राम माधव

‘‘सर्वच धर्मामध्ये पवित्र स्थानाला महत्त्व असले, तरी आपल्या देशात त्याभोवती गुंफलेल्या मूल्यसंस्कृतीसही तितकेच महत्त्व आहे. त्या मूल्य-परंपरेला केंद्रस्थानी ठेवूनच अयोध्येतील राम मंदिराच्या पुनस्र्थापनेकडे पाहायले हवे. कारण त्यातून आलेल्या आदर्शाचीच पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ ऑगस्ट रोजी अयोध्या येथील मंदिरसोहळ्यात केली..’’

प्रत्येक देशाला पवित्र जागा आणि प्रत्येक धर्माला पवित्र ठिकाणे असतात. संस्कृती हा देशाचा आत्मा आहे. भाषा, इतिहास, धर्म या सांस्कृतिक प्रतीकांद्वारे राष्ट्राची ओळख तयार होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी केवळ निम्मीच जनता फ्रेंच बोलू शकत होती. त्यातही १२ टक्केच लोक ही भाषा शुद्ध बोलत होते. क्रांतीनंतर या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी फ्रान्सने जे खडतर परिश्रम घेतले, त्याचे अमेरिकी इतिहासकार युजेन वेबर यांनी ‘स्वयंवसाहतवाद’ असे वर्णन केले आहे. या प्रयत्नातूनच आधुनिक फ्रान्सची निर्मिती झाली. त्यातूनच ‘बिगर-युरोपीय संस्कृतीपेक्षा फ्रान्स श्रेष्ठ आहे’ ही धारणा आकाराला आली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला थीओडर हेर्झल या दृरदृष्टी असलेल्या नेत्याच्या चळवळीतून ज्यूंचा देश अशी ओळख असलेल्या इस्राएलचा पाया घातला गेला. हेर्झल हे धार्मिक नव्हते, मात्र ज्यूवाद हा ज्यूंच्या खासगी आणि सार्वजनिक अस्तित्वापासून वेगळा होणे अशक्य असल्याची त्यांची भावना होती. त्यासाठीच हेर्झल यांनी नेहमी धर्माचा आदर केला.

सर्वच धर्मामध्ये पवित्र जागा आणि स्थान यांना महत्त्व आहे. शिकागो विद्यापीठातील धर्म-अभ्यासक मिर्चा इलिआदे यांनी ‘हायरोफॅनी’ ही संकल्पना मांडली आहे. पवित्र जागी  परमेश्वराचे वास्तव्य असते, असा तिचा अर्थ आहे. ज्यूंसाठी सॉलोमन याने जेरुसलेममधील वेलिंग वॉल हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ती ज्यूंसाठी पवित्र जागा आहे. तर जिझस्शी संबंध असल्याने ख्रिश्चन धर्मीयांसाठी ते जेरुसलेम आहे. मुस्लिमांसाठी प्रेषित मोहम्मदांचे जन्मस्थान मक्का हे पवित्र आहे.

सेमिटिक धर्माचा इतिहास पाहिला तर ध्यानात येईल की, अनेक ठिकाणांचे पावित्र्य नष्ट करण्यात आले आणि नंतर त्यांची पुनस्र्थापनाही झाली. बॅबलोनियाचा ग्रीक शहरांवरील विजय असो वा रोमनांनी ज्यूंची भूमी जिंकणे असो किंवा मध्ययुगीन काळात ख्रिश्चन व मुस्लीम यांच्यातील धर्मयुद्धे असोत, जेत्यांचे लक्ष कायम पवित्र ठिकाणे राहिली आहेत. मग अनेक ठिकाणी मशिदींचे रूपांतर चर्चमध्ये, तर चर्च मशिदींमध्ये परावर्तित झाले. इस्तंबुलमधील आया सोफिया या मोठय़ा चर्चचे रूपांतर नुकतेच मशिदीमध्ये झाले, हे आजच्या काळातील त्याचे उदाहरण.

भारतासारख्या देशात मध्ययुगीन संघर्षांत अनेक पवित्र ठिकाणांवर आक्रमण करण्यात आले. असंख्य मंदिरे उद्ध्वस्त करून त्यांचे परिवर्तन करण्यात आले. पण भारतात ‘हायरोफॅनी’ ही निव्वळ पवित्र वास्तू वा ठिकाणापुरतीच नसते, त्याभोवती मूल्ये आणि नैतिकताही गुंफलेली असते. अयोध्येसारखे ठिकाण हे या सर्वव्यापी भावनांचे प्रतिनिधित्व करते. पण हे महत्त्व केवळ रामायण किंवा प्रभू रामचंद्रांशी निगडित आहे म्हणून नव्हे, तर त्यांच्यापासून आलेल्या मूल्यसंस्कृतीमुळेही आहे.

आपल्या देशातील जी मूल्य-परंपरा आहे, तिला केंद्रस्थानी ठेवूनच अयोध्येतील राम मंदिराच्या पुनस्र्थापनेकडे पाहायले हवे. आशियात राम आणि रामायण खूप लोकप्रिय आहेत. वाल्मीकी रामायणाइतकी लोकप्रियता किंवा प्रभावशीलता खूप कमी साहित्याला लाभली, असे निरीक्षण कॅलिफोर्निया विद्यापीठातील संस्कृत प्राध्यापक रॉबर्ट गोल्डमॅन यांनी नोंदवले आहे. राम हा अनेकांसाठी देव आहे. पण वाल्मीकींनी श्रीराम हे विष्णूचे एक अवतार आणि आदर्श मानव असल्याचे वर्णिले आहे. वाल्मीकींनी प्रभू श्रीरामचंद्रांस मर्यादा पुरुषोत्तम असे संबोधले. जे धर्माचे आणि नीतिमत्तेचे प्रतीक आहेत. महात्मा गांधींसाठी श्रीराम हे सत्यवचनी होते. ‘रामराज्य’ म्हणजे लोकांचे शासन. श्रीरामांनी कारभार करताना राज्य व जनतेची आराधना केली, असे वर्णन वाल्मीकींनी केले आहे.

अयोध्या हे केवळ हिंदूंसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही पवित्र आहे. किमान पाच जैन र्तीथकर हे अयोध्येतून आल्याचे मानले जाते. बौद्ध धर्मात साकेत शहर म्हणजे अयोध्या, तर शीख धर्मीयांचे अयोध्येशी नाते घनिष्ठ आहे. गुरुग्रंथसाहिबमध्ये बाबराच्या आक्रमणाचे वर्णन आहे. शिखांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंग यांनी अयोध्येत बाबा वैष्णवदास यांच्या पाठिंब्यासाठी सैन्य नेले होते. बाबा वैष्णवदास मुघलांकडून रामजन्मभूमी परत मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. संत कबीर यांचा मूर्तिपूजेवर विश्वास नव्हता; पण त्यांनीही ‘रामाशिवाय कोणतीच जागा नाही’ असे म्हटले आहे. थोडक्यात, राम सर्वत्र आहे. त्यामुळेच समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी श्रीरामाचे वर्णन ‘सर्वाना एका सूत्रात जोडणारा’ असे केले होते. रामायणात दडलेल्या याच आदर्शाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. अयोध्येची ही कथा प्रत्येक हिंदूच नव्हे, तर अनेक मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख व ख्रिश्चनांना आपल्या जवळची वाटते.

(लेखक भाजपचे सरचिटणीस आणि ‘इंडिया फाऊंडेशन’चे संचालक आहेत.)