‘भविष्यालाही अभिमान वाटेल अशा वर्तमानाचा गौरव’ या आगळ्यावेगळ्या विचाराने, व्यापक उद्दिष्ट ठेवून रंगलेला पहिलावहिला ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळा नवतेजाने, नवउन्मेषाने झळाळून उठला. आपले ज्ञान केवळ आर्थिक आणि करिअर विकासाच्या उद्देशाने विस्तारत न नेता सर्जनशीलतेचे नवे आयाम आपल्याच क्षेत्रात शोधणारे, आपल्याबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जाणारे अनेक तरुण चेहरे समाजात वावरत असतात. अशा निवडक विविध क्षेत्रांतील बारा तेजांकितांना समाजासमोर आणून त्यांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे पहिलेच पर्व शनिवारी संध्याकाळी आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात रंगले. प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी आणि केंद्रीय वाणिज्य व नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू या वेळी उपस्थित होते. राजकारण, साहित्य- संस्कृती- मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी अशा नावाजलेल्या व्यक्तींच्या उपस्थितीत रंगलेला हा गौरव सोहळा अनोखा ठरला. त्याला प्रसिद्ध तरुण फ्युजन संगीतकार अभिजित पोहनकर यांच्या अनवट तरी सळसळत्या ऊर्जेने भरलेल्या सुरांची साथ मिळाली आणि सोहळ्याला रंग चढला. या पुरस्कारामागची संकल्पना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी विशद केली. कार्यक्रमाचा समारोप ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने झाला.

चौथी औद्योगिक क्रांती आता येत असून ती डिजिटल क्रांती असणार आहे. तरुणांनी आरोग्य सेवा, पर्यावरण आणि आदरातिथ्य या क्षेत्रांचा एकत्रित विचार करून काम केल्यास उद्याचा काळ भारताचा असेल. जगात जे बदल होत आहेत त्यानुसार आपल्यात बदल करून त्यांचा लाभ घेणे हे आपल्या हातात असते. इंटरनेटचा वाढता प्रसार, मोबाइलसारख्या उपकरणांचा वाढता वापर यातून डिजिटल क्रांतीला मोठय़ा प्रमाणात चालना मिळेल. त्यातून ई-कॉमर्स मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. हे सर्व लक्षात घेऊन तरुणांनी पुढील वाटचाल केली पाहिजे. २०२५ पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट होईल या दृष्टीने आराखडा तयार होत असून त्यातून कोटय़वधी तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील.

– सुरेश प्रभू, केंद्रीय उद्योगमंत्री

धैर्य, हिंमत हे कुणी शिकवून येत नाहीत. त्यांची निर्मिती स्वत:हूनच करावी लागते. तरुणांनी ध्येयाची स्वप्ने बघून ती पूर्णत्वास आणण्यासाठी झटणे आवश्यक आहे. माझे बालपण बेळगावात गेले. वडील शेतकरी होते. मोठी शेती होती. वयाच्या २२ व्या वर्षी मी कामाला सुरुवात केली. तेव्हाही एकच स्वप्न होते. कुठल्या तरी क्षेत्रात आपण देशात अव्वल कसे राहू. भारत फोर्ज ही कंपनी मारुतीपासून मर्सिडिज बेंझर्पयच्या सर्व वाहनांसाठी उत्पादन पुरविणारी एकमेव भारतीय कंपनी आहे. मी अमेरिकेतून अभियांत्रिकीतील शिक्षण घेतले आणि या शिक्षणाचा उपयोग आपल्या कार्यासाठी, व्यवसायासाठी कसा करून घेता येईल, यावर भर दिला. तरुणांनी मोठय़ा ध्येयाची स्वप्ने बघावीत.कठोर मेहनत ही तुम्हालाच करायची असते. सोबत शिस्तीचीही जोड असावी. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करताना तरुणांनी आपल्या देशालाही कसे पुढे नेता येईल, हेही पाहणे गरजेचे आहे. स्वत:चा विचार अधिक करण्यापेक्षा देशाचा करावा. भारताचा विकास दर ४०० वर्षांपूर्वी २४ टक्के होता. सध्या तो तुलनेत खूपच कमी आहे. समृद्ध आणि संपन्न देश घडविण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी ही तरुणांचीच आहे.

