सण म्हणजे आनंद आणि संगीत म्हणजेही आनंद, त्यामुळे सणांना संगीताची जोड मिळणे हे अगदी साहजिकच आहे. मात्र संगीत कशाला म्हणावे आणि गोंगाट म्हणजे काय, यातील रेषाच पुसून टाकल्यावर काय होते ते गणेशोत्सवांच्या बहुतांश मंडप आणि मिरवणुकांमध्ये दिसून येते. लोकांसाठी सुरू झालेल्या उत्सवांमधून आनंदाऐवजी त्रास पसरवण्याचे हे प्रमाण जनजागृतीनंतरही फारसे कमी होताना दिसत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ २००६ पासून ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप करते. दरवर्षी ध्वनी पातळीचे आकडे नोंदले जातात, गेल्या वर्षीच्या उत्सवाशी तुलना केली जाते आणि पुन्हा सारे थंड होते.
ध्वनिप्रदूषणाच्या नियमांनुसार निवासी भागात सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलची मर्यादा घालून दिलेली आहे. त्यातही शाळा, रुग्णालय, न्यायालय आदींच्या शंभर मीटर परिसरातील शांतता क्षेत्रात ही मर्यादा पाच डेसिबलनी आणखी खाली आहे. मात्र मप्रूनि मंडळ करत असलेल्या २५ ठिकाणांच्या पाहणीत मोजके अपवाद वगळता एकाही ठिकाणी या मर्यादेपेक्षा कमी आवाज आढळलेला नाही. प्रत्येक विभागाची दरवर्षांची ध्वनी पातळी बदलत राहते, मात्र ती निर्धारित पातळीपेक्षा वरच असते, हे लक्षात घ्यायला हवे. सर्वसाधारणपणे प्रत्येक विभागात आवाजाची सर्वोच्च पातळी ९० डेसिबलपेक्षा जास्त नोंदवली जाते. दिवाळीतील सुतळी बॉम्बचा आवाज हा साधारणपणे ११५ डेसिबल, तर फटाक्यांच्या माळांचा आवाज हा ९० डेसिबलएवढा असतो. त्यावरून या आवाजाची आणि त्याच्या त्रासाची कल्पना येऊ शकते.
पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न तर त्यापेक्षा गंभीर आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, मूर्तीवरील रासायनिक रंग तसेच निर्माल्य पाण्यात मिसळून होत असलेल्या प्रदूषणाचा अंदाज आल्याने पालिकेने विविध पातळ्यांवर पुढाकार घेतला. जलसाठे सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेने आखलेल्या निर्माल्य कलश योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असून कृत्रिम तलावांचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. मात्र या सगळ्यातील विरोधाभास असा की, कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या मूर्तीचा गाळ पुन्हा समुद्रातच टाकला जातो. शाडू मातीच्या मूर्ती घेण्याचे प्रमाण वाढत असले तरी त्यामुळेही प्रदूषण होत असल्याचे आयआयटीचे प्राध्यापक डॉ. श्याम असोलेकर यांनी केलेल्या पाहणीत दिसले आहे.