पाच राज्यांमधील निवडणुका तोंडावर आलेल्या असताना गुलैल आणि कोब्रापोस्ट या दोन वृत्तसंकेतस्थळांनी काही ध्वनिमुद्रणं सादर केली आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे अत्यंत निकटचे मानले जाणारे अमित शहा हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. एका तरुणीवर ‘पाळत’ ठेवण्याचा गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी दिलेला आदेश, त्यांचा राज्य पोलीस महासंचालकांशी झालेला संवाद, त्या संवादात असलेला ‘साहेब’ हा उल्लेख, मुलीच्या वडिलांनी ‘केंद्रीय महिला आयोगाला’ या प्रकरणाचा अधिक तपास न करण्याची केलेली विनंती यामुळे हे सगळे प्रकरण गुंतागुंतीचे होत गेले. या प्रकरणाचे हे काही कंगोरे..
२६ जानेवारी २००१.. गुजरातमधील भूजला भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. कच्छच्या रणातील हा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. येथील सराफा बाजार आणि कासार बाजार नव्याने उभे करण्याची गरज निर्माण झाली होती आणि या दरम्यान, केवळ एकदाच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, भूजचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि निलंबित भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रदीप शर्मा आणि ‘त्या’ मुलीचे वडील प्राणलाल सोनी हे एकत्र आले होते, असे प्रथमदर्शनी लक्षात येते. या भेटीचे तसेच कारणही होते. गुजरातमधील उद्ध्वस्त बाजारपेठ उभी राहावी यासाठी सोनी यांनी कंबर कसली होती. कच्छचे तत्कालीन जिल्हाधिकारी शर्मा यांना मदत करण्याचे आवाहन सोनी यांनी भूजमधील सहव्यापाऱ्यांना केले होते. सराफा बाजार आणि कासार बाजार उभा राहावा यासाठी प्रत्येकाने आपापल्या वाटय़ाची थोडी थोडी जागा सरकारसाठी सोडावी, तेथे रस्तेबांधणी केली जाईल, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद देण्यास सोनी यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत बाजार नव्याने आणि तेजीने उभा राहील याची काळजी घेतली. सुमारे दोन-अडीच वर्षांच्या मेहनतीने सराफा बाजार उभा राहिला आणि २७ जानेवारी २००४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘हेम ज्वेलर्स’चे उद्घाटन झाले. लौकिकार्थाने ही प्रदीप शर्मा, मोदी आणि प्राणलाल सोनी यांची एकमेव भेट!
६५ वर्षीय सोनी त्यानंतर एकदम चर्चेत आले ते थेट २०१३ मध्येच आणि तेही आकस्मिक पद्धतीने. मुळात सोनी यांचा पारंपरिक सराफा व्यवसाय होता. सोनी यांना दोन सख्खे भाऊ, मात्र अभियांत्रिकीमधील पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्राणलाल यांनी सोनी कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय सांभाळायचा निर्णय घेतला. सोनी यांना राजकारणात फारसा रस असल्याचे कोणाच्याच बोलण्यातून जाणवत नाही. प्राणलाल हे येथील रोटरी क्लबशी जोडले गेलेले आहेत. त्यांचा रोटरीच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग असतो, पण त्यांना राजकारणात किंवा राजकारण्यांमध्ये काही रस होता वा असेल असे वाटत नसल्याचे रोटरी क्लब ऑफ भूजचे अध्यक्ष आणि सोनी कुटुंबाचे स्नेही किशोर तन्ना सांगतात. या प्राणलालजींना तीन मुले आहेत. दोन व्यवसायाने अभियंते आहेत तर मुलगी स्थापत्यविशारद. दोन्ही मुलांनी एकत्रितपणे अहमदाबाद येथील आयआयएमजवळ ‘सेंटर फॉर इन्क्युबेशन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड आंत्रप्रेन्युएरशिप’ (सीआयआयई) या कंपनीची स्थापना केली असून राज्यातील विद्युत कंपन्या तसेच देशातील विविध उद्योजक त्यांच्या उत्पादनांचे ग्राहक आहेत.
