05 March 2021

News Flash

स्वागत दिवाळी अंकांचे!

अक्षर ‘वीमेन अनलिमिटेड’ या विशेष लेखमालेसह भरगच्च मजकुराने सजलेला अक्षर दिवाळी अंक म्हणजे साहित्याची मेजवानीच! या अंकात संध्या गोखले, वंदना भागवत, राजकुमार तांगडे, अनघा भट आणि

| November 20, 2012 05:07 am

अक्षर
‘वीमेन अनलिमिटेड’ या विशेष लेखमालेसह भरगच्च मजकुराने सजलेला अक्षर दिवाळी अंक म्हणजे साहित्याची मेजवानीच! या अंकात संध्या गोखले, वंदना भागवत, राजकुमार तांगडे, अनघा भट आणि ऋषीकेश गुप्ते यांच्या कथा आहेत. ‘वीमेन अनलिमिटेड’ या विशेष लेखमालेत मलाला युसुफझाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां दिवंगत मृणाल गोरे, सरोगेट मातांचं वसतिगृह सुरू करणाऱ्या डॉ. नयना पटेल, स्त्रीवादी प्रकाशक रितू मेनन, युद्धाचे वार्ताकन करणारी मारी कॉल्विन यांची ओळख करून देण्यात आली आहे.
त्यासोबत रामदास भटकळ, प्रज्ञा पवार, सत्यजित भटकळ, लक्ष्मण माने, सुबोध जावडेकर, अनिल अवचट, निळू दामले आदींचे लेख आहेत. या अंकात मेधा पाटकर, उषा मेहता, शांताराम पवार यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.               संपादक – मीना कर्णिक, हेमंत कर्णिक,
पृष्ठे-२५८, किंमत – १०० रु.

रुची
यंदाच्या ‘रुची’ दिवाळी अंकाचे वेगळेपण म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी ओमान-मस्कतमध्ये आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या डॉ. आत्माराम जयकर यांची ओळख करून देणारा डॉ. उज्ज्वला दळवी यांचा विशेष लेख. त्यासोबत मेहदी हसन या गझलसम्राटाचा जीवनपट रेखाटणारा आसिफअली पठाण यांचा लेख तसेच मायकेल अ‍ॅन्जेलो आणि लिओनार्दोदा विंची या एकाच काळातील दोन महान कलाकारांवर बेतलेला दोन दिग्गजांची टक्कर हा डॉ. माधवी मेहेंदळे यांचा लेख हे या अंकाचे शक्तिस्थान. त्यासोबत या अंकात वसंत वसंत लिमये यांचा ‘कुंडलिका एक कहाणी’, हेमंत देसाई यांचा ‘प्रश्नांची वखार’ हे लेख आहेत. ‘चिनी प्रवासी फा-हियान’ हा सुहासिनी देशपांडे यांनी केलेला भावानुवाद, ‘मौनाचे झरोके भले’ हा डॉ. यशवंत पाठकर यांनी लिहिलेला लेख, प्रभाकर वाईरकरांचा ‘फ्रान्स, मी आणि ‘आलम’गिरी, अरुण पुराणिक यांचा ‘जीना इसी का नाम है’ अशावविध विषयांवरील लेखांनी ‘रुची’दिवाळी अंक सजला आहे.
संपादक – दिनकर गांगल,
पृष्ठे – २००, किंमत – १०० रु.

