18 March 2019

News Flash

सोयीचं तेच स्वीकारणार काय?

विषय होता - ‘कौमार्यचाचणी.. पुरुषांची?’

रिद्धी म्हात्रे, मुंबई लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत ‘महाराष्ट्राची वक्ता दशसहस्रेषु’ ठरलेल्या विद्यार्थिनीचे भाषण.

विषय होता – ‘कौमार्यचाचणी.. पुरुषांची?’

आज आपण एकविसाव्या शतकात जगतोय. विज्ञान युगाचे पाईक आहोत. नुकताच आपण ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. कसं छान वाटतंय ना? पण दुसरीकडे मात्र कंजारभाट समाजातील स्त्रियांना त्यांचं कौमार्य सिद्ध करावं लागतंय आणि ते सुद्धा त्यांच्या लग्नाच्याच दिवशी. मध्य प्रदेशातील काही स्त्रियांना ‘कुकरी’ प्रथेला सामोरं जावं लागतं. तर काही स्त्रियांना स्वत:चा ‘खतना’ करून घ्यावा लागतो. म्हणजेच २१ व्या शतकात जगणाऱ्या स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतोय याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव त्या स्त्रीचं असूच शकत नाही असं मला वाटतं.

एकविसाव्या शतकात जगत असताना स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांना मी आवाहन करीन, अभिमान बाळगा आपण मुलगी असल्याचा, स्त्री असल्याचा आणि जो समाज तुम्हाला या रूढी-परंपरांमध्ये अडकवू पाहतोय त्यांना हे दाखवून द्या की तुम्हाला एक नवीन इतिहास घडवावा लागणार आहे. तुमच्यासाठी आणि उद्या जन्माला येणाऱ्या तुमच्या चिमुरडीसाठी..

स्त्रिया इतक्या साध्या असतात की तुम्ही कुठलीही गोष्ट त्यांना करायला सांगा, कोणत्याही दिव्यातून जायला सांगा, ते करायला त्या तयार असतात. पण पुरुषाला जर या चाचण्यांना सामोरं जायला सांगितलं तर तो दूर पळताना दिसतो. मला फक्त एवढंच म्हणायचंय स्त्रीचं कौमार्य सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं जातं, ते पुरुषाच्या बाबतीत दिलं जात नाही. म्हणजे काय तर कौमार्य सिद्ध करणारा तिच्या योनीत एक पडदा असतो. तो कधी कधी निसर्गत:च नसतो, तर कधी तो खूप पातळ किंवा कधी तो खूप जाडही असतो. म्हणजे काय तर पहिल्यांदाच जेव्हा शरीरसंबंध ठेवल्यानंतर तो पडदा जाड असल्यामुळे फाटला जाईलच असं नाही. मग अशी स्त्री की जिला तो पडदा निसर्गत:च नाही किंवा जाड असल्यामुळे फाटला गेला नाही तर ती कौमार्यचाचणीत नापास ठरूच कशी शकते?

बरं पुरुषांच्या शिश्नमुंडाला आणि लिंगाला जोडणारी एक पातळ कातडी असते ती सुद्धा शरीरसंबंधांच्या वेळी फाटली जाऊ शकते आणि रक्तस्राव होऊ शकतो किंवा कधी होऊही शकत नाही. मग हे निकष पुरुषांच्या कौमार्यचाचणीसाठी का लागू होत नाहीत? फक्त स्त्रीवरच ही बंधनं का असतात? पुण्यातील एक भीषण प्रकार नुकताच सगळ्यांसमोर आला. त्या कंजारभाट समाजातील मुलीचे लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी तिला तिच्या कौमार्याचा पुरावा द्यावा लागतो. म्हणजे लग्नानंतर दुसऱ्या दिवशी त्या नवऱ्या मुलाला विचारलं जातं, की तुला दिलेला माल खरा होता की खोटा होता. इतक्या वाईट आणि घृणास्पद भाषेत स्त्रीच्या चारित्र्याविषयी, तिच्या कौमार्यचाचणीविषयी आजही आपला समाज प्रश्न विचारताना दिसतो, ही खूप खेदाची बाब आहे. स्त्रियांना पुरुषांचीही कौमार्यचाचणी करायला भाग पाडावं यापेक्षाही पुरुषांची बदललेली मानसिकता स्त्रियांना हवी आहे. तुम्ही स्त्रीला समजून घ्यावं, तिच्या भावना समजून घ्याव्यात इतकीच माफक अपेक्षा स्त्रीची आहे आणि मला वाटतं प्रत्येक पुरुष ही अपेक्षा पूर्ण करू शकतो. इथे जमलेल्या प्रत्येक पुरुषाला मी आवाहन करीन की ‘बनानेवाले ने फरक नहीं किया, तो तू कौन होता हैं फरक करनेवाला?’ असा ‘क्रांतिवीर’ तुम्हाला व्हावंच लागणार आहे. तुम्ही स्त्रियांच्या सोबत उभे राहिलात ना तर आपल्या समाजातल्या स्त्रिया कुठच्या कुठे जाऊन पोहोचतील.

