शरद यादव

जॉर्ज फर्नाडिस यांना दीर्घ संघर्षांची कहाणीच मानता येईल. लोकांवर होणारे अत्याचार, जातीपातींच्या विद्वेषामुळे होणारा अन्याय या विरोधात जॉर्ज लढा देत राहिले. देशाच्या कानाकोपऱ्यात राजकीय संघर्ष करण्यासाठी जॉर्ज पोहोचत असत. मुंबईपासून उत्तर भारतापर्यंत जिथे जिथे ते गेले तिथली भाषा त्यांनी आत्मसात केली. ते मूळचे कर्नाटकातील असल्यामुळे त्यांना कन्नड येत होती. मराठी उत्तम बोलत. हिंदीवरही त्यांची पकड होती. या भाषा त्यांना बोलता येत असत असे नव्हे तर त्यात ते पारंगत होते. त्यामुळे लोकांशी संवाद साधण्यात त्यांना कोणतीही अडचण येत नसे. त्यांच्या भाषणातील आक्रमकता, प्रवाहीपणा यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत असत. जॉर्ज यांच्यात इतकी ऊर्जा होती की, एखाद्या मुद्दय़ावर संघर्ष करायचा असे ठरले तर ते शेवटपर्यंत पाठपुरावा करत. आंदोलन सोडून जाणे हे त्यांच्या स्वभावात नव्हते. ते सतत देशभर फिरत असल्यामुळे सारखा विमानप्रवास करावा लागे. मी अनेकदा त्यांच्याबरोबर प्रवास केला आहे. जॉर्ज विमानात मागच्या सीटवर बसून लिखाण करत असत किंवा पुस्तक वाचण्यात गर्क होत.

आणीबाणी लागू झाली तेव्हा माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले गेले. ‘मिसा’ कायद्याखाली कारवाई करण्यात आली. जॉर्ज फर्नाडिस भूमिगत झाले. आणीबाणीविरोधात भूमिगत राहून इंदिरा गांधींना विरोध करत राहिले. बडोदा डायनामाइट प्रकरणात त्यांना इंदिरा गांधींच्या सरकारने अटक केली होती. इंदिरा गांधीचे सरकार गेले पाहिजे यासाठी जॉर्ज यांची कुठलाही संघर्ष करण्याची तयारी होती. १९७७ मध्ये तुरुंगात असतानाच त्यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. प्रचंड बहुमताने ते जिंकले. पुढे जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्याविरोधातील खटला मागे घेतला.

जॉर्ज फर्नाडिस यांच्यावर डॉ. राम मनोहर लोहियांचा प्रभाव होता. लोहियांच्या संयुक्त समाजवादी पक्षात सक्रिय झाल्यानंतर जॉर्ज यांनी कामगार चळवळीत स्वतला झोकून दिले. जॉर्ज अत्यंत धाडसी कामगार नेते होते. मुंबईच्या बंदचे बादशाह मानले जात. त्यांनी रेल्वेचा ऐतिहासिक संप केला होता. १९६७ मध्ये स. का. पाटील यांच्यासारख्या बलाढय़ नेत्याचा लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेला पराभव हा त्यांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता. जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली कामगार चळवळ आक्रमक झाल्यानंतरच ती मोडून काढण्यासाठी शिवसेनेला बळ दिले गेले असे मानतात.

जबलपूर विद्यापीठात मी विद्यार्थी नेता होतो. आणीबाणीच्या काळात झालेल्या आंदोलनात मला अटक झाली होती. नागभूषण पटनायक आणि माझ्याविरोधात पहिल्यांदाच ‘मिसा’खाली कारवाई केली गेली होती. तीनवेळा माझ्याविरोधात ‘मिसा’ लावण्यात आला होता. विलासपूर आणि इंदौर तुरुंगात मला जॉर्ज येऊन भेटले होते. समाजवादी आंदोलनामुले मी प्रभावित झालो, त्याला जॉर्ज यांचे नेतृत्वही कारणीभूत होते. नंतर मी निवडणुकीच्या राजकारणात उतरलो. संपूर्ण क्रांतीचा नारा देणारे समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या खालोखाल दादा धर्माधिकारी त्यांना कार्यकर्ते मानत असत. जबलपूरमध्ये त्यांचे पुत्र अ‍ॅडव्होकेट जनरल होते. त्यामुळे धर्माधिकारी तिथे येत असत. शेठ गोविंददासही जबलपूरमध्ये असत. ते घटना समितीचे सदस्य होते. त्यांच्या निधनानंतर जबलपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. मी उमेदवार होतो. जॉर्ज प्रचारासाठी आलेले होते. त्यांनी निवडणुकीला आंदोलनाचे स्वरूप दिले होते. ‘मिसा’खाली अटक झाल्यानंतर माझ्या सुटकेसाठी जनमत तयार व्हावे यासाठी जॉर्ज यांनी खूप ठिकाणी भाषणे केली.

समाजवादी आंदोलन उत्तर प्रदेश, बिहारमध्येही तीव्र बनले होते. त्यामुळे जॉर्ज यांचे आंदोलन आणि राजकारण उत्तर भारतात सक्रिय राहिले. मुंबईतून जिंकणे अवघड झल्यामुळे पक्षाने त्यांना बिहारमधून निवडणूक लढवण्यास सांगितले. त्यांचा काँग्रेसविरोध प्रखर होता. त्यामुळेही ते वाजपेयींच्या ‘एनडीए’मध्ये सहभागी झाले. समाजवादी विचारांच्या पक्षांच्या चिंतांचे निरसन करण्याचा प्रयत्न जॉर्ज यांच्यामुळेच यशस्वी झाला असे म्हणता येईल. राजकारणात खाचखळगे येतच असतात. त्यांच्याही राजकीय आयुष्यात आले. त्यांचे आणि माझ्या संबंधातही तणाव निर्माण झाले. जनता दलाच्या नेतेपदासाठी ते माझ्याविरोधात उभे राहिले. नंतरच्या काळात त्यांना अल्झायमर झालेला होता. तरीही त्यांना काही लोकांनी निवडणुकीला उभे केले होते. पण, जॉर्ज यांच्यासारख्या लढवय्या नेत्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही.