गणित, तत्त्वज्ञान आणि इतिहास असा तिपेडी वैचारिक संचार असणारे आणि पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ व वाईची प्राज्ञपाठशाळा यांच्या संस्थात्मक कामाला वाहून घेतलेले ज्येष्ठ अभ्यासक श्री. मा. भावे यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे सुहृद विश्वास दांडेकर यांनी रेखाटलेले त्यांचे प्रांजळ स्मृतिचित्र..

‘‘दांडेकर, या वर्षी मंडळात राजवाडे स्मृती व्याख्यान तुम्ही द्यायचे आहे. दोन-चार दिवसांत मला फोनवर विषय कळवा. राजवाडय़ांचा संचार होता त्या क्षेत्रांशी भाषण निगडित हवे, एवढी पूर्वअट लक्षात ठेवा.’’

स्थळ : वाई. यशवंतराव चव्हाणांची जन्मशताब्दी म्हणून प्राज्ञपाठशाळेत कार्यक्रम. तो संपवून बाहेर रस्त्यावर असताना मला ती आज्ञावजा विनंती. मी गप्प. बोलणेच शक्य होत नव्हते. प्रकांडपंडित इतिहासचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे आयुष्यातले आदरस्थान. हे भाषण द्यायला मी लायक नाही, हे समजत होते. मात्र आज्ञा देणारे होते श्री. मा. भावे. राजवाडय़ांनीच स्थापन केलेल्या पुण्याच्या ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’चे सेक्रेटरी (पुढे चालून अध्यक्ष).

त्यांच्याशी परिचय होता, पण जवळीक नव्हती. गणित हा माझा कच्चा विषय. भावे त्या विषयातले नाणावलेले प्राध्यापक. मात्र इतर विषयांवर त्यांचे लिखाण वाचण्यात येत असे. त्यांच्या व्यासंगाबद्दल खूप ऐकले होते. थोडी ओळखही होती. ती ‘नवभारत’ मासिक व प्राज्ञपाठशाळा यामुळे.

त्या दिवशी यशवंतरावांच्या स्मृती कार्यक्रमात १९६५ च्या युद्धावर चर्चा अर्थातच होती. हा विषय आपल्या अभ्यासाचा नाही, त्यामुळे मते देण्याच्या भानगडीत पडू नये याचे भान नसलेली काही माणसे अशा चर्चासत्रात असतात. अशापैकी एकाने काही हास्यास्पद गोष्टी वस्तुस्थिती (फॅक्ट्स) म्हणून मांडल्या. त्या खोडून सत्य मांडण्यासाठी मी उभा राहिलो. यशवंतरावांशी असलेला थोडा परिचय कामी आला (मुद्दा : शक्य असताना लाहोर ताब्यात का घेतले नाही?). युद्धशास्त्र हा सखोल अभ्यासाचा नसला, तरी खूप वाचनाचा विषय होता. तेवढय़ा मांडणीवर भावेंनी वरील आज्ञापत्र जारी केले. मंडळात व्याख्यान दिले. सोबत पत्नीलाही आणा, असा आग्रह त्यांनी फोनवर केला. अत्यंत सौजन्याने त्यांनी उभयतांना मंडळ, ग्रंथसंग्रह, चित्रसंग्रह दाखवला. काही बारकावेही उलगडले.

तिथून खासकरून फोनवर भेटीगाठी सुरू झाल्या. आठ-पंधरा दिवस झाले की मी फोन करत असे. खंड पडला तर त्यांचा फोन येई. अनेक विषयांवर बोलणे होई. त्या त्या विषयातली, पण माझ्या पाहण्यात नसलेली महत्त्वाची पुस्तके ते सुचवत. इतिहास, परराष्ट्रसंबंध, तत्त्वज्ञान, युद्धेतिहास, मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी, आठवणी.. खूप आनंदाचा भाग. माझ्यासारख्या सामान्य वाचकाला बरोबरीच्या नात्याने वागवण्याची त्यांची हातोटी विलोभनीय होती. त्याच वेळी त्यांच्या पाहण्यात नसलेला एखादा संदर्भ माझ्या बोलण्यात आला, तर ते आवर्जून तपशील विचारून घेत.

त्यांच्या व्यासंगाच्या विषयावर आयोजित अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये निबंध वाचण्यासाठी त्यांना आमंत्रणे आली. साहजिकच त्यांचा परदेश प्रवासही व्यक्तिमत्त्वाच्या संपन्नतेत भर घालणारा ठरला. खूपसा भारतही त्यांनी न्याहाळला होता. एकदा- ‘‘आता काही काळ बोलणे होणार नाही, कारण मी काही दिवस बनारसला (वाराणसी) जाऊन राहणार,’’ असे त्यांच्या बोलण्यात आले, तेव्हा आजवर वाराणसी ‘घडले’ कसे नाही, असा प्रश्न माझ्यातर्फे आला. तसे नव्हते, बनारसला ते पूर्वी एकाहून जास्त वेळा गेले होते. पण कुठलाही हेतू-इच्छा-प्रयोजन नसताना तिथे जाऊन राहण्याची ओढ त्यांना जाणवत होती. त्या सादाला प्रतिसाद देत ते तिथे जाऊन आले. अशा कोडय़ांना उत्तरे नसतात.

