05 April 2020

News Flash

गुरूणां गुरु..

डॉ. सदानंद बोरसे यांनी पत्ररूपी संवादातून जागवलेल्या प्रांजळ आठवणी..

(संग्रहित छायाचित्र)

ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ तसेच सोप्या भाषेत, पण नेमकेपणाने वैद्यकीय ज्ञानाचा प्रसार करणारे लेखक डॉ. हणमंत विद्याधर अर्थात ह. वि.  सरदेसाई यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे विद्यार्थी डॉ. सदानंद बोरसे यांनी पत्ररूपी संवादातून जागवलेल्या प्रांजळ आठवणी..

आदरणीय सर,

तुमची अगदी पहिल्यांदा ओळख झाली ती आपल्या बरोबरच्या सुहृदचे बाबा म्हणून. ‘युवास्नेह’ नावाच्या आमच्या संस्थेसाठी एका कार्यक्रमाला तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्याचे काम माझ्यावर सोपवले होते आमच्या तांबे सरांनी. तर ते निमंत्रणपत्र तुम्हाला द्यायला मी तुमच्या ‘सुचरित’ बंगल्यावर पोहोचलो. तुमच्या वक्तशीरपणाबद्दल आधीच कळले असल्यामुळे मी अगदी काटय़ावरच्या वेळेला दारात पाऊल टाकले.

सुहृद किंवा अमलाने आत तुम्हाला मी आल्याचे सांगितले असावे. एखाद्-दोन मिनिटांतच तुम्ही आलात आणि मला हिवाळ्यातला सकाळचा सूर्यप्रकाश अन् ऊब घेऊन भेटल्यासारखे वाटले.

एखाद्या चित्रपटाच्या नायकासारखे देखणे रूप, समोरच्याला सहज आपलेसे करणारी स्नेहमय नजर, सहवासातील प्रत्येकाला संसर्गजन्य ठरणारा उमदा उत्साह, पाहताक्षणी कोणालाही प्रेमात पाडील असे मंदमधुर स्मित. सुहृदचे हे बाबा पुण्यातील खूप म्हणजे खूऽपच प्रसिद्ध डॉक्टर आहेत, इतकीच त्या वेळी तुमच्याबद्दलची माहिती. मी दिलेले निमंत्रणपत्र तुम्ही कौतुकाने स्वीकारलेत, लगेचच उत्सुकता दाखवत वाचलेत आणि तत्परतेने होकारही दिलात.

त्या पहिल्या भेटीत मला लाभलेली ती उबदार प्रकाशकिरणे नंतर किती तरी वेळा माझ्यावर पडली आणि प्रत्येक भेटीत त्यांच्या प्रकाशात मनाचा एखादा नवा कोपरा उजळून निघाला.

नंतर पुण्याच्या बरामजी जिजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात जेव्हा शिक्षण सुरू झाले, तेव्हा तुम्ही फक्त ‘सुहृदचे बाबा’ राहिला नव्हता. आता तुम्ही आम्हाला ‘मेडिसीन’ विषय शिकवणारे मानद प्राध्यापक होतात. शनिवारी बाह्य़रुग्ण विभाग चालवणारे ‘डॉ. एच. व्ही. सरदेसाई’ युनिट हे रुग्णांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, साध्या स्वच्छता-कर्मचाऱ्यांपासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांपर्यंत अन् तंत्रज्ञांपासून वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत साऱ्यांसाठी एक खास युनिट होते. डॉ. वाडिया त्या युनिटचे शरीर होते, तर तुम्ही त्या युनिटचा आत्मा.

तुम्ही बहुतेक वेळा सकाळी लवकर लेक्चर घ्यायचा. तुम्ही लेक्चर घेणार म्हटल्यावर केवळ ज्यांच्यासाठी ते लेक्चर असे, त्याच वर्गातील नव्हे तर ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचे, ते सगळे विद्यार्थी हजर होत. सकाळी लवकर न उठण्याचा नियमच असलेले किती तरी सूर्यवंशी केवळ घडय़ाळाच्या गजरावर न विसंबता मित्रांना निरोप देऊन त्या दिवशी आवर्जून भल्या पहाटे उठून, आवरून तुमच्या लेक्चरला आलेले असत. घडय़ाळाच्या ठोक्याला तुम्ही वर्गात प्रवेश करायचा. ना हातात टिपणे, ना काही संदर्भपुस्तक. आल्यावर तुमची हसरी नजर पूर्ण वर्गावर एकदा फिरेपर्यंत सगळीकडे अक्षरश: टाचणी पडेल तर आवाज अशी शांतता पसरलेली. काहीशा सानुनासिक, पण अतिशय स्पष्ट, मोकळ्या आणि प्रासादिक आवाजात तुम्ही त्या दिवशीच्या विषयाचा ‘सा’ लावायचात. आजवर दहा वेळा वाचूनही डोक्याला हुलकावणी देणारा क्लिष्ट विषय तुम्ही इतका सहजसोपा बनवून उलगडून दाखवायचात की, आतापावेतो आपण त्याचा सरांसारखा विचार का केला नाही, याबद्दल स्वत:चाच राग यायचा.

