विरोधी (कन्झर्वेटिव्ह) अर्थ होतो. आधुनिक काळात राज्यघटना हेच तिसरे कार्य करण्याचे साधन असल्याने तिसरा अर्थ इहवादी राज्यात बाद ठरतो. पण समाजात रूढीप्रिय व भूतकाळाला धरून राहणाऱ्या प्रवृत्ती चालू राहतात. म्हणून लोकसंग्रह हा मुद्दा आपण वगळत आहोत.

परम-अवस्था प्राप्त करणे (इयुडेमोनिझम) ही गोष्ट भारतात फारच केंद्रवर्ती राहिलेली आहे. मृत्यूनंतर स्वर्ग-सुख असा तिचा अर्थ नाही. असा आनंद की, जो कशावरच अवलंबून नाही, त्यात एकदाच पण कायमसाठी विलीन होणे, म्हणजे नि:श्रेयस. ते प्राप्त करण्याचे उद्दिष्ट म्हणजे परमार्थ! इतरांसाठी झटणे हा अन्यार्थ झाला परमार्थ नव्हे. फालतू स्वार्थाकडून परम-स्वार्थाकडे वळले पाहिजे अशी ही शिकवण आहे.

गेल्या वेळी प्रोटेस्टंट पंथात, आपले ‘तारण’ होण्यासाठी आपल्या जीवनात ऐश्वर्याच्या खुणा दिसल्या पाहिजेत, या शिकवणीचा औद्योगिक क्रांतीत हातभार लागला होता, हे आपण पाहिले. तशा प्रकारे नि:श्रेयस प्राप्तीची स्कीम ही अभ्युदय-लिंक्ड असायला हवी! हे अभ्युदयासाठी उपकारक असते. परंतु हिंदू जीवनदृष्टीनुसार असे लिंकेज फक्त, चित्तशुद्धीसाठी दुष्कर्म टाळावे, इतकेच उरते. मोक्ष-पुरुषार्थ हा खरा पुरुषार्थ! मग त्यासाठी आवश्यक तितकाच धर्म (नीती), त्यासाठी आवश्यक इतकाच अर्थ (उत्पादन) आणि त्यासाठी आवश्यक इतकाच काम (सुख), असे करत, इतर पुरुषार्थाना आखडते घेतले गेले आहे. सर्व पुरुषार्थ समतोल राखला गेला असता तर ऐहिक अभ्युदयाला जोम मिळाला असता! अजूनही मिळेल. पुरुषार्थ-समतोल हा विषय आपण नंतर घेणारच आहोत.

कत्रेपणाचे आकुंचन 

सुख पाहता जवापाडे दुख पर्वताएवढे, हा प्रत्यय जेव्हा पेनकिलर्ससुद्धा नव्हती अशा काळात तीव्रपणे येणे स्वाभाविकच आहे. हे जग, बदलण्याची किंवा सुधारण्याची गोष्ट नसून, जिच्यापासून सुटका मिळवावी अशी गोष्ट म्हणून पाहिली गेली. जे मुळात भ्रामकच आहे त्यात सुधारणा करण्यापेक्षा, स्वप्नातून जागे व्हावे अशा थाटात, जगाचे मिथ्यात्व कळले की झाले! अर्थात मोक्ष मिळणे ही सोपी गोष्ट नव्हेच. अनेक जन्मांच्या साधनेनंतर तो मिळतो. तोपर्यंत दु:खमय स्थिती कशी सुसह्य बनवायची? दुखे वाटय़ाला येतातच पण त्याहून वाईट म्हणजे ती यादृच्छिकपणे येतात. त्यात न्याय नसतो. माणूस जगात कितपत न्याय निर्माण करू शकतो? याबाबतीत अगदी आजचेही चित्र म्हणावे असे चांगले नाही! पूर्वजन्म व कर्मविपाक मानल्याने निदानपक्षी न्यायहीनतेची भावना तरी जाते. कारण जगात जो असतो तो नेहमी न्यायच असतो! यातून वर्णव्यवस्था किंवा कोणत्याही अनुचित सत्तेचे समर्थन होते. म्हणूनच न्यायबुद्धीसाठी कर्मविपाक नाकारला पाहिजे. हे आकलन आधुनिक काळात वाढीसही लागले आहे. त्यामुळे जमेल तेव्हा कर्तृत्व आणि हुकेल तेव्हा पूर्वकर्म! अशी तळ्यात/मळ्यात भूमिका घेतली जात आहे.

हिंदू युगकल्पना अंगभूतपणे निराशावादी आहे. प्रत्येक युगात अधोगतीच होत असते. चार युगे क्रमाक्रमाने अधिकच अवनत आहेत. शेवटी प्रलय होऊन नवा ‘कल्प’ सुरू होतो आणि सर्वोत्तम असे सत्ययुग येते. म्हणजेच ‘प्रलयाच्या क्षणी’ वगळता ‘काळा’त उन्नती कुठेच नाही. एकेक युग बदलत असताना खुद्द ईश्वर अवतार घेतो. पण तरीही तो अधोगती रोखू शकत नाही. मग मानवी प्रयत्नाने उन्नतीचा आशावाद कसा टिकणार?