दरम्यान २००९ मध्ये सोनी यांची मुलगी (तिचे वृत्तसंकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेले आणि बदलल्याचा दावा करण्यात आलेले नाव माधुरी) अहमदाबाद येथे विवाहबद्ध झाली. तिचे यजमान चहाचे व्यापारी होते. मात्र त्यांचे दुकान गेले काही दिवस बंद आहे. गेली तीन वर्षे सोनींची मुलगी अहमदाबाद येथील प्रल्हादनगरातच राहात होती. मात्र ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात त्यांनी अचानकपणे आपली राहती जागा बदलली. तात्पुरत्या स्वरूपात अहमदाबादमध्येच अन्यत्र राहण्यासाठी जात असल्याचे त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले होते. विशेष म्हणजे, पाच-सहा महिन्यांपूर्वी प्राणलाल सोनी यांनीही आपल्या पत्नीसह भूज सोडून अहमदाबाद येथे स्थिरावण्याचा निर्णय घेतला. प्राणलाल यांची तब्येत वारंवार खालावत असे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांसह राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले दुकानही विकून टाकले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे. सप्टेंबर महिन्यात सोनी भूजला आले होते ते अखेरचे.. तसे ते अनेकदा येत असत. रोटरी क्लबच्या अनेक बैठकींना ते हजर असत, असे रोटरीचे तन्ना सांगतात. सध्या ते अहमदाबाद येथील रोटरी क्लबचे सभासद आहेत. मात्र सध्या सोनी हे आपल्या सर्वात धाकटय़ा मुलाकडे वास्तव्यास आहेत.
प्राणलाल सोनी यांचे भूजमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचे संबंध आहेत असे काहींचे म्हणणे आहे. मात्र कच्छमधील बऱ्याच जणांनी याबाबत काही सांगण्यास नकार दिला. तर काही जणांनी यात तथ्य असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी गुलैल आणि कोब्रापोस्ट या वृत्तसंकेतस्थळांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘साहेबांसाठी त्या मुलीवर पाळत ठेवली जावी’, असे अमित शहा यांच्या कथित आवाजातील ध्वनिमुद्रण प्रसिद्ध झाले. त्या मुलीचे नाव उघड करण्यात आलेले नव्हते. मात्र प्राणलाल यांनी स्वत: पुढाकार घेत, आपल्याला या पाळतीची पूर्ण कल्पना होती. आपल्या मुलीलाही ती होती आणि आपण केलेल्या विनंतीनुसारच सरकारने ‘ही सुरक्षा’ पुरविली होती, असे निवेदन प्रसिद्ध केले आणि देशभरात वादळ उठले.
२००३ ते २०१० या कालावधीत अमित शहा हे गुजरातचे गृहराज्यमंत्री होते. सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी त्यांना २०१० मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या त्यांची जामिनावर मुक्तता झाली असून ते उत्तर प्रदेश येथील भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी आहेत. गुजरातमधील एक पोलीस अधिकारी गिरीश सिंघल यांनाही इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी अटक झाली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांना अटक केली होती. चौकशीदरम्यान सिंघल सहकार्य करीत असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच त्यांचीही जामिनावर सुटका करण्यात आली असून सध्या ते गुजरात दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक आहेत. त्यांनी चौकशीदरम्यान अन्वेषण विभागाला २६७ ध्वनिमुद्रणे पुरवली. गुलैल आणि कोब्रापोस्टने केलेल्या दाव्यांनुसार, त्यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केलेली ध्वनिमुद्रणे ही यापैकीच होती. पण त्याचबरोबर या दोन्ही वृत्तसंकेतस्थळांनी आपल्या दाव्याची स्वतंत्र पुष्टी करू शकणारी कोणतीही अन्य साधने आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.