मी कौतुक करीन कंजारभाट समाजातील एक तरुण विवेक तमाईचेकर याचे. कारण तो या सगळ्या प्रथेच्या विरोधात उभा राहिला. त्याला अनेक तरुण सहकार्यही करत आहेत. पण दुसरीकडेच खेदाची बाब म्हणजे त्याच समाजातील अनेक व्यक्ती विवेक आणि त्याच्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करताना दिसत आहेत. म्हणजे एकीकडे तरुण पिढी या समाजाला पुढे नेऊ पाहात आहे, समाजाची प्रगती करू पाहात आहे आणि त्याच वेळी तोच समाज आपल्या समाजाचे पाय खेचून मागे ओढण्याचा प्रयत्न करतोय. ही वृत्ती आपण किती दिवस कवटाळून ठेवायची? मला एका गोष्टीचंही नवल वाटतं, की एकापेक्षा जास्त बायका केल्यानंतर आपण श्रीकृष्णाचं किंवा पत्नीला अग्निपरीक्षा द्यायला लावल्यानंतर रामाचं नाव सांगायचं. मग ती स्त्री किंवा आपली पत्नी एखाद्या अत्याचाराला बळी पडली की ऋषी गौतमांचं उदाहरण देऊन मी तिला स्वीकारणार नाही, असा टेंभा मिरवायचा ही कुठली प्रवृत्ती आहे? बरं हे पुरावे देऊन तुम्ही आजपर्यंत अनेक पुरुष बघितलेत, जे स्त्रियांचा गैरफायदा घेतात. मला याविषयी असं म्हणायचं आहे की द्रौपदीचे पाच पती असूनही तिला आजही अनेक ठिकाणी पुजले जाते. कुंतीने कर्णाला जन्म दिला, तिनेही तिचं कौमार्य लपविलं होतं. मग हे पुराणातले दाखले स्त्रियांच्या बाबतीत का लागू होत नाहीत? फक्त पुरुषांनीच हे जुने दाखले द्यायचे आणि स्त्रियांना कायम दुय्यम स्थान द्यायचं, असं होऊ शकत नाही.

मुळात स्त्रीला कौमार्यचाचणी करावी लागते  म्हणून पुरुषांचीही ती केली जावी, असं कुठल्याच स्त्रीचं म्हणणं नाहीये. उलट स्त्रिया हेच म्हणताहेत की आम्हाला जे सहन करावं लागत आहे ते इतर कुणालाही सहन करावं लागू नये. पण मी मघाशी म्हटलं तसं पुरुषांची बदललेली मानसिकता स्त्रीला हवी आहे.

नुकताच तीन दिवसांपूर्वी आपण व्हॅलेंटाइन डे-प्रेमाचा दिवस साजरा केला. पण त्याला विरोध झाला. का तर म्हणे पाश्चिमात्यांचं अनुकरण इथे चालणार नाही. मला एक प्रश्न विचारायचा आहे की या व्हॅलेंटाइन डे ला विरोध करणारे जे लोक आहेत ते त्यांच्या मुलांचा किंवा मित्रमंडळींचा वाढदिवस साजरा करत असताना केक कापत किंवा मेणबत्त्या फुंकतच साजरा करत असतील. किंवा हे सगळं सोडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबुक‘सारख्या गोष्टी आपण धुडकावल्या आहेत का? तर नाही, मग त्याही द्या धुडकावून. ते जमतंय का? तर नाही. याचा अर्थ काय, तर आपल्या सोयीचं जे आहे तेच आपण स्वीकारायचं, ही मानसिकता आधीपासून चालत आली आहे आणि कदाचित हीच गोष्ट कौमार्यचाचणीच्या बाबतीतही होताना दिसली. कारण याला वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं जातं.. आणि महिलांप्रमाणे ते पुरुषांच्या बाबतीत दिलं जात नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन कदाचित काही पुरुषांचा जो अहंपणा तो आणि पुरुषप्रधान संस्कृती यातून कधी कधी स्त्रियांवर बलात्कार, अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या घटना घडतात आणि कौमार्यचाचणीसारख्या वाईट प्रथाही अजूनही सुरू आहेत. एक गोष्ट यामध्ये लक्षात घेण्यासारखी आहे की मुलींचं जे काही धावपळीचं जीवन आहे, खेळणं, पोहणं, जिन्मॅस्टिकसारखे साहसी खेळ करणं या गोष्टींमुळे तिचे कौमार्य दर्शविणारा योनीतला जो पडदा आहे तो फाटला जाऊ शकतो किंवा मग पुरुषांचंसुद्धा हस्तमैथुन, स्वप्नदोष किंवा मग स्वत:च्या पुरुषत्वाची चाचणी या गोष्टींमुळेही पुरुषांचा कौमार्यभंग होतोच ना?  मग हीच गोष्ट विज्ञानाच्या सहकार्याने आपण स्वीकारणं गरजेचं आहे. पुरुषांबरोबरच स्त्रीनेही ती स्वीकारली पाहिजे. कारण जेव्हा या कौमार्यचाचणीच्या  प्रथा लक्षात येतात तेव्हा हे पण बघितलं पाहिजे की फक्त पुरुष नाहीत तर काही स्त्रियाही या जुन्या परंपरांना कवटाळून बसलेल्या आहेत..

(संपादित)

First Published on February 25, 2018 3:27 am

Web Title: riddhi mhatre speech in loksatta oratory competition