18 January 2019

News Flash

मातृदिन साजरा करताना…

आज समाजमाध्यमांद्वारे घराघरांत मातृदिन साजरा केला जाईल. नव्हे, ‘बाजार’ तसे करायला भाग पाडील अनेकांना.

|| शलाका सरफरे, सायली रावराणे/भाग्यश्री प्रधान, किन्नरी जाधव

आज समाजमाध्यमांद्वारे घराघरांत मातृदिन साजरा केला जाईल. नव्हे, ‘बाजार’ तसे करायला भाग पाडील अनेकांना. ‘मार्केट’, जाहिराती या गोष्टींच्या प्रभावामुळे असे दिन साजरे केले जातात हे खरे. परंतु ते तसे असले, तरी त्या साजरेपणामागे, त्या सोहळ्यांमागे अनेकांची सच्ची भावना असते. आईचा आदर, तिच्याप्रती कृतज्ञता ही असतेच मनामध्ये. अशा दिनांनिमित्ताने ती व्यक्त करण्याची एक संधीही मिळते. त्या संधीकडे आजची ही तरुणाई कशी पाहते? ‘लोकसत्ता’च्या तरुण प्रतिनिधींनी घेतलेला भावनाशील वेध..

मातृदिन एकच ?   – शलाका सरफरे

मातृदिनाच्या निमित्ताने व्हॉट्सअ‍ॅपवर शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस सुरू झाला आहे. प्रत्येक शुभेच्छेतून आईची महतीच व्यक्त होत आहे. कुणी कविता पाठवते तर कुणी चारोळी.. कुणी आई-मुलांची चित्रं प्रदर्शित करत आहेत. अनेकांनी प्रोफाईल फोटो म्हणून आईसोबतची छायाचित्रे लावताना दिसत आहेत. कित्येकांनी त्या दिवशी आईला भेटवस्तूही दिल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. मातृदिन पूर्वीच्या चार ते पाच दिवस माध्यमांतील जाहिराती पाहा. त्यातही आई-मुलीच्या नात्याचे नवे रुप दाखविण्याचा प्रयत्न सुरू होता. पण.. हे सारे एकाच दिवसापुरते असते. दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे डीपी बदलले जातील.

आपल्याला जन्म देणाऱ्या आईविषयी केवळ एकच दिवस प्रेम का दाखवलं, असा सवाल कल्याणच्या वरूण पाटील यांनी उपस्थित केला आहे. जी आई मुलांना जन्म देते. त्यांच्या सुखासाठी अविरत झटते. तिला आपण कायम गृहित धरत असतो. खरेतर आईसाठी एक दिवस नको, तर प्रत्येक दिवस आपण आईच्या नावाने साजरा करायला हवा, असे दिप्ती चव्हाण यांना वाटते. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला रोहित बागडे याला हे ‘सेलिब्रेशन’ काहीसे खटकते. काही ठराविक वर्षांनंतर म्हणजे हीच आई म्हातारी झाली की मुलांना नकोशी होते. खरेतर तेव्हा तिला मुलांची गरज असते. कारण म्हातारपण म्हणजे दुसरे बालपणच असते असे म्हटले जाते. मात्र तेव्हा तिचे वागणे मुलांना नकोसे वाटते. तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते, तिच्या आजारपणात तिच्याकडे पाहिले जात नाही, औषधपाणी वगैरेची विचारपूस केली जात नाही. तिला काय हवे आहे, तिला काय सांगायचे आहे हेही त्यांना कळत नाही आणि या म्हाताऱ्या मातेला वृध्दाश्रमाची वाट दाखवली जाते. कधी कधी तर वर्ष-वर्ष तिच्याशी एक शब्दही बोलले जात नाही किंवा केवळ औपचारिकता दाखवली जाते. त्यात अजिबात मायेचा ओलावा नसतो. तिच्या वाढदिवसाला तिला साध्या शुभेच्छाही देत नाहीत. परंतु मातृदिनाला मात्र आईच्या नावाचे अवडंबर माजवले जाते.

दिवसाची सुरुवात म्हणून आईला रोज नमस्कार करण्याचा सुसंस्कृतपणा जपला जावा अशी शिकवण लहानपणापासून शालेय शिक्षणाबरोबरच मनावर बिंबवले जातात. मात्र प्रत्यक्षात रोज आईला नमस्कार करण्यासाठी किती जण तयार असतात हीदेखील विचार करण्याजोगी बाब आहे, असे मत अविनाश पाटील व्यक्त करतो.

