News Flash

जैश : ‘आयएसआय’चे छुपे सैन्य

पठाणकोटच्या निमित्ताने या दोघांवरही टाकलेला हा झोत..

भारतीय संसदेवरील हल्ल्याचे संग्रहित छायाचित्र.

पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद ही पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना असल्याचे प्राथमिक पुरावे मिळत आहेत. १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात हीच संघटना आणि तिचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याचा हात होता. पठाणकोटच्या निमित्ताने या दोघांवरही  टाकलेला हा झोत..
जैश-ए- मोहम्मद म्हणजे प्रेषिताचे सैन्य. हे खरेतर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना इंटर सव्हिसेस इंटेलिजन्सचे सैन्य असून, मौलाना मसूद अझहर याने ३१ जानेवारी २००० रोजी या संघटनेची स्थापना केली. कंदहार विमान अपहरण प्रकरणात भारताने ज्याला मुक्त केले तोच हा मसूद अझहर. सध्या या संघटनेचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहवालपूर येथे आहे.
जैशचा संस्थापक मौलाना मसूद अझहर हा पूर्वीच्या हरकत-उल-अन्सर या संघटनेचा सरचिटणीस होता आणि १९९४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये विशेष मोहिमेवर तैनात असाताना भारतीय सुरक्षा दलांनी त्याला ११ फेब्रुवारीला अटक केली होती. डिसेबर १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या आयसी ८१४ या विमानाचे अपहरण होऊन ते अफगाणिस्तानमधील कंदहार येथे उतरवण्यात आले. त्यातील प्रवाशांना मुक्त करण्याच्या बदल्यात ३१ डिसेंबर १९९९ रोजी मौलाना मसूद अझहरची सुटका करावी लागली होती. सुटकेनंतर लगेचच मसूदने जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली.
जैशची बीजे पूर्वीच्या हरकत-उल-जिहाद-इ-इस्लामी या दहशतवादी संघटनेत आहेत. त्या संघटनेत फूट पडून हरकत-उल-मुजाहिद्दीन हा गट वेगळा झाला. काही काळाने हे दोन्ही गट पुन्हा एकत्र आले आणि न्या संघटनेतचे नाव हरकत-उल-अन्सर असे ठेवले गेले. अल-फरान हा त्याचा लोकांपुढील चेहरा असल्याचे मानले जायचे. त्यानंतर संघटनेचे नाव पुन्हा हरकत-उल-मुजाहिदीन असे बदलले. त्यातूनच पुढे सध्याच्या जैश-ए-मोहम्मदची स्थापना झाली. जम्मू-काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तान आणि भारताच्या अन्य भागांतही या संघटनेच्या कारवाया आहेत. स्थापना झाल्याबरोबर जैशने पहिला हल्ला चढविला तो काश्मीरमध्ये. २००० सालच्या या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीय संसदेवर हल्ला झाला. या संघटनेवर भारताने २५ ऑक्टोबर २००१ रोजी ‘पोटा’नुसार (प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम अ‍ॅक्ट) बंदी घातली, तर अमेरिकी माजी परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांनी २६ डिसेंबर २००१ रोजी तिला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर आलेल्या दबावामुळे पाकिस्तानमधील तत्कालीन लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांना दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवणे भाग पडले.
२००१ च्या अखेरीस जैशचा कमांडर मौलाना अब्दुल जब्बार याने पश्चिम पाकिस्तानमधील लक्ष्यांवर हल्ले सुरू केले आणि त्यावरून संघटनेत फूट पडू लागली. अनेक कट्टर दहशतवाद्यांनी अल-कायदाचा रस्ता धरला. यात फुटीर गटांनी चक्क मुशर्रफ यांच्यावरच २००३ साली हल्ला केला. पाकिस्तानमधील लाल मशिदीत जुलै २००७ मध्ये झालेल्या हल्ल्यातही याच संघटनेचा हात होता. त्यानंतरही या संघटनेवरील दबाव वाढला. पण २०१३ पासून पाकिस्तानने पुन्हा या संघटनेला रान मोकळे देण्यास सुरुवात केली आहे.

Untitled-11

Untitled-12

– सचिन दिवाण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2016 4:07 am

Web Title: hidden military of isi
टॅग : Isi
Next Stories
1 धोका हायड्रोजन बॉम्बचा
2 विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांपुढील आव्हाने
3 तर, ‘शहर’..
Just Now!
X