विकासदर मोजण्याची पद्धत बदलून टाकल्यानंतर मोदी सरकारच्या काळातील विकासदर सात टक्क्यांहूनही अधिक दिसू लागला. मग भाजपवाल्यांनी आम्हीच कसं देशाला विकासपथावर नेलं, याच्या गर्जना केल्या. त्यामुळं काँग्रेसवाल्यांची पंचाईत झाली होती. यूपीएच्या काळातील विकासदर नव्या मोजपट्टीत बसवल्याशिवाय यूपीए आणि एनडीए या दोन्ही काळातील विकासदराची तुलना कशी करणार?.. दोन वर्षांनंतर अखेर काँग्रेसला भाजपवर बाजी उलटवण्याची संधी मिळाली. नव्या पद्धतीचा वापर करून यूपीए काळातील विकासदराची आकडेवारी गेल्या आठवडय़ात जाहीर करण्यात आली. त्यात यूपीएच्या काळात विकासाचा दर अधिक असल्याचं निष्पन्न झालं. या सगळ्यावर बोलायला पी. चिदंबरम यांच्याशिवाय काँग्रेसकडं दुसरी उत्तम व्यक्ती कोण असणार? मनमोहन सरकारमध्ये बहुतांश काळ तेच अर्थमंत्री राहिलेले होते. त्यामुळं विकासाचं श्रेय थोडं फार त्यांनीही घेणं साहजिकच होतं. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यांचं ऐकून घेतल्यावर पत्रकारांनी ‘मनी’बद्दल न विचारता ‘मणि’चा विषय काढला. मणिशंकर अय्यर.. काँग्रेसमधील अत्यंत फटकळ आणि बेजबाबदार नेते. बेताल वक्तव्यामुळं पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली होती. गांधी कुटुंबाच्या प्रेमामुळं ते काही महिन्यांत स्वगृही परतले आहेत. पत्रकारांनी चिदंबरम यांच्याकडून यूपीए काळातील विकासाचं महत्त्व ऐकून घेतलं, पण ‘मणि’च्याच प्रश्नांचा भडिमार केला. एखाद-दोन प्रश्नांची चिदंबरम यांनी नाइलाजानं उत्तरं दिलीही, पण प्रश्न काही थांबेनात. विकासाच्या श्रेयात ‘मणि’ खडय़ासारखा आला!.. या ‘मनी’वर बोलताना त्या ‘मणि’ची बात कशाला?..असं म्हणत रसभंग झालेले चिदंबरम निघून गेले.

राम आणि भरत

अखेर अर्थ खात्याला पूर्णवेळ अर्थमंत्री मिळाला. भाजपचे ‘प्रणब मुखर्जी’ नॉर्थ ब्लॉकमध्ये पुन्हा रुजू झाले.. संदर्भासहित स्पष्टीकरण असे की, अरुण जेटलींनी तीन महिन्यांनंतर देशाच्या अर्थकारणाची सूत्रं पुन्हा हाती घेतलेली आहेत. आदल्या दिवशी छायाचित्रकारांना कळवण्यात आलेलं होतं, त्यानुसार जेटलींच्या ‘कार्यालय प्रवेशाची’ छायाचित्रे माध्यमांमध्ये छापून आली. राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक दोनवर जेटलींनी हसतमुखानं पत्रकारांना अभिवादन केलं. मग आत जाऊन अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. जेटलींच्या प्रत्येक हालचालीची छायाचित्रं घेतली गेली आणि ती छापली गेली. जेटलींसाठी ही प्रसिद्धी गरजेची असावी. किडनी प्रत्यारोपणामुळं त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. त्यांचा सार्वजनिक जीवनातील वावर संपलेला होता. ज्या आक्रमकपणे पीयूष गोयल यांनी अर्थ खात्याच्या बैठका घ्यायला सुरुवात केली होती ते पाहता जेटली असुरक्षित झाल्याचं कोणालाही समजू शकत होतं. जेटलींच्या अनुपस्थितीत अनेक वावडय़ा उठवल्या गेल्या होत्या. आता अर्थ खातं गोयल यांच्याकडंच राहणार, असंही चित्र उभं केलं जात होतं. अर्थात, जेटलींच्या बाजूनेही गोयल यांच्यावर मात करण्याचा कसोशीनं प्रयत्न केले जात होते. काही बातम्याही पेरल्या गेल्या होत्या. नॉर्थ ब्लॉकमध्ये जेटलींच्या कार्यालयातील खुर्चीवर गोयल बसत नाहीत. वगैरे.. जणू काही जेटली म्हणजे राम आणि गोयल म्हणजे भरत. रामाच्या वनवासाच्या काळात भरतानं जशा रामाच्या पादुका ठेवून राज्य केलं, तसं गोयल अर्थ खात्याचा कारभार पाहात आहेत.. असो. रामाचा वनवास संपलेला आहे. त्यामुळं भरताचं अर्थ खात्यात काम उरलेलं नाही. भरत रेल्वे भवनात परतलेला आहे.. आता गडगडलेल्या रुपयाला राम कसा वर ओढून आणतो हे बघायचं..