 

मातृदिनाचे ऑनलाईन सोहळे   – सायली रावराणे/भाग्यश्री प्रधान

‘सेलिब्रेटिंग मदर्स डे विथ पल्लवी जोशी अ‍ॅन्ड २ अदर्स’.. क्षितिजाच्या या फेसबुक स्टेटसवर खुद्द ‘पल्लवी जोशी’ने प्रतिक्रिया दिली होती. ही पल्लवी जोशी काही क्षितिजाची मैत्रीण नाही. ती क्षितिजाची आई. मातृदिनाच्या निमित्ताने भेटवस्तू देण्याऐवजी आईला जेवायला बाहेर घेऊन गेलेल्या क्षितिजाने माय-लेकींचे छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध केले होते. मातृदिन, प्रेमदिवस असे दिवस आजच्या तरूणाईकडून मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. या तरूणांच्या खांद्याला खांदा लावत त्यांच्या आई बाबांची पिढीसुद्धा समाजमाध्यमांवर तितकीच सक्रिय होऊन या बदलत्या ‘ट्रेन्ड’चा भाग होऊ लागली आहे. #मदर्स डे #मायमॉम #लाईफलाईन या हॅशटॅगने आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या या तरूणाईला त्यांच्या आईनेही चांगलीच दाद दिलेली दिसून येते. मग फेसबुकवर कधी आईबरोबर ‘पाऊट’ करणारे छायाचित्र तर कधी आईचे एखादे जुने छायाचित्र प्रसारीत केले जाते. त्या छायाचित्रांखाली आईसुद्धा प्रतिक्रिया देऊ लागते.

‘माझी आई फेसबुक, इन्स्टाग्राम या समाजमाध्यामांचा हमखास वापर करते. या समाजमाध्यमांमुळे माझ्या आणि आईच्या वयातील अंतर आता कमी झाल्यासारखे वाटू लागले आहे,’ असे पूजा झोपे सांगते. तर ‘मला माझी मुलगी मातृदिनाच्या दिवशी व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेऊनच शुभेच्छा देते. त्यातून मलाही तितकाच आनंद मिळतो. बदलत्या जगाबरोबर आपणही बदलायला हवे, मग कधी मुलीच्या एखाद्या ‘पोस्ट’वर प्रतिक्रिया देऊन मला तिची मैत्रिण होता येत असेल तर त्यात काय वाईट?’ असे माला सावंत विचारतात.

‘सकाळी लवकर कार्यालयात जाण्यासाठी धडपड सुरू असते. मग अनेकदा काही गोष्टी बोलायच्या राहून जातात. तसेच एकदा मी आईला शुभेच्छा द्यायचे राहून गेले. मग मात्र मी एक छान छायाचित्र आणि एक मोठा मजकूर फेसबुकवर प्रसारित केला आणि आई फारच खुश झाली,’ हा निलिमा बेंगाली यांचा अनुभव. समाजमाध्यमांमुळे आईला शुभेच्छा देता आल्याचे समाधान वाटल्याचे त्या सांगतात. समाजमाध्यमांनी वेढलेल्या या जगात काही काळ आपण आपल्या माणसांसाठीही काढावा असे मत व्यक्त करणारेही अनेक आहेत. मातृदिनाच्या दिवशी समाजमाध्यमांवर छायाचित्र प्रसारीत करण्यापेक्षा किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवण्यापेक्षा आपल्या आईबरोबर काही काळ घालवा, असेही विचार व्यक्त होतात. आजचे तरुण फक्त या माध्यमांमध्येच हे सोहळे साजरे करते अशी नाराजी अनेकांकडून व्यक्त होते. त्या माध्यमांवरील हा मातृदिन सगळ्यांच्याच पसंतीस उतरत नसला तरी तो अनेक माय-लेंकीमधला दुवा बनला आहे.

ऑनलाईन भेटवस्तुंना अधिक पसंती

आधुनिक आईला भेटवस्तू देण्यासाठी सध्या ऑनलाईन खरेदीला अधिक पसंती दिली जात आहे. मुळातच ऑनलाईनने मागविलेल्या भेटवस्तु थेट आईच्याच हातात येतात. त्यात ‘हॅपी मदर्स डे’ असा संदेश लिहिलेला पुष्पगुच्छ, चॉकलेटचा डबा, ‘मॉं का ढाबा’ असे लिहिलेली एखादी फ्रेम, ‘तुझे सब है पता मेरी माँ’ असे लिहिलेली पाटी आणि त्याबरोबरच कप अशा भेटवस्तू खासकरुन ऑनलाईन दिसतात. याशिवाय लाकडी दागिन्यांचा डबा आणि त्यामध्ये काजळ, कानातले, बांगडया या नेहमीच्या भेटवस्तूही आहेतच.

मेजवान्या, पाटर्य़ा

आजकाल भेटवस्तू देण्यापेक्षा उपहारगृहांमध्ये जाऊन हे दिवस साजरे केले जातात. कमावणारी मोठी मुले आपल्या कुटुंबाला जेवायला बाहेर नेऊन त्यांना ‘ट्रीट’ देतातच. मात्र लहान मुलेही मातृदिन साजरा करण्यासाठी पॉकेट मनी जमवून आईला एक दिवसाची सुट्टी देतात. आईला सुखद धक्का देण्याची ही एक क्लृप्ती मोठय़ा प्रमाणात वापरली जाते.

