मोठय़ा उपक्रमामागे तितकीच मोठी व्यक्ती असेल तर काम काही काळातच हातावेगळे होते. याचाच एक खासा नमुना पाहायला मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यात एका सेवाभावी संस्थेने अन्य संस्थांना अर्थसाहाय्य करणारा उपक्रम आयोजित केला होता. त्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. सेवेचे महत्त्व त्यांनी विशद केले. याचवेळी अशा कामांसाठी पैसे कधी कमी पडत नाहीत; काहीतरी मार्ग निघतोच, असे सांगताना त्यांनी हा किस्सा कथन केला. कणेरी मठात पंचमहाभूत महोत्सवाअंतर्गत तारांगण उभे करणारा भव्य मंडप साकारायचा होता. संयोजकांनी खर्च सांगितला पावणेदोन कोटी. याचवेळी मंत्री महोदयांकडे पुण्यात एक उद्योगपती आमच्या लेखी काही काम सांगा, असे सांगत आला. त्यास त्यांनी तारांगणसाठी ५० लाख रुपयांची मदत देण्यास सांगितले. मंत्रालयात एक जण जुनी फाइल तटली आहे; ती मार्गी लावायला हवी, असे सांगत आला. त्यास कोटीचा धनादेश देण्यास फर्मावले. असेच आणखी एकास २५ लाख रुपये देण्याचे फर्मान सोडले. आणि मग अशी हा हा म्हणता पावणेदोन कोटींची सोय झाली. सत्तेसमोर सारे मार्ग कसे लीन होतात याचाच हा दाखला.

कोण हा भाऊ ?

भाऊ म्हणजे सध्या जिल्ह्यातील मोठी असामी. सरकार दरबारी तर भाऊच्या शब्दाविना कागदाचे पानही हलणार नाही अशी स्थिती गेल्या आठ-दहा महिन्यांपासून. मात्र, गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीची गणिते जुळविण्याचे काम करणारे स्वीय सहायक म्हणजेच मास्तर अलीकडच्या काळात दुर्लक्षित झाले होते. कायम भाऊसोबत मोटारीत जागा आरक्षित असताना अचानक भाऊंना पुत्रप्रेमाचा पुळका आला आणि स्वीय सहायकांसाठी वेगळी मोटार घ्यावी लागली. लोकांनाही दोघांमध्ये काही तरी दुरावा निर्माण झाल्याचा संशय येत होता. विकास कामाच्या जाहिरातीवरील फोटोमध्येही बदल झाला होता. ही धुसफुस गेली तीन महिने तर इतकी वाढली की, विरोधकांना आयता उमेदवार मिळणार अशा बातम्याही आल्या. अखेर या मतभेदाची दखल पक्षाला घ्यावी लागली आणि एका वरिष्ठ नेत्याने हस्तक्षेप केल्याने हा वाद पेल्यातील ठरला.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

आवाज कुणाचा?

गमछा, कपाळावर कधी उभे मोठे कुंकू किंवा गोल अष्टगंध, हातात नाना प्रकारचे दोरे घातलेला गर्दीतल्या कार्यकर्त्यांना साद घालण्यासाठी एक घोषणा व्हायची – ‘आवाज कुणाचा?’ आणि प्रतिसाद यायचा ‘शिवसेनेचा’. या गगनभेदी घोषणांची ऊर्जा राजकीय पटलावर पोहचत असे. महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ छत्रपती संभाजीनगरमध्ये आवळली गेली, तेव्हा त्याच जुन्या शिवसैनिकाने आवाज लावला. ‘गोब्राह्मण प्रतिपालक, सह्याद्रीचा जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज की.. आणि प्रतिसादाचा जय. त्यामुळे सभेतील वातावरण अधिक ऊर्जावान बनविले जात होते. या घोषणेपाठोपाठ नेहमीची घोषणा झाली ‘हा आवाज कुणाचा?’ आणि व्यासपीठावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते बसलेले असल्याने घोषणा देणाऱ्याला कळाले. आता प्रतिसादामध्ये ‘महाविकास आघाडी’चा असे उत्तर यावे. पण तसे येणार नाही असे कळाले आणि मग त्यानेच स्वत:च प्रतिसाद देत ‘महाविकास आघाडीचा’ असे सुचवून पाहिले. पण पुढे आवाज कुणाचा ही घोषणा न दिलेलीच बरी, हे जुन्या शिवसैनिकासही आता कळून गेले.

(संकलन : सुहास सरदेशमुख, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे)