लयास गेलेल्या प्राचीन रोमन साम्राज्याहून थोर रोमन कॅथलिक चर्चचे साम्राज्य. केवढा त्याचा दबदबा. बिशप आणि पाद्री (प्रिस्ट) हे या जगभर पसरलेल्या साम्राज्याचे राखणदार; पण कुंपणानेच शेत खावे त्याप्रमाणे त्यांच्यापैकी काही जण वागतात. ते नन्सचे लैंगिक शोषण करतात. हे सत्य पोप फ्रान्सिस यांनी नुकतेच संयुक्त अरब अमिरातीहून परतताना प्रथमच जाहीरपणे मान्य केले.

..पण त्यात नवीन ते काय, असा प्रश्न ‘यूएसए टुडे’ने अ‍ॅनी बॅरेट डोयल यांच्या हवाल्याने विचारला आहे. अ‍ॅनी या ‘बिशप अकाऊंटॅबिलिटी’ या संकेतस्थळाच्या प्रमुख आहेत. त्या म्हणतात, ‘‘व्हॅटिकन सिटीकडे अशी हजारो प्रकरणे दाखल आहेत, पण पोप असे सांगताहेत की, हे जणू काही प्रथमच घडत आहे. पोप यांनी फक्त मान्य केले आहे, प्रतिबंधासाठी पाऊल उचललेले नाही. तरीही सत्य मान्य केल्यामुळे काही अत्याचारग्रस्त नन्स पुढे येतील.’’ ‘रोमन ऑब्झव्‍‌र्हर’ या व्हॅटिकनमधल्या वर्तमानपत्राच्या ‘वुमेन चर्च वर्ल्ड’ मासिकाच्या मुख्य संपादिका ल्युसेटा स्कॅराफिया यांनीही, अत्याचारग्रस्त नन्स निषेध करण्याचे धाडस दाखवतील, अशी अपेक्षा ‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील वृत्तान्तात व्यक्त केली होती. या दोघींचीही अपेक्षा सार्थ ठरली आहे.

बीबीसी रेडिओवर पूर्वाश्रमीच्या दोन नन्सनी अनुभवकथन केले. त्यापैकी डॉ. रोकिओ फिग्युरोआ या ऑकलंडमध्ये धर्मशास्त्राच्या व्याख्यात्या आहेत. त्या म्हणतात, ‘‘माझे शोषण होत होते, परंतु ते करणारा भला माणूस आहे आणि आपण वाईट, अशी माझी भावना होती. मी मला दोषी ठरवून गप्प बसले. तो आता हयात नसला तरी त्याला लिमामध्ये संत मानले जाते, म्हणून त्याचा निषेध करणे आवश्यक वाटते.’’ डोरिस वॅगनर यांचाही अनुभव असाच आहे. त्या म्हणतात, ‘‘लैंगिक शोषणाआधी माझे आध्यात्मिक शोषण करण्यात आले. मला ग्रंथवाचनास मनाई करण्यात आली. तो चुकीचा वागत होता, पण तो प्रिस्ट होता आणि मी नन. मी धार्मिक संकटात होते. वाच्यता केली असती तर चर्चची प्रतिमा ढासळली असती.’’

पोप फ्रान्सिस यांनी चर्चमधल्या शोषणाला लैंगिक गुलामगिरी (सेक्शुअल स्लेव्हरी) असे म्हटले. ‘रोमन कॅथलिक रिपोर्टर’ने हे वृत्त देताना पर्यायी शब्दसमूह योजून जाणीवपूर्वक काही शब्द टाळले. ‘सेक्शुअल स्लेव्हरी’ हा मूळ शब्दसमूह पोप फ्रान्सिस यांचा, पण या वृत्तपत्राने त्याला ‘मिसट्रीटमेंट ऑफ सिस्टर्स’ अशा शब्दसमूहांचा पर्याय योजला आहे; पण त्यामुळे या समस्येची तीव्रता कमी होत नाही.

काही कॅथलिक चर्चमध्ये लैंगिक गुलामगिरी वर्षांनुवर्षे ठाण मांडून आहे. नन्सच्या करुण कहाण्या चर्चच्या दगडी भिंती भेदून थेट व्हॅटिकन सिटीवर आदळल्या; पण चर्चच्या या मुख्यालयाला पाझर फुटला नाही. परंतु पोप फ्रान्सिस यांना चर्चमध्ये महिलांचे लैंगिक शोषण केले जाते, हे जाहीरपणे मान्य करणे भाग पडले. त्याला कारण ल्युसेटा स्कॅराफिया बाई. त्यांनी ‘वुमेन चर्च वर्ल्ड’च्या फेब्रुवारीच्या अंकात ‘विदाऊट एनी टचिंग’ या लेखात शोषणावर आसूड ओढले. चर्चनी डोळे झापडबंद ठेवले तर अत्याचार असेच चालू राहतील. नन्सना बिशप वा पाद्री गर्भपात करण्यास भाग पाडत राहतील किंवा त्या त्यांच्या अपत्यांना जन्म देत राहतील.. या बाईंच्या लेखाचा उल्लेख करून ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने याविषयीचे विशेष वृत्त ऑनलाइन आवृत्तीत प्रसिद्ध केले आहे.

‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या वृत्तात चर्चमधील शोषणव्यवस्थेवर प्रकाश टाकला आहे. आफ्रिकेत एड्सच्या फैलावानंतर सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी पाद्री आणि बिशप यांनी नन्सना केलेले लक्ष्य इथपासून ते चर्चमधील पुरुषप्रधान संरचना बदलण्याची अमेरिकेतील नन्सची मागणी आणि गेल्या वर्षी केरळमध्ये नन्सवर बिशप फ्रँको मुलक्कल यांनी केलेले अत्याचार इथपर्यंतचे सगळे संदर्भ या वृत्तान्तात आहेत.

कोणत्याही समस्येच्या उच्चाटनासाठी उचललेले पहिले पाऊल म्हणजे तिचे अस्तित्व मान्य करणे; पण आमच्याकडे सर्व काही सुशेगात आहे, तुम्ही म्हणता, पाहता, वाचता किंवा ऐकता तसे काहीही नाही, असे म्हटले तर त्या आध्यात्मिक ढोंगातून समस्या जटिल होत जाते. प्रश्न धार्मिकतेशी निगडित असेल तर प्रतिमा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतो. कॅथलिक चर्चच्या बाबतीत कालपर्यंत हेच घडत होते.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई