नितीन अरुण कुलकर्णी nitindrak@gmail.com

माणूस कला पाहायला शिकतो, वस्तूतलं किंवा आणखी कशातलं सौंदर्य त्याला जाणवतं.. काही जण कलाकृती किंवा डिझाइन करत असतात.. या सर्वाना जोडणारं जे सूत्र असतं त्यात आपल्या पूर्वापार संकल्पना आणि त्यांना थेट धक्का न लावता, नव्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे नवी संकल्पना अशी एक साखळी दिसते.. या साखळीच्या कडय़ा उलगडून दाखवणारं हे नवं पाक्षिक सदर..

एखाद्या संध्याकाळी फिरायला गेलेलं असताना क्षितिजावर दुधी प्रकाशरंगाचा जरासा डागाळलेला गोल अवतरलेला दिसतो आणि आपली नजर विस्मयाने खिळते व सुखावतेदेखील. पौर्णिमा असेल तर दुधाळ गोल अजूनच मधाळ गोडवा आणतो.

हा ‘गोल’ चंद्र आहे हे सुरुवातीपासून माहीत असलं तरीही क्षणभर याचा आपल्याला विसर पडलेला असतो. कल्पनेतलं परग्रहावरील वातावरण आपण वास्तवात अनुभवतो आहोत असं काहीसं होतं. कालांतराने आपण पृथ्वीवर येतो, जमिनीवर चालत आहोत व चंद्राला न्याहाळत आहोत व त्यावरचा ‘ससा’- लहानपणी त्याच्या ऐकलेल्या गोष्टीच्या आठवणींसोबत बघतो आहोत, याची जाणीव होते. मध्येच चंद्राच्या खडबडीत जमिनीवर उडय़ा मारत चालणारा अंतराळवीरही मनांत डोकावून जातो. असा अनुभव बऱ्याच वेळेस मला येतो.

या वरील प्रसंगात चंद्र व त्याच्या भोवतालाचे वास्तव काय? आणि कल्पना काय? तसेच बघणे व दिसणे याचा संबंध आणि साक्ष मिळण्याचा खरा अर्थ काय? या सर्व प्रश्नांची मनांत सरमिसळ होते. दृश्य, कल्पना, विचार, संदिग्धता आणि वास्तव यांचा एक पुंज बनलेला असतो. हा प्रकाश-पुंजच असतो जणू, अनेक विचारबिंदूंचा समूह. हे विचारिबदू असतात कमी-अधिक ऊर्जेचे, पण असतात सर्जनशील प्रज्ञेचे. वेगवेगळे हे िबदू कोणत्या आकारबंधात बघितले जातात त्यावर या पुंजाचे मूर्त रूप कसे व काय बनावे हे ठरते आणि तयार झालेली असते ती म्हणजे ‘संकल्पना’.

संकल्पनेचा संदर्भ काय आहे? जीवनातल्या कुठल्या क्षेत्रात संकल्पना जडली व कुठे वापरली जाणार आहे त्यावर तिचे अंतिम वस्तुरूप ठरते. एकदा का या संकल्पनेचं रूपांतर वस्तूत झालं की मात्र ही संकल्पना एका चौकटीत बंदिस्त होते. नंतर त्या सर्जनशील व्यक्तीच्या मनात घडलेला तिचा प्रवास उलगडवणे कठीण होऊन बसते. म्हणजे बऱ्याचदा, स्वत: त्या व्यक्तीलादेखील ते अवघड असते. दृश्य-कला व ‘डिझाइन’च्या संबंधात गेल्या २०-२५ वर्षांच्या कलानिर्मिती (दृश्य व काव्य), सर्जनाचे शिक्षण व विश्लेषण (भाष्य व लिखाण) या संमिश्र, दोलायमान आंतरशाखीय काल-कीर्दीत अशा प्रकारच्या अनुभवांची पूर्वपीठिका सिद्ध होत गेली. यांत नेहमीच प्रकर्षांने हेच जाणवत आले की व्यक्ती, समाज, संस्था व यांत चाललेले विचारप्रवाह हे स्थल-काल, देश/ विदेशाच्या संदर्भात जरी बद्ध असले तरी संकल्पनांच्या पातळीवर एक प्रकारची संवादी शृंखला बनवतात. सर्जनाच्या संदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रांत जी काही निर्मिती होत असते त्यात एक सूत्र आढळते आणि हे सूत्र मुख्यत्वेकरून शांत व मूक असते. मनन-चिंतन, तर्क-वितर्काने त्यातला गर्भितार्थ ‘बोलता’ आणि अधोरेखित करावा लागतो. असे करणे हेसुद्धा एक सर्जनाचे अप्रस्थापित रूप असते आणि त्यामुळेच कठीण असते. आजची समीक्षा केवळ त्या त्या क्षेत्रातला केवळ विचार-वस्तू व्यवहार अधोरेखित करताना दिसते, संकल्पनांच्या साहचर्यावर आणि त्यांच्या आंतरसंबंधावर खचितच भर देताना दिसते.

खरं तर ‘संकल्पना’ हे असं ऊर्जासूत्र असतं जे जणू काही मानवी जीवनालाच आयुध बनवून स्वत:च्या लीला प्रसूत करत असतं. अडचण हीच असते की हे सूत्र बहुआयामी व कालातीत असतं, त्यामुळेच मायावी आणि आदिम असतं. एकच संकल्पना वेगवेगळा वेश परिधान करून येऊ शकते. हा ‘वेश’ संस्कृती, चालीरीती, अर्थकारण वा राजकारण तसेच त्या क्षेत्रातील प्रचलन यांच्यावर अवलंबून असतो त्यामुळे तो वेगवेगळा भासू शकतो.

