|| अरविंद जामखेडकर

भारताच्या, विशेषत: महाराष्ट्राच्या इतिहासखुणा जपण्यासाठी अविरत प्रयत्नशील राहिलेले इतिहासकार, कलासमीक्षक, संग्रहालयतज्ज्ञ पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या दीर्घ आणि बहुआयामी कारकीर्दीचा आढावा घेणारा लेख..

तो प्रसंग माझ्या मनात कोरल्यासारखा आहे. मला गोरक्षकरांचा फोन आला होता, ‘तू चटकन म्युझियमला ये, मला काही महत्त्वाचे तुझ्याशी बोलायचे आहे.’ त्यानंतर त्यांनी, ‘आर्ट सोसायटीच्या इमारतीतील हॉटेलचालकाने संग्रहालयाच्या हिरवळीवर अतिक्रमण चालविले असून त्यावर कायदेशीर कारवाईच करणे भाग आहे,’ याची मला कल्पना दिली. आम्ही दोघांनी धर्मादाय आयुक्तांकडे रीतसर दावा दाखल केला. संग्रहालयाची जमीन शासनाची. ती, त्यावरील इमले आणि संग्रहालयातील पुरावशेषांसकट शासनाने विश्वस्त मंडळाच्या स्वाधीन केली असल्याने, शासनाचा प्रतिनिधी म्हणून पुरातत्त्व संचालनालयाने आणि प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचा प्रतिनिधी म्हणून अशी कारवाई आम्ही दोघांनी करणे अनिवार्य होते. बॉम्बे आर्ट सोसायटीची इमारत आणि संग्रहालयाची हिरवळ यांमधील कुंपण पक्के करून अतिक्रमणाचा बंदोबस्त करण्यात आला. सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण असो अथवा युनियनची संग्रहालयातील कामात ढवळाढवळ असो वा पदपथावरील फेरीवाल्यांचा त्रास; गोरक्षकरांनी त्यांचा केवळ प्रतिकारच केला नाही, तर परिस्थितीवर निग्रहाने ताबा मिळवला. सार्वजनिक जीवनात, संग्रहालयाच्या धोरणात आणि अंतर्गत प्रशासनात, प्रदर्शन- वीथींच्या पुनर्रचनेत, संशोधनात हीच त्यांची तडफ आणि निग्रह उत्तरोत्तर माझ्या प्रत्ययास आला.

सदाशिव गोरक्षकर यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालयातून पूर्ण केले. प्रा. केणी यांच्याकडे प्राचीन भारतीय संस्कृतीचे धडे गिरवल्यानंतर, गोरक्षकरांच्या मनाने संग्रहालयशास्त्रात प्रावीण्य मिळविण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी बडोदा विद्यापीठाच्या संग्रहालय विभागात प्रशिक्षण घेतले, पदवी मिळवली. १९६४ साली फिल्म इन्स्टिटय़ूटची नोकरी सोडून गोरक्षकर गॅलरी असिस्टंट म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये रुजू झाले. म्युझियममधले वातावरण कडक शिस्तीचेच; पण संशोधनाला पोषक. डॉ. कार्ल खंडालावाला, डॉ. मोतीचंद्र, डॉ. पी. एम. जोशी ही मंडळी शिल्प, चित्रकला, मध्ययुगीन इतिहास, नाणकशास्त्र, इंडॉलॉजी अशा निरनिराळ्या ज्ञानशाखांत नुसती पारंगतच नाही तर दिग्गज होती. त्यामुळे गोरक्षकर, शेट्टी, अंधारे, सरयू दोशी या होतकरू, उमेदीच्या तरुणांना उत्तम तालीम मिळाली, त्यांचे कसब तावूनसुलाखून निघाले आणि त्यांना अनुभव गाठीशी बांधता आला. अशा वातावरणात उपजत चौकस वृत्तीमुळे आणि नेवासे येथील उत्खननशास्त्रातील प्रशिक्षणामुळेही कदाचित, इतर विषयांबरोबरच प्राचीन शिल्पे आणि प्रतिमालक्षण यांविषयीची गोरक्षकरांची जाण अधिक सूक्ष्मदर्शी झाली. उपजत असलेली मांडणी आणि सजावटींची तरल जाणीव, जोडीला संग्रहालयशास्त्राचे प्रशिक्षण, पूर्वीच्या नोकरीतील प्रशासनाचा अनुभव आणि विधिविषयक ज्ञान यांमुळे वरिष्ठांच्या नजरेत ते भरले असल्यास नवल नाही.

