मराठी नाटय़सृष्टीला नवीन वळण देणाऱ्या आणि नवे आयाम अजमावणाऱ्या मोजक्या नाटककारांमध्ये महेश एलकुंचवार यांचा समावेश होतो. मानवी जगण्याचा, नातेसंबंधांचा सतत शोध घेणाऱ्या तेंडुलकरोत्तर पिढीतील एलकुंचवार महत्त्वाचे नाटककार. पेशाने इंग्रजीचे प्राध्यापक, पण संस्कृत साहित्यापासून षड्दर्शनांपर्यंत आणि मराठी साहित्यापासून पाश्चात्त्य साहित्यापर्यंत चौफेर वाचन मुशाफिरी करीत असलेले एलकुंचवार ‘आपला लेखकराव होणार नाही’ हे जितक्या ठामपणे सांगतात, तितक्याच ठामपणे ते महाराष्ट्राच्या सद्यकालीन वैचारिक दारिद्रय़ावरही बोट ठेवतात.. लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात त्यांच्याशी झालेल्या संवादाचा संपादित अंश..
*गिरीश कुबेर – सर्वसाधारणपणे महेश एलकुंचवार वर्तमानपत्रांच्या हाताला लागत नाहीत.. तसे ते टाळतातच. तरीसुद्धा त्यांनी आपल्याशी गप्पा मारण्याची विनंती मान्य केली, याबद्दल त्यांचे आभार.
एलकुंचवार – मी वर्तमानपत्रांच्या हाती लागत नाही, याचं कारण म्हणजे हल्ली काय होतं, की काही घडलं की वर्तमानपत्रांतून फोन येतात- तुमचे मत काय? त्यांची अशी गैरसमजूत असते की लेखकाची मते तयार असतात. तो ताबडतोब मत देऊ शकतो.. मला अनेक गोष्टींबाबत निश्चित भूमिकाच घेता येत नाही. निश्चितपणे, ठोसपणे मला एक मूलभूत अशा स्वरूपाचा विचार देता आला तर मी लोकांशी काही बोलण्यात अर्थ आहे. लेखक असला तरी तो विचारवंत असतोच असे काही नाही. हे साधे कारण आहे मी वर्तमानपत्राच्या हाती न लागण्याचं. दुसरं कारण असं की आपण जे बोलतो ते जसंच्या तसं येत नाही. त्याचाही विपर्यास होतो. त्याच्यामुळे घोटाळे होतात. मग, विवाद होतात. दुसरं, जी माणसं प्रसिद्ध असतात, मग ती कुठल्याही क्षेत्रातली असोत, त्यांना कोणत्याही प्रश्नाबद्दल विचारलं जातं. असं दहा-बारा वेळा झालं की आपोआप लोक त्यांना विचारवंत म्हणू लागतात. या प्रकाराची मला फार भीती वाटू लागते. कारण की विचारवंत होणं हल्ली इतकं सोपं झालेलं आहे. हा प्रकार काही मला बरा वाटत नाही.
*गिरीश कुबेर- कलेच्या क्षेत्रातील मंडळींनी विचाराच्या जगापासून लांबच असायला हवं का?
सर्जनशील लेखकांमध्ये दोन वर्ग आहेत. पहिला, ज्यांना निश्चितपणे राजकीय, सामाजिक आणि जीवनाच्या इतर अंगांविषयी निश्चित मते आहेत. आणि ते ती व्यक्त करतात. दुसरा, काही लोक असे आहेत की ज्यांची निश्चित मते नाहीत. ती नेहमी दोलायमान असतात. त्यांना आपण कोणत्याही प्रश्नावर बोला असं सांगणं तसं योग्य होणार नाही. सगळ्या कलावंतांना नाही भूमिका घेता येत. मला वाटतं हे आपण स्वीकारलं पाहिजे. माझं स्वत:चं असं आहे की, माझ्या अनेक कल्पना अर्धकच्च्या आहेत. त्याला प्रचंड वाचन आणि चिंतन याची जोड मिळणं, त्याला राजकीय आणि सामाजिक अभ्यासाची बैठक माझ्याकडे नाही. त्यामुळे वर्तमानपत्रातून फोन आला की मी घाबरतो. सध्या तर इतकं व्यामिश्र झालं आहे की, कुठलीही घटना घडली तरी त्याला अवतीभवती इतके पदर असतात. ते मला कळत नाहीत. त्यामुळे अधिकारवाणीने मत व्यक्त करावं असं मला वाटत नाही.
