मराठी विज्ञान परिषदेचे ५४ वे मराठी विज्ञान अधिवेशन १८ जानेवारीपासून रत्नागिरी येथे सुरू झाले. २० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचे अध्यक्ष विज्ञान शिक्षणतज्ज्ञ प्रा. हेमचंद्र प्रधान यांच्या भाषणातील हा संपादित अंश.. शालेय विज्ञान शिक्षणातील नव्या प्रवाहाची नोंद घेणारा!

ज्याँ पियाजे यांनी शिक्षणातील ज्ञानरचनावादाचा पाया घातला. त्यांचा भर बालकाच्या बौद्धिक विकासप्रक्रिया वैयक्तिक स्तरावर कशा चालतात, यावर होता; तर लेव्ह वायगोत्सकी यांचा भर या विकासप्रक्रियेवर इतर व्यक्तींचा काय प्रभाव पडतो, यावर होता. शिक्षणात असे आढळून येते की, सर्व मुले- काही विशेष अक्षमतेची उदाहरणे सोडली तर- शिकू शकतात. कोणतीही शिकणारी व्यक्ती ज्ञान व आकलन स्वत:च बांधते. शिकवणे हे शिकण्याची संधी उपलब्ध करून देत असते. रेडिश या अमेरिकी भौतिक शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले की, आपण ज्यातून शिकतो ते आपले सर्व अनुभव, निरीक्षणे आपण मानसिक आकृतिबंधामध्ये ग्रथित करतो. या प्रतिमानां(मॉडेल्स)द्वारे आपण भोवतालच्या गोष्टी, नवे अनुभव समजून घेतो, त्याचा अर्थ लावतो. ही प्रतिमाने ज्ञानेंद्रियांच्या संवेदनांच्या स्मृती स्वरूपात असतात; कधी अर्धवट अथवा चुकीच्या स्वरूपातही असतात. ही प्रतिमाने बांधण्याची क्रिया जन्मापासून सुरू होते. म्हणून शिकणे म्हणजे प्रतिमाने बांधणे, त्यांच्याद्वारे भोवतालच्या जगाचा अर्थ लावणे, गरजेनुसार ती सुधारणे अथवा बदलणे हे होय. विज्ञान शिक्षणाच्या बाबतीत भोवतालच्या जगाविषयी, त्यातील वस्तू, तथ्ये, आविष्कार, घटना यांविषयीची प्रतिमाने सुयोग्य असली पाहिजेत. आपल्या डोळ्यांतून निघालेला प्रकाश वस्तूवर पडल्यामुळे ती वस्तू आपल्याला दिसते, अशी चुकीची समजूत बऱ्याच विद्यार्थ्यांची असते. किंवा- भौतिकशास्त्र हे गणितासारखे नियमांना अपवाद नसल्यासारखे वाटल्याने काच वा द्रव स्फटिक या संकल्पना समजायला कठीण वाटतात. आपल्याला जे ज्ञात आहे, त्यापेक्षा थोडे पुढचे शिकणे सोपे असते. शिक्षण पायरी-पायरीने होते. मात्र काही वेळा हे पायरी-पायरीचे तत्त्व चालत नाही. आणि पहिली प्रतिमाने उपयोगी न पडता, नवीन प्रतिमाने बांधावी लागतात. याची उदाहरणे म्हणजे हातच्याची गणिते अथवा न्यूटनचा गतिशास्त्रातील पहिला नियम!