त्यांनी सर्वप्रथम लक्ष घातले ते संग्रहालयातील कक्षांच्या पुनर्माडणीत. अगोदर गॅलरी असिस्टंट व क्यूरेटर म्हणून आणि नंतर निदेशक म्हणून, १९७० ते १९८० या काळात प्रामुख्याने गॅलरींची पुनर्रचना करण्यावर भर दिला. कलाकुसरीचे भारतीय हुन्नर ठसविणाऱ्या कलानमुन्यांचे (डेकोरेटिव्ह आर्ट्स), कांस्यप्रतिमांचे, संग्रहालयात नेमका कुठल्या प्रकारचा ठेवा कुठे प्रदर्शित केला आहे याची चुणूक दाखविणारे कळीचे दालन (की गॅलरी), नेपाळ – तिबेट दालन, दर्यावर्दी दालन आणि प्रागैतिहास व इतिहासपूर्व काळातील पुरावशेषांचे दालन यांची नव्याने मांडणी ही त्यांतील ठळक उदाहरणे म्हणून सांगता येतील.

ही नवी मांडणी रातोरात होणार नव्हती किंवा झालीही नाही, हे स्पष्टच आहे. त्यासाठी सहकाऱ्यांचा विश्वास, तांत्रिक मदतनीसांची निरलस कार्यक्षमता आणि सर्वात मुख्य, निदरेष योजना आणि प्रदर्शनीय कलावस्तूंचा सखोल अभ्यास या बाबी आवश्यक होत्या. गोरक्षकरांची कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि सहकाऱ्यांना बरोबर नेण्याच्या स्वभावामुळे हे कार्य पार पाडणे त्यांना अधिक सोपे झाले.

अशा प्रकारचा दीर्घ मुदतीचा कार्यक्रम तडीस नेण्यासाठी काही प्रासंगिक उपक्रम फायद्याचे असतात याची गोरक्षकरांना जाणीव होती. कुठलेही जागरूक संग्रहालय ठरावीक अंतराने तात्कालिक प्रदर्शने भरवीत असतेच. ‘राजस्थानमधील हवेल्या’, ‘घननिळा सावळा कृष्ण’, ‘वनश्री’, तिबेटच्या संस्कृतीवर आधारित ‘व्हेअर द माऊंटन्स आर हाय अ‍ॅण्ड लँड इज प्युर’, भारतीय चित्रकलेतील व्यक्तिचित्रणाची वैशिष्टय़े उलगडणारे ‘चेहरा’, ‘इये मराठीचिये नगरीं’ आणि ‘महाराष्ट्रातील नागरी संस्कृतीचा उष:काल’ ही त्यांनी भरविलेली प्रदर्शने विशेष नमूद करण्यासारखी म्हणून सांगता येतील.

‘महाराष्ट्रातील नागरी संस्कृतीचा उष:काल’ या प्रदर्शनात माझा प्रत्यक्ष संबंध नसला, तरी महाराष्ट्रातील दोन प्रख्यात संस्था त्यात एकत्र आल्या होत्या- डेक्कन कॉलेजातील पुरातत्त्व विभाग आणि प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. या प्रदर्शनाची तयारी चालू असताना मी नागपूरहून मुंबईला आलो होतो. प्रा. देव, ढवळीकर आणि गोरक्षकर, पुण्यातला आणि म्युझियमचा तांत्रिक स्टाफ, सगळेच रात्रंदिवस झटून खपत होते. प्रदर्शन अप्रतिमच झाले. विषयाच्या नावीन्यामुळे प्रदर्शन बघण्यासाठी दर्शकांच्या झुंडीच लोटत होत्या. तसाच दुसरा प्रसंग म्हणजे- महाराष्ट्रातील अज्ञात, परंतु अमोल ठेव्याचे महाराष्ट्राच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभाग आणि म्युझियमने जनतेला घडवलेले दर्शन. अगदी थोडय़ा अवकाशात भरविण्याचे ठरल्याने आणि ऐन वेळी पुण्यातील केळकर संग्रहालयाने माघार घेतल्याने, मला आणि गोरक्षकरांना शासकीय संग्रहालयांना भेटी देऊन प्रदर्शनीय वस्तू आणाव्या लागल्या. मंत्री सुधाकरराव नाईक आणि म्युझियमचे अध्यक्ष डॉ. खंडालावाला या दोघांनीही उद्घाटनाच्या वेळी प्रदर्शनाचे मोठे कौतुक केले आणि आम्हा दोघांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