*रवि आमले – कलाकार, लेखक आणि समाज यांच्यातील नेमकी देवाणघेवाण आणि नातेसंबंध कशा प्रकारचा असावा?..
*अभिजीत ताम्हणे- फाळणी, गांधीहत्या, आणीबाणी, स्वतंत्र विदर्भ.. अशा काही घटना होत्या की त्याचा परिणाम थेट तुमच्या मानवद्रव्यावर झाला होता.. तसा परिणाम साहित्यातून होताना दिसतो का? ते झिरपते ते का?
– त्या कलावंताची काय मर्यादा आहे हे समाजानेदेखील ओळखलं पाहिजे. उदाहरणार्थ जीएंनी आपल्या पत्रांमध्ये सामाजिक बांधीलकी या विषयाची टिंगल केलेली आहे. ती त्यांची वैयक्तिक मते होती. पण, आतल्या गाभ्यातून जे आलं ते कथांच्या रूपानं त्यांनी तुम्हाला दिलेलं अघ्र्य आहे. त्या पातळीवर ते तुमच्याशी जोडून घेत होते.  
फाळणीच्या वेळी मी फारच लहान होतो. विदर्भ मध्य प्रदेशापासून वेगळा झाला त्याचा काही खोलवर परिणाम लेखकांवर झालाय असे मला वाटत नाही. १९६० मध्ये विदर्भ महाराष्ट्रात आला. बरं झालं आपण महाराष्ट्रात आलो अशी धारणा होती. माझे वडील पक्के गांधीवादी, काँग्रेसवाले. त्यांनाही आपण महाराष्ट्रात आलो याचा आनंद झाला. विदर्भाचा राग फक्त पुण्यावर आहे, महाराष्ट्रावर नाही. पण, पुण्यावर कोणाचा राग नाही? कुठेही जा, पुणेरी वृत्तीवर सगळे बोलत असतात. तो गमतीचा भाग आहे. त्यात काही खरं नाही.
सगळेच जण तेवढय़ाच राजकीय आणि सामाजिक पातळीवर जगतात असं मला वाटत नाही. नाही जगू शकत. ते तसे जगू शकत नसतील तर तेवढी सवलत आपण त्यांना द्यायला पाहिजे. लेखकानं जर राजकीय-सामाजिक भूमिका घेतली नाही तर तो अनैतिक वागला, तो आपल्या कर्तव्यापासून ढळला, असं आपण टोकाला जातोय का अशी मला शंका आहे.
*गिरीश कुबेर- हे त्याच्या कलाकृतीला मारक ठरतं का?
– नाही. माझं जे कलाजीवन आहे ते वैयक्तिक आहे. जे गाभ्याच्या आतून येतं त्याच्यावर काही परिणाम होण्याची भीती वाटत नाही. परंतु काहींचं आंतरजीवन आणि बाह्य़जीवन यांचा मिलाफ असतो. नामदेव ढसाळच्या कविता, मंटोच्या कथा घ्या.. त्यांचं आंतरिक जीवन आणि बाह्य़जीवन यांची सरमिसळ झालेली दिसते. आमचं असं होत नाही. याचं कारण, आम्ही छोटय़ा सृष्टीत आणि सुरक्षित जगतो. मी, ग्रेस, जीए, आम्ही सुरक्षित जीवन जगलो. उघडय़ावर आलो नाही किंवा जीवनाशी तसा सामना करावा लागला नाही. त्यामुळे आम्हाला तशा प्रश्नांची निकड जाणवली नसेल, असं असू शकतं. निश्चित, नि:संदिग्ध विधान काही करू शकत नाही. पण, मला नेहमी असंच वाटत आलं आहे की, मराठी लेखकाचा आवाका तसा मर्यादित राहिलेलाच आहे. आपल्याकडे शोकांतिका नाही याचं कारण काय असं मला एका मुलाखतीत विचारलं होतं. शोकांतिकेसाठी जे भयाण जीवनानुभव घ्यावे लागतात ते मराठी लेखक फारसे घेत नाहीत. त्यातल्या त्यात शोकांतिकेच्या जवळ पोहोचले ते जीएच. खेडय़ातले हल्लीचे जे लोक आहेत, ते सुंदर लिहितात. मला वाटतं आता साहित्याचं केंद्र आता छोटय़ा गावातच जाऊ लागलं आहे.
