परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत व अंमलबजावणीत व्यक्ती महत्त्वाच्या ठरतात. देशांतर्गत धोरणाचा विस्तारित भाग म्हणून जेव्हा परराष्ट्र धोरण राबवले जाते तेव्हा तर त्यात व्यक्तीचा करिश्मा मोठा असतो. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना विद्यमान व माजी जागतिक नेत्यांशी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना जे अभूतपूर्व यश मिळाले त्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या करिश्म्याची तुलना अशा प्रकारे होणे स्वाभाविक होते. जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांच्याशी त्यांची तुलना केली गेली. याचे कारण अ‍ॅबे व मोदी यांचा केवळ राष्ट्रवादी प्रचार हेच नव्हते तर त्यांना मिळालेली लोकप्रियता हेही होते. नरेंद्र मोदी हे बहुतांशी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासारखेच आहेत, असे म्हणता येईल त्याची काही कारणेही आहेत.
पूर्वसुरींचा विचार केला तर अध्यक्ष क्षी जिनपिंग व नरेंद्र मोदी यांच्या आधी सत्तेवर असलेले नेते फारसे बोलणारे नव्हते व त्यांचे त्यांच्या सरकारवर नियंत्रणही उरलेले नव्हते. मोदी व जिनपिंग यांच्यातील साम्य म्हणजे दोघेही त्यांच्या पूर्वसुरींपेक्षा जास्त व्यक्त होणारे, प्रभावी व करिश्मा असलेले आहेत. ही तुलना केवळ संशोधनात्मक अभ्यासापलीकडे जाणारी आहे. अध्यक्ष क्षी जिनपिंग हे आणखी आठ वर्षे अधिकारपदावर राहणार आहेत व पंतप्रधान मोदी यांनीही विजयानंतर गुजरातेत केलेल्या भाषणात आपल्याला दहा वर्षे सत्ता द्यावी, असे साकडे मतदारांना घातले आहे. हे दोन्ही नेते त्यांच्या देशाचे भवितव्य घडवण्यात निर्णायक भूमिका पार पाडणार आहेत किंवा त्यांना ती पार पाडण्याची महत्त्वाकांक्षा आहे. भारत-चीन द्विपक्षीय संबंधांवर दोन्ही नेते त्यांची अमीट छाप उमटवू इच्छितात.
अध्यक्ष जिनपिंग व पंतप्रधान मोदी यांनी अंगीकारलेल्या धोरणातही काही साम्यस्थळे आहेत. आपापल्या देशातील सर्वोच्च राजकीय पदावर ज्या पद्धतीने हे दोन्ही नेते पोहोचले त्यात पहिले साम्य दिसते. दोन्ही नेत्यांच्या कारकीर्दीत राष्ट्रवादाचे पुनरुज्जीवन होताना दिसते व त्यांच्या राज्यकारभारात त्याची महत्त्वाची भूमिका राहील अशी चिन्हे आहेत. तिसरे साम्य, दोन्ही नेते सर्वोच्चपदी राहून सत्तेच्या अधिकारांचा ज्या पद्धतीने वापर करीत आहेत त्यात दिसते. दोघा नेत्यांनी देशांतर्गत पातळीवर जो कार्यक्रम राबवला आहे त्यातही साम्य दिसते. त्यांची परराष्ट्र धोरणेही शेजारी देशांवर लक्ष केंद्रित करणारी व सतत स्पष्ट संवाद साधण्याला महत्त्व देणारी आहेत.
