डॅनिअल मस्करणीस

‘समलिंगी विवाहां’बद्दल काय भूमिका घेणार, अशी विचारणा केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच केली आहे. ते प्रकरण आपल्या गतीने पुढे जाईलही; पण कॅथोलिक ख्रिस्ती धर्मप्रमुख असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी ‘समलिंगी विवाहा’चा पुरस्कार करण्याचे धाडस अलीकडेच केले, तरीदेखील ही संकल्पना धर्मात कितपत रुचेल? प्रगत विचारांचे नेतृत्व नेहमीच धारणांवरही प्रभाव पाडू शकते का?

‘‘समलिंगींना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणून त्यांच्यासाठी लग्नासारखीच ‘सिव्हिल युनिअन’सारखी काही पर्यायी व्यवस्था असावी,’’ असे पोप फ्रान्सिस यांनी एका माहितीपटात म्हटल्याची बातमी आली आणि संपूर्ण जगभर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली.

रशियात जन्मलेले व सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले ‘ऑस्कर’ पुरस्कार विजेते आणि ज्यूधर्मीय लघुपटकार इव्हगेनी अफायनव्स्की यांनी पोप फ्रान्सिस यांच्यावर ‘फ्रान्सेस्को’ हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. २१ ऑक्टोबर रोजी रोममध्ये हा माहितीपट प्रथमच प्रदर्शित झाला आणि यातील समलिंगी संबंधाविषयीचे पोप यांचे वक्तव्य काही तासांतच जगात, कानाकोपऱ्यांत पोहोचले. व्हॅटिकनच्या बंद दाराआड नवविचारांचे वारे आणू पाहणारे, पुरोगामी मूल्यांचा पुरस्कार करणारे पोप फ्रान्सिस यांच्या एकंदरीत मागील सात वर्षांच्या कारकीर्दीकडे पाहिले तर त्यांच्या या विधानाचे खरे तर आश्चर्य वाटू नये! पोपपदाची सूत्रे हातात घेतल्या घेतल्या २०१३ मध्ये जेव्हा त्यांना समलिंगी व्यक्तींसंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा त्यांनी ‘मी कोण त्यांचा न्याय करणारा?’ असे विधान केले होते. पोप फ्रान्सिस हे बऱ्याच अर्थाने पारंपरिक व्हॅटिकनला नवीन आहेत. ते ख्रिस्ती कॅथोलिक चर्चमध्ये काहीशा बंडखोर, धाडसी मानल्या गेलेल्या जेजुईट किंवा जेजवीट पंथातील आहेत.

इ.स. १५३९ मध्ये चर्चच्या सत्ताकारणाला कंटाळून इग्नेशिअस ऑफ लोयोला यांनी दुसरा पंथ सुरू केला. त्याला जेजुईट वा येशूसंघीय धर्मगुरू असे नाव दिले. पुढे त्यास पोपनेही मान्यता दिली व तो चर्चचाच एक भाग बनला. जेजुईट किंवा येशूसंघीय धर्मगुरू हे स्वतंत्र विचार करणारे, धीट मानले जातात. ते चर्चपेक्षा चर्चच्या बाहेरच जास्त रमणारे असतात. चर्चमधील बहुतांशी धर्मप्रांतीय धर्मगुरू हे सेमिनरीत जाऊन सहा वर्षांत धर्मगुरू होऊ शकतात, तर जेजवीट धर्मगुरू बनण्यासाठी तब्बल १२ वर्षे खर्ची घालावी लागतात. पोप फ्रान्सिस यांच्या रूपाने कॅथोलिक इतिहासात पहिल्यांदाच जेजुईट धर्मगुरू पोपपदाला पोहोचले आहेत. त्यात ते अर्जेटिना या युरोपबाहेरील देशातील. त्यामुळे बऱ्याच अर्थाने ते व्हॅटिकनमध्ये ‘आऊटसायडर’ आहेत.