– बाबा कल्याणी, ज्येष्ठ उद्योगपती

जळगावसारख्या छोटय़ा गावामध्ये काम करत असूनही ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाच्या माध्यमातून कामाची दखल घेतली गेली, याचा खूप आनंद होत आहे. बहुतांश वेळा काम केल्यानंतर उतार वयामध्ये कामाची पोचपावती मिळते. मात्र ‘तरुण तेजांकित’या उपक्रमातून काम करत असतानाच पाठ थोपटल्याने काम करण्याचा उत्साह अजूनच वाढला आहे.

– मानसी महाजन, यजुवेंद्र महाजन यांच्या पत्नी.

सागर यांना सुरुवातीपासूनच समाजाचे पाठबळ मिळत आले आहे. यामध्ये ‘लोकसत्ता’सारख्या सजग वृत्तपत्राने दिलेल्या ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारामुळे त्याच्या कार्याला अधिक वेग प्राप्त होईल एवढे नक्की. सागर हे अनाथ असल्यामुळे कुटुंब व्यवस्थेबद्दल आणि त्यातील नात्यांबाबत सुरुवातीच्या काळात थोडे अजाण होते. मी त्यांची सहचारिणी झाल्यावर त्याच्या कामात थोडा हातभार लावला.

पूजा रेड्डी, सागर रेड्डी यांच्या पत्नी

सुरुवातीच्या काळात वैशाली आपल्याला नेमके काय करायचे आहे, याच्या शोधार्थ होती.  विशिष्ट कालावधीनंतर तिला ‘कापड’ हे आपले माध्यम असल्याचे उमगले. आमचे लग्न झाले तेव्हा तिने नुकतीच करिअरला सुरुवात केली होती.  मुलगी झाल्यानंतर हे काम कुठे तरी पुन्हा थांबणार असे वाटत असताना मी पुढाकार घेऊन घरची जबाबदारी अंगावर घेतली.े. त्यामुळेच ती उत्तम काम करू  शकली. आणि ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराला पात्र ठरली.

प्रदीप शडांगुळे, वैशाली शडांगुळे यांचे पती

शंतनु आणि आम्ही सोबत काम करत असल्याने या प्रकल्पाविषयी त्याची धडपड आम्ही रोज बघत असतो. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे त्याच्या संकल्पनेला मिळालेली दाद आहे. ‘लोकसत्ता’ने त्याच्या कामाची दखल योग्य वयात घेतल्याने त्याचे महत्त्व वेगळे आहे.  हा पुरस्कार त्याला आणि त्याच्या सोबत काम करत असलेल्या आम्हा सर्वाना प्रोत्साहन देणारा आहे. त्याला पुढेही असेच पुरस्कार मिळावेत, हीच इच्छा आहे.

चिन्मयी चव्हाण, शंतनू पाठक यांची सहकारी

आमच्या लग्नानंतर खऱ्या अर्थाने तिच्या क्रीडा प्रवासाला आणि त्यामधील चढउतारांना सुरुवात झाली.  मधल्या काळात तिला फारसे यश मिळत नव्हते. त्या वेळेस आमच्या खासगी आयुष्यावर  टीका करण्यात आली. त्या वेळी  कविताला प्रक्षिकासारखे प्रोत्साहन देण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. नेटाने केलेल्या परिश्रमांमुळे तिने यशाची शिखरे गाठली आहेत. त्यामध्ये ‘लोकसत्ता’चा पुरस्कार अजून भरारी देण्याकरिता प्रोत्साहन देणारा ठरला आहे.

महेश तुंगारे, कविता राऊत यांचे पती

क्रीडाक्षेत्रात करिअर असल्याने ललितावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असतो. हा दबाव कमी करण्यासाठी आम्ही घरात प्रकर्षांने खेळीमिळीचे वातावरण निर्माण करतो. तसेच तिच्या प्रशिक्षणाकडे कुटुंबाचे बारीक लक्ष असून प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडावी लागते. तिच्यावर घरच्या जबाबदाऱ्या आहेतच. त्यातही मी तिला जमेल तसे सहकार्य करतो. तिने देशाचे नाव अजून मोठे करावे हीच इच्छा आहे.