गोरापान वर्ण, वयोमानाने विरळ केस, साधा पायजमा-कुर्ता वा पँट-बुशशर्ट असा त्यांचा थाट असे. मध्यम उंची, स्पष्ट शब्दोच्चार अबाधित ठेवत जरा जलद बोलणे.

वाडिया महाविद्यालय, आयआयटी (पवई) इथले शिक्षण क्षेत्रातले कर्तृत्वाचे दिवस सरल्यावर त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ व प्राज्ञपाठशाळा-वाई या दोन संस्थांच्या कामाला वाहून घेतले. ‘नवभारत’ मासिकाचे संपादन काही वर्षे सर्व अडचणी सोसून करत राहिले. ‘नवभारत’च्या दर्जाला शोभतील असे लेख मिळत नाहीत, अशी खंतही त्यांच्या बोलण्यात डोकावे.

त्यांचा माणसांचा संग्रह ग्रंथसंग्रहाप्रमाणेच मोठा व विविधक्षेत्री होता. हा सर्व व्याप ते कसे लीलया पेलत, हे मला नेहमीच कुतूहल होते.

भावे वहिनींशी माझी प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही. पुण्यात याल तेव्हा घरी अवश्य या, असा आग्रह त्यांनी अनेकदा केला, पण योग नव्हता. वहिनींची सायकलस्वारी मात्र त्यांच्या बोलण्यात नेहमी येई. भावे वहिनींनी सायकल चालवत जवळपास सर्व भारत न्याहाळला आहे. अगदी लेह-लडाख, सिक्कीम ते कन्याकुमारी. जीवघेण्या आजारपणातून वाचल्यावर उभे राहण्यापुरती शक्ती पायात येण्यास निदान दीड-दोन महिने लागतील, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे निदान असताना पंधरा-वीस दिवसांत त्या सायकल चालवण्याइतकी शक्ती कमवू शकल्या. भावे सरांचे जाणे सोसण्याचे बळ त्यांना मिळो, असे म्हणण्यापेक्षा ते बळ स्नेहीजनांना लाभो असे मला जाणवते.

अलीकडे भावेंची प्रकृती अधूनमधून त्रास देत होती. प्रकरण इतके गंभीर होईल असे कधीच वाटले नाही. रविवार, ४ ऑक्टोबर २०२० च्या ‘लोकसत्ता’त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आठवणी जागवणारा भावेसरांचा सुंदर लेख वाचला. खूप बरे वाटले. पण खरे सांगायचे तर मनात पाल चुकचुकली. लेखात ज्या ‘लोकायत’ या गाजलेल्या ग्रंथाचा उल्लेख आहे, त्याचे लेखक हे तिथे नोंदल्याप्रमाणे डॉ. पी. सी. भट्टाचार्य नव्हेत. त्या ग्रंथाचे लेखक देवीप्रसाद चट्टोपाध्याय. या पंडिताची ‘हिस्टरी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी इन एन्शंट इंडिया’, ‘व्हॉट इज लिव्हिंग अ‍ॅण्ड व्हॉट इज डेड इन इंडियन फिलोसॉफी’ अशी आणखीही पुस्तके आहेत. भावेसरांबरोबरच्या गप्पांमध्ये त्यांनी ‘लोकायत’संबंधी बोलण्याच्या ओघात देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या कलकत्ता (कोलकाता) इथे झालेल्या भेटीचे व हा संपर्क नंतरही सुरू राहिल्याचे सांगितले होते. डॉ. स. रा. गाडगीळांनी ‘लोकायत’चे भाषांतर केले नाही, तर त्या महाग्रंथाची ओळख मराठी वाचकांना व्हावी, मूळ ग्रंथाकडे वळावे या हेतूने ‘लोकायत’ या नावानेच मराठीत एक छोटेखानी पुस्तक लिहिले. भावेसरांची स्मरणशक्ती उत्तम होती. तपशिलावर त्यांची नीट नजर असे. त्यामुळे काही तरी वावगे घडले आहे, असे जाणवून फोन केला, तो वहिनींनी त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवल्याचे सांगितले. बहुधा हा लेख त्या आजारी अवस्थेत लिहिला असावा, असे आज जाणवते. म्हणजे हा योद्धा अखेपर्यंत लढतच होता. डाइड इन हार्नेस.. घोडय़ावर शेवटपर्यंत स्वार, असे वीरमरण.

त्यांचे उत्तरायुष्य ज्या वर उल्लेखित संस्थांसाठी त्यांनी वेचले, त्या दोन्ही संस्थांना हा आघात जिव्हारी लागणारा. माझ्यासारख्या त्यांच्या असंख्य स्नेह्य़ांना हे त्यांचे अज्ञाताच्या प्रवासाला एकाएकी जाणे न रुचणारे, न पटणारे. पण दुर्दैवी असे वास्तव स्वीकारणे भाग आहे.

हा हन्त, हन्त नलिनिम्..!