*अभिजित बेल्हेकर- अनेक कलावंत कित्येकदा सोयीस्कर भूमिका घेताना दिसतात..
– तुम्ही म्हणता ते खरं आहे. काही वेळा आपण असं पाहतो की चलनी नाणं असतं तशीही भूमिका घेतली जाते.
*राम जगताप- याचा कलावंताच्या प्रतिमेवर परिणाम होतो का?
– माझे कडवे डावे मित्र मला प्रतिगामी किंवा उजवा समजतात. कारण गंगेवर मी एक लेख लिहिला. आता मी हिंदू आहे ही तर वस्तुस्थितीच आहे. त्याचा काही मला मोठा गर्व नाही. गंगेबद्दल एका आत्मभावनेने लिहिले म्हणून तुम्ही ताबडतोब रायटिस्ट ठरता? हिंदू ठरता? कडवे ठरता? हे काही मला योग्य वाटत नाही.
*गिरीश कुबेर- संहिता लिहिताना नाटक आधी तुम्हाला दिसतं का? त्याचा फॉर्म डोक्यातून येतो का? या सगळ्या मोठय़ा कादंबऱ्या होऊ शकल्या असत्या असं वाटत नाही का?
– मला नाटक दिसतं. नाटक लिहिण्यापूर्वी रंगमंचावरची जी स्पेस आहे ३६ फूट बाय ४० फूट.. त्या स्पेसमध्ये नाटक घडताना दिसत असतं. ही ‘व्हिज्युअल स्पेस’ जर दिसली नाही तर, नाटक नाही लिहिता येत कुणाला. या स्पेसचा जाच कादंबरीकाराला नसतो. ज्या कादंबरीकारांनी नाटकं लिहिली त्या सगळ्यांची नाटकं पडलेली आहेत. कादंबरीची कथनशैली आणि व्याकरणच वेगळं असतं. नाटकाचं वेगळं असतं. मला वाटतं कुठे तरी तो प्रेरणेचा भाग आहे. मी जन्मत:च ती प्रेरणा घेऊन आलो आहे. मला दृश्यात्मक पद्धतीनं एका विशिष्ट अवकाशात ती गोष्ट दिसणं हे आपोआप घडत गेलं. त्याचं भान आल्यावर मी स्वत:ला जास्त शिस्त आणली.
*अभिजीत ताम्हणे- मराठी नाटक भारतीय स्तरावर का जात नाही?
– सर्वच प्रांतांमध्येच आता रंगभूमी राहिलेली नाही. नाटक पॅशनेटली कुणी करताना दिसत नाही. कलकत्त्यामध्ये ७० साली ज्या विलक्षण आवेगीपणानं नाटकामध्ये माणसं गुंतलेली दिसत, आता तसं होत नाही.
*रवींद्र पाथरे- इतर नाटकं फोकबेस्ड असतात. व्हिज्युअली खूप रिच असल्यामुळे त्यांना प्रतिसाद लाभतो. मराठी नाटक नेमकंतिथेच मार खातंय. त्यामुळे ते भारतीय स्तरावर जात नाही का?
– प्रश्नच नाही. कन्हैयालाल, वीणापाणी, चंदिगडची नीलम किंवा पण्णीकर यांची जी नाटकं आहेत त्यातल्या नटांच्या देहबोलीतून नाटक उभं राहतं. त्यांनी आपापली थिएट्रिकल इडियम तयार केली आहे. त्यांचं नाटक त्यांच्या परंपरांशी आहे.. मार्शल आर्ट्स म्हणा किंवा नृत्यपरंपरा म्हणा. त्याच्यातून त्यांनी ती इडियम निर्माण करून नाटकं केलेली आहेत. आपण स्टिफ- कडक लोक आहोत. आपल्याकडे लोकनृत्य त्या अर्थानं नाही, जसा गरबा गुजरात्यांमध्ये आहे. आपलं नाटक हे नेहमीच शब्दप्रधान राहिलेलं आहे.
*राम जगताप- जीवनाच्या बदललेल्या गतीचा संवेदनशीलतेवर आणि सर्जनशीलतेवर काय परिणाम होतो?