या ध्वनिमुद्रण प्रसारणानंतर लगेचच कच्छ येथून प्राणलाल यांनी स्पष्टीकरण दिले. सदर ध्वनिमुद्रणांमध्ये ज्या माधुरीचा उल्लेख आहे, ती आपलीच मुलगी असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या पत्नीची तब्येत बिघडली होती. तिच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. त्यामुळे बंगळुरूस्थित आपली मुलगी अहमदाबाद येथे आली आणि तिने एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. रुग्णालयात जाण्याच्या वेळा थोडय़ा विचित्र होत्या. रात्री वेळी-अवेळीसुद्धा आम्हाला रुग्णालयात जावे लागे. मुलीचा पिता या नात्याने, आपल्याला तिच्या सुरक्षेविषयी सतत काळजी वाटत होती, म्हणून आपण स्वत:च मुख्यमंत्री मोदी यांना तिला संरक्षण पुरविण्याविषयी तोंडी विनंती केली. राज्याचे प्रमुख या नात्याने तसेच आपल्याशी असलेले कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेऊन त्यांनी या विनंतीनुसारच तिला संरक्षण पुरविले. मात्र या दाव्यांशी परस्पर विसंगत असलेले दावे वृत्तसंकेतस्थळाने केले आहेत. त्यांच्या मते या ‘गुप्त पाळत प्रकरणा’भोवती इतके वलय निर्माण झाले होते की, त्यामध्ये गिरीश सिंघल यांच्याबरोबरच राज्य गुप्तचर विभागाचे महानिरीक्षक ए. के. शर्मा, गुन्हे अन्वेषण विभागाचे (गुप्तवार्ता) पोलीस उपअधीक्षक डी. बी. वैष्णव आणि पोलीस उपायुक्त   (गुन्हे शाखा) अभय चुडासामा यांसारखे महत्त्वाचे अधिकारीही गुंतले होते. ध्वनिमुद्रणातील तपशिलानुसार, अमित शहा यांनी प्रदीप शर्मा यांच्यावरही पाळत ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
जर कोणालाही सुरक्षा पुरवायची असेल तर त्याच व्यक्तीवर पाळत कशाला ठेवावयास हवी, असा सवाल करीत काँग्रेसने या प्रकरणात उडी घेतली. प्राणलाल एकीकडे ‘आपल्या मुलीच्या व्यक्तिगततेचा (प्रायव्हसी) कोणताही भंग झाला नसल्याचे सांगत राहिले, तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाने या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती करणारे पत्रही त्यांनीच पाठवले. पण काँग्रेसजन मात्र संवादांचे दाखले देत होते. जर संरक्षण दिले जात होते, तर ‘जाळ्यात अडकवा’, ‘सुटका होता कामा नये’ यांसारखे शब्द संवादांत का येत होते, असा सवाल उपस्थित केला गेला. चर्चेतील काही अंश प्रकाशितही करण्यात आला, तो पुढीलप्रमाणे..
अमित शहा : ती मुलगी कुठे आहे?
सिंघल :  नवरंगपुरा येथे ‘हॅव मोर’च्या एका दुकानाजवळ ती बसून आहे.
शहा : त्याच मुलाबरोबर आहे का? जितके दिवस वंजारा तुरुंगात आहेत तितकेच दिवस तो मुलगाही मला तुरुंगात गेलेला पाहायचा आहे. त्याला अगोदरच हॉटेलचे नाव विचारून ठेवा. त्यामुळे जर तो सटकलाच, तर त्याचा माग काढता येईल. तसेच हॉटेलवरही पाळत ठेवता येईल.
सिंघल : आम्ही हॉटेलवर माणसे ठेवली आहेत. त्या हॉटेलला दोन दरवाजे आहेत. दोन्हीकडे माणसे आहेत.
शहा : पण, ते बंद दरवाज्यांमधून निसटले तर?
