News Flash

शाळेचे ‘ग्राममंगल’

नेरलीच्या मार्गे येणारे बोंढार हे गाव तसं छोटंसं. काहीशा उंचीवर वसलेलं. शेती हाच प्रमुख व्यवसाय. नवीन पिढीतील काही युवक दहा किलोमीटर अंतरावरील नांदेड शहरात स्वयंरोजगार

शाळेचे ‘ग्राममंगल’
पर्यावरण संतुलनासाठी विद्यार्थ्यांचे वृक्षारोपण. बाजुच्या छायाचित्रात कार्यानुभवात रमलेले विद्यार्थी.

डिजिटल क्लासरूम, वेध इंग्रजीचा, अंक शिडी, झटपट गणित, ब्रेन जीम, ई-लनग, पर्यावरणाच्या सान्निध्यात, असे कितीतरी उपक्रम एका छोटय़ाशा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत चालतात, हेच चित्र मुळात आश्वासक आहे. या शाळेतील विद्यार्थी ११२ पर्यंतचे पाढे मुखोद्गत सांगतात. शिक्षकांच्या समर्पित वृत्तीने अलीकडच्या दशकात हा बदल घडवला आहे. परिणामी शाळेला २०१४-१७ कालावधीचा ‘इंटरनॅशनल स्कूल’ पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार मिळवणारी नांदेड तालुक्यातील बोंढार ही जिल्हा परिषदेची एकमेव शाळा ठरावी. पण, महत्त्वाचे म्हणजे बोंढारच्या या शाळेने विद्यार्थ्यांनाच नव्हे तर गावालाही विकासाचा मार्ग दाखवून ‘ग्राममंगल’तेचा खराखुरा वस्तुपाठ दिला आहे.
नेरलीच्या मार्गे येणारे बोंढार हे गाव तसं छोटंसं. काहीशा उंचीवर वसलेलं. शेती हाच प्रमुख व्यवसाय. नवीन पिढीतील काही युवक दहा किलोमीटर अंतरावरील नांदेड शहरात स्वयंरोजगार किंवा नोकरीत आहेत. जेमतेम दीड-दोन हजार लोकसंख्या. गावात जिल्हा परिषदेची एक शाळा आहे. परंतु आपल्या मनात जिल्हा परिषद शाळेचे जे चित्र निर्माण झालेले आहे, त्याला अगदी उभा छेद देणारी. गावच छोटे असल्याने शाळेतील विद्यार्थीसंख्याही मोजकीच. पण शाळेचा लौकिक पसरल्याने जवळपासच्या गावातील काही विद्यार्थीही येथे प्रवेशित झालेले. तरीही शंभराच्या आतच विद्यार्थीसंख्या. पण पाचवीपर्यंत शिकून बाहेर पडणारी मुलं शहरातील अगदी सेमी इंग्रजी अभ्यासक्रमाच्या शाळेतही सहज वावरू शकतील अशी गुणवत्ता धारण केलेले.
या शाळेची स्थापना १९६२ची. विद्यार्थीसंख्या आहे फक्त ८२. त्यात मुले ४८ आणि मुली ३२. बोंढारपासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर वरच्या बाजूला चिमेगाव आणि दीड किलोमीटर अंतरावर खालच्या बाजूूने नेरली. या दोन्ही गावांत शाळा आहेत. २००४पर्यंत शाळेत दोनच शिक्षक होते. एव्हाना शाळेत विविध उपक्रम राबवायला सुरुवात झाली. मुख्याध्यापक उपक्रमशील आणि कृतिशील असला की, कसा झपाटय़ाने बदल होतो, याचे ही शाळा उत्तम उदाहरण ठरावी. राजाराम राठोड यांनी स्वत पुढाकार घेत प्रसंगी आíथक झळ सोसत अनेक उपक्रम सुरू केले. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनीही त्यांना पुरेपूर प्रोत्साहन दिले.
वेध इंग्रजीचा
शाळेत २००८ पासूनच ज्ञानरचनावादी अध्यापनाला सुरुवात झाली आहे. २०१२मध्ये शाळेत डिजिटल क्लासरूम ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात आली. याशिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत इंग्रजी भाषेबद्दलचा न्यूनगंड दूर व्हावा आणि त्यांना या भाषेची गोडी लागावी या उद्देशाने ‘वेध इंग्रजीचा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. यात तिसरी ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांचे अभ्यासगट तयार करण्यात आले आहेत. दररोज २० शब्दांचे पाठांतर करायचे, असा हा परिपाठ आहे. याचा विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा झाल्याचे मुख्याध्यापक सांगतात. अंक शिडी, झटपट गणित हेदेखील असेच उपक्रम.
११२ पर्यंतचे पाढे
‘ब्रेन जीम’ हा आणखी एक अनोखा उपक्रम. यात पाढय़ांची शाळा चालवली जाते. विद्यार्थ्यांनी स्वतच ३० च्या पुढच्या पाढय़ांची निर्मिती आणि पाठांतर करायचे. यात शिक्षकांचा सहभाग फक्त प्रोत्साहन देण्याचा. याचा फायदा असा झाला की, विद्यार्थी ११२पर्यंतचे पाढे न अडखळता सांगतात. या उपक्रमाचे विविध स्तरांवर कौतुकही झाले आहे.
‘माझा वाढदिवस’ हा आणखी एक स्तुत्य उपक्रम. ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे, तो शाळेला उपयोगी वस्तू भेट देतो. यामुळे झाडांच्या कुंडय़ा, वार्ताफलक, डायस, ध्वनिक्षेपक यंत्रणा, रंगरंगोटी, बागेचे व्यवस्थापन, अशा सर्व सोयींनी शाळा समृद्ध होऊ शकली. शाळेचे विद्यार्थी राज्यस्तरावरील वक्तृत्व, नृत्य स्पध्रेतही सहभाग नोंदवतात, एवढा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. शाळेत ‘बाल संचयनी’ ही बचत बँक सुरू करण्यात आलेली आहे.
इंग्लडमधील शाळेची देवाणघेवाण