आम्ही दोघांनी एकत्र येऊन अनेक वेळा काम केले, पण दोन-तीन घटनांचा आवर्जून उल्लेख करणे अपरिहार्य आहे. आम्ही दोघे आणि बाबूराव सडवेलकर, अशा तिघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या कॅलेंडरसाठी काम केले होते. राजा दिनकर केळकर संग्रहालयातल्या नित्य वापरातल्या पण अनोख्या वस्तू, नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयातील भागवत पोथीतील बहारदार लघुचित्रे, जे.जे.मधील चित्रे, शिवाजी महाराजांचे पोट्र्रेट आणि इतर कलावस्तूंच्या साहाय्याने आम्ही जवळजवळ पाच वर्षांसाठीचा मसाला एकत्र केला; काही सुंदर कॅलेंडर्सही महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केली. हेन्री मूरच्या कलाकृतींचे प्रदर्शन ब्रिटिश कौन्सिलने भरविले, त्या वेळी औंध संग्रहालयातील अप्पासाहेब पंतांनी आणलेली ‘मदर अ‍ॅण्ड चाइल्ड’ ही प्रतिमा पाठविण्याच्या वेळी आमचे त्रिकूटच कार्यरत होते.

गोरक्षकरांचा आणखी एक आवडीचा विषय म्हणजे नागरी जतन. आम्ही दोघेही एमएमआरडीए आणि महापालिकेच्या जतन समितीचे सदस्य होतो. त्यानिमित्ताने अनेक वस्तूंच्या जतनासंदर्भात चर्चा होत असे. पण लक्षात राहतो, तो पायधुनीच्या जैन मंदिराबाबतीतला आम्हा सर्वाचा अयशस्वी प्रयत्न! आमच्या दोघांमध्ये नेहमीच महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय संग्रहालयाबाबत चर्चा व्हायची. शेवटी एक समिती नेमून तिला मूर्त स्वरूप द्यायचे ठरले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महानिदेशक म. न. दशपांडे, डॉ. खंडालावाला आणि गोरक्षकर हे तीन सदस्य आणि समितीचा सचिव मी असे गठन झाले. १८ दालने असलेल्या श्रीशिवाजी संग्रहालयाचा परिपूर्ण असा आराखडा शासनास सादर करण्यात आला. तो मान्यही झाला. तो उभारण्यासाठी शासनाने वांद्रे येथे भूखंडही पुरातत्त्व विभागास बहाल केला. पण आम्हा दोघांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे हे स्वप्न अधुरेच राहिले, ही रुखरुख अजूनही मनात आहेच. वर उल्लेखिलेल्या तात्कालिक प्रदर्शनांतल्या अनुभवांतून गोरक्षकरांनी आपल्या संग्रहालयाचा कायापालट घडवून आणला. ‘महाराष्ट्रातील नागरी संस्कृतीचा उष:काल’ या प्रदर्शनाच्या पुरावस्तूंतून ‘प्री अ‍ॅण्ड प्रोटो-हिस्ट्री’च्या दालनात काही चांगली भर घातली. तिबेट प्रदर्शनाचा लाभ नेपाळी आणि तिबेट दालनाची पुनर्माडणी करताना झाला. पण त्यांचे खरे कसब पणाला लागले ते त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत. ‘मॅरिटाइम हेरिटेज’ हे प्रदर्शन त्यांनी मॉरिशस येथे १९८४  साली; ‘लावण्य-दर्पण’ हे स्वीडनमध्ये १९८७ साली; तर ‘मृग’ हे जपानमध्ये १९८८ साली भरविले. या प्रदर्शनांमुळे गोरक्षकरांच्या चोखंदळपणाचा तर सगळ्यांना प्रत्यय आलाच, शिवाय भारतीय संस्कृतीच्या सौंदर्यप्रियतेचा प्रत्ययही परदेशी चोखंदळ रसिकांना आला.