राजकीय कारकीर्द
पंतप्रधान मोदी यांची राजकीय कारकीर्द रा. स्व. संघाच्या माध्यमातून सुरू झाली, प्रचारक म्हणून काम करताना त्यांना देशाच्या सामाजिक घडीचे बारकावे समजले. दुसरीकडे क्षी जिनपिंग हे चीनमधील सांस्कृतिक क्रांतीचे चटके बसलेल्या लाखो लोकांपैकी एक आहेत व त्यांना चीनचा ग्रामीण भाग जवळून पाहण्याची संधी मिळालेली आहे. शांझीमधील यानचुआन परगण्यात पाठवले असता त्यांनी चीनच्या ग्रामीण भागाचा अभ्यास केला. त्यांचे वडील क्षी झोंगझुन यांना तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा त्यांचे राजघराण्याचे संरक्षणही गळून पडले होते. मोदी व जिनपिंग यांचा उदयही सारख्याच परिस्थितीत झाला आहे. मोदी दिल्लीत सत्तेवर येण्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते तर जिनपिंग हे शेजियांग प्रांतात पक्षाचे सचिव होते. दोघांनीही स्वच्छ प्रशासक व भ्रष्टाचारविरोधी कडक धोरण अवलंबणारे नेते म्हणून प्रतिमा निर्माण केली. मोदी यांना गुजरात प्रारूपाने राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर जिनपिंग यांनी स्वत:ला शेजियांग प्रांतात स्वच्छ व भ्रष्टाचारविरोधी नेता म्हणून मतदारांपुढे सादर केले त्यामुळे ते राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च नेते बनू शकले. शांघायमध्ये जेव्हा भ्रष्टाचाराची एकामागून एक प्रकरणे उघडकीस येत होती तेव्हा २००७ मध्ये ते शांघायच्या सर्वोच्च पदी आले. गुजरातेत गटबाजीच्या राजकारणाने राज्य सरकार अस्थिर झाले तेव्हा मोदी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते, यातही दोन्ही नेत्यांत साम्य दिसते.
राष्ट्रवाद
पंतप्रधान मोदी हे उजव्या विचारसरणीच्या भाजपचे नेते आहेत. पूर्वी भाजपचा संबंध अयोध्येतील मशीद पाडल्याच्या घटनेशी तसेच राष्ट्रवादाच्या सांस्कृतिक ते बंडखोर अशा प्रारूपांशी जोडला जात होता. सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी अनेकदा स्वत:ला जन्माने हिंदू व हिंदू राष्ट्रवादी म्हणवून घेतले होते. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांनी एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांसमोर जे भावोत्कट भाषण केले होते त्यातही त्यांनी त्यांचे सत्तारोहण हे केवळ मातृभूमीच्या सेवेसाठी आहे असे सांगितले, त्यांनी देशाचा उल्लेख भारतमाता असा वारंवार केला. त्यांच्या आधीच्या पंतप्रधानांनी सगळ्या दशकाची कारकीर्द वाया घालवली, पण त्यांना आधुनिक भारताची आर्थिक घडी व्यवस्थित बसवता आली नाही, असे प्रतिपादन केले. चीनच्या बाबतीत तेथील राज्य संकल्पनेच्या ऱ्हासामुळे निर्माण झालेली पोकळी लोकप्रिय राष्ट्रवादाने भरून काढली. आजची चीनची प्रगती ही मागील चुकांमध्ये केलेली दुरुस्ती व इतिहासातील ऱ्हासाच्या दृष्टिकोनातून बघितली जाते. त्यांच्या राष्ट्रवादाचे बाह्य़ प्रेरणास्रोत हे बेलग्रेड बॉम्बहल्ला व एपी ३ विमान दुर्घटना हे मानले जातात तर अंतर्गत प्रेरणास्रोत हे बीजिंग ऑलिम्पिक, स्पेस वॉक व ऑलिम्पिकमधील पदकांची लयलूट, जपानी दूतावासापुढे मर्यादित लोकांना निदर्शनांची दिलेली परवानगी आहेत. याशिवाय जिनपिंग हे राष्ट्रवादी विचारसरणी व पाश्चात्त्यविरोधी धोरणापासून मागे हटलेले नाहीत. चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या १८ व्या अधिवेशनानंतर जिनपिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी रोड टू रिव्हायवल या चीनच्या राष्ट्रीय संग्रहालयातील प्रदर्शनाला भेट दिली होती. त्यांनी चायना ड्रीम (प्रगत चीनचे स्वप्न) उराशी बाळगताना चीनचे महापुनरुत्थान करण्याची संकल्पना मांडली. त्यांनी चीनच्या मोठय़ा अर्थव्यवस्थेचा फायदा चीनचा जगात दरारा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. कमी विकसित देशांशी संबंध प्रस्थापित करताना त्यांनी राष्ट्रवाद व पाश्चिमात्य विरोधाचा खुबीने वापर केला. चीनच्या राष्ट्रवादाला काही आव्हानेही मिळाली. त्यात शिनजियांग व हाँगकाँग यांनी कृतीतून दिलेली वेगळी उत्तरे व फुटीरतावादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेले प्रा. इतहाम तोहती यांना दिला गेलेला न्याय व त्या दृष्टिकोनातून चीनची प्रतिमा यांचा समावेश होता.