 

तो मायेचा हात..     – किन्नरी जाधव

‘त्या दिवशी कामावर निघण्याच्या वेळेत माझे लेकरू त्याच्या आवडत्या खेळण्याबरोबर खेळत होते. माझी थोडी घाईच झाली होती. माझी होत असलेली धावपळ त्याला कळली असावी. घराबाहेर पडण्याच्या विचाराने मी दाराकडे आल्यावर त्वरित त्याचे आवडते खेळणे सोडून तो माझ्याआधी दाराबाहेर कुलूप लावण्यासाठी उभा राहिला. आपल्या आईला कामावर जायला उशीर होऊ नये यासाठी माझ्या मुलाने माझ्यासाठी केलेली ती ‘तडजोड’ मला प्रकर्षांने जाणवली..’ एका महाविद्यालयात प्राचार्या असणाऱ्या डॉ. वैदेही दप्तरदार त्यांच्या भावना व्यक्त करत होत्या. त्या सांगत होत्या, ‘एकदा माझ्या लहान मुलीला पुरणपोळी खायची इच्छा झाली. माझ्या पीएचडीच्या प्रबंधाचे सादरीकरण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले होते. त्यावेळी पाच दिवस थांब, माझा प्रबंध सादर झाल्यावर पुरणपोळ्या करून देते हे मुलीला सांगताना मनाची झालेली घालमेल आजही आठवते.’

कार्यालय सांभाळून आपले मातृत्त्व जपत वावरणाऱ्या प्रत्येक आईच्या मनात अशाच भावना असतील. आपल्या बाळाविषयीची जगासाठी क्षुल्लक वाटणारी एखादी गोष्ट या कॉर्पोरेट आईसाठी नक्कीच महत्त्वाची असेल. ज्या काळात मुलांचे बालपण अनुभवत आपले मातृत्त्व साजरे करायचे असते, त्याच काळात करिअरच्या अनेक वाटांवर मुशाफिरी करत आपले आदर्श बाईपणही सिध्द करायचे असते. एकीकडे करिअरच्या उच्च स्थानी पोहचण्यासाठी करावी लागणारी कसरत आणि दुसरीकडे कार्यालयीन व्यापात अनुभवता न येणारे आपल्या बाळाचे निरागस बालपण याचा समतोल साधताना भावनिक गुंता कसा सोडवत असेल ही नोकरदार, कॉर्पोरेट आई?

आज बदलत्या काळात अनेक क्षेत्रात लिलया वावरणाऱ्या प्रत्येक आईला ही भावनिक अस्वस्थता सतावत असेल. सतावणारी अस्वस्थता, भावनिक गुंतागुंत, बाळाचे बालपण उद्वस्त होऊ नये याची खांद्यावर असलेली जबाबदारी यातून मार्ग काढत ही कॉर्पोरेट आई स्वत:ला सिध्द करत असते. विशिष्ट टप्प्यावर मुलं मोठी असतात. आपले करिअर सांभाळून आईकडून जगण्याचे संस्कार या मुलांवर होत असतात. आपल्या बाळाचे टप्प्याटप्प्याने होणारे मोठेपण अनुभवता येत नसेल कदाचित आईला. पण आयुष्याची आव्हाने पेलताना आपल्या मुलाने खंबीरपणे उभे राहण्यासाठी लहानपणापासूनच त्याला अवलंबून न राहण्याची सवय लावत असेल ही आई. मुलं वयाने आता मोठी झालेली असतात. स्वतंत्र झालेली असतात. निर्णय घेण्यातही ती ठाम असतात. एकीकडे मुलं मोठी होतात आणि दुसरीकडे ही आई निवृत्ती घेत असते. मुलं स्वतंत्र होण्याच्या वाटेवर असतात आणि त्याचवेळी या आईचे वय आपल्या मुलांचे तिला हवे असलेले बालपण अनुभवण्यासाठी पुन्हा लहान होऊ लागते. मुलं मोठी झाली असली तरी नोकरी सांभाळताना मुलांसाठी करायला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता या आईला भरभरून करायच्या असतात. मुलाला वाढविताना प्रेमाच्या बाबतीत कराव्या लागलेल्या तडजोडीमुळे आता तिचे आईपण तिला पुन्हा सिध्द करावेसे वाटते. आता जबाबदारी असते ती मुलांची. घर सांभाळून आपल्याला वाढवलेल्या आईच्या भावना समजून घेण्याची. काही कारण नसताना सहज डोक्यावरून मायेचा हात फिरला तर त्या स्पर्शात आपल्या बालपणीचे आईचे प्रेम आपल्याला आता शोधता यायला हवे..

First Published on May 13, 2018 12:02 am

Web Title: international mothers day 2018