शाळेला गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत दोन वेळा तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत. २०१२मध्ये ५१ हजार रुपयांचा ‘साने गुरुजी स्वच्छ शाळा’ पुरस्कारही बोंढारने पटकावला. २०१०मध्ये शाळा ‘ग्लोबल स्कूल पार्टनरशिप प्रोग्राम’अंतर्गत ‘ब्रिटिश कौन्सिल’शी जोडली गेली. इंग्लंडमधील लिव्हरपुलच्या ‘हॉटनहिल प्रायमरी स्कूल’शी शाळेचा करार झाला असून या अंतर्गत तिथल्या शिक्षकांनी बोंढारला आणि बोंढारच्या शाळेच्या शिक्षिका अश्विनी कौरवार या लिव्हरपुलच्या शाळेला भेट दिली आहे. आजतागायत या दोन शाळांमध्ये शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक देवाणघेवाण होते. यासाठी ब्रिटीश कौन्सिलने दोन्ही शाळांना प्रत्येकी तीन हजार पौंडची वार्षकि तरतूद केली आहे. ई-मेल, व्हिडीओ कॉन्फरिन्सग, फेसबुक आणि पोस्टाच्या माध्यमातून शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे आदानप्रदान होते. यामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास वाढीस लागला. नवनिर्मितीची उत्सुकता निर्माण झाली. शाळेत नवनवे उपक्रम सुरू होऊन विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत झाल्याचे राजाराम राठोड यांनी सांगितले.
खरीखुरी कमाई
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू गावच्या यात्रेत स्टॉल लावून विक्रीसाठी ठेवल्या जातात. यातून विद्यार्थ्यांना ‘खरी कमाई’चे महत्त्व शिकविले जाते. २६ जानेवारीला शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यात शिक्षक व ग्रामस्थ रक्तदान करून विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देतात. शाळेने गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. प्रभातफेरी, गृहभेटी याद्वारे लोकांना आरोग्य व पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जाते. गाव १०० टक्के पाणंदमुक्त असून कोणीच उघडय़ावर शौचाला जात नाही. गावकऱ्यांमध्ये ही जागरूकता शाळेने राबविलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमातून निर्माण झाली आहे.
ग्रामविकासात पुढाकार
पर्यावरणाच्या संतुलनासाठी शाळेने पुढाकार घेत गावात १६०० झाडे लावली. पकी ९०० झाडे जगली आहेत. शाळेच्या या प्रयत्नांमुळे गावाला पर्यावरणविषयक तीन पुरस्कार मिळाले आहेत. यातून चार ते साडेचार लाख रुपये ग्रामपंचायतीला मिळाल्याचे उपसरपंच केशवराव आरसुळे यांनी सांगितले. जलव्यवस्थापनातही शाळेचे मोठे योगदान आहे. ग्रामस्थांना प्रेरित करून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी श्रमदान करत २०११ पासून सलग तीन वर्षे वनराई बंधारा बांधला. पाणी पातळी वाढण्यासाठी त्याचा खूप फायदा झाला. याच ठिकाणी नंतर राज्य शासनाच्या निधीतून एक कोटी रुपये खर्चाचा कायमस्वरूपी बंधारा बांधला गेला. परिणामी आजच्या गंभीर दुष्काळी स्थितीतही गावात पाण्याचा अजिबात प्रश्न नाही.
गावासाठी शाळेने दिलेले योगदान लक्षात घेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळेसाठी सहा हजार लिटर साठवण क्षमतेची टाकी दिली असून ती सौर ऊर्जेवर भरते. शाळेचे कार्यालय सरपंच व मुख्याध्यापकांनी प्रत्येकी २० हजार रुपये पदरचे खर्च करून बांधले. शाळेचेच नव्हे तर गावाचेही रूप पालटण्यात गावकऱ्यांची साथ आणि लोकसहभाग महत्त्वाचा ठरल्याचे राठोड प्रांजळपणे कबूल करतात. आता या शाळेचा समावेश राज्य शासनाच्या नव्या ‘शाळा सिद्धी’ या उपक्रमात झाला आहे.
यात राज्याच्या ३६ जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन शाळा निवडण्यात आल्या असून नांदेडमधून कोहळी (तालुका हदगाव) आणि बोंढार शाळेची निवड झाली आहे. ‘आय.एस.ओ.’च्या धर्तीवर शाळांचे मूल्यमापन होणार असून राज्यशासनातर्फे तसे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या शाळांनी मग जिल्ह्यातील प्रत्येकी २०० शाळांची गुणवत्ता तपासणी करणे अभिप्रेत आहे. शाळेवरील या नव्या जबाबदारीलाही येथील शिक्षक निश्चितपणे न्याय देतील. शाळेबरोबरच समाजातही बदल करणारे विकासाचे हे आगळेवेगळे ‘मॉडेल’ इतर गावांतही पोहोचावे हीच अपेक्षा!

रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com

संकलन – रेश्मा शिवडेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2016 2:56 am

Web Title: nanded municipal corporation school
Next Stories
1 बौद्धिक संपदा धोरण कोणाच्या फायद्याचे?
2 मागोवा मान्सूनचा
3 संरक्षणखरेदी घोटाळ्यांचा तोटा
Just Now!
X