सिंघल : तेथे माणसे पोहोचली आहेत. कोणतीही हालचाल नाही. आम्ही त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, पण मुलगी मोठी चलाख आहे. विमानतळावरून परतताना त्या मुलीने तिच्या मोबाइलवर आलेल्या ‘मिस्ड कॉल’च्या क्रमांकावर पुन्हा फोन करून बघितला. पण तो सार्वजनिक बूथवरील क्रमांक असल्याचे तिला सांगण्यात आले. त्यावर तिने कोणी फोन केला होता आणि ती व्यक्ती कशी होती, असे विचारण्यास सुरुवात केली. सर, आत्ताच ती सँट्रो गाडीतून हॉटेलवर आली आहे.
शहा : सँट्रो गाडीचा क्रमांक टिपून ठेवा. त्या मुलाचे काय झाले? तिथे किती माणसे आहेत, त्याचा माग काढला जातो आहे की नाही? तो सुटून जाता कामा नये. तसेच तो माणूस भावनगरमध्येच आहे ना याची खातरजमाही करून घ्या.
सिंघल यांनी सीबीआय चौकशीत ‘हा सगळा पाळतीचा प्रकार अवैध असल्याचा’ दावा केला होता. शहा यांनी केवळ तोंडी सूचना दिल्या होत्या, त्यांनी लेखी सूचना द्यायला हव्या होत्या, असा दावा सिंघल यांनी केला. माधुरीचा पाठलाग सर्वत्र केला गेला. रुग्णालयात, आईस्क्रीम पार्लरमध्ये, विमानतळावर, विमानात, व्यायामशाळेत, सिनेमागृहात, हॉटेलमध्ये.. सर्वत्रच तिच्यावर नजर ठेवली गेली. ती कोणाकोणाला भेटते त्यावरही लक्ष ठेवले गेले. तिच्या फोनचेही रेकॉर्डिग करण्यात आले, अशी माहिती सिंघल यांनी दिली. ही सगळी माहिती त्या-त्या क्षणीच शहा यांना दिली जात होती आणि ते ती ‘साहेबां’ना पुरवीत होते, असे सिंघल यांचे म्हणणे आहे. हे साहेब म्हणजेच मोदी होत, असा काँग्रेसचा आरोप आहे. तर, गुजरात सरकारची सोनी कुटुंबीयांवर मेहेरनजर केली असल्याचा काही जणांचा आक्षेप आहे. अनेक पात्र कंपन्या असतानाही एक महत्त्वाचे सौरऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट सोनी यांच्या कुटुंबीयांनाच मिळाले होते. तसेच हे प्रकरण उजेडात येण्यापूर्वी किमान एकदा त्या मुलीची पेट्रोलची तसेच मोबाइल रिचार्जची बिले सरकारने भरली होती, असा आक्षेपही काही वृत्तपत्रांनी नोंदवला आहे. सोनी हे नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक पेजवर आहेत. राष्ट्रीय महिला आयोगास या प्रकरणाचा तपास करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. मात्र, त्यांची मुलगी, नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या यापैकी कोणीही या प्रकरणावर भाष्य केलेले नाही.

“इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी अनेकांची चौकशी झाली. हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे गेल्यानंतर तत्कालीन राज्य पोलीस महासंचालक, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रदीप शर्मा अशांची चौकशी झाली. २०११ मध्ये शर्मा यांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ‘गुजरात सरकारचे ‘त्या’ मुलीशी असलेले संबंध आपल्याला माहिती असल्यानेच’ आपल्याला बळीचा बकरा करण्यात आल्याचा दावा केला होता. या वेळी पहिल्यांदा सोनी कुटुंबीय चर्चेत आले.
या महिलेला किंवा तिच्या कंपनीला गुजरात सरकारने एक पैसाही दिलेला नाही. ज्या सौर प्रकल्पावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत तो काँग्रेसप्रणीत आघाडी सरकार केंद्रात असताना त्यांच्याकडून चालवला जात होता. मोदी सरकार तो चालवीत नव्हता.
व्यंकय्या नायडू, भाजप नेते