कर्मठ व्हॅटिकनच्या भव्य प्रासादात त्यांचे शत्रू तयार होणार हे त्यामुळे स्वाभाविकच होते. जॉर्ज बेर्गोग्लिओ (पोप फ्रान्सिस यांचे मूळ नाव) यांच्यासारखे विवेकी विचार करणारे व ते बिनदिक्कतपणे समोर मांडणारे धर्मगुरू हे अपवादच. ख्रिस्ती चर्चचे सर्वेसर्वा म्हणून त्यांनी जाहीररीत्या व्यक्त केलेली मते आपल्याच विश्वात मग्न असलेल्या चर्चला खडबडून जागी करणारी आहेत. प्रागतिक, पुरोगामी मूल्याचा पुरस्कार करणाऱ्या सर्व, विशेषत: चर्चमध्ये जाणाऱ्या ख्रिस्ती धर्मीयांनी त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर समलिंगींसंबंधीच्या पोप यांच्या उपरोक्त विधानाचा तीन वेगवेगळ्या बाजूंनी परामर्श घेणे गरजेचे आहे.

पहिली बाजू म्हणजे, त्यांचे हे विधान ज्या तऱ्हेने जगासमोर आले ती. पोपचे व्यक्तव्य ‘फ्रान्सेस्को’ या माहितीपटामार्फत आत्ता जगासमोर आले असले, तरी ते दोन वर्षांपूर्वीचे विधान आहे. दिग्दर्शक अफायनव्स्की यांना खरे तर या माहितीपटासाठी पोप यांची स्वतंत्र मुलाखत घ्यायची होती, पण त्यास व्हॅटिकनच्या माध्यम विभागाने नकार दिला. त्याऐवजी व्हॅटिकनच्या अधिकृत कॅमेऱ्यातून अगोदर रेकॉर्ड केलेल्या पोप यांच्या विविध देशांतील मुलाखतींच्या असंपादित दृक्मुद्रणे (रॉ फुटेज) अफायनव्स्की यांना देण्यात आल्या. शेकडो तासांच्या या रेकॉर्डिग्जमधून अफायनव्स्की यांना हे वरील विधान मिळाले. पोपनी ज्या पत्रकाराच्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले होते ती मुलाखत या वक्तव्याविना दोन वर्षांपूर्वीच प्रकाशित झाली होती. म्हणजे व्हॅटिकनने खुद्द पोप यांच्या विधानांस कात्री लावली होती. पोप यांनाही न जुमानणारी व्हॅटिकनमधील सनातनी, कडवी नोकरशाही किती शक्तिशाली आहे याची प्रचीती या प्रसंगातून येते.