जो ‘खरा तू’ आहेस तो तू कर्ता नाहीसच. आत्मा अकर्ता आहे. कत्रे-भोक्तेपणातून बाहेर पडल्यावर आत्मा आनंदस्वरूपच आहे, ही शिकवण फारच प्रमाणात पसरलेली आहे. ज्यात ‘फळाची अपेक्षा नाही असेच कर्म तू कर’ असा संदेश आहे. पण फललक्ष्यी नसणारे कर्म असू शकते काय? मोक्ष हेही फल नाही काय? या प्रश्नांना उत्तर नाही. सात्त्विक कर्ता निष्काम कर्म करू शकतो. फललक्ष्यी कर्ता हा राजसी किंवा तामसी असतो. तामसी कर्त्यांचे उद्दिष्टच चुकीचे असते. राजसी कर्त्यांबाबत उद्दिष्टच चुकीचे म्हणता येणार नाही. तरीही राजसी कर्त्यांचाही निषेधच केला गेला आहे. दैवी आणि आसुरी असे गुण घेऊन माणूस येतो. त्यातील दैवी म्हणजे सद्गुण, हे फक्त सात्त्विक कर्त्यांला राखून ठेवल्यामुळे, राजसी कर्तादेखील आसुरी ठरतो! असे असल्यामुळे ऐहिक अभ्युदयासाठी जे कत्रेपण लागते तेही त्याज्य ठरवले जाते.

आणखी एक मोठा घोटाळा आहे. पाप-पुण्याच्या बाबतीत तुम्ही काय निर्माण केले हे सोडून तुम्ही काय भोगले हे निर्णायक ठरवणारे, तपश्चर्यावाद व वैराग्यवाद खोलवर रुजलेले आहेत. दुख भोगल्याने पापक्षय होतो आणि सुख भोगल्याने पुण्यक्षय होतो अशी शिकवण दिली गेलेली आहे. सोसणे हेच मेरिट! सुख हे डीमेरिट! यामुळे दु:खनिरासाकरता आणि सुखसाधनेकरता जे ऐहिक प्रयत्न व्हायला पाहिजेत, त्यांना पाठबळ मिळत नाही. आत्म्याचा अकत्रेपणा साधण्याच्या नादात माणसाचा नाकत्रेपणा जोपासला जातो. अशा सर्वच धारणा काढून टाकल्या पाहिजेत.

धर्म परिवर्तनीय आहे

धर्म अपरिवर्तनीय असतो, हा सनातनी आग्रह झाला. सनातनीपणाचा दोष जास्त करून वैदिक परंपरेला दिला जातो. परंतु संत-पंरपरेखेरीजसुद्धा, खुद्द वैदिक परंपरेतदेखील परिवर्तनवाद मांडला गेला आहे. १९३० सालच्या सुमारास ‘तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी सभा’ ही चळवळ निर्माण झाली. भारतरत्न पां वा काणे, नारायणशास्त्री मराठे, रघुनाथशास्त्री कोकजे असे अनेक पंडित या चळवळीत होते. किंबहुना वाईला नारायणशास्त्री मराठे (केवलानंद सरस्वती) यांच्या प्रेरणेने लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जो धर्मकोश लिहिला, त्याचे उद्दिष्ट धर्म परिवर्तनशील असतो हे सिद्ध करणे हाच होता. धर्म-उच्छेद तरी किंवा सनातनीपणा तरी! एवढेच पर्याय नसून धर्मसुधारणा हाही पर्याय असू शकतो. एकोणिसाव्या शतकात जे अनेक सुधारणावादी होऊन गेले त्यांनी धार्मिकता न नाकारता धर्माची आधुनिक रूपे निर्माण करणे किंवा निदान आधुनिक अर्थाकन करणे यावर भर दिला होता. आज पुण्यातील ज्ञान-प्रबोधिनी ही संस्थादेखील धर्म-परिवर्तनवादी आहे.

इतकेच नव्हे तर अगदी विसाव्या शतकात उपनिषदांचे सार नव्याने शोधून, डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज यांनी ‘पूर्णवाद’ नावाचे नवे दर्शन मांडले. यात मायावादाचे स्पष्ट खंडन केलेले आहे. जडजगत हेही त्या पूर्णाचे एक स्वरूप आहे. जिवाची धडपड हेही एक स्वरूप आहे, आनंदमय-परमात्मरूप हेही एक स्वरूप आहे. कोणतेही स्वरूप नाकारणे चुकीचे आहे. साधना ही फललक्ष्यीच असली पाहिजे. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे जगणे ही साधनाच आहे. अशी या दर्शनाची मांडणी आहे. (पारनेर येथे पूर्णवाद-परिवाराचे केंद्र आहे.) ईश्वर आणि अनीश्वर असे तुकडे पाडले तर दास्य आणि द्वेष उत्पन्न होतात. पूर्णवादात येणारा किंवा अन्यथाही, सर्वेश्वरवाद (पॅनथेइझम) हा इहवादाला, मानवी उत्कर्षांला अनुकूल असतो

हिंदूंना नुसते ‘अभिमानी’ बनवणे धोक्याचेच आहे. परंतु त्यांना इहानुकूल, युगानुकूल व विधायक विकासोन्मुख बनवण्यासाठी, धर्मजीवनातही सुधारणा आवश्यक आहे.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2018 1:01 am

Web Title: hinduism practices hindu concept hindus religion
Next Stories
1 पुढारलेल्यांची पुण्याई
2 रोबोंच्यात स्व-आकांक्षा उद्भवतील?
3 नेतृत्व की नुसतेच प्रतिनिधित्व?
Just Now!
X