25 March 2019

News Flash

ठेचून काढू साप हे विषारी!

विषय - ‘आपली ‘मेरिल स्ट्रीप’ कुठेय?’

अभिजीत खोडके, नागपूर द्वितीय क्रमांक विजेता

विषय – ‘आपली ‘मेरिल स्ट्रीप’ कुठेय?’

अ‍ॅरिस्टॉटल हा निर्मितीच्या बाबतीत असं म्हणतो की, जेव्हा निर्मिती होत असते तेव्हा भावनांचं विरेचन झालं पाहिजे. त्या भावना व्यक्त होत असताना कोणत्याही प्रकारचा आडपडदा कलाकाराने मनात ठेवता कामा नये. अमेरिकेमधील वंशवादाविरोधात कोणताही आडपडदा मनात न ठेवता एखादी मेरिल स्ट्रीप प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभं राहून बोलायला लागते, तेव्हा मनात विचार येतो की, ती ‘मेरिल स्ट्रीप’ आमच्या देशातल्या साहित्यकारांमध्ये, कलाकारांमध्ये जिवंत आहे का? तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना जात, धर्म न विचारता कीर्तनं करू दिली जातात, प्रवचनं करू दिली जातात, कोणत्याही धार्मिक स्थळी प्रवेश दिला जातो. हे सगळं शक्य आहे कारण तुमच्या-आमच्यावरती साहित्यिकांची- कलाकारांची कृपा आहे. आमच्याकडे जेव्हा बाराव्या शतकामध्ये चातुर्वण्य व्यवस्था होती  तेव्हा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभं राहून ज्ञानेश्वरांनी भक्तीनामाचं सोपं सूत्र समाजाच्या हाती दिलं. म्हणूनचं वैश्विक तत्त्वज्ञान उभं करणारे ज्ञानेश्वर, नामदेव महाराज, एकनाथ महाराज हे मला मेरिल स्ट्रीपचे आद्यपुरुष वाटायला लागतात. आज एकविसाव्या शतकात आम्हाला स्त्रीवादाच्या भूमिकांवर चर्चा होऊनही निष्कर्ष निघत नाहीत.  बारा वर्षांची मुक्ताई जेव्हा अनुग्रह द्यायला लागते तेव्हा ती या मेरिल स्ट्रीपची आद्य स्त्री वाटायला लागते. सोळाव्या शतकामध्ये स्त्रियांना जेव्हा सारेच दरवाजे बंद होते, तेव्हा आपल्या कलाकृतीच्या आणि साहित्याच्या माध्यमातून पुढे येत प्रस्थापित व्यवस्थेवरती टीका करत, ‘‘डोईचा पदर आला खांद्यावर, भरल्या बाजारी जाईन मी.. पंढरीच्या पेठे मांडियले पाल, मनटावर तेल ओता तुम्ही’’, असं म्हणणारी जनाबाई मेरिल स्ट्रीपची आद्य स्त्री वाटायला लागते.

पण त्यावेळी असा प्रश्न पडतो की ही मेरिल स्ट्रीप २१ व्या शतकापर्यंत आली का? हा विचार कराताना एक प्रसंग येथे नमूद करणे महत्त्वाचे वाटते. १९७२च्या साहित्यसंमेलच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक दुर्गा भागवत यांनी यशवंतराव चव्हाण यांना ठणकावले की, ‘‘जी व्यवस्था, जे सरकार या देशातील कलाकारांवर, साहित्यकारांवर आणीबाणीच्या नावाखाली र्निबध आणत असेल, त्यांना या साहित्य संमेलनात प्रवेश नाही.’’ तेव्हा यशवंतराव चव्हाण आपले बूट सभागृहाच्या बाहेर काढून आत येतात आणि म्हणतात, ‘‘मी माझ्या राजकारणाची खेटरं बाहेर काढली आहेत. आता तरी या सभागृहामध्ये मला प्रवेश मिळेल काय?’’

भंग झालेल्या समाजाला अभंग आणि शिव्या देणाऱ्या समाजाच्या ओठांवरती ओव्या खेळवण्याचं काम हे आमच्या कलाकारांनी, साहित्यिकांनी केलं. पण व्यंगचित्र काढलं म्हणूनं सहा महिने तुरुंगात जावं लागत असेल किंवा एखादा कलाकार, साहित्यिक म्हणत असेल की यानंतर मी फक्त शिक्षक म्हणून जिवंत राहीन. माझ्यातील साहित्यकाराचा मृत्यू झाला. असं मरण जर या देशातील कलाकारांना, सहित्यिकांना येत असेल तर आमच्याकडे मेरिल स्ट्रीप तयार होऊ शकते काय? याही गोष्टीचा विचार झाला पाहिजे.

मला ती मेरिल स्ट्रीप काही ठिकाणी जिवंतही दिसते. जेव्हा अभिनेते प्रकाश राज म्हणतात, ‘‘आम्हाला खड्डे पडलेले रस्ते चालतात. त्या रस्त्यांवरती वाईनबार चालतात. त्या वाईनशॉपचं नावं ‘दुर्गा वाईन शॉप’ असंही चालंत, पण दुर्गा आणि त्याच्या समोर एखादा शब्द जोडून तयार झालेलं सिनेमाचं पुरस्कार मिळालेलं नाव आम्हाला चालत नाही.’’ समाजाला जागृत करणारा कलाकार जर तुमच्या आमच्यामध्ये तयार होत असेल तर तो खऱ्या अर्थाने मेरिल स्ट्रीपची भूमिका बजावतो आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आबा पाटील म्हणतात,

‘‘तुझ्या जगण्याचं गूढ मी तुला उलगडून दाखवतो,  तुझ्या हसण्याचं गूढ मी तुला उलगडून दाखवतो मोनालिसा..

फक्त उधारी नाकारलेल्या दुकानदारासमोर

माझी आई जेवढं सुंदर हसते, तेवढ सुंदर तुला हसता येईल काय?’

तेव्हा त्यांच्या लेखणीतून मला या देशात मेरिल स्ट्रीप जिवंत असल्याची खात्री वाटते.

निरोप घेताना मी फक्त इतकचं म्हणेन,

‘‘आतून पेटलो तरी हळुवार बोलतो मी

विशेष काहीच नाही व्यवहार बोलतो मी

ठेचून काढू साप हे विषारी

येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी!’’

ज्या निर्धाराने तुम्ही येथे आला असाल, त्या निर्धाराने आम्ही बोलत असू, तर हा विचारयज्ञ असाच कायम पेटता राहणार असेल, तर मला असं वाटतं प्रत्येकजण मेरिल स्ट्रीपची भूमिका घेऊ शकतो..

(संपादित)

First Published on February 25, 2018 3:24 am

Web Title: abhijit khodke speech in loksatta oratory competition