के. सी. महाविद्यालयाचे ‘किचन फार्मिंग’ व ‘फार्मर्स मार्केट’
महाविद्यालये केवळ शिकवण्याचेच काम करतात असे नाही. तर आपल्या विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव व्हावी या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रमही महाविद्यालये हाती घेत असतात. यातून समाजालाच खूप काही मिळतेच इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्येही विविध नैप्युण्यांचा विकास होत असतो. मुंबई परिसरातील महाविद्यालयांनीही काही सामाजिक कामे हाती घेतली आहेत. ही कामे एकदा करून उपक्रम कागदावर दाखवून संपविली नाहीत तर ती वर्षांनुवष्रे सुरू आहेत आणि व्यापकही होत आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त अशा महाविद्यालयांच्या कामाचा घेतलेला हा वेध.
चर्चगेट येथील ‘के. सी. महाविद्यालया’च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ‘किचन फार्मिग’ व ‘फार्मर्स मार्केट’ या दोन प्रकल्पांतून शेतक ऱ्यांना साहाय्यक ठरणारा कार्यक्रम गेली काही वर्षे राबविला आहे. आपण रोज वेगवेगळ्या भाज्या बाजारतून विकत घेत असतो; परंतु हा भाजीपाला कसा पिकवला जातो, त्यासाठी करावी लागणारी मेहनत, बाजारपेठेपर्यंत होणारा त्याचा प्रवास याबद्दल मात्र आपल्याला फारसे माहिती नसते; परंतु आजच्या फास्ट फूडच्या युगात विद्यार्थाँना ही माहिती मिळावी तसेच त्यांनी या प्रक्रियेत स्वत: सहभागी व्हावे यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मंजू निचाणी तसेच एन.एस.एस. प्रमुख प्रा. सतीश कोलते यांच्या प्रयत्नाने हे दोन प्रकल्प राबविले गेले. यासाठी ११ वर्षांपासून सफाळा येथील करवाळे या गावाला दत्तक घेण्यात आले आहे. महाविद्यालयाकडून तेथील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भाज्यांच्या बिया लागवडीसाठी देण्यात येतात. या भाज्यांच्या लागवडीतून या कुटुंबांना वेगवेगळ्या भाज्यांच्या समावेश आपल्या आहारामध्ये करता आलाच शिवाय उरलेल्या भाज्या ते विकूही लागले. यामुळे या भागात बहुतांशी शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या कुटुंबांना कमाईचे एक साधन उपलब्ध झाले आहे. याचा फायदा सुमारे १५ कुटुंबांना झाला असून गेल्या दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करून त्यांना तांदळाचे जया, कोलम आदी बियाणे पुरवण्यात आले. त्यातून त्यांनी तांदळाचेही उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. या साऱ्या प्रक्रियेत ४० विद्यार्थी चार महिन्यांसाठी गावातील लोकांशी संपर्कात राहतात. लागवडीपासून, शेतीतील इतर सर्व कामात ते या शेतकऱ्यांना मदत करतात. त्यानंतर श्रावण महिन्याच्या सुमारास दोनवेळा तिथला हा भाजीपाला विद्यार्थी स्वत: चर्चगेटला घेऊन येतात व त्याचे महाविद्यालयात ‘फार्मर्स मार्केट’ भरवतात. यातून विद्यार्थ्यांना शेतक ऱ्यांच्या जीवनाची माहिती मिळतेच; परंतु विद्यार्थी स्वत: यात सहभागी होऊन अनुभव घेतात.