अशा अनेक संकल्पनांची निर्मिती गृहीत व अध्याहृत असते; कारण ती एकंदर निर्मितीप्रक्रियेचाच एक भाग असते आणि त्यामुळेच आकारांत व क्रियाबंधात बंदिस्त असते, तिला हुडकून काढावे लागते. कला अथवा क्रयवस्तूंचा व्यवहार कदाचित संकल्पनांच्या मर्मापासून वंचित असतो. कधी कधी तर (मघाशी म्हटल्याप्रमाणे,) स्वत: निर्मातादेखील या प्रक्रियेपासून अनभिज्ञ असतो. अशा प्रकारचे नामानिराळेपण वरवर पाहता तर्कविसंगत वाटेल, पण तर्काला धरून असते. कसे, ते पुढल्या काही लेखांत पाहू.

आजपर्यंत झालेल्या वाटचालीत प्रगतीचे अनेक टप्पे पादाक्रांत करताना माणूस अनेक अडचणी सोडवत आला. यापैकी बऱ्याचशा अडचणी आधीच्या भौतिक निर्मितीचाच परिणाम होत्या. जीवन विकासाच्या वेगवेगळ्या शाखा प्रबळ असणे ही काळाची गरज होती, ते यांत्रिकीकरणाच्या एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातल्या प्रगतीसंदर्भात योग्यच होतं. आज एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात माहितीजाल व डिजिटल तसेच निर्मिती-तंत्रज्ञानाच्या उत्कर्षयुगात वस्तुनिर्मिती अतिशय सुकर झाली आहे, तर दुसरीकडून जीवनातल्या विभक्ततेचा काळ सरून ‘होलीझम’ येऊ घातलाय, आयुष्यात समग्रता महत्त्वाची झालीय आणि डिजिटल तंत्रज्ञान हे या सीमारेषा ठिसूळ करायला चालना देत आहे. आता आपला प्रवास सुरू झालाय तो संकल्पनांच्या माध्यमातून भूतकाळातल्या चांगल्या गोष्टींची पुनर्निर्मिती करण्याकडे तसेच पर्यावरणास न डावलता आधुनिकतेचा पुरस्कार करण्याकडे. आंतरशाखाप्रधान विचार करण्यावाचून आता आपली सुटका नाही. तसा तो करायला, तंत्रज्ञान व चढाओढीचा माहोल आपल्याला भाग पाडत आहे. त्यामुळे संकल्पनाप्रधानता दुव्याच्या, सांध्याच्या रूपात महत्त्वाची ठरते. आजचा काळ माहितीच्या जलद होणाऱ्या प्रसारामुळे एका प्रकारे ‘एज ऑफ आयडियाज अ‍ॅण्ड कॉन्सेप्ट्स’ म्हणून जाणला पाहिजे.  ही वेळ निर्मितीक्षम असल्याचं ओळखून, त्यातल्या सर्जनशील क्रियाकृती टिपण्याची व शिकण्याची, ही संस्कृती म्हणजे ‘संकल्पनांची संस्कृती’!

संकल्पनेची सामग्री काय असते? प्रथम संवेदना, अनुभव, कल्पना नंतर पूर्वसंकल्पना (स्वत:च्या व इतरांच्याही), तर्क आणि शेवटी माध्यम विचार. या सर्व टप्प्यांवर विचारिबदू क्रियाशील होऊन ‘ऊर्जािबदू’ बनतात. या बिंदूंचा एक आकारबंध मनात तयार होतो. सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे दृष्टिकोन बदलून त्यांचं आकारबंधाकडे पाहणे व नंतर योग्य असा आकार निवडणे. ही प्रक्रिया जागृत करायला आजचा काळ योग्य परिस्थिती तयार करतो. तंत्रज्ञानाने या शक्यतांचा पडताळा आपल्याला बहाल केला. पृथ्वीवरून चंद्र उगवलेला आपण नेहमीच पाहतो, या घटनेतील अद्भुतता कधी कधी आपल्या ध्यानात येते. हा अनुभव पूर्ण होतो तो आपल्या स्मृती व माध्यमांच्या संस्काराने. मला असं वाटतं की ही सजगता एखाद्या गुणसूत्रासारखी आपल्या जाणिवेत घट्ट बसणारी आहे. या जाणिवेची पत असणार आहे ती सोबतच्या छायाचित्रासारखी – ‘अर्थ राइज’ या पृथ्वीच्या उगवण्याच्या घटनेची. आजपासून ५० वर्षांपूर्वी (१९६८) असे पहिलेवहिले छायाचित्र नासाच्या अंतराळवीरांनी चंद्रावर पोहोचल्यावर घेतले होते. या अजरामर झालेल्या दृश्याने माणसाची स्वत:ची व भोवतालाची जाणीव – ‘परदृष्टी’- दृढमूल झालेली वाटते. मात्र आपल्याला त्याची जाणीव असतेच असं नाही. आपण जेवढे आपल्यापासून दूर जाऊ तेवढेच आपण आपल्याकडे परत येऊ आणि असे जाणणे आपल्याला समग्रतेकडे घेऊन येण्याची शक्यता निर्माण करेल. या लिखाणाद्वारे अशा अनेक शक्यतांची मांदियाळी पुन्हा सचेतन होवो, हीच आशा. पुढील लेखांमधून संकल्पनांचे- काही ऊर्जाबिंदूंचे – पुंज आपण पाहू.

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…

duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…