कलमनामा
‘कलमनामा’ या अंकात राजन गवस यांचा ‘नातं असलेलं आणि संपलेलं’ आणि प्रभाकर वाईरकर लिखित ‘बाळासाहेब आणि डेव्हिड लो’ हे विशेष लेख आहेत. त्यासोबत ‘आंदोलनातील जिव्हाळा’ – उल्का महाजन, ‘कलाकृतीमागची नाती’ – रेखा देशपांडे, ‘संबंधांचं बदलतं वास्तव’ – गजानन खातू, ‘राजकारण्यांच्या घराण्यात’ – धनंजय कर्णिक, ‘साऱ्याजणींच्या परिवारात’ – विद्या बाळ, ‘अल्पवयीन बाई’ – छाया दातार, ‘विद्वेष आणि सहजीवन’ – अब्दुल कादर मुकादम, ‘नाटककाराची ‘पात्र’ प्रसूती’ –  राजकुमार तांगडे, ‘मैत्रेयावर बोलू काही..’ – सलील कुलकर्णी, ‘योग : कर्मसु कौशलम्’ – अविनाश धर्माधिकारी आदी दर्जेदार लेखांचा समावेश आहे. त्यासोबत नीरजा यांच्या कविताही आहेत.
 संपादक – युवराज मोहिते,
पृष्ठे – १४४, किंमत – १०० रु.

लीलाई
‘लीलाई’ दिवाळी अंकात विजया राजाध्यक्ष, विजया वाड, किशोर परब, दत्ता केशव आदींच्या कथा आहेत. त्यासोबत शंकर सखाराम, ह. शि. खरात, प्रा. पु. द. कोडोलीकर आदींच्या विनोदी कथा आहेत. गंगाराम गवाणकर, अशोक पाटोळे, फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आत्मानुभव आहेत. चंद्रशेखर धर्माधिकारी, अ‍ॅण्ड्रय़ू कोलासो, शशी भालेकर यांचे लेख आहेत.
अनिल कुलकर्णी, जोसेफ तुस्कानो यांचे ललित लेख आहेत. सूर आत्मा की शब्द आत्मा, भारतीय चित्रपटसृष्टीचा शतकी उंबरठा, भारतीयांचे परदेशगमन या विषयांवरील परिसंवादांचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. तसेच शिरीष पै, प्रवीण दवणे, सिलिलिया काव्‍‌र्हालो, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर यांच्या कविता आहेत.
 संपादक – अनिलराज रोकडे,      पृष्ठे  २०८, किंमत – १०० रु.

चित्रलेखा
साप्ताहिकांच्या दुनियेत आपले स्वत:चे वेगळे स्थान जपणाऱ्या चित्रलेखाचा यंदाचा दिवाळी अंकात विविध विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमीच्या हास्यविनोदांसह विचार करायला लावणारे अनेक लेख चित्रलेखाच्या दिवाळी अंकात सामावले आहेत.
महाराष्ट्रातील राजकारणात राजकारण्यांची नवी पिढी उतरली आहे. आपल्या वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल करताना स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांची चाललेली धडपड मांडणारा लेख नव्या राजकीय नेतृत्वाची झलक मांडतो. एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या मुक्ता बर्वे हिच्या कारकीर्दीचा घेतलेला धावता आढावा, दहशतवादाने उद्ध्वस्त झालेल्या काश्मीर आणि तेथील माणसांचा अनुभव सांगणारा पुण्याच्या सारंग गोसावी या तरुणाचा तसेच संध्या नरे-पवार यांचा लोककलेतील महिला कलाकारांचा बहार यांसह अनेक विविध विषयांना हात घालणारे लेख वाचनीय आहेत. मराठी आणि कानडी हा भाषावार आणि प्रांतरचनेनुसार बेळगावच्या आग्रहाची तपासणी करणारा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा लेख वाचकांना विचार करायला लावणारा आहे.
संपादक- ज्ञानेश महाराव,
पृष्ठे -१३०, किंमत -३५ रुपये