राजकीय अधिकारांना प्राधान्य
भारतात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून अभूतपूर्व असे अधिकार मिळवले आहेत. मनमोहन सिंग यांना जे अधिकार होते त्याच्या किती तरी पट अधिकार मोदी यांनी मिळवले, शिवाय वयाच्या बाबतीत विचार केला तर त्यांनी पक्षातील बुजुर्गाना मागे टाकून सत्तास्थान पटकावले व अधिकारही मिळवले. त्यांचे उजवे हात अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाले तेव्हा मोदींची पक्षावरची पकड अधिक मजबूत झाली, भाजपने जिंकलेल्या जागा जास्त असल्यानेही मोदी यांना अभूतपूर्व ताकद व क्षमता मिळाली.मोदींप्रमाणेच चीनमध्ये क्षी यांना अभूतपूर्व अधिकार मिळाल्याचे चित्र आहे. ते सरकारचे, पक्षाचे व लष्कराचे प्रमुख आहेत. आर्थिक सुधारणा आयोगाचेही प्रमुख आहेत जे पद पूर्वी पंतप्रधानांकडे होते. राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुखपदही त्यांनी स्वत:कडे ठेवले आहे. पक्षाला पतित करणाऱ्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे नेतृत्वही त्यांनी केले. पीपल्स लिबरेशन आर्मीचे झाऊ योंगकांग व जनरल ग्यू जुनशान यांच्या भ्रष्टाचाराला आळा घातला. लष्कराचे १२ वरिष्ठ अधिकारी व सरकारचे ३०० वरिष्ठ अधिकारी यांना त्यांनी तुरुंगात टाकले तरी त्यांची ती मोहीम सत्तेसाठीच होती, कारण त्यांनी एकेक करून जियांग झेमिन यांच्या गटातील अनेकांना खडय़ासारखे बाजूला काढले. जियांग हेच भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे लक्ष्य ठरतात की काय अशीही चर्चा होती.
परराष्ट्र धोरणातील अग्रक्रम
मोदी आणि जिनपिंग यांच्यातील साम्य हे परराष्ट्र धोरणाच्या आखणीतही आहे. दोन्ही देशांनी शेजारी देशांशी मैत्रीला महत्त्व दिले आहे. मोदी यांनी तीन शेजारी देशांना भेट दिली. चीनमध्येही जिनपिंग व पंतप्रधान ली केक्वियांग यांनी शेजारी देशांचे दौरे केले. मोदी यांनी परराष्ट्र संबंधात अधिक  क्रियाशीलता आणली, पण परराष्ट्र धोरणाच्या मूळ चौकटीत फार बदल केले नाहीत.