संदीप भोसले, ललिता बाबर यांचे पती

कलाविश्वामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने निपुणला कोणत्याही प्रकारचे पाठबळ नव्हते.  त्याने निर्माण केलेल्या पहिल्याच कलाकृतीपासून त्याला यश मिळणे सुरू झाल्याने तो बिघडेल की काय, याची भीती होती. मात्र मुळातच तत्त्वांशी ठाम राहणारा त्याच्या स्वभाव असल्याने त्याचे पाय जमिनीवरच राहिले. त्यामुळे त्याला ‘तरुण तेजांकित’ पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे.

अमिता धर्माधिकारी, निपुण धर्माधिकारी यांची आई

मुक्ता मुळातच कष्टाळू आहे. थोडय़ा लाजऱ्याबुजऱ्या स्वभावाची असली तरी स्वतंत्र विचारांची आहे. निवडक- नेमके मात्र दर्जेदार करण्याकडे तिचा कल असल्याने तिच्या पदरी यश आले आहे. तसेच सामान्य लोकांविषयी कळवळा असून अनेक सामाजिक कार्यात तिचा हातभार लागत असतो. त्यामुळे ‘लोकसत्ता’ने ‘तरुण तेजांकित’ पुरस्कार देऊन तिचा सन्मान केल्याने आमच्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे.

विजया बर्वे, मुक्ता बर्वे यांच्या आई

नाटय़क्षेत्रात काम करत असताना आपल्या अंगी सकारात्मकता असणे आवश्यक आहे. राहुल यांच्या अंगी ती ऊर्जा आहे. एखादे ध्येय ठरविल्यानंतर ते गाठण्याचा गुण त्यांच्यामध्ये आहे. अपयश आल्यानंतर तेथूनच यश मिळविण्याची ऊर्मी त्यांच्या अंगी आहे.  नवख्या तरुणांना संधी देण्याबाबत ते आग्रही आहेत. त्यामुळे नवख्या मुलांच्या माध्यमातूनच त्यांनी आपला विकास साधला आहे.

पूजा भंडारे, राहुल भंडारे यांच्या पत्नी

संशोधनाचे क्षेत्र हे झळाळीपासू नेहमीच दूर राहिले आहे. त्यामुळे अशा रीतीने माझ्या मुलीचा होणारा सत्कार पाहूनच खूपच  आनंद होता आहे. मी स्वत: संशोधक असून घरामधील सर्वच जणांनी संशोधन क्षेत्राची वाट निवडली आहे. तेव्हा संशोधन क्षेत्राचा अशा रीतीने केला जाणारा सन्मान अभिमानकारक आहे. हा मानाचा सन्मान तिला मिळाल्याने तिची जबाबदारी वाढली आहेच. पुढेही तिच्याकडून चांगले काम होत राहावे, हीच इच्छा.

डॉ. सुलेखा हाजरा, अम्रिता हाजरा यांच्या आई

जव्वादचं काम खरतरं खूप वेगळं असलं तरी ते त्याला प्रसिद्धी मिळावी, असं ते क्षेत्र नाही.तरीही या पुरस्काराने त्याच्या कामाची दखल घेतली, हे खूपच कौतुकास्पद आहे. जव्वादचा प्रकल्प आता लवकरच सीमेवरील ठिकाणीही राबविण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून त्याचे काम अधिकाधिक लोकांपर्यत नक्कीच पोहचेल. ‘लोकसत्ता’ने पुढेही अशाच वेगळ्या क्षेत्रातील लोकांचे काम समोर आणावे

विनित मालपुरे, जव्वाद पटेल यांचा भाऊ

संशोधक म्हणून सौरभ गेल्या काही वर्षांमध्ये घेत असलेली मेहनत या पुरस्काराच्या माध्यमातून सामान्यांपर्यत पोहचली आहे. सौरभने केलेले काम खूपच महत्त्वाचे आहे. बदलापूरसारख्या ठिकाणी तो राहतो. तेव्हाही त्याच्या संसोधनाची दखल प्रथम ‘ लोकसत्ता’नेच घेतली होती.  ‘तरुण तेजांकित’ या पुरस्काराची संकल्पना तरुण वर्गाला प्रेरणा देणारी आहे.

सोनल आयकर- पाटणकर, सौरभ पाटणकर यांच्या पत्नी