चुकीची प्रतिमाने बदलण्यासाठी त्यातून येणाऱ्या निष्कर्षांतील विसंगती उघड करायला हवी. नवीन प्रतिमान सकृद्दर्शनी पटणारे व अखेर योग्य निष्कर्षांला पोहोचण्याच्या दृष्टीने उपयुक्त असले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनातील गैरसंकल्पना दूर करण्यासाठी विविध पद्धती अवलंबिता येतात. पियाजे यांच्या मताप्रमाणे, बुद्धीचा विकास टप्प्याटप्प्याने होतो. ०-२, २-७, ७-१२ आणि १२ वर्षांच्या पुढे असे ते चार टप्पे आहेत. सुरुवातीला मुले आंतरिक प्रक्रियेने शिकतात आणि नंतर प्रौढ व्यक्तींशी होणाऱ्या आंतरक्रियेतून ती शिकतात. रचनावाद हा केवळ शिकण्यासंबंधी नसून तो शिकवण्यासाठीही आहे. मात्र यात शिकवण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्रथम शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांनी शिकावे असे पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे असते. प्रत्येक विषयाची एक संस्कृती असते, तीही वर्गात निर्माण करावी लागते. शिकणारा प्रत्येक जण वेगळा असल्याने, एकच पद्धत सगळ्यांना उपयोगी पडत नाही. यासाठी विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. एखादा विषयघटक शिक्षक कसा शिकला हे जर तो विद्यार्थ्यांना सांगेल, तर ते विद्यार्थ्यांना अधिक उपयोगी पडते. उदाहरणार्थ, विषयघटकाची ओळख-मांडणी-शेवट-मुद्दय़ाचा क्रम इत्यादी. त्यावर प्रश्न कसे व कोणते विचारायचे, विद्यार्थ्यांना काय काय अडचणी येतील हे ओळखून त्याचे निराकरण करणे, या संपूर्ण क्रियेला ‘अधिबोधन क्रिया’ म्हणतात. शिक्षक जर सकारात्मक असेल, तर त्याचे अध्यापन परिणामकारक होते. उदा. शिक्षकाला विषय आवडतो का, त्याला आपल्या व्यवसायासंबंधी आणि संस्थेविषयी आत्मीयता आहे का, माझे विद्यार्थी शिकू शकतात, मी त्यांना चांगले शिकवू शकतो, इत्यादी. यामुळे वर्गातील वातावरण आनंदी तर राहतेच, पण शिक्षणही आनंददायी होते. आज असा रचनावाद स्वीकारल्यामुळे जगात फिनलंड, कॅनडा, नेदरलँड, नॉर्वे, इत्यादी ठिकाणाचे शिक्षण सर्वात चांगले आहे.

रचनावादाची दोन गृहीते आहेत. ती म्हणजे, कोणतेही मूल शिकू शकते आणि शिकणारा स्वत: शिकतो- त्याला कोणीही शिकवू शकत नाही व प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत स्वायत्त असते. १९६० साली रचनावाद येण्यापूर्वी मानसशास्त्रात ‘वर्तनवाद’ होता. त्याअन्वये विद्यार्थ्यांना उद्दीपन दिल्यास त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळतो. उदा. अंगाला चिमटा काढल्यास माणूस कळवळतो किंवा एखाद्याला विनोदी चित्र दाखवल्यास तो हसतो. त्याला बोधीय मानसशास्त्र म्हणतात. माणसाच्या मनात डोकावण्याची अनेक तंत्रे आता अवगत झाली आहेत.

ज्ञानेंद्रियांना संवेदन कसे होते, अवधान (लक्ष) म्हणजे काय, स्मृती म्हणजे काय, भाषा म्हणजे काय, इत्यादी अनेक. या मानसिक क्रियांचे नियंत्रण चेतासंस्थेद्वारे होते. आपल्याकडे मात्र जाणीवपूर्वक एखादी भूमिका घेतलेली आढळून येत नाही. तरीही मुंबईचे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, ग्राममंगल संस्था, पुण्याची अक्षरनंदन शाळा, नाशिकची आनंद निकेतन शाळा, विक्रमगडची क्वेस्ट संस्था, गोरेगावची अ. भि. गोरेगावकर प्राथमिक शाळा यांनी रचनावाद अमलात आणला आहे. यूटय़ूबवरही ‘टीचर पेजेस्’ ही वाहिनी महाराष्ट्रातील शिक्षकांनी रचनावाद पद्धतीने घेतलेले पाठ सादर करते. भारत सरकारच्या एनसीईआरटीने रचनावादावर आधारलेली पाठय़पुस्तके तयार केली आहेत.

रचनावादी शिक्षण तंत्र वापरताना मुलांना प्रश्न विचारायला उद्युक्त केले पाहिजे आणि त्या वेळी विद्यार्थी निरुत्तेजित होईल असे वातावरण असू नये. काही ठरावीक मुलांनाच प्रश्न विचारायचे टाळायला हवे. विद्यार्थ्यांना संकल्पनाचित्र / मनोचित्र तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना समस्या देऊन त्या सोडवायला प्रोत्साहन दिले पाहिजे. वनस्पतीशास्त्र शिकताना प्रत्यक्ष बागेत जाऊन शिकवल्यास बाग हा वर्ग बनतो. सहकाऱ्यांकडून शिकायला प्रोत्साहन द्यायला हवे. उदा. मुले एकमेकांकडून मोबाइल वापरायला शिकतात.

एकुणात, देशाचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली शिक्षणप्रणाली बळकट करायला हवी, त्यासाठी रचनावादी शिक्षणाची आवश्यकता आहे.