दुसरी बाजू म्हणजे, हे वक्तव्य कोणत्या संदर्भात केले गेले, ही. पोपपदी विराजमान झाल्यावर, सुरुवातीला ज्या समलिंगींना पोप भेटले- त्यांपैकी ज्या समलिंगी व्यक्तीमुळे पोप यांचे ‘एलजीबीटी’ समूहासंबंधी मतपरिवर्तन होण्यास मदत झाली, ती व्यक्ती म्हणजे वुआन क्रूझ. हा चिली येथे राहणारा एक सामान्य ख्रिस्ती तरुण. लहानपणी तो परिसरातील एका ख्रिस्ती धर्मगुरूच्या लैंगिक शोषणाला बळी पडला. पांढऱ्या झग्यातील ख्रिस्ती धमर्गुरूला देवदूत मानणाऱ्या त्या देवभोळ्या कोवळ्या जिवावर ‘शरीर आणि मन’ अशा दुहेरी पातळीवर अत्याचार झाला. या अत्याचाराची कुठे तो वाच्यताही करू शकत नव्हता. पुढे तारुण्यात पदार्पण केल्यावर वुआन एक समलिंगी तरुण म्हणून जगू लागला. त्याचे लहानपणी धर्मगुरूहाती लैंगिक शोषण होणे आणि पुढे तारुण्यात त्याचे समलिंगी म्हणून असणे या दोन घटना (आपण या लेखापुरत्या) स्वतंत्र मानू. काही वर्षांनी आजूबाजूचे वातावरण अनुकूल झाल्यावर त्याने ‘त्या’ धर्मगुरूच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली. ज्याविषयी तक्रार केली ते फादर फर्नाडो कराडीमा हे चिली चर्चमधील एक बडे धर्मगुरू होते. चिलीतील गिरिजाघरे फादरांना या आरोपांपासून वाचविण्यासाठी पुढे आली. चिली चर्चमधील कार्डिनल (व पोपच्या सल्लागार मंडळावर राहिलेल्या) फादर झेवियर इराझूरीज यांनी सुरुवातीला वुआनचे आरोप फेटाळून तर लावलेच; पण इतक्यावरच न थांबता ‘वुआन हा पहिल्यापासूनच समलिंगी आहे, म्हणजे त्याला ‘तो’ प्रकार लहानपणी ‘आवडलेला’ असणार’ असा अतिशय खालच्या पातळीवरचा प्रतिवाद न्यायालयात केला. वुआन मात्र आपल्या आरोपांवर ठाम राहिला. पुढे बरीच वर्षे एकटय़ाने लढा दिल्यानंतर व्हॅटिकनने २०११ साली फादर फर्नाडो कराडीमा यांना वयाच्या ८७व्या वर्षी दोषी ठरवले. पुढे वुआन ‘ख्रिस्ती धर्मगुरूंकडून चर्चमधील लहान मुलांचे लैंगिक शोषण’ या मुद्दय़ावर प्रबोधन करत जगभर बोलू लागला. वुआन तसा सामान्य श्रद्धावान ख्रिस्तीच होता, मात्र तो चर्चच्या या वागण्यानं दुखावला गेला होता. त्यामुळे सर्व प्रकाराबद्दल चर्चने आपली माफी मागावी या मताचा तो होता. पुढे तब्बल सात वर्षांनी, २०१८च्या एप्रिल-मे महिन्यांत पोप फ्रान्सिस यांची वुआनने भेट घेतली. या भेटीत त्याने आपले अनुभव पोपना कथन केले. हा संवाद पोप फ्रान्सिस यांचे समलिंगी वा एलजीबीटी समाजाबाबतचे मत बदलण्यासाठी निर्णायक मानला जातो. चर्चमध्ये भोळ्याभाबडय़ा श्रद्धेने पालकांनी पाठविलेली बालके चर्चमधीलच ख्रिस्ती धर्मगुरूंच्या लैंगिक शोषणाला कसे बळी पडतात, याचे एक प्रत्यक्ष उदाहरण वुआनच्या रूपाने पोपनी पाहिले. दुसऱ्या बाजूला चर्चचे समलिंगी मुद्दय़ाबाबतचे प्रतिगामी धोरणही पोप पाहात होतेच. वुआनबरोबरच्या भेटीने पोप यांना अंतर्मुख केले आणि त्यामुळेच असेल, त्यांनी वुआनला त्याच भेटीत- ‘तू जसा आहेस त्याचा तू प्रेमाने स्वीकार कर, कारण तुला तसे देवाने निर्माण केले आहे..’ असे म्हटले. ‘समलिंगीही देवाचीच लेकरे आहेत’ असे म्हणत विद्यमान पोपनी कॅथोलिक चर्चच्या इतिहासात प्रथमच एलजीबीटी समाजाविषयी करुणेने उद्गार काढले. पोप यांच्या या वक्तव्याची बीजे त्या प्रसंगात दडलेली आहेत. वेगवेगळ्या जातीसमूहांच्या किंवा भिन्न आवडीनिवडीच्या लोकांबाबत आपण बरीच एकांगी मते बाळगत असतो आणि त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘संवादचा अभाव’, हेच हा प्रसंग दर्शवतो.

आता तिसरी आणि महत्त्वाची बाजू म्हणजे, चर्चची पारंपरिक भूमिका आणि पोप यांचे विधान. बायबलमध्ये पती आणि पत्नीमधील लैंगिक संबंधांनाच (तेही फक्त कुटुंबनिर्मितीसाठी- प्रोक्रिएशन) मान्यता आहे. लग्नाबाहेरील संबंध हे व्यभिचार मानले जातात. त्यामुळे समलिंगी संबंधांना ख्रिस्ती धर्मात मान्यता नाही. किंबहुना २००३ मध्ये व्हॅटिकनने अधिकृतरीत्या परिपत्रक काढून- ‘कौटुंबिक मूल्यव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समलिंगी संबंधांना विरोध करणे कसे गरजेचे आहे,’ हे ठासून सांगितले होते. तर दुसऱ्या बाजूला युरोप-अमेरिकेतील बरेच ख्रिस्ती धर्मगुरू समलिंगी आहेत. असे हे मोठे विरोधाभासी चित्र चर्चसमोर आहे. तेव्हा या संदर्भात पोपनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरते.