– हा खूप अवघड प्रश्न आहे. तेंडुलकरांकडे पाहा. मुंबईसारख्या विचित्र धावपळीच्या शहरात त्यांची जगण्याची जी लय होती ती त्यांनी कधी बदलली नाही. परंतु, मला असं वाटतं की परिणाम होत असणार. मी स्वत:ची कल्पना करू शकतो की मी समजा १९७० मध्ये मुंबईला आलो असतो तर काय झालं असतं? सांगता येत नाही. माझ्या चिरफाळ्या उडाल्या असत्या. चिरफाळ्या उडालेल्या माणसानं किती लेखन केलं असतं हे सांगता येत नाही. नागपूरमध्ये मी अत्यंत निवांतपणे माझ्या आशयद्रव्याबरोबर खूप काळ घालवू शकतो. बरं, मला निकड नसते. आपण लिहिलेलं नाटक सादर होईल की नाही याची चिंता करीत नाही. त्यामुळे मी स्वत:ला आणि माझ्या आशयद्रव्याला खूप वेळ देऊ शकतो. जो मी मुंबईत देऊ शकलो नसतो.
*गिरीश कुबेर- लेखन प्रक्रिया, कलानिर्मिती पूर्णपणे इतकी स्वान्तसुखाय असू शकते का?
– हो. हे पाहा, आता अनेक पुरस्कार आदी येऊ लागले आहेत आणि तुम्ही प्रतिभावान असे लोक मला सांगू लागले आहेत. लिहायला सुरुवात केली तेव्हा आपण लिहिलं की, ‘सत्यकथे’त येतं आणि विजयाबाई करतात व त्याचे प्रयोग होतात, असंच किती तरी वर्षे चाललं होतं. तोच माझा आनंद होता, त्याचं काही वाटत नव्हतं. मला त्या काळात व्यावसायिक रंगभूमीच्या ऑफर्स आल्या होत्या, पण मला ते करायचं नव्हतं. मला पैशाचा मोह नव्हता. किती पैसे देणार होते ते? तितके पैसे माझ्याकडे मुळातच होते. अन् प्रसिद्धीचं काय? ती किती टिकते?
*मुकुंद संगोराम- अनुभवाचा स्पर्श होणं, त्यासाठीच कलावंत म्हणून धडपड असते ना?
– आपण लिहीत असताना आतमध्ये एक ग्लो असतो. ते पाच-सहा दिवस भारलेले असतात, आतमध्ये एक छान ज्योत पेटलेली असते. तेव्हा मी मजेत असतो. तो आनंद मोठा आहे. पुरस्कार व सन्मान या आनुषंगिक गोष्टी आहेत.
*राम जगताप- मराठीमध्ये साहित्यिक बऱ्यापैकी ज्येष्ठ झाल्याशिवाय मान-सन्मान त्याच्या वाटय़ाला येत नाहीत. आता तुम्ही पंचाहत्तरीत प्रवेश केला आहे. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी ज्येष्ठ झाला आहात.. आणि विविध मान-सन्मान तुम्हाला मिळत आहेत. अशा वेळी तुम्ही काहीसे संकोचल्यासारखे दिसता..
– मुळात मी सुरुवात केली तेव्हा असं काही एवढंहोईल, असं वाटलंच नव्हतं. मजा आता है चलो लिखो, असं ते होतं. विजयाबाईंकडे जायचं तिथं दोन-तीन दिवस राहून गप्पा मारायच्या. आमचा जो प्रेक्षकवर्ग होता तो पाचशे लोकांचा.. श्री. पु. भागवत, सरवटे, पु. शि. रेगे असली माणसं. त्यांनी नाटक पाहून झालं की संपलं. त्यानंतर आणखी काय? हे सर्व जे घडू लागलेलं आहे आणि आता तर सुकाळच झालाय बक्षिसांचा. संकोच वाटतो मला. ग्रेस, जीए केवढे मोठे होते! िवदा करंदीकरांना ज्ञानपीठ मिळायला ब्याण्णवावं वर्ष यावं लागलं. हे जे चाललं आहे, त्यात माझ्याकडे जरा वेगानेच गोष्टी येत आहेत, त्याचा संकोच वाटतो.
*गिरीश कुबेर- या टप्प्यावर आपला लेखकराव होईल, अशी भीती वाटते का?
– माझा लेखकराव होणार नाही. ज्या दिवशी मी स्वत:हून प्रयत्न करीन काही मिळावं म्हणून, तेव्हा माझा लेखकराव होईल. पण, तशी शक्यता नाही.
*गिरीश कुबेर- पण, अनेकांचा लेखकराव होतो व कलात्मकता मरते असं घडतं का?
