गुन्हेगाराची ओळख चुटकीसरशी पटवणे शक्य व्हावे, या उद्देशाने ‘सायबर महाराष्ट्र’ने निर्माण केलेल्या ‘अ‍ॅम्बिस’ (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेण्टिफिकेशन सिस्टीम) ही अद्ययावत प्रणाली नव्या वर्षांत राज्यभर कार्यान्वित होणार आहे. यंदा जुलैमध्ये या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले असून मुंबई पोलीस तिचा वापर करत आहेत. उर्वरित राज्यात ही प्रणाली सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

‘पोलिसांचे गूगल’ अशी ख्याती लाभलेल्या अ‍ॅम्बिसमध्ये १९६० पासून जून महिन्यापर्यंत अटक झालेल्या साडेसहा लाखांहून अधिक आरोपींचे तपशील डिजिटल स्वरूपात साठविण्यात आले आहेत. जूननंतर अटक होणाऱ्या आरोपींचे बुब्बुळ, हाताचे ठसेही अन्य तपशिलांसोबत साठविले जात आहेत. उंगली मुद्रा, हाताचे ठसे, बुब्बुळ, सीसीटीव्हीने टिपलेले छायाचित्र किंवा छायाचित्रण अशी तपशील प्रणाली तपासून आरोपीची ओळख एका झटक्यात पटवून देते. त्यामुळे आरोपी झटपट अटक करणे शक्य होते. ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर ती कोणत्याही पोलीस ठाण्यातून हाताळणे शक्य आहे. याआधी छायाचित्र, नाव-पत्ता आदी तपशील आणि उंगली मुद्रांआधारे (फिंगर प्रिण्ट) आरोपींची ओळख पटवली जात होती. त्यासाठी पुणे येथील केंद्राकडे पोलिसांना धाव घ्यावी लागे. सीसीटीव्हींनी टिपलेले छायाचित्र किंवा चित्रण अंधूक असल्यास आरोपींची ओळख पटवणे पोलिसांसाठी अशक्य होते. मात्र आता निव्वळ १६ अंशांच्या कोनातील, म्हणजेच ओझरता चेहरा दिसेल अशा छायाचित्रांवरूनही अ‍ॅम्बिस आरोपीची ओळख पटवू शकेल, हे विशेष. देशात ही अद्ययावत यंत्रणा स्वतंत्रपणे निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. अद्ययावत यंत्रणा, अचूकतेच्या स्पर्धेत अ‍ॅम्बिस आणि सायबर महाराष्ट्र चमूने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील सहा पारितोषिके पटकावली आहेत.

बलात्कार, हत्या, दरोडा, जबरी चोरी किंवा महिलांविरोधातील गुन्हे घडल्यानंतर आरोपीची ओळख पटणे सर्वात महत्त्वाचे असते. ती पटली की पुढला तपास सुकर होतो. चाचण्या पूर्ण होताच, पुढल्या दोन महिन्यांत ही प्रणाली राज्यात सर्वत्र सुरू होईल. त्यामुळे गुन्ह्य़ांची उकल झटपट होईल आणि दोषसिद्धी दरही वाढेल, असा विश्वास सायबर महाराष्ट्रचे प्रमुख ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.