तीच गोष्ट तुम्ही घेत असलेल्या बेड साइड क्लिनिकची. सुरुवातीला तुमच्याबद्दलच्या दबदब्यामुळे तुमच्यापुढे केस प्रेझेंट करायला कुरकुरणारी मुले एखाद्-दोन क्लिनिकनंतर अहमहमिकेने पुढे सरकायची. कारण एव्हाना मुलांना कळलेले असायचे, आपण सरांनी विचारलेल्या अगदी सोप्या प्रश्नाचे उत्तरही अगदी उटपटांग चुकीचे दिले तरी सर न रागावता, कुठल्याही प्रकारचा अवमान न करता गोड हसून आपली चूक दुरुस्त करतात अन् पुढे जातात. म्हणजे – ‘‘मेंदू कुठे असतो?’’ असे तुम्ही विचारल्यानंतर एखाद्याने ‘‘गुडघ्यात!’’ असे उत्तर दिले असते; तरी तुम्ही मिश्कील हसत त्याला म्हणाला असतात, ‘‘नाही रे राजा, तू बराच खाली आहेस! तसाच आणखी वर वर जात शोधता येतोय का तुला?’’

तुम्ही स्वत: शिकलात आणि नंतर आम्हाला शिकवलेत, त्या काळात आजच्या इतके तपासण्यांचे अवडंबर अस्तित्वातच नव्हते. रोगनिदानाबाबत मुख्य भर असायचा तो रुग्णाच्या तपासणीवर आणि सरदेसाई युनिटची प्रसिद्धी होती मज्जासंस्थेच्या व्याधींच्या निदानाबद्दल अन् उपचाराबद्दल. ससून रुग्णालयातील या विषयाचा विशेष बाह्य़रुग्ण विभाग चालवण्याची जबाबदारीही तुमच्या युनिटकडेच होती. माझे वैद्यकीय शिक्षण चालू असतानाच सीटी स्कॅन अन् एमआरआयसारख्या तपासण्यांचा शिरकाव वैद्यकीय क्षेत्रात होऊ लागला होता; पण नंतरही किती तरी वष्रे तुम्ही केलेल्या ‘क्लिनिकल’ निदानाच्या गणितावरच अनेकांचा भरवसा होता.

ससून रुग्णालयात अथवा बाहेरही तुम्ही केलेल्या रोगनिदानाच्या कथा-दंतकथा आम्हाला अचंबित करत असत. त्यामागची तुमची तर्कशुद्ध विचारपद्धती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती अन् अद्ययावत ज्ञान या साऱ्यांमुळे बहुतेक विद्यार्थी तुम्हाला आदर्श मानत, प्रेरणास्रोत मानत. धन्वंतरीच्या अस्तित्वाचा खरेपणा ज्यांच्या ज्ञानामुळे पटेल, अशा मोजक्या वैद्यकीय तज्ज्ञांपकी तुम्ही होतात. ‘वैद्यक हे केवळ शास्त्र नाही, तर ती कलाही आहे’ हे तुमच्या हाताखाली शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला केवळ कळले नाही, तर वळलेसुद्धा!

तुमची ही शिकवण केवळ वैद्यकशास्त्रापुरती मर्यादित नव्हती. तुमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला- मग तो वैद्यकीय विद्यार्थी असो वा नसो- तुम्ही जीवनशिक्षणाचा एखादा तरी पाठ पढवलेला आहे. डॉक्टरकडे आलेला रुग्ण उपचारांसाठी शुल्क देतो, उपचार करणारा डॉक्टर व्यवसाय म्हणून ते स्वीकारतो; पण या सगळ्या व्यावहारिक देवाणघेवाणीत त्या रुग्णाने डॉक्टरबद्दलच्या विश्वासावर विसंबून आपल्याजवळची सगळ्यात मोलाची गोष्ट डॉक्टरकडे तारण म्हणून ठेवलेली असते- स्वत:चा जीव!

हा विश्वास अन् हे तारण वैद्यकाला केवळ व्यवसायाच्या पातळीवर ठेवत नाही, ते वैद्यकाला नीती बनवते. वैद्यकीय व्यवसायाचे हे नतिक अधिष्ठान तुम्ही किती तरी उदाहरणांनी माझ्यासारख्या कितीकांना शिकवलेत.

सर, शेवटी तुमच्याबद्दलची एकच तक्रार.

अनेक वेळा स्वत: इतरांपुढे मांडलेले समीकरण तुम्ही स्वत: मात्र चुकवलेत. तुमच्या किती व्याख्यानांमधून तुम्ही सर्व श्रोत्यांना निरामयतेची, आरोग्यपूर्ण आयुष्याची सूत्रे सांगायचात. त्या प्रत्येक वेळी तुम्ही पूर्वसुरींचा हवाला देऊन वेदवचने ऐकवायचा.

‘वेदिक ऋषींनी शंभर वष्रे आरोग्यमय जीवनाची इच्छा व्यक्त केली आहे आणि वेदांत उल्लेख केलेली शंभर वष्रे म्हणजे प्रत्यक्षात सव्वाशे वष्रे!’’

हे समीकरण तुम्ही स्वत: मात्र चुकवलेत, सर!

तुमच्या असंख्य विद्यार्थ्यांपकी एक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2020 12:23 am

Web Title: dr hanamant vidyadhar his student dr sadanand borses memories correspondence abn 97
Next Stories
1 नाही तर आपण रस्ता चुकू!
2 तान्हाजीला छपाक
3 चाँदनी चौकातून : करोनाप्रहर
Just Now!
X