करोनाच्या जागतिक आपत्तीने काही राष्ट्रप्रमुखांच्या संकट व्यवस्थापन कौशल्याचे मूल्यमापन करण्याची संधी प्रसारमाध्यमांना दिली आहे. सतत असत्य हेच सत्य असल्याचे छातीठोकपणे सांगणारे, राजकीय विरोधकांना आणि टीकाकारांना देशशत्रू ठरवणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असोत, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि बहुमतासाठी वर्षभर झगडणारे इस्राएलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू असोत, की युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचे ‘ब्रेग्झिट’ प्रकरण पार पाडणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असोत; या सर्वाच्या क्षमतांबाबत माध्यमांनी टीका-टिप्पणी करणारे लेख, स्तंभलेख प्रसिद्ध केले आहेत.

करोना पेचप्रसंगाच्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा हॉलीवूडचा अभिनेता टॉम हँक्स कसा आदर्श ठरतो, हे सांगणारा लेख ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केला आहे. ‘ट्रम्प अध्यक्ष असले तरी अमेरिकी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करीत नाहीत, उलट- आपण आणि आपली पत्नी करोनाबाधित आहोत, हे जाहीर करणारा अभिनेता टॉम हँक्स हा अमेरिकेच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करतो, ज्यात चारित्र्य ही महत्त्वाची गोष्ट मानली जाते आणि त्यामुळेच तो लोकप्रिय आहे. टॉम हा एक अस्सल मनुष्य आहे,’ असे भाष्य या लेखात केले आहे. ‘करोनाचा सामना करण्यास आपण सांस्कृतिकदृष्टय़ा असमर्थ आहोत. ट्रम्प हे आजच्या संस्कृतीचे प्रतिबिंब आणि स्वार्थाचे प्रतीक आहेत. ते सत्याशी प्रामाणिक नाहीत की कठोर गोष्टींना सामोरे जात नाहीत. संकटाच्या काळात जेव्हा विश्वासाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा ट्रम्प यांची प्रवृत्ती मारक ठरते,’ अशी मल्लीनाथीही या लेखात आहे.

‘काळजी घ्या, ट्रम्प करोना संकटाचा गैरफायदा घेऊ  शकतात,’ असे इशारावजा भाष्य ‘द गार्डियन’मधील लेखात केले आहे. ‘जेव्हा यापुढे खोटे बोलणे किंवा सत्य नाकारणे अशक्य आहे हे ट्रम्प यांना कळेल, तेव्हा ते स्थलांतरित नागरिक, पत्रकार, उदारमतवादी अशा आपल्या शत्रूंना दोष देतील,’ असे या लेखात म्हटले आहे. तर करोना संकट हाताळण्यास ट्रम्प ‘अनफिट’ असल्याची टीका ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मधील स्तंभात आणि ‘ट्रम्प यांची असमर्थता करोना उघड करीत आहे,’ असा टोला ‘द वॉशिंग्टन एक्झामिनर’मधील लेखात लगावला आहे.

इस्राएलमध्ये वर्षभर राजकीय गोंधळ सुरू आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले पंतप्रधान बेन्यामीन नेतान्याहू यांचा उजव्या विचारधारेचा पक्ष बहुमत मिळवण्यात अपयशी ठरला आहे. नेतान्याहू यांच्यापुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा खटला सुरू होण्याआधी करोनाचा फैलाव झाला. तो त्यांच्या पथ्यावर पडू शकतो, त्यांना राजकीयदृष्टय़ा फायदेशीर ठरू शकतो, असे भाकीत ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मधील लेखात केले आहे. नेतान्याहू करोनाच्या निमित्ताने पुन्हा राजकीय वर्चस्वासाठी सरसावले आहेत. अल्पकाळासाठी राष्ट्रीय आणीबाणीकालीन सरकार स्थापण्याचा प्रस्ताव नेतान्याहू यांनी दिल्याने तो धुडकावणे त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी बेनी गांत्झ यांना कठीण जाईल, अशी टिप्पणीही या लेखात केली आहे.

‘हारेत्झ’ या डाव्या विचारसरणीच्या वर्तमानपत्रातील एका स्तंभात- नेतान्याहू करोना संकटकाळातील प्रत्येक क्षणाचा राजकीय फायदा घेत आहेत, प्रचार करीत आहेत, असे निरीक्षण नोंदवले आहे. नेतान्याहू यांचा प्रयत्न संकट नियंत्रित करण्यासाठी नाही, तर राजकीय स्वार्थासाठी आहे, अशी टीकाही त्यात आहे. ‘द जेरूसलेम पोस्ट’मधील लेखात आणीबाणीत अधिकारांचे विकेंद्रीकरण आणि नियंत्रणाचे हस्तांतरण संबंधित क्षेत्राकडे करणे आवश्यक असते, यावर भर दिला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन करोना पेचप्रसंगाशी दोन हात करण्यास किती सक्षम आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी ‘इंडिपेण्डंट’ने तज्ज्ञांच्या मतांवर आधारित लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात दोन्ही प्रकारची मते व्यक्त झाली आहेत. ते ‘ब्रेग्झिट’प्रमाणे याही संकटातून मार्ग काढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्याबरोबरच ते प्रशासनातील तज्ज्ञांवर विश्वास ठेवून मोठी जोखीम उचलत असल्याची निरीक्षणे त्यात नोंदवण्यात आली आहेत. जॉन्सन ट्रम्प यांचे मित्र असले, तरी ते ट्रम्प यांच्यापेक्षा खूपच वेगळे आहेत, असेही काहींनी म्हटले आहे. करोनाशी संबंधित माहितीबाबत नागरिक वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांवर विश्वास ठेवतात की राजकीय नेत्यांवर, याची मतचाचणी ‘ऑब्झव्‍‌र्हर’ने केली. त्यात लोक नेत्यांपेक्षा तज्ज्ञांवर विश्वास ठेवतात, असे आढळले. पंतप्रधान जॉन्सन यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे प्रमाण ३६ टक्के आहे, असे या चाचणीतील निष्कर्ष आहेत.

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)