– कलात्मकता त्याच्यामुळे मरते, असं मला वाटत नाही. कारण दोन कप्प्यांमध्ये माणूस जगू शकतो. वाङ्मयीन व्यवहारात राजकारण करीत असूनही एखादा लेखक चांगल्या प्रकारे जिवंत राहू शकतो. तो डागाळला जाईलच याची काही खात्री नसते. पण काही माणसं डागाळली जातातही. एस्टॅब्लिशमेंटला काय आवडतं त्याप्रमाणे लिहीत राहतात. तो प्रांतच माझा नाही.
*स्वरूप पंडित- आजच्या मराठीविषयी काय वाटतं?
– गंमत अशी की, मी शुद्ध भाषेचा आग्रह धरून उच्चवर्णीय ब्राह्मण होईन की काय, अशी भीती माझ्या पोटात आहे. वर्तमानपत्र सर्वसामान्यांचं आहे. त्यामुळे त्यात त्यांची भाषा लिहिली गेली पाहिजे. पण तीही भाषा अचूक लिहिली गेली पाहिजे. पण धड मराठी लिहितानाच कुणी दिसत नाही. निव्वळ मराठीत कुणी लिहिलं, तर मला आनंदच होईल.. दुसरं, भाषा टिकविण्याची जबाबदारी आपण सरकारवर का बरे टाकतो? माझा राग मध्यमवर्गीयांवर आहे. मुलांना इंग्रजी माध्यमात टाका, त्यांनी इंग्रजी वाचलेच पाहिजे. पण, म्हणून घरात मराठी बोलता येत नाही, हा काय प्रकार आहे? भाषा टिकविणं ही लोकांची जबाबदारी आहे. आपण काही करीत नाही आणि शासनाने हे केलं नाही, ते केलं नाही, असं म्हणतो. हा आपला सांस्कृतिक आळशीपणा आणि बेजबाबदारी आहे.
*विद्याधर कुलकर्णी -कर्नाडांना ज्ञानपीठ मिळालं, पण तेंडुलकरांना नाही मिळालं?
– तेंडुलकरांना सरस्वती सन्मान मिळाला. सरस्वती सन्मान मिळाला की ज्ञानपीठ मिळत नाही. कारण बिर्ला हाऊस व जैन हाऊस यांचं वितुष्ट आहे. ज्ञानपीठ मिळालेल्या माणसाची बातमी टाइम्स ऑफ इंडिया व महाराष्ट्र टाइम्समध्ये येते. पण, हिंदूुस्थान टाइम्समध्ये येत नाही. सरस्वती सन्मानाची बातमी हिंदूुस्थान टाइम्समध्ये येते, पण टाइम्स ऑफ इंडिया व महाराष्ट्र टाइम्समध्ये येत नाही. या पातळीवर जिथे वैर असतात, तिथं कसलं ज्ञानपीठ?
*रवींद्र पाथरे- विदर्भातल्या अनेकांची तक्रार असते की आम्ही विदर्भात असल्यामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळत नाही?
-मी अनेकांना नेहमी सांगतो की, असं तुम्ही बोलूच नका. कारण विदर्भातील प्रत्येक लेखक आधी पश्चिम महाराष्ट्रात मोठा झालाय. कवी अनिल, ग. त्र्यं. माडखोलकर, कुसुमावती देशपांडे यांच्यापासून ग्रेसपर्यंत पाहा. ग्रेस हा पु. शि. रेगे यांनी शोधून काढला. सुरेश भट पश्चिम महाराष्ट्रानं मोठे केले. माझी नाटकं मुंबईत चालली. अगदी वीर वामनराव जोशींपर्यंतही मागे जाता येईल. विदर्भ किंवा नागपुरातील ज्या लोकांना लौकिक मिळाला त्यांची खरी ताकद आधी पश्चिम महाराष्ट्रानं ओळखली. ही तक्रार तिय्यम दर्जाच्या लेखकाची असते.
*गिरीश कुबेर- सांस्कृतिक रेनेसॉं महाराष्ट्राच्या वाटय़ाला आलाच नाही. आला तो विजय तेंडुलकर, विजयाबाई, रंगायन यांच्यापुरताच. नंतर पुढे हे सर्व माळवत गेलं असं वाटतं का?