अर्थात, या विधानामुळे धर्मातील पुराणमतवादी अधिकच आक्रमक होणार आहेत. पोप फ्रान्सिस हे जगात लोकप्रिय असले तरी त्यांचे चाहते हे बहुतांशी चर्चबाहेरील आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. चर्चमध्येही सुधारणावादी गट आहे व त्या गटाला हे पोप आश्वासक वाटतात. पण चर्चमधील परंपरावादी गट मात्र जास्त ताकदवान आहे.

मुळात पोप फ्रान्सिस यांना व्हॅटिकनमधील नोकरशाही मोडीत काढण्यासाठी पोपपदी आणले गेले होते. चर्चमधील विविध धर्मगुरूंकडून लैंगिक शोषणाची प्रकरणे असोत किंवा व्हॅटिकनमधील आर्थिक भ्रष्टाचार; अगोदरचे पोप बेनेडिक्ट सोळावे यांना हे सारे थोपविणे जमले नव्हते. त्यामुळे पाश्चात्त्य माध्यमांचा बराच दबाव चर्चवर येऊन २०१३ मधील ऐतिहासिक पोपपदाचा खुर्चीबदल घडविला गेला.

पोपपदाची सूत्रे हातात घेताना स्वत:चे सामान स्वत:च गाडी चालवून व्हॅटिकनमध्ये घेऊन येणे, सोन्याने मढवलेल्या सिंहासनावर विराजमान होण्यास नकार देऊन साध्या खुर्चीवर बसून पोपपदाची शपथ घेणे अशा छोटय़ा छोटय़ा घटनांतून पोप फ्रान्सिस यांनी आपले वेगळेपण पहिल्या दिवसापासूनच अधोरेखित केले. अगोदरच्या पोपसारखे व्हॅटिकनच्या माध्यम-विभागाने पढवून दिल्यासारखे तोलूनमापून रूक्ष बोलणे त्यांना कधी जमलेच नाही! मुलाखतकर्त्यांच्या कोणत्याही प्रश्नावर ते बिनदिक्कतपणे मानवतावादी दृष्टिकोनातून सहज व्यक्त होताना दिसतात. फुटबॉल या खेळावर मनापासून प्रेम करणारे व ते जाहीररीत्या दर्शविणारे, स्थानिक राज्यकर्त्यांना काय वाटेल याची पर्वा न करता जगातील विविध ठिकाणच्या निर्वासितांना भेटून त्यांची विचारपूस करणारे, समलिंगी/नास्तिक सर्वानाच ‘देवाची लेकरे’ म्हणून खुल्या दिलाने संबोधिणारे पोप अल्पावधीतच पुरोगामी मूल्यांवर विश्वास असणाऱ्या जगभरच्या नागरिकांना न आवडते तरच नवल!

पोप फ्रान्सिस यांची भूमिका मात्र एकदम स्पष्ट आहे. चर्चने लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याऐवजी, त्यांना उत्साहाने जगण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. तुम्ही घटस्फोटित आहात वा समलिंगी आहात म्हणजे तुम्ही पापी असे सुचवून त्या व्यक्तींचे मानसिक खच्चीकरण करण्याऐवजी त्यांच्या पाठीवर हात ठेवून आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी त्यांना चर्चने शुभेच्छा दिल्या पाहिजेत.

दोन हजार वर्षांपूर्वी एका व्यभिचारी शोमरोनी स्त्रीला मारण्यास आलेल्या लोकांना येशू म्हणाला होता की, ‘‘दगड मारायला आलेल्यांपैकी ज्यांनी कोणी कधी चूक केलीच नाही त्यांनी प्रथम दगड मारावा.’’ तेव्हा सगळे जण निघून गेले. येशूने यहुदी शास्त्रात काय लिहिले आहे ते उगाळत न बसता, आपल्या साध्यासोप्या मानवतावादी दृष्टिकोनाने त्या स्त्रीचे झुंडबळी जाण्यापासून रक्षण केले होते. पोप फ्रान्सिस येशूच्या या मुक्त विवेकी विचारांशी नाते सांगणारे आहेत!

(लेखक ‘धर्म आणि विवेक’ या विषयाचे अभ्यासक असून त्यांचे ‘मंच’ हे ख्रिस्ती धर्मातील विवेकवादी चळवळीबद्दलचे पुस्तक प्रसिद्ध आहे.)

danifm2001@gmail.com