26 January 2021

News Flash

करोनाने लोटले देहबाजारात!

सहानुभूती दाखवत, मदत देण्याचा देखावा करीत त्यांना जाळ्यात ओढले जाते

एजाजहुसेन मुजावर, सोलापूर

करोनातील टाळेबंदीपायी सर्वच क्षेत्रांत मंदी आली. रोजगाराअभावी अनेकांवर उपासमारीची वेळ आली. याला देहविक्रय करणाऱ्या महिलांचाही अपवाद नव्हता. जगरहाटीच थांबल्याने या स्त्रियांवरही उपासमारीची पाळी आली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला यात लक्ष घालून या उपेक्षितांच्या मदतीकरता शासनास आदेश द्यावे लागले. करोनाने रोजीरोटी हिरावलेल्या या गरीब स्त्रियांवरील आर्थिक संकट अद्याप दूर झाले नसताना करोनाने निर्माण केलेल्या असहायतेचा फायदा उठवत आणखी काही महिलांनाही देहविक्रयाच्या या व्यवसायात ओढण्याचा ‘उद्योग’ आता उजेडात येत आहे.

सोलापूरसारख्या बहुसंख्य गरीब श्रमिक वर्ग असलेल्या शहरात अलीकडे पोलिसांनी बेकायदा कुंटणखान्यांवर छापे टाकून कारवाई केली असता हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या महिनाभरात शहराच्या विविध भागांत छुप्या पद्धतीने चालणाऱ्या पाच कुंटणखान्यांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी देहविक्रयातील ९५ टक्के महिलांचा हा प्रथमच सहभाग असल्याचे आढळून आले. बहुतांशी झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या या अल्पशिक्षित स्त्रिया २८ ते ३५ वर्षे वयोगटातील असून, जवळपास सर्वावर मुलाबाळांच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे. काही जणी विधवा, तर काही परित्यक्ता आहेत. काहींचे पती दारू, जुगाराच्या व्यसनात बुडालेले किंवा दुसऱ्या बाईच्या आहारी जाऊन स्वत:चा घरसंसार वाऱ्यावर सोडलेले आहेत. अशा परिस्थितीत बालबच्च्यांसह संसाराचा गाडा रेटण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या या अभागी महिलांना करोनाचा मोठाच फटका बसला. त्यामुळे मोलमजुरी गेली. बंद झालेली घरेलू कामे पुन्हा मिळेनात. बाजारपेठेतील एखाद् दुसऱ्या दुकानातील ‘झाडू पोछा’चे कामही बंद झालेले. त्यातच पूर्वी गरजेपोटी काढलेले मायक्रो फायनान्स कंपन्यांचा वा खासगी सावकारांचा कर्जफेडीचा तगादा यामुळे जगायचे कसे आणि खायचे काय, असा प्रश्न आ वासून उभा ठाकला. त्यातूनच मग अनेक महिलांची वाटचाल या देहविक्रयाच्या धंद्याकडे झाल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे.

आसपासच्या अथवा पूर्वी केव्हातरी संपर्कात आलेल्या एखाद्या पुरुष वा महिलेकडून या असहाय महिलांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो. सहानुभूती दाखवत, मदत देण्याचा देखावा करीत त्यांना जाळ्यात ओढले जाते. परस्परविश्वास व जवळीक वाढल्यावर या महिला समोरच्या व्यक्तीचे भक्ष्य कधी बनल्या, हे कळेतो उशीर झालेला असतो. आर्थिक उधारी, कर्ज, मदत या प्रलोभनांतून समोरच्या व्यक्तीच्या आहारी गेलेल्या या स्त्रियांना मग एखाद्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्यात नेऊ न देहविक्रय करण्यास भाग पाडले जाते. त्यातून मिळालेल्या पैशातून घराचा गाडा चालवण्याची चिंता काहीशी दूर झाल्यासारखे या महिलांना वाटते. पुढे एका ठिकाणाहून दुसऱ्या कुंटणखान्यात पाठवले जाते. मदत करण्याच्या नावाखाली गोड बोलून या महिलांना देहविक्रय व्यवसायात ढकलल्यावर पुढे त्यांचे आर्थिक शोषण होण्यास वेळ लागत नाही.

सोलापुरात अशा तऱ्हेने गेल्या महिनाभरात कुंटणखान्यांत देहविक्रयासाठी आणल्या गेलेल्या स्त्रियांनी मांडलेली ही व्यथा भीषण वास्तव दर्शवणारी आहे. यापैकी चौघी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या कर्जाच्या ओझ्याखाली होत्या. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने हातचा रोजगार गेला आणि कर्जाचे हप्ते भरण्याची चिंता वाढली. त्यातूनच  देहविक्रय व्यवसायात यावे लागल्याची सल या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होती. करोनाने या असहाय महिलांना देहविक्रीस मजबूर केले होते.

सोलापुरात करोनाचे संकट आता हळूहळू दूर होत असताना त्याचे परिणाम अद्यापि गोरगरीबांना भोगावे लागत आहेत. त्यातूनच परिस्थितीपायी लाचार, हताश महिलांना बचत गटांचे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी देहविक्रय व्यवसायात ढकलण्याचा हा प्रकार धक्कादायकच आहे. करोनाकाळात महिला बचत गटांच्या कर्जाची हप्तेवसुली थांबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. परंतु तरीही कर्जवसुलीसाठी गोरगरीब महिलांना वेठीस धरून चक्क अमानवी वाहतुकीसाठी वापरले गेले असेल तर संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी.

      – प्रणिती शिंदे, आमदार

करोनाकाळात अडचणीत आलेल्या गरीब महिलांना देहविक्रय व्यवसायात लोटणाऱ्या अपप्रवृत्तींचा शोध घेऊ न अमानवी वाहतूक प्रतिबंध कक्षामार्फत अशांवर तीव्र कारवाई केली जाईल.

      – अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 4:10 am

Web Title: sex workers fight for survival during coronavirus crisis zws 70
Next Stories
1 ग्रामीण जीवनातले ‘मॉल’ हद्दपार
2 आपत्तीचे रूपांतर संधीत!
3 मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्थान कहते हैं..
Just Now!
X