रेनेसॉं हा भव्य शब्द आहे. त्या पातळीवर आपल्याकडे कधी काही झालंय का? त्यातल्या त्यात म्हणायचं झालं तर स्वातंत्र्याच्या काळात प्रचंड मोठी माणसं झाली. जोतिबा फुल्यांपासून आगरकर, टिळक, कर्वे, महामहोपाध्याय काणे, डॉ. मिराशी आदी वेगवेगळ्या क्षेत्रांतली माणसं होती. १९४७ सालानंतर काहीच नाही. त्यामुळे त्या ठरावीक कालावधीला आपण वैचारिकदृष्टय़ा रेनेसॉं म्हणू शकतो. १९४७ नंतर सर्वच पातळ्यांवर दुष्काळ आहे. हल्ली आपण प्रत्येकाला विचारवंत म्हणतो, पण महाराष्ट्रात तर मला कोण विचारवंत दिसत नाही. र. धों. कर्वे हे विचारवंत होते. जीवनात मूलभूत, मूलगामी परिवर्तन करणारा विचारवंत कुणी आहे का इथं? विचारवंत तो जो स्वत:चे विचार जगणारा पाहिजे. कर्वे स्वत:चे विचार जगले. आरामखुर्चीत बसून शहाणपणा शिकवणं, याला काही विचारवंत म्हणत नाहीत. हल्ली जो तो विचारवंत होतो. याची जबाबदारी मीडियाने घेतली पाहिजे. प्रतिभावंत नाटककार, विचारवंत नट अशी लेबलं लावता! असे नका करू. दोन सीरियल्स, एक सिनेमा आणि एक नाटक केलं की ती व्यक्ती दिग्गजच होते! वय वर्षे २८ आणि ‘माझे कलाजीवन’ किंवा ‘माझा जीवनप्रवास’ या विषयांवर त्याचे लेख छापून येतात. मला त्या मुलांबद्दल काळजी वाटते. त्यांनी अजून काहीच पाहिलेलं नाही..

*सगळ्या कलावंतांना नाही भूमिका घेता येत. मला वाटतं हे आपण स्वीकारलं पाहिजे. कलावंताची काय मर्यादा आहे हे समाजानेदेखील ओळखलं पाहिजे.
*दोन कप्प्यांमध्ये माणूस जगू शकतो. वाङ्मयीन व्यवहारात राजकारण करीत असूनही एखादा लेखक चांगल्या प्रकारे जिवंत राहू शकतो. तो डागाळला जाईलच याची खात्री नसते.  
*मला नाटक दिसतं. नाटक लिहिण्यापूर्वी रंगमंचावरची जी
स्पेस आहे ३६ फूट बाय ४० फूट.. त्या स्पेसमध्ये नाटक घडताना
दिसत असतं.
*सुदैवाने मला फार जबाबदार दिग्दर्शक मिळाले आणि नाटय़ानुभवापासून ते दूर सरकलेले नाहीत. थोडय़ाबहुत मधल्या जागा त्या थोडय़ा वेगळ्या येत असतील. परंतु, अनेकदा ते चांगलेही असे. मी नेहमी म्हणतो क्रिकेटच्या खेळासारखं आहे नाटक. आम्ही सगळे मिळून खेळतो ११ जण खेळाडू. लेखामध्ये मात्र मी स्वत:चा असतो. मी पोहायला जातो.सकाळी आठला गेलो की बारापर्यंत तिथेच. घरी येऊन मग आमरस खाणे आणि झोपणे हाच उद्योग होता. शहरात आल्यानंतर पूलमध्ये पोहायला जातो. मला म्हणायचं होतं की मी आणि पाणी. मला तिसरा माणूस चालत नाही. मी अशा वेळी जातो की तेव्हा अजिबात गर्दी नसते. तसे लेखन आहे आत्म ‘मौनरागा’चं. मी आणि माझा आशयघन. दुसरं काहीही मध्ये नाही.
*मी नागपूरला राहतो. तिथे नाटकं फारशी होत नाहीत. त्यामुळे नाटकं पहायलाच मिळत नाहीत. रंगमंचावर काय होतं हे गेल्या २० वर्षांत मी पाहिलेले नाही. नाटक भारतीय स्तरावर जात नाहीत याचे कारण प्रांतांमध्येच आता रंगभूमी राहिलेली नाही. त्यामुळे त्या पॅशनेटली कुणी करताना दिसत नाही. कोलकात्यामध्ये ७० साली ज्या विलक्षण आवेगीपणानं नाटकामध्ये माणसं गुंतलेली दिसत आता तसं होत नाही.
या कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive  येथे भेट द्या.

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…