गोरक्षकर १९६४ साली गॅलरी असिस्टंट म्हणून रुजू झाले याचा वर उल्लेख आला आहेच. १९७४ साली ते प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे संचालक झाले; ते सतत २१ वर्षे कार्यरत होते. या काळात, संग्रहालयाचा चेहरामोहरा बदलण्याबरोबरच त्यांनी आधुनिक संग्रहालय घडविण्याच्या दृष्टीने सहकाऱ्यांना प्रशिक्षित केले. निवृत्तीनंतरही ते स्वस्थ राहिले नाहीत. भारत सरकारच्या ओएनजीसीसाठी आणि गोवा सरकारच्या पणजी येथील राज्य संग्रहालयाच्या उभारणीत भरीव मदत केली. महाराष्ट्र राज्यपालांच्या अभिलेखागाराची पुनर्रचना करून त्याच्या निरंतर जतनाची व्यवस्था केली. म्युझियमच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष खंडालावाला यांचे मार्गदर्शन गोरक्षकरांना ४० वर्षांहून अधिक काळ लाभले. त्यांच्या पितृवत स्नेहासही ते पात्र होते. ‘ललितकला’ या केंद्र शासनाच्या ललित कलांना वाहिलेल्या नियतकालिकाचे खंडालावाला संपादक, तर गोरक्षकर उपसंपादक. अनेक कलाविषयक ग्रंथांच्या संपादनात त्यांनी खंडालावाला यांना मदत केली. त्या दोघांनी संपादित केलेल्या पूर्व भारतीय कांस्य-प्रतिमांवरचा ग्रंथ तर कलामर्मज्ञांच्या प्रशंसेस प्राप्त झाला. कलाक्षेत्रातील त्यांच्या अशा योगदानामुळे टागोर  फेलोशिपचे ते मानकरी झाले. राष्ट्रीय संग्रहालयातील कांस्य-प्रतिमांवर त्यांनी ग्रंथलेखन केले. अशा चौफेर कर्तृत्वामुळेच ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.

(२०१६ साली चतुरंग रंगसंमेलनात सदाशिव गोरक्षकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानिमित्ताने २०१७ साली प्रसिद्ध झालेल्या स्मरणिकेत हा लेख समाविष्ट आहे.)

तात्कालिक प्रदर्शनांतल्या अनुभवांतून गोरक्षकरांनी संग्रहालयाचा कायापालट घडवून आणला. ‘महाराष्ट्रातील नागरी संस्कृतीचा उष:काल’ या प्रदर्शनाच्या पुरावस्तूंतून ‘प्री अ‍ॅण्ड प्रोटो-हिस्ट्री’च्या दालनात काही चांगली भर घातली. तिबेट प्रदर्शनाचा लाभ नेपाळी आणि तिबेट दालनाची पुनर्माडणी करताना झाला. पण त्यांचे खरे कसब पणाला लागले ते त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत. ‘मॅरिटाइम हेरिटेज’ हे प्रदर्शन त्यांनी मॉरिशस येथे १९८४  साली; ‘लावण्य-दर्पण’ हे स्वीडनमध्ये १९८७  साली; तर ‘मृग’ हे जपानमध्ये १९८८  साली भरविले. या प्रदर्शनांमुळे गोरक्षकरांच्या चोखंदळपणाचा तर सगळ्यांना प्रत्यय आलाच, शिवाय भारतीय संस्कृतीच्या सौंदर्यप्रियतेचा प्रत्ययही परदेशी चोखंदळ रसिकांना आला.