मुंबई तरुण भारत
 
देशातील विविध भागांतील मुस्लिम विचारवंत, अभ्यासक, विद्यार्थी तसेच मौलवी यांच्याशी झालेल्या चर्चेवर आधारित ‘मुस्लिमांच्या विचारांच्या दिशा’ हा प्रमोद बापट यांचा लेख हे ‘मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंकाचे मुख्य वैशिष्टय़. केरळ, देवबंद, मेघालय, मणिपूर अशा देशांतील विविध भागांतील मुस्लिम मनाचा परामर्श बापट यांनी या लेखात घेतला आहे.
त्याचबरोबर आझाद हिंद सेना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील कृतीपूर्ण वैचारिक सहबंध उलगडणारा सच्चिदानंद शेवडे यांचा लेख हा प्रत्येक इतिहासप्रेमींनी वाचावा असा आहे.
वैदर्भीय बहिणाबाई हा डॉ. यू. म. पठाण यांचा लेख चांगलाच जमला असून  ईशान्य भारतामधील घुसखोरीवर हेमंत महाजन यांनी लक्ष वेधले आहे. ‘मायबोलीतून करियरच्या वाटा’ या विषयातील परिसंवादामध्ये मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या विविध क्षेत्रांतील युवकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
 ‘तणमोर’या दुर्मिळ पक्ष्याचे संवर्धन करणाऱ्या प्रकल्पाबद्दल मंदार मोरणे यांनी तर नागपूरमधील वारांगनाच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या रामभाऊ इंगोले यांचा परिचय करून देणाऱ्या लेखांचाही या दिवाळी अंकात समावेश आहे.

कार्यकारी संपादक – किरण शेलार
पृष्ठे – १६२, किंमत – १०० रु.

साहित्य संगम
ग्रामीण भागातून पत्रकारिता करीत २५ वर्षांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या उमाकांत वाघ यांच्या ‘पत्रकारितेची पंचविशी’ या विषयावर शरद सीताराम कुलकर्णी, बिपिन ढापरे, नंदकुमार जावळे, निरंजन राऊत, वामन गुणा पाटील, ज. गो. मराठे यांचे लेख, सदानंद संख्ये, बावतीस फर्नाडिस, संगीता धायगुडे, मीनाक्षी अय्यंगार, विद्या मोरे यांच्या सुंदरशा लघुकथा, स्त्रीभ्रूण हत्येवर मोहन ढवळीकरांचा विशेष लेख. अमृता कुलकर्णी, प्रा. हिलरी फर्नाडिस,  यांचे विशेष लेख. हे भरीव साहित्य या अंकात असून मुखपृष्ठही आकर्षक आहे.
संपादक –  उमाकांत वाघ,
पृष्ठे – १२०, किंमत – ५० रुपये

 उल्हास प्रभात
साप्ताहिक उल्हास प्रभातच्या १८व्या दीपावली विशेषांकात ४०० वर्षांपूर्वीचा बंगला, ५२ दरवाजे, पहिल्या मजल्यावर, मातीची जमीन, खाली भुयार वर अंधारकोठडी. १०० वर्षे बंद तळघर, भुजंगराज सापाची संपत्ती, का आहे याचे रहस्य याविषयी विशेष मुखपृष्ठ कथा विनायक चांदोरकर यांनी लिहिली आहे.
 गूढ गादीतले-रेखा नाबर, आमच्या लग्नाची गोष्ट- विलास शिंदे, एकावर एक फ्री-पद्मा देशपांडे, उठी उठी गोपाळा-मंजिरी मुळ्ये बायांनो-मुलींनो ओढणी सांभाळा- सुभाष जैन, मोबाईलचा इतिहास- गुरुनाथ बनोटे, मी पाहिलेले बुवा-आत्माराम नाटेकर, सहल अंदमानची-ज्योती गोसावी आदींच्या साहित्याने उल्हास प्रभातचा अंक सजला आहे.
संपादक- गुरुनाथ बनोटे,
पृष्ठे-१३२,  किंमत- ६० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2012 5:07 am

Web Title: welcome to diwali magazines 2
टॅग : Diwali,News
Next Stories
1 ती भेटच अखेरची ठरली..
2 हळवा ‘हृदयसम्राट’!
3 मी असा का वागतो?
Just Now!
X