महेश सरलष्कर

अटलबिहारी वाजपेयींच्या भाजपकडे विरोधकांचा आदर करण्याचे औदार्य होते. अमित शहांच्या भाजपची प्रतिमा सत्तेचा एकछत्री अंमल करणारा पक्ष अशी होऊ लागली आहे. शहा यांचे महाराष्ट्रातील डावपेच त्यात आणखी भर घालतात..

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग

प्रादेशिक पक्षांशी युती वा सामंजस्य करत करत भाजप मोठा होत गेला. एक एक राज्य ताब्यात घेतले. त्यापुढील टप्पा असतो प्रादेशिक पक्षांना दुय्यम स्थान देण्याचा. महाराष्ट्रात भाजपने पाच वर्षे राज्य केले. त्यामुळे शिवसेनेला कायमस्वरूपी छोटा भाऊ  बनवून टाकण्याचा विचार भाजपने केला असावा. इथे ‘भाजपने’ असे म्हणत असताना पक्षाचे केंद्रीय नेतृत्व नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे अध्याहृत आहेत; त्यातही प्रामुख्याने अमित शहाच! गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेनेने युती न तोडता भाजपला सतावले. भाजपचे सगळेच कातावले होते; पण अमित शहा यांची सहनशक्ती दांडगी आहे. लोकसभा निवडणूक होईपर्यंत शांत राहण्याचे धोरण त्यांनी अंगीकारले. विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेला जागावाटपापासून सत्तावाटपापर्यंत सगळ्याच मुद्दय़ांवर मात देण्याचे शहांनी ठरवलेले होते. सातारा लोकसभा मतदारसंघ मूळचा शिवसेनेचा; पण तो शिवसेनेला न विचारताच स्वत:च्या ताब्यात घेतला गेला. उदयनराजेंना प्रवेश देऊन उमेदवारीही घोषित केली गेली. त्यामुळे शिवसेनेने सातत्याने भाजपसमोर नमते का घ्यायचे, असा शिवसेनेचा सवाल होता. पण विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल या गृहीतकावर शहांनी महाराष्ट्रात राजकीय डावपेच आखले होते. मतदारांनी भाजपला सर्वाधिक जागा मिळवून दिल्या, पण बहुमत मिळू दिले नाही. इथे शहांचे गणित गडबडले. प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी करण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्रात खीळ बसली.

हरियाणातही मतदारांनी भाजपला नाकारले, पण तिथे शहांनी ‘धोरणीपणा’ दाखवत भाजपच्या विरोधात लढलेल्या जननायक जनता पक्षाच्या दुष्यंत चौताला यांना ‘आपलेसे’ केले, सत्तेत भागीदारी दिली; चौतालांचे वडील लगेचच तुरुंगातून बाहेर आले! अनेकांना आपलेसे करण्यात अमित शहांचा हातखंडा असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. महाराष्ट्रात शिवसेना आपलीशी व्हावी यासाठी शहांनी खूप वाट पाहिली. पण उद्धव ठाकरे यांनी शहांना दाद दिली नाही. अखेपर्यंत भाजपकडून शिवसेनेला आमिषे दाखवली गेली, पण त्यात शहा कधी नव्हे ते अपयशी ठरले. नरेंद्र मोदी-शरद पवार यांच्या भेटीचा दाखला देत, मोदी-शहा हे शरद पवारांपुढे कसे नमले नाहीत आणि म्हणूनच पवारांनी महाविकास आघाडीचे सरकार कसे बनवले, असा युक्तिवाद करून मोदी-शहांना नैतिक बळ देण्याचा प्रयत्न आता जोराने केला जाऊ  लागला आहे.

राज्यात भाजपची सत्ता स्थापन होत नव्हती तरी, दिल्लीत अमित शहा आणि मुंबईत देवेंद्र फडणवीस अत्यंत शात होते आणि त्यांना भाजपचीच सत्ता येणार याबद्दल खात्री होती. पण अमित शहांनी महाराष्ट्राला ओळखण्यात चूक केली असावी. गोवा वा अन्य छोटय़ा राज्यांमध्ये भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता ताब्यात घेतली. कर्नाटकमध्ये सातत्याने ‘कमळ मोहीम’ राबवून भाजपने सत्ता मिळवली. ही मोहीम येडियुरप्पा यांनीच केली, त्यात केंद्रीय नेतृत्वाचा हात नसल्याचा देखावा उभा केला गेला. पण मोहीम भाजप नेतृत्वाच्याच मार्गदर्शनात राबवली गेल्याचे आता सांगितले जाऊ  लागले आहे. महाराष्ट्रातही हाच प्रयोग त्याच भाजप नेतृत्वाच्या आशीर्वादाने केला गेला. अलगदपणे अजित पवारांना भाजपकडे वळवून भाजपची नवी युती स्थापन करण्याचा प्रयत्न होता.

अटलबिहारी वाजपेयींच्या भाजपकडे विरोधकांचा आदर करण्याचे औदार्य होते. शहांच्या भाजपची प्रतिमा सत्तेचा एकछत्री अंमल करणारा पक्ष अशी होऊ  लागली आहे. शहांचे महाराष्ट्रातील डावपेच त्यात आणखी भर घालतात. मात्र ईडीचा ससेमिरा मागे लावून फार काळ लोकांना अंकित करता येत नाही, याची प्रचीती भाजपच्या नेतृत्वाला महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे झाली, हे महत्त्वाचेच! ‘काँग्रेसमुक्त’ म्हणजे विरोधी पक्षमुक्त भारताचे ध्येय पूर्ण करणे हाच गेल्या पाच वर्षांतील भाजपनेतृत्वाचा एककलमी कार्यक्रम राहिला आहे. त्यासाठी कोणत्याही मार्गाचा (गैर)वापर करून राज्यांमधील सत्ता टिकवण्यावर भर दिला जातो. भाजपनेतृत्वाच्या या मनीषेवर महाराष्ट्राने अंकुश लावलेला आहे.