सर्वदूर मीच..

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचं लाल किल्ल्यावरून झालेलं पंतप्रधानांचं भाषण हे ‘मोदी पर्व-१’मधलं शेवटचं. त्यामुळंच बहुधा ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असा आग्रह मोदींनी धरला असावा. पंतप्रधानांच्या आदेशामुळं प्रसारभारतीनं मनावर घेऊन हे काम पूर्ण करून टाकलेलं दिसतंय. दूरदर्शनच्या २३ वाहिन्यांवरून मोदींचं भाषण प्रसारित करण्यात आलं. त्यामुळं मोदींचं भाषण बघणाऱ्यांमध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाल्याची आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. ही मोदींच्या लोकप्रियतेत झालेली वाढ समजायची की, प्रसार भारतीच्या कष्टाचं चीज झालं म्हणायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं.. यंदा मोदी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठीचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले गेले होते. गुगलशी बोलणं करण्यात आलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या मोदींच्या भाषणाचा शोध गुगलवर घेणाऱ्यांना ते लगेचच उपलब्ध व्हावं अशी तरतूद करण्यास गुगलला सांगण्यात आलं होतं. त्यामुळं मोदींच्या भाषणासाठी लोकांना शोधाशोध करावीच लागली नाही. यूटय़ूब आणि फेसबुकवरून थेट प्रसारण होतच होतं. शिवाय, प्रसार भारतीच्या २५८ ट्विटर हॅण्डलवरून भाषणाचे अपडेट्स देण्याचीही व्यवस्था केलेली होती. ज्यांना निव्वळ मोदींना ऐकायचं आहे, त्यांच्यासाठी ‘आकाशवाणी’ होतीच. मोदींचं भाषण प्रचाराचंच असणार हे गृहीतच धरण्यात आलं होतं आणि अपेक्षेप्रमाणं ते प्रचाराचंच झालं.. ‘सर्वदूर मीच’ असं म्हणत स्वातंत्र्यदिनी मोदींनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीचं बिगूल समाजमाध्यमांवरूनच वाजवलं आहे.

भाजपमय..

वाजपेयींची तब्येत खालावल्याचं समजताच ज्येष्ठ नेत्यांनी ‘एम्स’मध्ये गर्दी केली होती. वाजपेयींच्या खोलीत कोणाला जाऊ दिलं जात नव्हतं. मायावतींनी फारच आग्रह केल्यामुळं त्यांना खोलीत प्रवेश दिला गेला. इतर नेते बाहेरूनच विचारपूस करून येत होते. त्या दिवशी वाजपेयींच्या निधनाचंच वृत्त आलं. दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कारासाठी स्मृतिस्थळावर मात्र मायावती, ममता, अखिलेश हे नेते नव्हते. आदरांजली सभेलाही या ज्येष्ठ नेत्यांची गैरहजरी जाणवत राहिली. बसप आणि सपचा कोणीही मोठा नेता उपस्थित नव्हता. आजारी असल्यानं मायावती आल्या नसल्याचं सांगण्यात आलं. नितीशकुमारही आले नाहीत. त्यांचाही संदेश वाचून दाखवण्यात आला. राहुल गांधी स्मृतिस्थळावर उपस्थित होते, मात्र आदरांजली सभेला नव्हते. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी राहुल यांना जावं लागलं होतं. काँग्रेसच्या वतीने गुलाम नबी आझाद यांनी संदेश वाचन केलं. काही पक्षांचे ज्येष्ठ नेते नसल्यानं त्यांच्या पक्षाच्या अन्य नेतेमंडळींनी आदरांजली वाहिली. वाजपेयींच्या आदरांजली सभेनिमित्त सर्वपक्षीय मीलन झाल्याचे चित्र उभं राहिलं होतं. पण, सगळं वर्चस्व मोदी आणि भाजपचंच होतं. वाजपेयींच्या अंत्ययात्रेला मोदी चार किमी चालत गेल्यानं माध्यमांचं लक्ष मोदींनीच आकर्षित करून घेतलं होतं. भाजपच्या मुख्यालयात वाजपेयींचं अंतिम दर्शन घेण्याची संधी कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांनाच अधिक मिळाली. आताही अस्थिकलश राज्या-राज्यांमध्ये पाठवले जात आहेत. भाजपची नेतेमंडळी सेल्फी काढण्यात दंग झालेली आहेत. विविध विचारांच्या पक्षांना एकत्र आणणारे वाजपेयी गेल्या आठवडय़ात मात्र पूर्ण ‘भाजपमय’ होऊन गेल्याचे दिसले.

– दिल्लीवाला