पंतप्रधान मोदी व अध्यक्ष जिनपिंग हे आपापल्या देशात अजून नऊ वर्षे राज्य करतील अशी शक्यता आहे. लोकांचा आशावाद हेच या दोन्ही नेत्यांचे खरे भांडवल आहे. देशाचा सर्वोच्च नेता देशाला योग्य मार्गाने नेऊन प्रगती घडवू शकतो असा लोकांचा विश्वास आहे व ते अवघड काम करण्याचे आव्हान या दोन्ही नेत्यांनी स्वीकारले आहे, दोन्ही नेत्यांवर जबाबदारीचे ओझे फार मोठे आहे. मे २०१५ मध्ये दोन्ही नेत्यांची चीनमध्ये भेट होत आहे त्यात आर्थिक वाढ, गुंतवणूक याच मुद्दय़ांना प्राधान्य राहील. दुसरीकडे हा असा काळ आहे ज्या वेळी आशियातील भूराजकीय समीकरणे संभाव्य आशियाकेंद्री व्यवस्थेभोवती निगडित असतील. आशियायी पायाभूत गुंतवणूक बँकेची कल्पना, व्यापारासाठी विशेष सागरी मार्गिका यांच्या रूपाने चीनकेंद्री आशियायी व्यवस्था उदयास येत आहे असे मानले जाते. भारतही या व्यवस्थेचा एक खांब म्हणून उदयास येत आहे. या नवीन आशियायी व्यवस्थेच्या माध्यमातून मोदी व जिनपिंग किती प्रभाव जगावर टाकतात यावर आशियाची पुढची वाटचाल अवलंबून आहे. एकेकाळी भारतात जवाहरलाल नेहरू व चीनमध्ये माओ झेडाँग या महत्त्वाकांक्षी पण फटकळ नेत्यांच्या हातात सत्ता होती. त्यांची एकमेकांच्या देशांविषयीची आकलने व समज यातून १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध झाले त्यातून भारत-चीन यांच्यातील संबंधांवर एक  डाग उमटला. आज जागतिकीकरणातील शक्ती मध्यवर्ती स्थानावर आहेत व त्यामुळे आताच्या महत्त्वाकांक्षी व फटकळ नेत्यांमध्ये फरक इतकाच आहे की, त्यांनी एकमेकांचे आकलन चांगले करून घेतले आहे व त्यामुळे भारत व चीन एकमेकांच्या भवितव्यावर प्रभाव टाकतील व त्यासाठीच मोदी-जिनपिंग यांची होत असलेली भेट महत्त्वाची आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर
आल्यापासून त्यांची अनेक जागतिक नेत्यांशी तुलना केली जाते. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि मोदी यांच्यातही अनेक साम्यस्थळे दिसून येतात.

हे दोन्ही नेते त्यांच्या पूर्वसुरींपेक्षा जास्त व्यक्त होणारे, प्रभावी व करिश्मा असलेले आहेत. तसेच त्यांच्या अनेक धोरणांमध्येही सारखेपणा दिसून येतो.

समान देशांतर्गत कार्यक्रम
चीनने आर्थिक सुधारणांच्या प्रारंभी चांगला आर्थिक विकास दर गाठला. अर्थव्यवस्था मुक्तकेली, पण भ्रष्टाचार व सत्तेच्या गैरवापराची उदाहरणेही समोर येत होती. चीनच्या आर्थिक विकासाचा फायदा सर्वाना सारखा मिळाला नाही त्यामुळे आर्थिक सुधारणांना विरोध सुरू झाला. त्यामुळे चीनने वापर व अभिनवता यावर केंद्रित वाढीला महत्त्व दिले व त्याला गुंतवणुकीची जोड दिली. आर्थिक विकासाचा दर ७ टक्केअसताना क्षी जिनपिंग यांनी कार्यक्षम व बेधडक नेता म्हणून ही आव्हाने स्वीकारली. भारतात मोदी यांनी विकासाच्या मुद्दय़ावर प्रचार केला. त्यात गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्याचा केलेला विकास लोकांपुढे ठेवला, त्यामुळे भारतात वरिष्ठ पातळीवर असलेल्या भ्रष्टाचाराला आव्हान देणारा नेता म्हणून प्रतिमा निर्माण केली. आर्थिक वाढ, कार्यक्षम सरकार व स्वच्छ प्रशासन या तीन आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली, त्यामुळे मोदी व जिनपिंग यांचा देशांतर्गत कार्यक्रम राष्ट्रवादाचा मुलामा असलेल्या विकासाचा आहे.
अनुवाद – राजेंद्र येवलेकर